15 ऑगस्टला दहाच्या बातम्या बुलेटिन संपत आलं होतं आणि ती बातमी येऊन थडकली. अजित वाडेकर काळाच्या पडद्याआड. माजी कर्णधार वाडेकरांचं निधन. मनाला एकदम चटका लागला. आमच्या पिढीने वाडेकरांचा खेळ पाहिलेला नाही. याची मला नेहमी रुखरुख वाटते.
म्हणजे वाडेकर सरांची कारकीर्द ज्या काळात गाजली त्या काळात म्हणजे १९६६-७४ या कालावधीत माझ्यासह माझ्या पिढीतल्या अनेकांचा जन्मही झाला नव्हता. तरीही त्यांच्या खेळाबद्दल, त्यांच्याबद्दल एक अटॅचमेंट वाटते. ज्या काळात परदेश भूमीवर मालिका जिंकणं, म्हणजे वाळवंटात मृगजळ शोधण्याइतकं कर्मकठीण होतं, त्या काळात वाडेकरांच्या टीमने वेस्ट इंडीज आणि इंग्लंड भूमीवर यजमानांच्या संघांनाच धूळ चारली होती. ही अचिव्हमेंट ग्रेट होती.
इंग्लिश भूमीवर त्यानंतरच्या दौऱ्यांमध्ये आपण किती स्ट्रगल झालोय किंवा सध्या विराटची टीमही इंग्लंडमध्ये किती चॅलेंजेस फेस करतेय, हे आपण बघतोय. इंग्लंडच्या त्या टीममध्ये जॉन स्नो, अंडरवूडसारखे दादा बॉलर होते. त्या टीमला आपण लोळवलं. तर ज्या विंडीज संघात सोबर्स, लॉईड, कन्हाय सारखे गोलंदाजांचे कर्दनकाळ बॅट्समन होते, त्या संघाविरुद्धही आपण मालिका जिंकली, हे सोपं नाही. ज्या पिचेसवर वेगवान गोलंदाज फलंदाजांची पळापळ करत होते, त्याच पिचेसवर बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन् ही फिरकी चौकडी घेऊन वाडेकरांनी विजय पताका फडकवली.
स्लीपमध्ये वाडेकर, फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर, बॅकवर्ड शॉर्ट लेग अबीद अली आणि गलीत वेंकटराघवन् अशी फिल्डिंग लाईनअप प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करायची.
वाडेकरांची खास करुन स्लीप कॅचिंग भारी होतं, असं आम्ही ज्येष्ठांकडून ऐकतो. एकंदरीतच वाडेकरांच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये भारतीय क्रिकेटने कात टाकली, असं आपण म्हणू शकतो.
नंतरच्या काळात म्हणजे वाडेकर निवृत्त झाल्यावर वाडेकर-अझर जोडीने मायदेशात मालिका जिंकण्याचा सपाटा लावला. परदेशात गेल्यावर तिथल्या टीम्स जर आपल्याला बाऊन्सी किंवा स्विंगिंग पिचेस बनवून तोंडाला फेस आणत असतील तर आपण आपल्या स्ट्रेंथवर का खेळायचं नाही? हा विचार त्यांनी रुजवला आणि अंमलातही आणला. फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार करुन आपण भल्याभल्यांना मग लोळवू लागलो, आपले फलंदाज धावांच्या राशी घालायचे आणि प्रतिस्पर्ध्यांना आपण दोनदा लीलया गुंडाळून टाकायचो. कोच वाडेकर आणि कॅप्टन अझरुद्दीन हे कॉम्बिनेशन त्या काळात टेरिफिक वर्क झालं. आपल्या स्ट्रेंथवर खेळताना नियमांच्या चौकटीत राहून सन्मानजनक पद्धतीने आपण मालिका जिंकल्या.
वाडेकरांचा खेळ जरी आम्ही पाहिला नसला तरी मला दोनदा जाहीर कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेता आली, ही माझ्या दृष्टीने निश्चित समाधानाची बाब. इतक्या लिजंडरी प्लेअरसोबत स्टेज शेअर करण्याचं पहिलं भाग्य लाभलं ते ‘आठवणीतले बाळासाहेब’ या कार्यक्रमात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवण्याचा हा कार्यक्रम आम्ही गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात केला होता. याच कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंतही होते. तीन दिग्गजांना मला बोलतं करायचं होतं, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, पण तिघेही आपापल्या क्षेत्रातली दादा माणसं. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मी वाडेकर सरांना फोन केला होता, थोड्या टेन्शनमध्येच. मात्र पहिल्याच फोनमध्ये ते इतके मोकळेपणाने बोलले की, माझं दडपण दूर झालं. मग साहित्य संघातल्या कार्यक्रमात बाळासाहेबांचं क्रिकेटप्रेम, त्यांची बाळासाहेबांसोबतची मैत्री याबद्दल वाडेकर सर भरभरून बोलले. दुसऱ्यांदा २०१५ मध्ये त्यांच्याशी क्रिकेटगप्पा करता आल्या. थँक्स टू द्वारकानाथ संझगिरी सर. टेनिसबॉलच्या एका मोठ्या टूर्नामेंटच्या वेळी मैदानात जाऊन वाडेकर सरांसोबत क्रिकेटगप्पा केल्या. त्यावेळी मुंबईचं डोमेस्टिक क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचं महत्त्व, वाडेकर सरांच्या जमान्यातील फलंदाजी आणि आजच्या टी-ट्वेन्टी जमान्यातील बदललेली बॅटिंग स्टाईल याबद्दल सर भरभरून बोलले. त्यांच्या बोलण्यात मिश्किलपणाही असे. मध्येच समोरच्याची फिरकी घ्यायचे आणि पुढे जायचे. त्या फिरकी ताणण्यातही गोडवा होता. सोबतच त्यांनी ब्लाईंड, हँडीकॅप क्रिकेटसाठी निवृत्तीनंतर दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. ते हिंदी सिनेमातल्या गाण्यांचेही दर्दी होते, संझगिरी सरांच्या कार्यक्रमांना रफी-किशोरच्या गाण्यांमध्ये रंगून गेलेले वाडेकर मी अनेकदा पाहिलेत. रसिक क्रिकेटर अशी त्यांची ओळख होती, त्यांच्या घरीही दोनदा जायचा योग आला.
तेव्हा घराच्या खिडकीतून दिसणारा सी-लिंकचा अफलातून व्ह्यू, या सी-लिंकचं त्यांच्या परवानगीने मी त्यांच्या घराच्या विंडोतून केलेलं फोटोसेशन हे सारं आज अल्बमची पानं चाळावीत तसं मनाच्या पटलावर उमटलं.
त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलो. माजी क्रिकेटर्स, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, राजकीय नेते साऱ्यांनीच पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना अलविदा केलं. तेव्हा वाडेकरांना श्रद्धांजली वाहायला बुजुर्ग क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी सर आले होते. वाडेकर सरांच्या पार्थिवाकडे पाहून म्हणाले, मला असं वाटतंय की, आता वाडेकर उठून उभे राहतील, माझ्या हातात बॉल देतील आणि म्हणतील, पॅडी समोरच्या टीमला साफ करुन टाक. इतकं आमच्यातलं नातं घट्ट होतं.
वाडेकरांच्या ग्रेटनेसची त्यांनी आठवण सांगितली, म्हणाले, 70 च्या दशकात एकदा चेन्नईत (तेव्हाचं मद्रास) एक मॅच होती, पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग. तेव्हा दक्षिण विभागाकडे वेंकटराघवन्, प्रसन्ना हे दोन कसलेले स्पिनर्स होते, म्हणून त्यांनी पिच असं बनवलं होतं की, एका बाजूला पूर्ण माती ठेवली होती, तर एका बाजूला वाढलेलं गवत. चेंडू नाईन्टी डिग्री फिरत होता, त्या घातक खेळपट्टीवरही वाडेकरांनी वेंकट आणि प्रसन्ना यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत दीडशेच्या आसपासची खेळी केली होती. अशा पिचेसवर कसं खेळावं, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ती खेळी होती.
अजित वाडेकर हे अत्यंत मितभाषी, पण अभ्यासू कर्णधार होते. त्यांना प्रत्येक प्लेअरची स्ट्रेंथ ठाऊक. ही वॉज अ ग्रेट कॅप्टन, प्लेअर अँड पर्सन टू.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकरांनीही एक वेगळी आठवण सांगितली, म्हणाले, त्या काळी वाडेकरांची मॅच बघायला आम्ही काय काय अतरंगी गोष्टी केल्यात ते आमचं आम्हीच जाणो. मी स्कॉलरशिपला बसलो होतो, बालमोहन शाळेत परीक्षा होती. मागेच शिवाजी पार्क. आता जसं त्या परिसरात इमारतींचं प्रमाण वाढलंय, तसं त्यावेळी नव्हतं. त्यामुळे शिवाजी पार्क दिसायचं. एका दिवशी दोन पेपर होते, दोन पेपरच्या मध्ये ब्रेक असायचा. मावशी डबा घेऊन आली होती. तो डबा खायचं किंवा पुढच्या विषयाची उजळणी करायची सोडून मी त्यावेळी सुरु असलेली वाडेकरांची मॅच पाहत बसलो होतो. इतकं आमचं वाडेकरांवर नितांत प्रेम.
या साऱ्या यादगार क्षणांना एकीकडे उजाळा मिळत असतानाच तिकडे वाडेकर सरांवर अंत्यसंस्कार झाले आणि शिवाजी पार्क स्मशानभूमीतून निघालो, रित्या मनात त्यांच्या आठवणी भरुन.
अलविदा वाडेकर सर....
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2018 11:28 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -