Lata Mangeshkwar: लता मंगेशकर नावाचा चार पिढ्यांवर मोहिनी घालणारा हा दैवी सूर आज अनंतात विसावला. सकाळीच ती चटका लावणारी बातमी आली आणि मन जडावलं, हेलावलं. ज्या स्वरांनी, ज्या आवाजाने आपल्या सुखदु:ख, आशा-निराशा, उत्साह-निरुत्साह अशा सगळ्या मनोवस्थांमध्ये सकारात्मकतेची ऊर्जा दिली. त्या लतादीदी आता आपल्यात नाहीत. पुढे दिवस सरत गेला, तसतशी लतादीदींच्या अंत्ययात्रेची वेळ जवळ आली. त्यांची अंत्ययात्रा प्रभुकुंजवरुन शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली तेव्हा मी अँकरिंगला होतो. जन्मभूमी आणि कर्मभूमीही मुंबई असल्याने पेडर रोड, हाजी अली परिसर, वरळी, प्रभादेवी या भागांशीही नातं जडलंय. त्यात स्वरसम्राज्ञीचा अखेरचा प्रवास याच मार्गाने होत होता, रस्ते भरुन गेले होते आणि मनही भरुन आलं होतं. हाजी अलीच्या जवळ अंत्ययात्रा पोहोचली तेव्हा एक वेगळाच अनुभव आला. गीतांच्या महासागरात आपल्याला चिंब करणाऱ्या लतादीदींना जलसागर आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेला जनसागर असे दोन्ही दीदींना जणू वंदन करत होते. अनेक जण आपल्या कॅमेऱ्यात लतादीदींची अखेरची मुद्रा टिपण्याचा प्रयत्न करत होते. यात सगळ्या वयोगटातले, जातीधर्मातले चाहते होते. संगीताची त्यातही लतादीदींच्या स्वरांची हीच तर जादू आहे, जिला अशा कुठल्याही सीमारेषा नाहीत. कोणतीही बंधनं नाहीत. हे स्वरबंध आहेत, आयुष्यभर जपण्याचे. त्यांची असंख्य गाणी मनात रुंजी घालतात. म्हणजे बघा ना...अगदी मधुबालापासून काजोलपर्यंतच्या पिढ्यांना दीदींनी आवाज दिलाय. 


आयेगा आनेवाला ते मेरे ख्वाबो मे जो आए... किंवा ‘मग ओ पालनहारे’सारखं भजन असो हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढे ‘जेल’ आणि ‘पेज’ थ्रीसारख्या सिनेमातही त्या गायल्यात. संगीतकारांचा विचार केल्यास गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, अनिल बिस्वास, सी.रामचंद्र, एस.डी.बर्मन, नौशाद, खय्याम, रोशन, मदनमोहन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल...नावं लिहून आपली दमछाक होईल. इतक्या मंडळींसोबत त्यांनी अविस्मरणीय गीतं गायलीत. नूतन-तनुजा-काजोल या भिन्न पिढ्यांसाठी त्यांनी प्लेबॅक दिलाय. त्यांचं पार्श्वगायन नायिकेच्या पडद्यावरील व्यक्तिरेखेशी आणि त्या नायिकेच्या आवाजाशी इतकं एकरुप व्हायचं की, त्या अभिनेत्रीच गाणं म्हणतायत, हा अनुभव येत असे. रोशन पितापुत्र किंवा बर्मन पितापुत्र असोत. या भिन्न काळातील संगीतकारांच्या गीतांनाही दीदींनी खुलवलंय. अगदी गीतकारांच्या बाबतीतही अंजान आणि समीर हे पितापुत्रांचं उदाहरण देता येईल. सिने दिग्दर्शकांबद्दल बोलायचं झालं तर मेहबूब खान, राज कपूर ते आशुतोष गोवारीकर, मधुर भंडारकर इतक्या भिन्न काळातील दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलंय. हा आवाका पाहून आपले हात आपसूकच जोडले जातात. ‘आनंदघन’ नावाने संगीत दिग्दर्शन असेल किंवा मग ‘लेकिन’सारख्या चित्रपटाची निर्मिती असेल याही कक्षांमध्ये त्यांनी मुक्त विहार केलाय. तसाच वेळोवेळी सामाजिक भावही जपलाय. क्रिकेटवर नुसत प्रेम नाही केलं, तर ८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाला भरीव आर्थिक मदतीसाठी त्यांनी खास कार्यक्रमही केला.


जुन्या काळातील एलपी-ईपी रेकॉर्डसपासून ते सध्याच्या डिजिटल मीडियापर्यंत त्यांची गाणी निनादत नव्हे दुमदुमत राहिलीत, राहतील. काळाच्या ओघात रेकॉर्डसची कव्हर्स जुनी झाली असतील कदाचित. पण, दीदींचा आवाज तसाच ताजा, टवटवीत आणि प्रफुल्लित करणारा. त्यांच्या आवाजाचा हा रेकॉर्ड अबाधित राहणार कायमचा. आपण भाग्यवान आहोत की, लतादीदींच्या स्वरांचा इतका सहवास आपल्याला लाभला. पुढेही लाभत राहणार आहे.


ख्यातनाम गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी एका कार्यक्रमात म्हटल्याचं मला आठवतंय, त्याप्रमाणे जगातील कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे क्षणोक्षणी लतादीदींचं एक तरी गाणं सुरु असतंच. आजच्या दिवसाबद्दल पुन्हा एकदा सांगायचं झालं तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि कर्णधार बाबर आझम हेही दीदींच्या निधनाने व्यथित झाल्याची बातमी आली. त्याच वेळी लतादीदींच्या अंत्यसंस्कारांचं टेलिव्हिजन कव्हरेज ४० हून अधिक देशांमध्ये पाहिलं जात होतं, अशीही माहिती मिळाली. यात डिजिटल मीडियाचा आकडा जमेस धरला तर तो किती वाढेल याचा अंदाजही येणार नाही. विश्वव्यापी असणं म्हणजे दुसरं काय असतं?


जाता जाता इतकंच म्हणावसं वाटतं की, लतादीदी शरीररुपाने जरी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांचं स्वरतेज आपलं आयुष्य कायम प्रकाशमान करत राहील, उजळत राहील.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha