गोलंदाजांचा कर्दनकाळ विवियन रिचर्डस यांनी कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर त्याची या शब्दात ट्विट करत पाठ थोपटली.


“विराट, तुझं नाव जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये घेतलं जाईल”


 साक्षात आक्रमकतेच्या एव्हरेस्टने फडकवलेलं ते कौतुकाचं निशाण म्हणावं लागेल.


गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये मैदानाबाहेर जे घडलं ते साऱ्यांसमोर आहे. त्यामुळे विराटच्या कर्णधारपदाचं हे टायमिंग फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतलेला निर्णय म्हणून घ्यायचं की, आणखी काही त्यामागे आहे हे येणारा काळच ठरवेल.


तरीही कॅप्टन म्हणून कोहलीने बजावलेली कामगिरी, खास करुन कसोटी कर्णधार म्हणून त्याचा परफॉर्मन्स भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेणारा राहिला आहे. परदेश भूमीवर आपण सातत्याने कसोटीत जिंकायला लागलो ते याच काळात. ६८ कसोटींपैकी ४० विजय १७ पराभव आणि ११ अनिर्णित ही कामगिरी पुरेशी बोलकी आहे. २४ कसोटी मालिकांपैकी १८ विजय, पाच पराभव हा आकडाही छाती अभिमानाने फुलवणारा आहे.


यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जिंकणं खास मोलाचं. जिथे आपली दाणादाण उडायची, तिथे कोहली आणि कंपनीने यजमान टीमच्या तोंडचं पाणी पळवलं. कोहलीच्या काळात वन डेसोबतच टी-ट्वेन्टीची पाळंमुळं अधिक खोलवर रुजली. यामुळे कसोटी सामने निकाली ठरण्याचं प्रमाण वाढलं. त्यातच कोहलीसारखा आक्रमक कर्णधार, एक्स्प्रेसिव्ह नेता भारतीय टीमला लाभला. सोबतच तितक्याच आक्रमक वृत्तीचा रवी शास्त्री यांच्यासारखा कोचही त्याच काळात लाभला. ज्याने कोहलीच्या नेतृत्वाला आणखी धार आली. विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या या निर्णयानंतर रवी शास्त्री यांच्या ट्विटमधील एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, Definitely India's most aggressive and successful. आक्रमकतेच्या बाबतीत सौरव गांगुलीनी जी वात टीम इंडियामध्ये पेटवली त्याची विराटने मशाल केली असं म्हणता येईल.


परदेश भूमीवर खास करुन ऑस्ट्रेलियासारख्या देशात तुम्हाला जाऊन जिंकायचं असेल तर तुमच्याकडे केवळ क्षमता आणि गुणवत्ता असून चालत नाही तर चौकटीत राहून त्यांना भिडण्याची, प्रसंगी ‘अरेला कारे’ करण्याची माझी तयारी आहे, हे दाखवावं लागतं. यासाठी पूर्ण सिनेमा रीलीज करण्याची गरज नसते, नुसता ट्रेलरही पुरतो. कोहलीने तो ट्रेलर नेहमी दाखवला. टीम कॉम्बिनेशनबद्दलही त्याने काही गोष्टी ठरवून घेतल्या. पूर्वी आपलं संघ समीकरण सहा फलंदाज, चार गोलंदाज आणि विकेट कीपर असं असायचं. कोहलीने ते पाच फलंदाज, पाच गोलंदाज (त्यातला एक काही वेळा ऑलराऊंडर म्हणून गणला जाणारा) आणि एक विकेट कीपर असं केलं. एक फलंदाज कमी करुन एक गोलंदाज प्लेईंग इलेव्हनमध्ये वाढवणं, म्हणजेच पाच निव्वळ गोलंदाज खेळवण्याचा निर्णयच मुळात आक्रमक वृत्ती दाखवणारा होता. मग ती मायभूमी असो वा परदेशातील कसोटी. कोहलीने सातत्याने पाच तज्ज्ञ गोलंदाज घेऊन मैदानात उतरणं पसंत केलं. पूर्वी फिरकी खेळपट्टी म्हणजे टीम इंडियाची हिट कामगिरी हे इक्वेशन ठरलेलं. कोहलीने वेगवान गोलंदाजी हीदेखील भारताची ताकद होऊ शकते, हे अधोरेखित केलं. खास करुन परदेशात सातत्याने कसोटी सामने जिंकायचे असतील तर ते तुम्हाला फिरकीचं ताट पुढे करणार नाहीत. त्यांच्याकडे खेळपट्ट्यांच्या मेन्यूमध्ये उसळी, स्विंग आणि वेग हे प्रमुख पदार्थ असतात. मग, आपण आपल्या डिशमध्येही हा मेन्यू समाविष्ट केला. नुसता समाविष्ट केला नाही तर, त्याने यजमान फलंदाजांची चव घालवली. कोहलीने वेगवान गोलंदाजांना आत्मविश्वास दिला, मोकळीक दिली. याचा निकाल तुमच्यासमोर आहे. शमी, बुमरा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर ही नावं आता वेगवान गोलंदाजीची अस्त्रं झालीत. ही नावं अस्त्र होण्यामागे कोहली नावाचा योद्धा नेता आहे.


भारतीय क्रिकेटला गांगुली, धोनी आणि कोहलीच्या रुपात तीन असे कर्णधार लाभले ज्या प्रत्येकाने भारतीय क्रिकेटची उंची वाढवली. आता येणारा कर्णधार (रोहित किंवा राहुल) हादेखील तिचे मापदंड आणखी मोठे करेल, अशी अपेक्षा बाळगूया.


कोहलीची खेळाडू म्हणून असलेली महानता सर्वच जाणतात. गेली दोन-अडीच वर्षे त्याला शतकांनी कोरडं ठेवलंय. आम्ही क्रिकेटरसिकही त्याची शतकं पाहायला तहानले आहोत. ती तहान त्याने आता भागवावी आणि वाढवावीदेखील. आता त्याला फलंदाजीवर लक्ष अधिक द्यायचंय, त्याच वेळी ती अधिक एन्जॉयदेखील करायचीय. यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा.