रांची कसोटी पहिला डाव - आधी पाच बाद 161 आणि नंतर सहा बाद 171 अशी स्थिती
दुसरा डाव - पाच बाद 120


पहिल्या डावात 353 चा डोंगर गाठायचा होता, तर खेळाच्या चौथ्या आणि भारताच्या दुसऱ्या डावात 192 चं विनिंग टार्गेट.


दोन्ही वेळा वाट काट्यातली होती. मैदानात होता 23 वर्षीय ध्रुव जुरेल. कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या एका सामन्याचा अनुभव. अशा स्थितीतही खास करुन रांची कसोटीच्या पहिल्या डावात ध्रुवने कुलदीपला घेऊन जी बॅटिंग केली, हा त्याच्या गुणवत्तेचा ट्रेलर होता. 


कारगिल युद्धात योगदान देणाऱ्या लढवय्या वडिलांचा हा फायटर लेक लढला आणि दोन्ही डावात उत्तम कामगिरीचा झेंडा रोवूनच परतला. त्याची  पहिल्या डावातील 90 ची झुंजार खेळी आणि कुलदीपसह केलेली पार्टनरशिप यामुळे इंग्लंडला मिळणारी जी आघाडी 100 प्लस वाटत होती ती केवळ 46 पर्यंत सीमित राहिली. 


आक्रमण आणि बचावाचा उत्तम संगम त्याने साधला. खराब चेंडूला सीमारेषेपलिकडची जागाही दाखवली. त्याच वेळी बर्फाचं टेम्परामेंट घेऊन खेळपट्टीवर नांगरही टाकला. पहिल्या डावात 211 मिनिटे आणि दुसऱ्या डावात 75 मिनिटे परीक्षा घेणाऱ्या खेळपट्टीवर त्याने अनुभव गाठीशी असलेल्या कसोटीपटूच्या थाटात बॅटिंग केली. दोन्ही वेळा काट्यातली वाट चालणाऱ्या ध्रुवने विजयी फुलांची उधळण केली. सामना जिंकून पॅव्हेलियनमध्ये परतताना ध्रुवला द्रविडने मारलेली शाबासकीची मिठी बरंच काही बोलून जाणारी होती. 


कारकीर्दीच्या दुसऱ्याच कसोटीत सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवणाऱ्या ध्रुवचा कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रवास जो वाचनात आला तो फारच इंटरेस्टिंग आहे. ध्रुवच्या वडिलांना त्यानेही त्यांच्याप्रमाणेच देशसेवेसाठीच कार्यरत राहावं, असं वाटत होतं. त्यावेळी ध्रुवचं मन मात्र क्रिकेटकडे ओढलं गेलं.


वडिलांनाही नंतर हे पटलं, ते इतकं की, त्यांनी ध्रुवसाठी जी पहिली बॅट विकत घेतली त्याकरता त्यांनी 800 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. आज ध्रुवची कामगिरी पाहून त्या एकेक रुपयाची सव्याज परतफेड करायला ध्रुवने सुरुवात केलीय , नव्हे तो एकेक रुपया वसूल होतेय, असं त्याच्या वडिलांना नक्की वाटत असेल.


ध्रुव धोनीला आपला आदर्श मानतो, तर, डीविलियर्सच्या फलंदाजीचा तो फॅन आहे. करीअरमध्ये मोठी उंची गाठायची असेल, तर ध्येय एव्हरेस्ट गाठण्याचंच ठेवायचं असतं. याबाबतीत ध्रुवने अशीच दोन उत्तुंग शिखरं समोर ठेवलीत हे चांगलं आहे.


अंडर 14, अंडर 16 संघ, अंडर 19 विश्वचषक संघात सहभागी तसंच तसंच अंडर 19 आशिया चषक विजेता मग कसोटी संघात एन्ट्री अशी चढत्या क्रमाने त्याची कामगिरी सुरु आहे. त्यात ध्रुवचा कसोटी क्रिकेटचा पाळणाही तरुण वयात हललाय. पहिल्याच मालिकेत त्याची खऱ्या अर्थाने कसोटी पाहिली जातेय.


आतापर्यंतच्या इनिंगमध्ये तरी त्याने डिस्टिंक्शन मिळवलंय. पण आता कुठे त्याच्या कसोटी कारकीर्दीचं झुंजुमुंजू झालंय, अनेक आव्हानांचा उदय अजून व्हायचाय. त्यातून वाट काढत त्याची कारकीर्द यशाच्या लखलखीत प्रकाशाने उजळून निघेल, अशी अपेक्षा करुया.