रविवारची सकाळ क्रिकेटप्रेमींसाठी नकारात्मक बातमी घेऊन उजाडली. पब्लिक डिमांडवर सिक्सर ठोकणारे ऑलराऊंडर सलीम दुर्राणी (Former Indian Cricketer Salim Durani Death) गेले. वय वर्ष 88. माझ्या पिढीने त्यांचा खेळ पाहिलेला नाही. पण, त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय.


ज्येष्ठ लेखक द्वारकानाथ संझगिरी सरांमुळे काही वर्षांपूर्वी सलीम दुर्राणी सरांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी गप्पा करण्याचा योग एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आला. ती टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होती, दुर्राणी सर दिलखुलास बोलले. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला मला आजही आठवतोय. तुमच्या जमान्यात ट्वेन्टी-20 असतं तर?


गॉगल टाईप चष्मा आणि लालसर-गुलाबी असलेला त्यांचा चेहरा हा प्रश्न ऐकल्यानंतर आणखी लाल-गुलाबी झाला, आणखी खुलला. ते म्हणाले, एन्जॉय केलं असतं मी. त्यांच्या या एकाच वाक्याने मी समजून गेलो. त्यांनी षटकारांचा पाऊस पाडला असता. 'वुई वॉन्ट सिक्सर' म्हणत षटकारांची फर्माईश झाल्यावर तात्काळ ती पूर्ण करण्याचं कमाल कौशल्य त्यांच्याकडे होतं, असं आताची सत्तरीतली पिढी आवर्जून सांगते.


त्या काळात क्रिकेट आजच्या इतक्या प्रमाणात खेळलं जात नव्हतं.  त्यामुळेच 1960 ला कसोटी पदार्पण करणाऱ्या दुर्राणींनी 1973 ला अखेरची टेस्ट मॅच खेळेपर्यंत सामन्यांच्या संख्येचा स्कोर अवघा 29 झाला होता. त्यांच्या नावे एक कसोटी शतक आणि 7 अर्धशतकं जमा आहे. तर, 75 कसोटी विकेट्स.  ज्या काळात खेळपट्टीवर नांगर टाकण्याचं व्रत घेऊन कारकीर्दीचा जप केला जायचा, त्या काळात दुर्राणी मर्जीने षटकार ठोकण्याचं स्किल बाळगून होते. अलिकडच्या जमान्यात युवराज सिंहला सिक्सर किंगची मिळालेली उपाधी आपण पाहिलीय. नव्हे, त्याने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला टोलवलेले सहा सलग षटकार आजही मनाच्या भव्य मैदानात रुंजी घालतायत. ती आठवण मला यानिमित्ताने झाली.


दुर्राणींचा खेळ पाहण्याचं भाग्य लाभणाऱ्या काही मंडळींशी मी संवाद साधला आणि त्यांच्या खेळाबद्दल अधिक जाणून घेतलं. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर त्यापैकीच एक. ते म्हणाले, मी दुर्राणींना मुंबईत कांगा लीग खेळताना पाहिलंय. तो त्यांच्या कारकीर्दीतला जरी अस्ताचा काळ होता तरीही त्यांची एकूणात फलंदाजीची स्टाईल एकदम कडक होती. टाईम्स शिल्डमध्ये जे.के.केमिकल्स नावाच्या टीममध्ये त्या काळी पतौडी कर्णधार तर मोहिंदर-सुरिंदर हे अमरनाथ बंधू तसंच हेमंत कानिटकर, सलीम दुर्राणी अशा दिग्गज खेळाडूंचा भरणा होता. तो काळ मला आठवतोय.




स्थानिक क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफीत 71-72 च्या वर्षी त्यांनी हनुमंत सिंह यांच्यासह मैदान गाजवलं. त्या वर्षात वाडेकरांसारख्या महान खेळाडूंचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाला धूळ चारत ती ट्रॉफी मध्य विभागाने पटकवली आणि दुर्राणींचं संघात पुनरागमन झालं.


चंदू बोर्डे आणि दुर्राणी ही 60 च्या दशकातली उत्तम ऑलराऊंडर जोडी म्हणून ओळखली जायची. ही जोडी म्हणजे, दर्जेदार फलंदाज आणि विकेट टेकिंग प्रभावी फिरकी गोलंदाज यांचा संगम होता. बोर्डे लेग स्पिनर तर दुर्राणींची डावखुरी फिरकी. दुर्राणी आर्मर अत्यंत प्रभावीपणे टाकत.


दुर्राणींसंदर्भातली 71 च्या वेस्ट इंडीज दौऱ्यातली एक आठवण मिहिर बोस यांनी 'हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट' या पुस्तकात लिहिलीय. ती फारच इंटरेस्टिंग आहे. त्या वेळी  दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीज संघ एक बाद 150 अशा सुस्थितीत असताना दुर्राणींनी वाडेकरांकडे स्वत:हून गोलंदाजी मागितलेली आणि आपण तुला दोन विकेट्स काढून देतो, असं कॉन्फिडंटली सांगितलं होतं. वाडेकरांनीही दुर्राणींवर विश्वास दाखवला. त्यांनी सोबर्सना शून्यावर क्लीन बोल्ड केलं आणि लॉईडना वाडेकरांकडे झेल देण्यास भाग पाडलं. अशा दोन प्राईज विकेट्स घेत दुर्राणींनी हा विश्वास सार्थ ठरवला.


कद्रेकर पुढे म्हणाले, दुर्राणींच्या कारकीर्दीतील अखेरच्या काही वर्षातली भारत-इंग्लंड मालिका मला चांगलीच आठवतेय. त्या मालिकेत दिल्ली कसोटी आपण गमावलेली. दुसऱ्या सामन्यात कोलकातामध्ये दुर्राणींनी 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, टोनी ग्रेगची महत्त्वाची विकेट त्यांनी काढली. हा सामना आपण जिंकलो. पुढे चेन्नईत (त्यावेळचं मद्रास) आपण लो स्कोरिंग मॅच जिंकलो. या मॅचमध्ये दोन्ही डावात दुर्राणींनी प्रत्येकी 38 धावा केल्या. त्यांचा फॉर्म उत्तम असतानाही त्यांना पुढच्या कानपूर कसोटीत संघातून वगळण्यात आलं. ती टेस्ट ड्रॉ झाली. पुढची कसोटी मुंबईत होती, तेव्हा दुर्राणींचे फॅन असलेल्या मुंबईकर क्रिकेटरसिकांनी 'नो दुर्राणी नो टेस्ट'चे फलक दाखवत इशाराच दिला. त्या सामन्यात दुर्राणी संघात होते. ब्रेबॉर्नवरच्या त्या सामन्यात त्यांनी 73 आणि 37 अशा खेळी करत आपलं नाणं पुन्हा खणखणीत वाजवलं. ब्रेबॉर्नवरचा त्या काळातला आणि दुर्राणींच्या कसोटी कारकीर्दीतला हा अखेरचा कसोटी सामना. कसोटी पदार्पण ब्रेबॉर्नवरच आणि कसोटी क्रिकेटला अलविदाही ब्रेबॉर्नवरच, असा एक वेगळा योगायोग त्यांच्या कारकीर्दीत जुळून आला.


ही कसोटी मालिका आपण 2-1 नं जिंकलो होतो. बॅटचा देखणा फॉलो थ्रू हे त्यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य होतं.


तर ज्येष्ठ सिने लेखक आणि अस्सल क्रिकेटप्रेमी असलेले दिलीप ठाकूर म्हणाले, ख्यातनाम अभिनेत्री परवीन बाबीचे पहिले हीरो सलीम दुर्राणी... सिनेमाचं नाव होतं 'चरित्र'. आणखीही दोन सिनेमे त्यांना मिळाले होते, पण ते काही प्रत्यक्षात वर्क आऊट झाले नाहीत.


क्रिकेटर म्हणून मला त्यांच्यातला बिनधास्तपणा, नीडरपणा भावला. हे खास सांगण्याचं कारण म्हणजे, खेळपट्टी तासन् तास उभं राहत गोलंदाजांना थकवण्याच्या त्या दिवसात दुर्राणी लीलया आपल्या इच्छेनुसार, चेंडूला स्टँडची सफर घडवून आणत. अर्थात षटकार ठोकण्याची त्यांची क्षमता अफाट होती. तसा बिनधास्तपणा मला अलिकडे सेहवाग, रोहित शर्माच्या फलंदाजीत जाणवला. दुर्राणींचं व्यक्तिमत्त्वही तितकंच रुबाबदार आणि बिनधास्त होतं.


अशा या रुबाबदार, शैलीदार फलंदाजाला, उपयुक्त गोलंदाजाने क्रिकेट जगाचा निरोप घेतलाय. पण, क्रिकेट मैदानावर जेव्हा जेव्हा 'वुई वॉन्ट सिक्सर'चा नारा यापुढे घुमेल तेव्हा तेव्हा दुर्राणी सरांचा हँडसम चेहरा समोर येईल. द ग्रेट दुर्राणी सरांना आदरांजली. मिस यू सर...!!!