आणखी एक कसोटी अडीच दिवसात संपली. भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या मालिकेत सलग तिसऱ्यांदा असं घडलं. यावेळी निकाल आपल्या विरोधात गेला. त्यामुळे कामगिरीचा लेखाजोखा अधिक डोळसपणे मांडणं गरजेचं आहे. पहिल्या दोन कसोटीत आपण अडखळती सुरुवात करुनही जिंकलो. कारण, अक्षर, जडेजा आणि अश्विन या मधल्या तसंच तळाच्या फळीने आपली बुडत जाणारी नौका केवळ वर काढली नाही तर तीरावर नीट लावली. यात पहिल्या कसोटीत रोहितच्या एका बहारदार शतकाने दीपस्तंभासारखी दिशा दाखवलेली. म्हणून टॉप ऑर्डरच्या अन्य फलंदाजांचा फ्लॉप शो झाकला गेला. इंदूरच्या या तिसऱ्या सामन्यात मात्र असं झालं नाही. अक्षर पटेल, जडेजा, अश्विन यांना कांगारुंनी फार तग धरु दिला नाही किंवा धावाही करु दिल्या नाहीत. परिणामी आपण तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात मॅच गमावली.


याचं मूळ होतं आघाडीवीरांची कचखाऊ फलंदाजी. ज्यांच्यावर किमान अडीचशे-तीनशे धावा गाठण्याची जबाबदारी असते, ती आपली फलंदाजीची फळी पुन्हा पुन्हा कोसळतेय. इथेही टॉस जिंकून आपण पहिल्या डावात 33.2 ओव्हर्समध्ये 109 वरच ऑलआऊट झालो. फटके खेळण्याच्या नादात विकेट्स देणं, खेळपट्टीवर उभं राहायचे पेशन्स न दाखवणं हा वाढत्या टी-ट्वेन्टी तसंच वनडे क्रिकेटचा हा परिणाम आहे का? अशा चर्चा आता रंगू लागतील.


आपण मात्र याचा तटस्थपणे विचार केल्यास असं लक्षात येतं की, कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटला साजेसा खेळ आपण केला नाही. म्हणजे पाहा ना. या सामन्यात पहिल्या डावात कोहली 64 मिनिटं खेळपट्टीवर होता. तर, विकेटकीपर भरत 53 आणि अक्षर पटेल 57 मिनिटं खेळपट्टीवर होता. तिथे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याच खेळपट्टीवर ख्वाजाने एकट्याने 162 मिनिटे खेळून काढत 60 धावांची झुंजार खेळी केली. लाबूशेनने 118 मिनिटं तर हँड्सकॉम्बने 111 मिनिटं किल्ला लढवला. असं झाल्यावरही कांगारुंनी 11 धावांत सहा फलंदाज गमावले. चार बाद 186 वरुन सर्वबाद 197 असं आपण त्यांना रोखलं. तरीही एव्हाना आघाडी 88 धावांची त्यांच्या खिशात होती. जिथे चेंडू पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच घुमू लागला होता. तिथे ही ८८ ची आघाडी 100-150 च्या मोलाची होती. आपण सामना कदाचित तिथेच हरलो. समोर आघाडीचं ओझं असताना पुन्हा दुसऱ्या डावातही आपण फलंदाजीत शिस्त, संयम दाखवला नाही तसंच ऑसी गोलंदाजांनी खास करुन लायनने आपल्याला जाळ्यात अडकवलं असंही म्हणता येईल. दुसऱ्या डावात आपल्या आठ फलंदाजांना त्याने शिकार केलं. पुजाराचा खणखणीत अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी केवळ हजेरी लावली. पुजाराने 227 मिनिटं चिवटपणे फलंदाजी केली. याखालोखाल पुन्हा अक्षर पटेल 64 मिनिटे तर, रोहित शर्मा 61 मिनिटे पिचवर होता. श्रेयस अय्यर प्रतिहल्ला चढवताना मोठी खेळी साकारतोय असं वाटत असतानाच एका ट्रॅपमध्ये फसला तर, पुजाराची मॅच विनिंग होऊ शकणारी इनिंग स्मिथच्या एका अफलातून कॅचने संपवली. 113 ला चार अशा स्थितीतून आपण 163 वर आटपलो. कांगारुंना विजयासाठीचं लक्ष्य अवघं ७६ चं होतं. अर्ली विकेट्स गरजेच्या होत्या. ख्वाजा पहिल्याच ओव्हरमध्ये सापडला देखील. पण, दुसऱ्या बाजूने म्हणावं तसं प्रेशर राहिलं नाही आणि ऑसी टीमला आपण मालिकेत कमबॅकचं एक पाऊल टाकू दिलं.


अवसानघातकी, लोटांगण घालणाऱ्या  आपल्या फलंदाजांनी पुन्हा घात केला. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी रोहित, पुजारा आणि कोहली हे तिघे आपल्या बॅटिंग लाईनअपमध्ये आहेत. तर, गिल आणि श्रेयस हे दोन गुणवत्तावान युवा फलंदाजदेखील आपल्या भात्यात आहेत तरीही आपण दोन्हीपैकी एकाही डावात  200 चा टप्पा गाठू शकलो नाही. फिरकीवर पोसल्या जाणाऱ्या खेळपट्ट्यांवर वाढूनही आपण पुन्हा पुन्हा ढेपाळतोय. पहिल्या डावात तर कुहनेमनसारख्या नवख्या गोलंदाजाला पाच विकेट्स बहाल करुन बसलो. आपल्या धावफलकाचा चेहराही झाकण्यासारखाच होता. म्हणजे बघा ना... पहिल्या डावात रोहित, गिल, पुजारा आणि कोहलीने 12,21,1,22 असा स्कोर नोंदवला. तर, दुसऱ्या डावात याच चौकडीने 12,5,59,13 अशी आकडेवारी दिली. या आकड्यांनी निकाल काय लागेल हे स्पष्ट केलं.


या पिचवर सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी खरमरीत टीका केलीय. खेळपट्टी कोरडी होती. बॅट आणि बॉलला समान न्याय देणारी नव्हती. जिथे फिरकी गोलंदाजांना सुरुवातीपासून सहाय्य मिळत होतं. सामन्यात पहिल्या दिवशी पाचव्याच चेंडूने खेळपट्टीचे रंग दाखवले. असमान बाऊन्सदेखील पाहायला मिळाला. या शब्दात सामनाधिकाऱ्यांनी निरीक्षण नोंदवत ताशेरे ओढलेत. असं असलं तरीही आपल्या फलंदाजांमध्ये शिस्तीचा, संयमाचा अभाव दिसला. तसंच काही वेळा फटक्यांची अयोग्य निवड केल्याने आपण सेट केलेल्या फिरकीच्या जाळ्यात आपणच अडकलो. म्हणजे टॉस जिंकून मिळालेला फायदा आपण पहिल्या दोन तासांमध्येच गमावला. मालिकेची स्कोरलाईन आता 2-1 झालीय. ती आता 2-2 होऊ द्यायची नसेल तर चौथ्या कसोटीत खास करुन पहिल्या डावात पहिल्या चारपैकी दोघांनी तरी मोठी इनिंग करणं गरजेचं आहे. शिवाय टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची दुसरी जागा आपल्याला खुणावतेय. ती फायनल गाठण्यासाठी बॅट्समन रचती पाया, बॉलर्स चढवती कळस असंच स्क्रिप्ट असायला हवं. रोहितसेनेला सांगूया, अहमदाबादमध्ये जिंका आणि टेस्ट चॅम्पियनशीप फायनल गाठाच.