अखेर ती नकोशी बातमी आलीच. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर (V. V. Karmarkar) यांचं निधन. क्रीडा पत्रकारितेतला दादा माणूस गेला. माझ्या, माझ्या आधीच्या आणि माझ्या नंतरच्याही अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक करमरकर सर गेले. काही दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस त्यांच्या आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराने ओल्ड एज होममध्ये साजरा केला होता. तेव्हा त्यांना भेटलो होतो. तीच शेवटची भेट.


मी नवशक्तिमध्ये पत्रकारितेला म्हणजे क्रीडा पत्रकारितेला सुरुवात केली. तेव्हा क्रीडा विभागात पत्रकारितेचं 'अ ब क ड' मी जाणून घेत होतो. मुळाक्षरं गिरवत होतो, तेव्हा क्रीडा पत्रकारितेतील माहितीकोष, ज्ञानभांडार असलेल्या करमरकर सरांची भेट झाली. अनेक खेळांचं सखोल ज्ञान, अनेक संदर्भ तोंडावर असलेल्या सरांसोबतचा संवाद हा समृद्ध करणारा अनुभव असायचा. कधी एखाद्या स्थानिक क्रीडा स्पर्धेच्या मैदानात तर कधी वानखेडेच्या प्रेस बॉक्समध्ये सरांची भेट होई. खेळाच्या पलीकडे जाऊन ते तपशील सांगत. फिल्ड वर्क कोळून प्यायलेल्या पत्रकारांपैकी एक म्हणजे करमरकर सर.


ज्या मंडळींचे लेख वाचून आमची पिढी क्रीडा पत्रकारितेकडे वळली किंवा ज्यांच्यामुळे पत्रकारितेची आवड निर्माण झाली, त्यातले एक करमरकर सर. आघाडीच्या वृत्तपत्रातून येणारे त्यांचे लेख, त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखमाला बरंच काही शिकवून जात. अशाही अँगलने खेळ आणि खेळाडूंचा विचार होऊ शकतो, हे सरांचे लेख वाचल्यानंतर लक्षात यायचं.  


खेळाला वाहिलेलं पान वृत्तपत्रात सुरु करावं आणि ते निष्ठेने सुरू राहावं यासाठीची त्यांची धडपड आम्ही आमच्या ज्येष्ठांकडून अनेकदा ऐकलीय. त्यांनी क्रीडा पत्रकारितेला नवा आयाम दिलाच, त्याच वेळी त्यांच्या या आग्रहामुळे माझ्यासारख्या होऊ घातलेल्या क्रीडा पत्रकारांसाठी अनेक वृत्तपत्रांमध्ये संधीचे दरवाजे उघडले. यासाठी त्यांना त्रिवार वंदन.


लेखणीची कमाल असंख्य वर्षे दाखवणाऱ्या करमरकर सरांची मराठी क्रिकेट कॉमेंट्री आजही कानात रुंजी घालतेय. ते केवळ आवाजातून खेळ आपल्या कानात आणि मनात उभा करत. त्यांच्यासोबत घुमणारा चंद्रशेखर संत, बाळ पंडित याही मंडळींचा कॉमेंट्रीचा आवाज आज आठवतोय आणि नॉस्टॅल्जिक करतोय.  क्रिकेट पाहण्याचा नव्हे तर ऐकण्याचा तो जमाना होता.  त्यावेळी मराठी भाषेत समालोचन ऐकणं याची मजा औरच होती. चौकार, षटकार, चेंडू, पंच, खेळपट्टी... या शब्दांची पेरणी असणारं करमरकर सरांचं समालोचन. ज्याचे संस्कार कानावर आणि मनावर झालेत. खेळासोबत मराठी भाषेवरही तितकंच प्रेम असणारे मार्गदर्शक आम्हाला लाभले, हे आमचं भाग्य.  आज तो सारा काळ रिवाईंड झालाय.


किंबहुना आज मनात विचार आला, आज अवघ्या विश्वात पसरलेला डिजिटल मीडिया जर त्या काळी असता तर, करमरकर सरांनी लाईव्ह आणि आठवणी तसंच किश्श्यांच्या पोस्टचा पाऊस पाडला असता. इतके संदर्भ, माहितीचा खजिना त्यांच्याकडे होता.


लेखणी आणि माईक दोन्हींवर जबरदस्त पकड असणारे सर आज नाहीत. आशीर्वादाचा, मार्गदर्शनाचा एक हात आज आम्ही गमावलाय. पण, त्यांच्या लेखांमधून ते कायम शब्दरुपाने सोबत असतील, स्टेडियममधल्या टाळ्या, आरोळ्या कानात घुमतात तसं त्यांचं क्रिकेट समालोचनही कानात घुमत राहील. क्रीडा पत्रकारितेसोबतच मराठी जपण्याची आणि जोपासण्याचीही आठवण करुन देत. करमरकर सरांच्या योगदानाला वंदन आणि विनम्र आदरांजली.