अखेर कोहलीच्या टीम इंडियाने आणि तुम्हीआम्ही पाहिलेलं मालिका विजयाच्या स्वप्नाची राखच झाली. होय, राखच म्हणावं लागेल. कारण, नॉटिंगहॅमचा २०३ धावांचा विजय पाहिल्यावर नवीन पहाट झाल्याचं वाटत होतं, पण तो आभास होता. फक्त आभास. कारण, नंतरच्याच कसोटीत आपले फलंदाज मोईन अलीला शरण गेले आणि नवी पहाट न होता, आपल्या आशाआकांक्षांचा थेट अस्तच झाला. मालिकेत पराभूत झाल्यावर कोहली बोलला देखील, वुई नीड टू लर्न हाऊ टू क्रॉस फिनिशिंग लाईन. फार महत्त्वाचं आहे. या कसोटी मालिकेत अनेक वेळा आपल्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाजांनी गुडघे टेकले होते. म्हणजे एजबॅस्टनला दुसऱ्या डावात सात बाद ८७ वरुन सॅम करनच्या अर्धशतकाने मॅच फिरवली, इंग्लंडने १८० चा टप्पा गाठला. लॉर्डसला आधी ८९ ला चार आणि नंतर १३१ ला पाच वरुन इंग्लंडने ३५२ चा स्कोर गाठला. इथे साऊदॅम्पटनला पुन्हा इंग्लंड पहिल्या डावात ८६ ला ६ वरुन २४६ पर्यंत जाऊ शकली, तर दुसऱ्या डावातही १७८ ला ६ वरुन २७१ पर्यंत पोहोचली. हे आकडे पाहता कोहली म्हणतो, ते अधोरेखित होतं. मोक्याच्या क्षणी म्हणजे जिकडे ग्रिप घट्ट करायची, तेव्हाच आपण ती करु शकलो नाही. यामध्ये फलंदाजांची निराशा हे प्रमुख कारण असलं तरी काही क्रुशल मोमेंट्सला बॉलर्सनीही नांगी ठेचायला पाहिजे होती ती केली नाही, खास करुन अश्विनसारख्या कसलेल्या स्पिनरने या कसोटीत खेळपट्टीवर रफ पॅचेस असतानाही दोन्ही डावात मिळून फक्त तीन विकेट्स घेतल्या, तिकडे मोईन अलीने मात्र भारतीय फलंदाजीवर सपासप वार करत नऊ मोहरे टिपले. मोईन अलीने फ्लाईट, रफ पॅचेसचा उत्तम वापर केला, जिथे अश्विन या कसोटीत तरी कमी पडला असंच म्हणावं लागेल.
इंग्लंडच्या टीमची ऑलराऊंडर्सची स्ट्रेंथ हीदेखील त्यांना तारुन नेणारी ठरली. म्हणून ज्यो रुटची मोठी खेळी न होऊनही, तसंच त्यांचेही आघाडीवीर आपल्यासारखेच फ्लॉप ठरुनही या अष्टपैलूंनी अब्रू राखली. बटलर, बेअरस्टो, स्टोक्स, वोक्स, करन, मोईन अली. म्हणजे इंग्लिश टीममध्ये स्पेशालिस्ट फक्त वरचे तीन म्हणजे जेनिंग्ज, कुक आणि रुट, तर दोन बॉलर्स ब्रॉड आणि अँडरसन. हे पाच वगळता सगळे ऑलराऊंडर्स. हीच त्यांची ताकद ठरली अन् आपला कच्चा दुवा. जी मॅच्युरिटी नवख्या सॅम करनने दाखवली ती आपले नावाजलेले फलंदाज दाखवू शकले नाहीत. धवन, विजय, राहुल यांचा अनुभव करनपेक्षा निश्चित जास्त आहे. पण, करनने आक्रमण आणि बचावाचा उत्तम मिलाफ साधला. त्याची मैफल रंगली. या तिघांचा सूर मात्र बिघडलेलाच राहिला. अगदी निर्णायक कसोटीतही करनने पहिल्या डावात १८८ मिनिटं तर दुसऱ्या डावात १२८ मिनिटं नांगर टाकला. तेही इशांत आणि कंपनीने आघाडीच्या फळीला चटके दिल्यावर. करन निखाऱ्यावर चालला आणि त्यातून आपल्या टीमला बाहेर घेऊन आला.
आपल्या आघाडीवीरांनी मात्र मोठा स्कोर एकदाही केला नाही. तसंच खेळपट्टीवर साधं उभं राहायचा संयमही दाखवला नाही. हार्दिक पंड्याकडूनही दोन्ही फ्रंटवर म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही, हे इथे मान्य करावंच लागेल. आपण जर त्याला ऑलराऊंडर म्हणून ट्रीट करत असू, तर फलंदाजीत किमान अर्धशतक आणि गोलंदाजीत २-३ विकेट्स असा परफॉर्मन्स अपेक्षित आहे. नाही म्हणायला, त्याने एक-दोनदा चांगले स्पेल्स टाकले, एक-दोनदा चांगला संयमही दाखवला. पण, फक्त ट्रेलरच दिसला, पिक्चर नाहीच मिळाला बघायला, झाला तो मालिकेचाच दी एन्ड.
या मालिकेत एजबॅस्टन आणि साऊदॅम्पटन या दोन्ही कसोटीत असे काही क्षण होते, की जिथून आपण आणि फक्त आपणच हा सामना जिंकायला हवा होता. पण, आपण ग्रिप सोडली. कधी करनने करणी केली, तर या कसोटीत मोईन अलीसारखा ऑफ स्पिनर आपल्याला गुंडाळून गेला. टेम्परामेंट सेपरेट्स मेन फ्रॉम बॉईज, असं म्हणतात. या मालिकेत करनसारख्या नवोदिताने दाखवलं. तर त्या तुलनेत अनुभवी असलेले आपले फलंदाज मात्र कागदी वाघच ठरले. खास करुन आघाडीवीर.
या सगळ्यांमध्ये आपलं वेगवान त्रिकूट आणि कोहली यांचं मात्र कौतुक व्हायला हवं. म्हणजे ज्या इंग्लिश खेळपट्ट्यांवर कुक अँड कंपनी एरवी धावांच्या राशी घालतात, त्याच खेळपट्ट्यांवर इशांत, बुमराह, शमी त्यांना सळो की पळो करुन सोडत होते, इशांतचा बाऊन्स, बुमराहचं व्हेरिएशन आणि शमीचा स्विंग. यामुळे इंग्लडंची फलंदाजी निराशेच्या गर्तेत अक्षरश: बुडाली होती. त्यांना त्यांच्या मधल्या फळीने, तसंच सॅम करन, मोईन अलीने नावाडी होत बाहेर काढलं.
विराट कोहलीचा या वेळचा फोकस काहीतरी वेगळंच सांगून जाणारा होता. म्हणजे पॉईंट टू प्रूव्ह टाईप्स. गेल्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीला अँडरसनने नामोहरम केलं होतं, त्या अँडरसनसकट कोहली यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरं इतकी बिनचूक पाठ करुन आला होता की, त्याने हे पेपर्स पटापट सोडवले. काही पॅचेसमध्ये तर तो बादच होणार नाही असं वाटत होतं. म्हणजे मागे सचिन तुफान फॉर्मात असताना असं म्हटलं गेलं होतं, की ओन्ली वन प्लेअर कॅन प्ले बेटर दॅन सचिन, ही हिमसेल्फ. सध्या कोहलीचा फॉर्म त्या लेव्हलचा वाटतोय. फक्त मैदान, अपोझिशन, क्रिकेटचा फॉरमॅट बदलतोय. पण, त्याचा स्कोर फेरारीच्या वेगानेच पळतोय. त्याच्या बॅटमधलं धावांचं सातत्य पाहून एखाद्या धबधब्यालाही हेवा वाटावा. असा फ्लो सध्या पाहायला मिळतोय. अर्थात तो जरी धावाधीश होत असला तरी अन्य फलंदाजांची ३०-४० गाठण्यासाठी झालेली धावाधाव ही आपल्याला मारक ठरली.
आपण फाईट दिली, पण नॉक आऊट पंचमध्ये कमी पडलो. मालिका हातातून गेली असली तरी हा फरक २-३ करण्यासाठीच आता प्रयत्न व्हायला हवेत. कोहलीचा फोकस, त्याचं अग्रेसिव्ह नेचर पाहता तो याचसाठी प्रयत्न करणार, हे नक्की. अन्य सहकाऱ्यांनी त्याला तितकीच तोलामोलाची साथ द्यायला हवी. आपल्याला बाकीच्या १० खेळाडूंकडूनही कोहलीचा फोकस, जिद्द हवीय. मालिका गमावली असली तरी अखेरचा सामना जिंकून सन्मानाने परतूया. यासाठी कोहली अँड कंपनीला शुभेच्छा.
लढा क्रिकेटवीर हो....
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2018 01:28 PM (IST)
आपण फाईट दिली, पण नॉक आऊट पंचमध्ये कमी पडलो. मालिका हातातून गेली असली तरी हा फरक २-३ करण्यासाठीच आता प्रयत्न व्हायला हवेत. कोहलीचा फोकस, त्याचं अग्रेसिव्ह नेचर पाहता तो याचसाठी प्रयत्न करणार, हे नक्की. अन्य सहकाऱ्यांनी त्याला तितकीच तोलामोलाची साथ द्यायला हवी. आपल्याला बाकीच्या १० खेळाडूंकडूनही कोहलीचा फोकस, जिद्द हवीय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -