शिक्षक दिन. पाच सप्टेंबर. लहानपणी या दिवसाबद्दल आम्हाला आवर्जून सांगितलं जायचं. त्याचं महत्त्व आता मोठेपणी आणखी अधोरेखित होतंय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले गुरुजन भरीव योगदान देत आपल्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी सक्षम करत असतात.


अगदी शाळेपासून विचार केला तर, आधी बालवाडीत म्हणजे जांबोरी मैदानातील पाटील बाईंची शाळा. जिथे जाऊन नुसती धमाल, मजा करायची. आजीसोबत मी जात असे. तिथून पुढे आमची स्वारी दाखल झाली, गिरगावच्या आर्यन शाळेत. खऱ्या अर्थाने शाळेचा, वर्गात जाऊन शिकण्याचा, मित्र म्हणजे काय याचा अर्थ मला तिथे समजू, उमजू लागला. गांगोळी ताई, भावे बाई, वैशंपायन बाई, वैद्य बाई, हस्तकलेच्या (जी मला फारशी कधीच जमली नाही) पांजरी बाई, भिडे बाई, प्रभा ताई, ,सुषमा ताई प्रायमरीच्या मुख्याध्यापिका दांडेकर बाई. आम्हाला लाभलेली गुरुजनांची पहिली टीम. आम्हाला खऱ्या अर्थाने गमभन शिकवणारी. नारायण मामा, विष्णू मामा यांच्यासह ज्यांच्या डोळ्याचा आणि आवाजाचा दरारा होता त्या हिराबाई, साटम मामा ही देखील आमची शाळेतलीच एक्सटेंडेड फॅमिली.


शाळेतल्या आमच्या वर्गात तेव्हा एक घसरगुंडी होती, लाल रंगाची. मस्त धमाल यायची, तिथे खेळायला. त्याच घसरगुंडीने बहुदा आयुष्यातल्या चढउतारांची नांदी केली होती. पुढे अनेक चढउतारांचे क्षण आले, अजूनही येतायत तेव्हा ही घसरगुंडी मला प्रामुख्याने आठवते, सिम्बॉलिक वाटते. आज माझ्या मुलीच्या वयाची पिढी घरातच ऑनलाईन शिक्षण घेतेय, तेव्हा ती कोणत्या क्षणांना मुकतेय हे मी पाहतोय. पण, आरोग्यविषयक स्थितीचा प्रश्न असल्याने पर्याय नाही, असो. कमिंग बॅक टू प्री-प्रायमरी शाळा. म्हणजे शिशुवर्ग. शिशुवर्गासाठी बाकं नव्हती, भारतीय बैठक असायची. पहिलीत प्रवेश झाल्यावर शाळेतल्या बाकांवर आम्ही बसू लागलो ते दहावीपर्यंत. पहिली ते चौथी, मग पाचवी ते दहावी. असा हा प्रवास. परांजपे टीचर, परब टीचर, पटवर्धन सर, करगुटकर टीचर, भागवत टीचर, नेरुरकर टीचर, नरसाळे टीचर, माटे टीचर, श्रोत्री टीचर, खाडिलकर टीचर, ओक टीचर, महाले सर, कासार सर, भोसले सर, देसाई सर आदी शिक्षक मंडळी या मार्गातले आमचे दीपस्तंभ. आम्हाला दिशा देणारे आणि दाखवणारे, मार्गदर्शन करणारे.  शालेय विषयांसोबत आमचा चतुरस्र विकास होण्यासाठी यातील प्रत्येकाने जीवाचं रान केलंय. मग त्या शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, गायन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असोत. की आंतरशालेय स्पर्धा. या मंडळींनी आम्हाला आपले विद्यार्थी समजून नव्हे तर आपलंच मूल समजून मेहनत घेतली. त्यांनी समुद्राइतकं असीम दिलं, आमची ओंजळ जितकी होती तितकंच घेता आलं, हे आमचं नशीब.


शाळेतल्या शेवटच्या तीन वर्षात स्काऊटचं ट्रेनिंग होतं. तेव्हा संचलनासाठी सज्ज होण्याचं थ्रिल वेगळंच असायचं. तो खाकी ड्रेसही काहीतरी वेगळं फिल देणारा. बहुदा दर शुक्रवारी आम्ही तो परिधान करायचो. कंबरेला बेल्टसोबत रोपही असायचा पांढऱ्या रंगाचा. मला आठवतंय, एका संचलनाच्या वेळी आम्ही एक ट्रॉफीदेखील मिळवली होती. पाहुण्यांच्या आगमनाला स्काऊटचे आमचे गार्डस दोन्ही बाजूंनी, सोबत बँड पथक, अशा दिमाखात पाहुण्यांचं आगमन होत असे.


शाळेतील या प्रत्येक टप्प्याने, अनुभवाने शिस्त, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, टीम स्पिरीट आदींचं भान आम्हाला दिलं. तीच पुंजी घेऊन पुढे वाटचाल करतोय.


या शिक्षकांसोबतच शाळेची वास्तुही आमच्या मनाजवळची. अगदी अजूनही. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेबद्दल मी आधी लिहिलंय. तेव्हा पुनरुक्ती करत नाही. पण, ती पूजा, ते दहीपोहे. हे सारं आधी गणवेशात नंतर नेहमीच्या पोशाखात अनुभवलंय. कोरोना काळातील दोन वर्षे वगळता हा दिवसही आमच्यासाठी कोरुन ठेवण्यासारखा.


शाळेला निरोप देण्याचा दिवसही मला आठवतोय. म्हणजे दहावीच्या वर्गाचा शेवटचा दिवस. मन आणि  पावलं दोन्ही जड झाली होती. रोज भेटणारं आमचं शाळा नावाचं कुटुंब. आज विखुरणार होतं. म्हणजे फक्त शरीरानेच. तरीही ते मन स्वीकारत नव्हतं. शाळेतल्या मित्र-मैत्रिणी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. थँक्स टू टेक्नॉलॉजी. आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमुळे एकत्र आलोय आणि राहू याचा विश्वास आहे. खरं तर पुढे कॉलेज, क्लासेस, पत्रकारिता अभ्यासक्रम, मग दै. नवशक्ति, एबीपी माझा अशा अनेक टप्प्यांवर अनेक गुरु लाभले. काही सहकारीही बरंच शिकवून गेले, अजूनही शिकवतायत. तरीही शाळेतले शिक्षक, ती वास्तु आणि तो मित्रपरिवार. यासाठी मनामधला एक स्पेशल कप्पा रिझर्व्ह आहे. सेफ डिपॉझिटसारखा. जिथे प्रेम, आपुलकी, मायेची अभेद्य तटबंदी आहे. हे क्षण आमच्याकडून कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. ते तिथेच राहतील, शेवटच्या श्वासापर्यंत. कधी एखाद्या वाईट अनुभवाने निराश झालो तर, त्यातलेच काही आम्हाला नव्याने प्रेरणा देतील, कधी एखाद्या कौतुकाने भरभरुन आनंदून गेलो, तर पाय जमिनीवर ठेवण्याचं भान देतील. कायम.


शिक्षक दिनानिमित्ताने शाळेसह विविध टप्प्यांवर भेटलेल्या तमाम गुरुजनांना सादर वंदन.