बदलत्या काळानुसार, आपण विविध क्षेत्रातील क्रांतीची एकेक पावलं पुढे टाकतोय. ज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीचाही मोठा वाटा आहे. आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही कोपऱ्यात काही सेकंदात पोहोचतो. असा हा माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा थक्क करणारा वेग. हाच वेग जेव्हा तुमच्या खाजगी आयुष्यात शिरकाव करतो, तेव्हा मात्र गोष्टी तापदायक होतात. असाच अनुभव ऑस्ट्रेलियात टी-ट्वेन्टी विश्वचषक (T20 WORLD CUP) खेळत असलेल्या विराट कोहलीला (Virat Kohali) आला. हॉटेल रुममधला त्याचा व्हिडीओ लीक झाला आणि त्याने संताप व्यक्त केला. नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. दुसऱ्याचं खाजगी आयुष्य जपा. कोहलीसारख्या स्टार प्लेअरच्या खाजगी आयुष्यातही या मीडियाने घुसखोरी केली, तिथे आपल्यासारख्या सामान्य जनांची काय कथा?


खरं तर सोशल मीडिया ही काळाची अपरिहार्यता आहे, गरज आहे. यातून अनेक विधायक गोष्टीही होत असतात. अनेक प्रश्न मांडले जाऊ शकतात. अनेकांसाठी मदतीचा पूर वाहतो तो या सोशल मीडियातील एखाद्या पोस्टमुळे. हेही आपण पाहिलंय. आजच्या गतिमान जीवनात जिथे आपल्याला प्रत्यक्ष भेटायला वेळ मिळत नाही, तिथे व्हिडीओ कॉलसारख्या माध्यमातून आपण ते अंतर दूर करतो. फिजिकली नाही तरी ऑनलाईन(व्हर्च्युअली) भेटतो. कोरोना काळात तर या माहिती तंत्रज्ञानाची कमाल आपण साऱ्यांनीच अनुभवली.


कोरोना काळात आपल्या ठप्प झालेल्या जीवनाच्या गाडीला तंत्रज्ञानाच्या गियरने रिस्टार्ट केलं. तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. किंबहुना व्यापक प्रमाणात पाहायचं झालं तर अन्न, वस्त्र, निवारा यासोबत आता मोबाईल आणि सोशल मीडिया यादेखील आपल्या जणू बेसिक गरजा झाल्यात. त्याच वेळी त्याच्या गरजेची मर्यादा आपण ओळखायला हवी. त्याचा विधायक किंवा काही वेळा मनोरंजनासाठी वापर ठीक आहे, पण त्याला आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ न देणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरण्याचा अतिरेक न करणं हे ही काळाची गरज आहे.


सोशल मीडिया वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, हे सायबर लॉ एक्सपर्ट Advocate प्रशांत माळी यांनी अगदी सोप्या शब्दात आणि बारकाईने सांगितलंय. हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा.



  • कुठलंही वैयक्तिक संभाषण, कुटुंबियांसोबतचे व्हिडीओ, खास करुन लहान मुलांचे, व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करु नका. त्यामुळे ब्लॅकमेलिंग, किडनॅपिंगसारखे होणारे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे याकडे कटाक्षाने लक्ष द्या.

  • तुमच्या प्रवासाचा संदर्भ, त्याबद्दलची तपशीलवार माहिती कुठेही शेअर करु नका. चोरदेखील सोशल मीडियावर असतात ते या माहितीचा गैरवापर करुन तुमच्या घरी चोरी करु शकतात.

  • आर्थिक क्षेत्राशी संबंधित कोणतेही तपशील शेअर करु नका. आधार कार्ड, पॅनकार्ड, तुमची ओळख जाहीर करणाऱ्या, आर्थिक तपशील देणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करु नका. अशामुळे तुमच्या नावावर कर्ज घेतलं जातं, जे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

  • काही apps जिथे तुमचा हाताचा पंजा घेतला जातो, हाताचे ठसे घेतले जातात. ते अजिबात देऊ नका. त्यामुळे तुमच्या हाताचे क्लोन फिंगरप्रिंट वापरुन त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. हाताचे क्लिअर फोटो कुठेही शेअर करु नका.


आज कोहलीच्या रुमचा व्हिडीओ दुसऱ्याच व्यक्तीने शेअर केला. हाही आपल्याला एक धडा आहे. दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा, त्याचे फोटो, व्हिडीओ शेअर कऱण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. राईट टू प्रायव्हसीचा तो उंबरा न ओलांडण्याची जबाबदारी आपली आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या युगात आपलं लाईफ आणखी फास्ट होणार आहे. त्याच वेळी ते वेगात घुसमटू न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपली आणि दुसऱ्याचंही खाजगी आयुष्य जपूया. सतर्क आणि जागरुक राहूया.