या वर्षातील अर्थात 2020 मधील आणखी एक महिना सरताना मराठी जनांसाठी महत्त्वाचा असणारा जागतिक मराठी भाषा दिन आज साजरा होतोय. ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा होत असतो. या दिवसाच्या निमित्ताने मनात विचार आला, केवळ एक दिवस मराठी भाषा दिन साजरा करुन मराठी जोपासली जाईल का, की आपणही त्यात काही हातभार लावू शकतो? उत्तरही माझं मलाच मिळालं, होय. आपण नक्कीच हातभार लावू शकतो.

काही अगदी मूलभूत, नियमित गोष्टींवर भर दिला तरी हे होऊ शकतं. याची सुरुवात घरापासूनच व्हावी, म्हणजे आजच्या स्पर्धात्मक युगात मुलं बरेचदा इंग्रजी माध्यमात शिकत असतात. त्याची प्रत्येक कुटुंबाची कारणं निराळी असतील. पण, मराठी कुटुंबांची मुलं जर मराठी माध्यमात शिकत नसतील तरीही काही गोष्टी व्हाव्यात असं वाटतं. उदाहरणार्थ घरी हटकून मराठी बोललं जावं. पाच वर्षांपर्यंतच्या वयात जर समाज माध्यमांमध्ये आपलं मूल ट्विंकल ट्विंकल किंवा जॅक अँड जिलची ध्वनिचित्रफीत पाहत असेल तर त्याच वेळी सांग सांग भोलानाथ आणि असावा सुंदर चॉकलेटचा बंगलासारखी मराठीतील बालगीतंही त्याला आवर्जून दाखवायला हवी. घरात अन्य भाषिक वाहिन्यांसोबत मराठी वाहिन्या म्हणजे वृत्तवाहिन्याही पाहण्याची आणि दाखवण्याची सवय लागावी. मराठी भाषा आपल्या पाल्यात रुजवण्यासाठी पालक इतकं नक्की करु शकतात. तो आग्रह त्यांनी धरावा. तसंच मराठी शुद्ध बोलण्यावर आणि लिहिण्यावर अगदी लहानपणापासूनच भर द्यावा. एकमेकांच्या चुका सांगितल्या जाव्यात. याबाबतीत माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो.



माझं बालपण गिरगावात गेलं. आर्यन शाळेत माझं दहावीपर्यंतचं शिक्षण पार पडलं. या शाळेत आम्हाला परांजपे बाई नावाच्या एक वर्गशिक्षिका शिकवायला होत्या. त्यांनी आमच्यासोबत एक प्रयोग केला, शाळा सुरु होत असताना रोजची उपस्थिती घ्यायच्या आधी त्या आम्हाला रोज एक विषय देत आणि उपस्थिती पूर्ण होईपर्यंत त्यावर लिहायला सांगत. मग एक परिच्छेद लिहा किंवा एक पानभर. यानंतर हे लिखाण शुद्धलेखनासकट तपासलं जाई. ही सवय आमच्यात अगदी शालेय जीवनापासून रुजवली गेली, नव्हे मुरवली गेली. आपली भाषा शुद्ध लिहिणं, ती तितकीच शुद्ध बोलली गेली पाहिजे, यासाठी आग्रह धरणं हे अत्यंत गरजेचं आहे. मराठीतील एखादा शब्द चुकीचा लिहिला गेला किंवा बोलला गेला, तर ती चूक लक्षात आल्यावर आपल्याला प्रचंड त्रास व्हायला हवा. ती चूक जिव्हारी लागून पुन्हा न करण्याकडे कल असायला हवा. इतकं, आत्यंतिक प्रेम, आपुलकी, ओलावा मराठीबद्दल असावा.

अनेक अमराठी मंडळी म्हणजे अगदी इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणारी अमराठी मुलंही उत्तम मराठी बोलतात, कलाविष्कार करतात. अनेक गायक, अभिनेते हेही मराठी उत्तम आत्मसात करतात. आमचे गिरगावकर असलेल्या मुळ्येकाकांच्या काल झालेल्या माझा पुरस्कार सोहळ्यात साईराम अय्यर या जादुई आवाजाच्या गायकाने सुन्या सुन्या, सख्या रे.. यासारखी मराठीतील अजरामर गीतं तीही स्त्री एकल गीतं असल्याने ती स्त्रिच्याच आवाजात गाऊन उपस्थितांना थक्क करुन टाकलं. याच कार्यक्रमात श्रीकांत नारायण यांनी कोळीगीतांवर उपस्थितांना ठेका धरायला लावला. ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत, असे अनेक अमराठी कलाकार आहेत, जे मराठी आत्मसात करुन तिची पताका फडकवत राहतात. मग मराठी लोकांनी मराठी जपण्यासाठी, ती जोपासण्यासाठी आणखी प्रयत्न करायला नकोत का? याशिवाय मराठी वृत्तपत्रांचं वाचन, मराठी पुस्तकांचं वाचन याचं सातत्य राखावं. मराठी नाटकं, मराठी चित्रपटही आवर्जून पाहायला पाहिजेत. मराठी व्याख्यानं, मराठी सांस्कृतिक कार्यक्रम यांचाही आस्वाद आपणही घ्यायला हवा आणि मुलांनाही तो घ्यायला आग्रह धरायला हवा. मोबाईल तसंच समाज माध्यमांमध्ये रमणाऱ्या, व्हिडीओ गेम्समध्ये तासन तास डोळे घालून बसणाऱ्या पिढीला इतकं तर आपण करायला लावूच शकतो. अर्थात कालाय तस्मै नम: म्हणत काही बदल स्वीकारावेच लागतात. मात्र ते स्वीकारतानाच आपली मूळं मात्र घट्ट रोवलेली असावीत.

मराठी संस्कृती जोपासणारा मुंबईतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे गिरगाव. त्याच 'गिरगाव' या संकल्पनेवर आधारित एक दिनदर्शिका वजा पुस्तक साकारण्याचा योग यावर्षी आला. इथलं वातावरण, इथली सणसंस्कृती याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर, पांडुरंग सकपाळ, बाळा अहिरेकर या चार मंडळींचं यामध्ये मोलाचं योगदान. या दिनदर्शिकेबद्दल मी स्वतंत्र लेखात लिहिलंय. त्यामुळे इथे फक्त उल्लेख एवढ्यासाठीच की, मराठी संस्कृतीची रुजवात करण्यासाठी असाही एखादा प्रयत्न आपापल्या राहत्या ठिकाणी आपण करु शकतो.

मराठी हा संस्कार आहे. तो फक्त उपचार म्हणून न राहता, आचार,विचारात, नसानसात भिनायला हवा. पुढच्या पिढीत तो भिनवायला हवा. व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून, समाज म्हणून ती आपली मोठी जबाबदारी आणि कर्तव्यदेखील आहे. अन्य भाषांचा तितकाच आदर करताना मराठीच्या या वेलूला आणखी बहर येण्यासाठी हे आपण नक्कीच करु शकतो. सर्वांना पुन्हा एकदा या जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा. कुसुमाग्रजांसह ज्या ज्या शब्दप्रभूंनी, मराठीच्या गौरवात भर घातली, त्या सर्वांना शतश: नमन.