ये ड्रॉ जीत के बराबर है..सिडनी कसोटी ड्रॉ झाल्यावर भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात ही भावना नक्की निर्माण झाली असेल. कोहली, ईशांत शर्मा, शमी, उमेश यादव संघात नाहीत. पंत, जडेजा दुखापतग्रस्त. पाचव्या दिवशी 407 चा पहाड चढायचा. त्यात रहाणेसारखा बुरुज पहिल्या काही मिनिटांतच ढासळलेला. पुजाराच्या साथीला विहारी आणि मग गोलंदाज.


ऑस्ट्रेलियाच्या मनात रहाणे बाद झाला त्या क्षणी विजयाची पालवी नक्की फुटली असेल. पण, रहाणेच्या शिलेदारांच्या मनात काही औरच होतं. पुजारा, विहारी, अश्विन यांनी नांगर टाकून कसोटी क्रिकेटची अस्सल चव भारतीय क्रिकेटप्रेमींना चाखायला दिली. त्यात ऋषभ पंतच्या फटकेबाज खेळीचा तडका लागला आणि पाचवा दिवस आणखी गोड झाला.


खरं तर रहाणे आऊट झाल्यावर विहारी फलंदाजीला उतरेल, अशी अपेक्षा होती. पण, पंतला बढती देण्यात आली. त्यानेही दोन्ही हाताने ही संधी घेतली. ही मूव्ह गट्सी होती, तितकाच मास्टरस्ट्रोकही. म्हणजे डाव्या-उजव्या फलंदाजाचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आलं. जे रहाणे पोस्ट मॅच कमेंट्समध्ये म्हणाला. याने गोलंदाजाला प्रत्येक वेळी फलंदाज बदलल्यावर दिशा, टप्पा बदलावा लागला. त्यात पंतने कोणतंही परिस्थितीचं दडपण न घेता तसंच त्याला असलेली दुखापत जाणवू न देता फलंदाजी करत धावा लुटल्या. 118 मिनिटात 118 चेंडूंमध्ये 97 धावांची खेळी त्याने केली. टीम इंडियाचा धावफलक 250 ला तीन अशा सदृढ स्थितीत होता. खास करुन पाचव्या दिवशी विचार केल्यास. आता कांगारु बॅकफूटवर होते आणि भारतासाठी विजयाचं दार किलकिलं होतंय, असं वाटू लागलं. तेवढ्यात एक आक्रमक फटका खेळण्याच्या नादात पंत बाद झाला, 12 चौकार, तीन षटकारांसह 82 च्या स्ट्राईक रेटने खेळणारा पंत पंत आणखी एक तास टिकला असता तर टिम पेन आणि कंपनीला नक्की आणखी घाम फुटला असता. पण, क्रिकेटमध्ये जर-तरला काहीही किंमत नसते.


त्यामुळे किलकिला झालेला दरवाजा पुन्हा बंद झाला आणि इथून पुढे आपला किल्ला वाचवायचा, याच हेतूने फलंदाजी झाली. त्यातही पुजाराने हेझलवूडच्या एका चेंडूची लाईन मिस केली आणि तो बाद झाल्याने धडधड वाढली. विहारी, अश्विन, जडेजा आणि तीन वेगवान गोलंदाज. जवळपास 40-42 ओव्हर्सचा खेळ बाकी होता.


तेव्हा विहारी-अश्विन जोडीने केलेला खेळ आणि त्याआधी रहाणे लवकर बाद झाल्यावर पुजाराने पंतच्या साथीने केलेली फलंदाजी, ही कामगिरी म्हणजे टेस्ट क्रिकेटची रिअल टेस्ट होती. म्हणजे नांगर टाकणे, वगैरे शब्दप्रयोग आम्ही पूर्वी ऐकले होते. किंबहुना सचिन-द्रविड, लक्ष्मणच्या टीमनंतर या संघातील पुजारापुरतेच ते अलिकडच्या काळात मर्यादित होते. इथे हनुमा विहारी आणि अश्विन मैदानात होते. म्हणजे यापैकी कोणीही स्पेशालिस्ट फलंदाज नव्हे तर दोघेही ऑलराऊंडर टॅगमधले. विहारी बॅटिंग ऑलराऊंडर आणि अश्विनच्या नावावर चार शतकं असल्याने त्याला आपण बोलिंग ऑलराऊंडर म्हणायला हवं.


पाचव्या दिवशीची मंद होत चाललेली तरीही काही वेळा अनइव्हन बाऊन्स दाखवणारी खेळपट्टी, समोर स्टार्क, कमिन्स, हेझलवूड हे वेगवान त्रिकूट आणि लायनसारखा खडूस ऑफ स्पिनर. परिस्थिती प्रतिकूल होती, त्यावेळी डोकं शांत ठेवून खेळपट्टीवर उभं राहण्याची गरज होती. जी या दोघांनी पार पाडली. खास करुन विहारीने दुखापतग्रस्त झाल्यानंतरही जी जिगर दाखवली त्याला तोड नाही. मांडीचे स्नायू दुखावल्यानंतरही त्याने मांडी ठोकून फलंदाजी केली, अश्विननेही त्याच्यावर केलेले बाऊन्सर्सचे प्रहार पोलादी मनोवृत्तीने अंगावर पेलत संघाची तटबंदी अभेद्य ठेवली. क्रिकेट इज अ माईंड गेम. पुन्हा एकदा प्रूव्ह झालं. खरं तर पहिल्या डावात दोन बाद 200 वरुन ऑस्ट्रेलियाला 338 वरच रोखणं, मग दुसऱ्या डावातही जडेजा दुखापतग्रस्त झाल्यावर त्यांना धावा लुटू न देणं आणि आज पाचव्या दिवशी केलेली फलंदाजी. ही कणखर मनोवृत्तीचीच सूचक उदाहरणं होती. या मनोयुद्धात आज पाचव्या दिवशी तर आपल्या फलंदाजांनी कमाल केली. आपण 334 चा पल्ला गाठला. म्हणजे पाचव्या दिवशी फक्त तीन विकेट गमावल्या. ऑसी गोलंदाजांनी निखारे पेटवण्याचा प्रयत्न केला, पण, निर्णायक तीन तासात विहारी-अश्विनने अप्रतिम टेम्परामेंट दाखवलं. हे निखारे जे आपल्याला पराभवाचा चटका देणारे ठरले असते, त्यावर चालताना त्याची धग या दोघांनीही जाणवू दिली नाही. त्याआधी पुजारानेही गोलंदाजांचा घामटा काढला. पुजारा 205 मिनिटांमध्ये 77, विहारी 161 चेंडूंमध्ये नाबाद 23 आणि अश्विन 128 चेंडूंमध्ये नाबाद 39 ही कामगिरी कसोटी क्रिकेटच्या वैभवाला आणखी एक टिळा लावणारी आहे तशीच या तिघांसह टीम इंडियासाठी नक्कीच छाती फुगवून सांगण्यासारखी आहे. भारत या सामन्यामध्ये चौथ्या डावात 200 चा पल्लाही गाठू शकणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचा महान माजी फलंदाज पाँटिंग म्हणाला होता, त्याचे दात त्याच्याच घशात गेले ते बरं झालं.


या निकालाने निर्णायक कसोटीसाठी आता अगदी करेक्ट प्लॅटफॉर्म सेट झालाय, असं म्हणूया.


आता दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत कोणकोण जातंय आणि प्लेईंग इलेव्हनसाठी कोण कोण अव्हेलेबल आहे, ते पाहायचं. एक नक्की की, या ड्रॉने टीम इंडियाला विजयाचा आनंद दिला असणार. जो आपल्यासारख्या क्रिकेटप्रेमींनाही झाला.


गेल्या वेळसारखीच 2-1 ची स्कोरलाईन असावी, असं स्वप्न माझ्यासारखे क्रिकेटप्रेमी पाहातायत. पाहूया ब्रिस्बेनचा बादशहा कोणता संघ ठरतो? तोपर्यंत या ड्रॉचा उत्सव साजरा करुया.


अश्विन बापट यांचे अन्य ब्लॉग : 




BLOG | आता ग्रिप सोडू नका...