एजबॅस्टनच्या मैदानात अखेर इंग्लिश आर्मीने भारताला चीत करत मालिकेत आघाडी घेतलीच. अतिशय कडवा संघर्ष सामन्यात पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने कसोटी लागली ती क्रिकेटिंग स्किल्ससोबतच टेम्परामेंट आणि टेक्निकची. दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांनी जान ओतून गोलंदाजी केली. म्हणजे भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या भूमीवर त्यांच्याच फलंदाजांना पळवतायत हे चित्र सुखावह होतं. विशेषत: पहिल्या डावात दोन बाद 112 वरुन आपण त्यांना वेसण घातली. याचं श्रेय जसं गोलंदाजांना तसं कोहलीलाही. म्हणजे कॅप्टन्सीबरोबरच त्याने रुटला रनआऊट करत आपल्याला मॅचमध्ये कमबॅक करुन दिला होता. अश्विन, शमीने तर कमालच केली. खास करुन अश्विनचं कौतुक करावं लागेल. स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर अश्विनने व्हेरिएशन, अचूकता या बळावर पहिल्या डावात तेही पहिल्याच दिवशी चार विकेट्स घेतल्या. एवढंच नव्हे तर दोन्ही इनिंगने कुकची त्याने घेतलेली विकेट त्याच्यातल्या अव्वल फिरकी गोलंदाजाच्या दर्जाचं दर्शन घडवते.

शेन वॉर्न किंवा मुरलीधरन यांच्यासाठी खेळपट्टी ही औपचारिकता असायची. दोघेही कुठेही चेंडू टर्न करत. खोऱ्याने विकेट्सही काढत. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये सामना जिंकायचा असेल तर अपोझिशनच्या दहा विकेट्स दोनदा काढणारे बॉलर्स तुमच्या भात्यात असणं गरजेचं आहे. अश्विनच्या फिरकीने ती चमक दाखवली. खास करुन आशिया खंडाबाहेरील भूमीवर. सोबतच कुलदीप, चहलच्या वनडे तसंच टी-ट्वेन्टीमधील परफॉर्मन्समुळे निर्माण झालेल्या कॉम्पिटिशनचा पॉझिटिव्ह इफेक्ट अश्विनवर झालेला पाहायला मिळाला.

कॉम्पिटिशन रेझेस क्वालिटी अँड स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स. या मालिकेत कडवी टक्कर देण्यासाठी इथून पुढे अश्विनची कामगिरी फार क्रुशल असेल. ईशांतचा दुसरा स्पेल पाहून एका ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला इशांत आठवला, जेव्हा त्याने रिकी पाँटिंगसारख्या वेगवान विकेट्सवर पोसलेल्या आणि कसलेल्या फलंदाजाला ढूंढो ढूंढो करायला लावलं होतं. उंचीमुळे मिळणाऱ्या त्या बाऊन्ससोबत पिचवर पडल्यावर चेंडू नागिणीसारखा सळसळत बॅट्समनकडे जाऊन त्याला दंश करत होता.

दुसऱ्या डावात तर त्याच्या चेंडूंचं विष इंग्लंडच्या बॅटिंगमध्ये इतकं भिनलं की, सात बाद 87 अशी केविलवाणी स्थिती इंग्लंडची झाली. (असा दंश त्याने वारंवार करावा) भारताच्या आशांना विजयाची पालवी फुटू लागली. त्याच वेळी करनने करणी केली. त्याने हा हा म्हणता 65 चेंडूंत 63 रन्स करत भारताच्या खिशातला सामना काढून घेतला. पुन्हा आपलं जुनं दुखणं वर आलं. आघाडीची फळी कापून काढल्यावर प्रतिस्पर्ध्यांचं शेपूट आपल्याला तडाखा देतं. इथेही तेच झालं. जिथे लक्ष्य 120 पर्यंतचं असतं तिथे 194 चं झालं. हे लक्ष्यही अशक्य नव्हतं, पण परीक्षा पाहणारं होतं. करनच्या या खेळीने इंग्लिश खेळाडूंमध्ये नवी जान भरली. अँडरसन, ब्रॉडने पहिला स्पेल तिखट टाकला. अधूनमधून ढगांशी लपाछपी खेळणाऱ्या सूर्यामुळे या खेळपट्टीवर बॅट्समनची परीक्षा होतीच. खास करुन सलामीच्या जोडीची. परदेश भूमीवर सलामीची पार्टनरशिप नेहमी इनिंगचा टोन सेट करत असते. कारण, तिथे चेंडू सतत मूव्ह होत असतो नाहीतर उसळत तरी असतो.

आपण जेव्हा 2003-04 मध्ये कांगारुंच्या देशात गेलो होतो, तेव्हा सेहवाग-आकाश चोप्रा जोडीने बहुतांश इनिंगमध्ये फास्ट बॉलर्सचे सुरुवातीचे निखारे आपल्या अंगावर झेलले होते. इथे जर जिंकायचं स्वप्न आपण पाहात असू, तर ओपनिंग जोडीची कामगिरी फारच महत्त्वाची आहे. पुढच्या सामन्यात जर पुजाराला खेळवायचं असेल तर विजय, धवन आणि राहुलपैकी दोघेच खेळतील, असं वाटतं. आणखी एका फलंदाजाच्या कामगिरीवर इथून पुढे जर तो खेळला नाही तर जास्त चर्चा होईल, ती अर्थातच अजिंक्य रहाणेच्या. दर्जा, टेम्परामेंट, तंत्र सारं काही असताना अजिंक्य धावांसाठी का चाचपडतोय. चिंता वाटते. शिवाय ज्या खेळपट्टीवर पहिल्या डावात आधी इशांत आणि मग उमेश यादव कोहलीसोबत उभे राहिले, त्या खेळपट्टीवर जेन्युईन बॅट्समन उभे राहू शकत नाहीत, पटूच शकत नाही. त्यामुळे बॅट्समनना एक्स्क्युज नाही.

हार्दिक पंड्याला आपण ऑलराऊंडर म्हणून टेस्टमध्येही सिलेक्ट केलंय. तसा परफॉर्मन्स दिसतोय का? याचं उत्तर देण्यासाठी हार्दिककरता ही मालिका उत्तम व्यासपीठ आहे. इथे जर त्याने खेळाच्या दोन्ही अंगांमध्ये चुणूक दाखवली तर त्याची संघातली जागा फिक्स होईल. काही जण त्याच्यात भविष्यातला कपिल देव बघतात. पण, एखाद्याने कपिल देव होणं आणि एखाद्यामध्ये कपिल देव बघणं यात जमीन-आस्मानाचा फरक आहे.

इतर फलंदाजांची भंबेरी उडत असताना कोहली मात्र विश्वामित्रांच्या ध्यानस्थ एकाग्रतेने खेळत होता, तेही उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूरुपी मेनकेच्या मोहात न पडता. ज्या अँडरसनने कोहलीला गेल्या वेळी नामोहरम केलं होतं, त्याच्यासकट कोहली सगळ्या इंग्लिश बॉलर्सना पुरुन उरला. त्याची एकाग्रता, अभ्यासू वृत्ती आणि मुख्य म्हणजे हंगर फॉर सक्सेस यामुळे तो इतर फलंदाजांच्या वे अहेड आहे. शिवाय त्याची वातावरणाशी, खेळपट्टीशी जुळवून घेण्याची क्षमता निव्वळ अफाट आहे. तो सध्या त्याच्या करिअरच्या प्राईम फॉर्ममध्ये आहे, असं वाटतं. म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो कुठेही जाऊन, कोणत्याही बॉलिंग अटॅकसमोर रन्स करतोय. अमेझिंग कन्सिस्टंन्सी आहे त्याची. कोहलीच्या बॅटिंगमध्ये इतकी सहजता पाहायला मिळाली की, तो वेगळ्या पिचवर आणि अन्य फलंदाज वेगळ्याच पिचवर बॅटिंग करतायत असं वाटत होतं. कोहलीचा हा ग्रेटनेस त्याला जसं आणखी मोठं करतो तसं तो इतरांचं खुजेपणही अधोरेखित करतो. त्यामुळे इतरांना कोहलीचा आदर्श ठेवूनच खेळावं लागेल.

या सामन्याने एक गोष्ट निश्चित झाली की, मालिका चुरशीची होणार. आपण ही मालिका जिंकू शकतो, असं अजूनही मला वाटतं. अर्थात फलंदाजांनी रन्स केल्या तर. म्हणजे कोहलीव्यतिरिक्त लोकांनी. नाहीतर दर वेळी एका कोहलीवर अवलंबून राहून आपण जिंकू शकणार नाही. कलेक्टिव्ह एफर्ट लागेल. खेळपट्टीवर उभं राहून अँडरसन आणि कंपनीचे झोंबरे स्पेल खेळून काढावे लागतील. त्याच वेळी येणारा प्रत्येक झेल टिपावा लागेल. त्यातही ही इंग्लंडमध्ये मालिका असल्याने स्लिप कॅचिंग फारच महत्त्वाचं. येणारा प्रत्येक झेल टिपण्यासाठी वृत्तीने आपल्या क्षेत्ररक्षकांना जॉन्टी ऱ्होड्स किंवा आपला मोहम्मद कैफ व्हावंच लागेल. तरंच विजयाचं स्वप्न साकार होईल. मंजिल मुश्किल जरुर है... लेकिन नामुमकिन नही....