स्थळ – ब्रिस्बेन, 19 जानेवारी 2021 . टीम इंडियाने अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला होता. ऋषभ पंतसह यंग ब्रिगेडने तगड्या ऑसी टीमला त्यांच्याच भूमीत गुडघे टेकायला लावले होते. स्मिथ, वॉर्नरसारखे मोहरे फलंदाजीत तर स्टार्क, कमिन्स, लायन आणि हेझलवूड ही गोलंदाजीतील त्यांची सर्वश्रेष्ठ चौकडी असताना आपण त्यांना धूळ चारलेली. कांगारुंच्याच भूमीवर त्यांना लागोपाठच्या दोन मालिकांमध्ये अस्मान दाखवणाऱ्या फार टीम्स नाहीत. तो पराक्रम आपल्या टीमने करुन दाखवलेला.  एका वर्षाने त्याच सुमारास पाच दिवस आधी म्हणजे 14 जानेवारीला आपण आणखी एक इतिहास रचण्याची संधी गमावली. फलंदाजीतील फ्लॉप शो आणि सातत्यहीन गोलंदाजीने घात केला.


म्हणजे पुजारा, रहाणे तसंच काही प्रमाणात कोहलीला ही जबाबदारी घ्यावी लागेल. कोहलीनेदेखील पोस्ट मॅच कमेंटमध्ये


फलंदाजांची निराशाजनक कामगिरी ही बाब मान्य केली. कौतुक दक्षिण आफ्रिकेचं करावं लागेल की, रबाडासारखा एकमेव अनुभवी गोलंदाज आणि एल्गार तसंच काही प्रमाणात बवूमासारखा अनुभवी फलंदाज असताना त्यांनी कोहली, राहुल, पुजारा, रहाणे, बुमरा, शमी, अश्विन सारखी अनुभवी स्टारकास्ट असलेल्या टीमचा पिक्चर फ्लॉप करुन दाखवला.


ही मालिका झाल्यावर सहज म्हणून आकडेवारी चाचपली. तर हे हाती लागलं, तुम्हीच पाहा..


कोहली - 99 कसोटी, पुजारा - 95 कसोटी आणि रहाणे - 82 कसोटी, तर दुसरीकडे द. आफ्रिकेच्या बॅटिंगची ताकद असलेले एल्गर 72 कसोटी, कीगन पीटरसन अवघे 5 कसोटी सामने, तर बवूमा 47 कसोटी सामने.


गोलंदाजीतही बुमरा – 27 कसोटी, शमी – 57 कसोटी, अश्विन – 84 कसोटी सामने तर द. आफ्रिकेचं वेगवान अस्त्र रबाडा – 50 कसोटी सामने, ऑलिव्हर -12 कसोटी, जॅनसन –3 कसोटी.


हे आकडेदेखील भारताच्या बाजूने कौल देत होते. असं असताना, त्यातही पहिली कसोटी जिंकल्यानंतर आपण दोन्ही सामने गमावण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. इतका सातत्यहीन खेळ आपण अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये केला.


शेवटच्या दोन्ही कसोटीत भारतीय टीमचा स्कोर 202, 266, 223 आणि 198 असा राहिलाय. हे आकडे प्रचंड डिप्रेसिंग आहेत. खास करुन जेव्हा तुमच्याकडे कोहली, रहाणे, पुजारा, राहुलसारखे दादा बॅट्समन आहेत. पंत, शार्दूल ठाकूर, अश्विनसारखी उपयुक्त मधली फळी आहे. तेव्हा तर खूपच निराशाजनक. फलंदाजांनी पुरेशा धावांचं कव्हर दिलं नाही, असं म्हणून पराभवाचा जास्त दोष हा फलंदाजीलाच द्यावा लागेल. तरीही ज्या खेळपट्टीवर आपल्या ताकदवान बॅटिंग लाईनअपला 202, 223, 198 वर दक्षिण आफ्रिका उखडून टाकते. त्याच पिचवर दक्षिण आफ्रिका संघाच्या आपण चारपैकी दोनदा फक्त तीन-तीन विकेट घेऊ शकतो. तेही चौथ्या दिवसाच्या खेळपट्टीवर. हे स्वीकारायला जड वाटत तरी वास्तव आहे.


मालिकेतली आकडेवारी आणखी सखोल पाहिली तर मालिकावीर ठरलेल्या पीटरसनच्या अखेरच्या चारपैकी तीन इनिंग्ज 62 , 72 आणि 82 आहेत. त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये 276 धावा केल्या. मुख्य म्हणजे मोक्याच्या क्षणी धावा केल्या. मालिकेत पिछाडीवर असताना तो १०० कसोटी सामन्यांची मॅच्युरिटी, डोक्यावर बर्फाची लादी असल्यासारखं टेम्परामेंट घेऊन खेळला. भारतीय गोलंदाजी खास करुन वेगवान गोलंदाजी जी गेल्या काही महिन्यांमध्ये जगातील सर्वोत्तमपैकी एक म्हणून गणली जाते. ती त्याने समर्थपणे हाताळली. ऑफ स्टम्पबाहेरचे चेंडू म्हणजे फलंदाजांसाठी अपघात प्रवण क्षेत्र असतं, तिथे त्याने गाडी स्लो चालवली किंवा त्या रस्त्यालाच तो गेला नाही, असं आपण म्हणूया. ते चेंडू त्याने थेट कीपरच्या हातात जाऊ दिले. खराब चेंडूंचा समाचार घ्यायलाही तो विसरला नाही. म्हणजे बघा ना, तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 166 चेंडूंत 72 धावा करताना त्याने 249 मिनिटं ठाण मांडलं. तर, दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 113 चेंडूंत 82 धावा चोपून काढताना प्रतिहल्ला करणारी बॅटिंग केली. ज्यामध्ये 10 चौकार होते आणि स्ट्राईक रेट होता 72.56 चा. केवळ पाच कसोटी सामन्यांचा अनुभव असतानाही (म्हणजे या मालिकेआधी दोनच सामने) त्याने दाखवलेली जिगर केवळ कौतुकास्पद होती.


याउलट ज्या फलंदाजीबद्दल कायम गोडवे गायले जातात. ज्यांनी याआधी अनेक अग्निदिव्य पेललीत, हे खरंही असलं तरी या मालिकेत तुलनेने अननुभवी आक्रमाणासमोर या फलंदाजांनी कच खाल्ली. खास करुन पुजारा आणि रहाणे या दोघांच्या कामगिरीवर इथून पुढे क्रिकेट बोर्डसह साऱ्यांचंच स्कॅनिंग मशीन असणार आहे. याला कारणं दोन. त्यातलं पहिलं म्हणजे त्यांच्यातली प्रचंड क्षमता आणि गुणवत्ता त्यांनी न वापरल्याचा प्रेमळ राग आणि दुसरं अत्यंत प्रॅक्टिकल ते म्हणजे कसोटी पदार्पणात शतक झळकवणारा श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हनुमा विहारी दारावर टकटक करतायत. तसंच ऋतुराज गायकवाड, पडिक्कलसारखी मंडळीही बाळसं धरतायत. पंतसारखा कसोटी क्रिकेटमधील युवा फलंदाज शतक ठोकताना आपल्या पुजारा, रहाणेसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजांनी एक अर्धशतकही ठोकू नये, हे फारच क्लेशदायक आहे.


भारतीय गोलंदाजी जिने परदेशात भारताला मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचललाय. त्या गोलंदाजीच्या फळीलाही ही पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल.


बुमरा, शमीसारखे जगभरातल्या फलंदाजांवर दादागिरी करुन आलेले गोलंदाज अखेरच्या दोन्ही सामन्यांमधील निर्णायक डावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 10 विकेट्स काढू शकले नाहीत. खेळपट्टी फिरकीला इतर ठिकाणी पोषक असते तशी नसली तरी अश्विनलाही काही प्रमाणात ही जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्हाला जर वॉर्न आणि मुरलीधनरच्या पंक्तीत बसायचं असेल तर तुम्हाला सगळीकडे कन्सिस्टंटली विकेट्स काढता यायला हव्यात.


इथे मला आफ्रिकन गोलंदाजीचंही कौतुक करावंसं वाटतं. रबाडा तीन मॅचेसमध्ये 20 विकेट्स, सरासरी 19 ची तर स्ट्राईक रेट 35चा. जॅनसन ज्याला या मालिकेचं फाईंड म्हटलं जातंय, त्याची आकडेवारीही फलंदाजीतील पीटरसनच्या आकडेवारीप्रमाणे नजरेत भरण्यासारखी आहे. तीन मॅचेसमध्ये 19 विकेट्स, सरासरी अवघी 16ची आणि स्ट्राईक रेट 32चा. आपल्या गोलंदाजीत डावखुरा वेगवान गोलंदाज असणं किती महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित करणारी ही आकडेवारी. त्याच वेळी बुमराने तीन सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेताना 23ची सरासरी नोंदवली तर स्ट्राईक रेट तब्बल 52चा. तर शमीच्या खात्यात याच तीन मॅचेसमध्ये 14विकेट्स, जिथे 21ची सरासरी आणि 43चा स्ट्राईक रेट. हा स्ट्राईक रेटच बहुदा दोन्ही संघांमधील पराभवाचं एक कारण होता. जिथे आफ्रिकन गोलंदाजी 35 आणि 32ची सरासरी नोंदवत असताना भारतीय गोलंदाजीला वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर घाम गाळावा लागला. स्ट्राईक रेट होता 52 आणि 43.


स्टीव्ह वॉ, टेलरच्या त्या ऑस्ट्रेलियन टीमसारखं जगावर साम्राज्य गाजवण्याचं स्वप्न आपण पाहत असू, तर त्या स्वप्नाला सुरुंग लावणारे हे आकडे आहेत. किंबहुना या मालिकेतील प्रमुख खेळाडूंची कामगिरीच या स्वप्नाच्या ठिकऱ्या उडवणारी आहे. या मालिकेत तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एल्गरच्या बाजूने जाणारा रिव्ह्यू डिसिजन हाही मालिकेतील महत्त्वाचा घटक म्हणावा लागेल. पण, तो फक्त एक घटक आहे, मालिकेच्या निकालाचं कारण नव्हे.


जसं सुरुवातीला मी म्हटलं, ऑसी भूमीवरील 2021 मधील ऐतिहासिक कामगिरीचा आनंदोत्सव आपण करत होतो, तो  आवाज शांत होतो न होतो तोच तुलनेने खूपच अननुभवी अशा दक्षिण आफ्रिकन संघाकडून त्यांच्याच भूमीत झालेल्या पराभवाची शोकसभा भरवण्याची वेळ आपल्यावर आलीय. एक इतिहास घडवण्याचा क्षण आपल्या हातून निसटलाय. किंबहुना आपण तो घालवला, आपल्या कर्माने. आत्मपरीक्षणाची वेळ आलीय. अव्वल संघ आणि सार्वकालिक महान संघांपैकी एक संघ यातला फरक आपल्याला पुसायचा असेल तर ते करावंच लागेल.