२ शिवसैनिकांच्या हत्या, कर्डीले, कोतकर-जगताप कुटुंबांचा सहभाग आणि हत्येचा आरोपी म्हणून पारनेर पोलिसात हजर झालेला संदीप गुंजाळ..


संदीप गुंजाळ..अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजमधून संदीपनं बीसीए केलं. तगडा बांधा आणि केडगावचा (त्यावेळीही कोतकर-जगताप-कर्डीलेंची दहशत कॉलेजात असायची)असल्यामुळं त्याची पोरांमध्ये चांगली वचक होती. छोटी-मोठी भांडणं व्हायची, पण संदीपची भूमिका ही कायम मिटवण्याची असायची. दिसायला धिप्पाड असला तरी थोडं सामंजस्यानं घ्यावं हीच त्याची भूमिका होती.

संदीपच्या याच गोष्टीमुळं वर्गातल्या एका मुलीचं संदीपवर प्रेमही जडलं. संदीपलाही ती आवडायला लागली. प्रेम बहरलं. आणि अवघ्या ६ महिन्याच्या प्रेमानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्नही केलं. संसार सुखाचा होईल असं वाटलं होतं. पण ते प्रेम फारच नवखं होतं. हातात काही कामही नव्हतं. यावरुन सारखे वाद व्हायचे. दोघांनाही एकमेकांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. मुलगी माहेरी निघून गेली. जी कधी परत आलीच नाही. आपण काहीतरी बनल्याशिवाय आपली पत्नी परत येणार नाही, हे संदीपला कळून चुकलं. आणि त्यानं एक ध्यास घेतला.

संदीपनं एमपीएससी, यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्याच काळात मास कम्युनिकेशनला प्रवेशही घेतला. संदीप आणि माझी ओळख तिथेच झाली. एकदा काही कारणानं संदीपच्या घरी जाणं झालं. आणि मी ते चित्र पाहून थक्क होऊन गेलो. त्याच्या खोलीच्या भिंतीचा रंगही दिसणार नाही, इतक्या झेरॉक्स सगळ्या भिंतीवर चिटकवलेल्या होत्या. कुठं देशांची नावं आणि राजधानी, कुठं इंग्रजीचं व्यकरण, तर कुठं गणिताची काही सूत्रं.. अगदी घराच्या स्लॅबवरही भूगोलाचे नकाशे चिटकवलेले. त्याला विचारणा केली, तर म्हणला की झोपेतून उठल्यावर नजर छताकडे जाते, नकळत तो नकाशा, राज्य, राजधानी डोळ्यात बसते. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. बरं हे सगळं करण्यासाठी त्यानं घरात एक प्रिंटरही घेतला होतं. नवीन काही आलं की प्रिंट काढायच्या आणि भिंतीवर चिटकवायच्या हा क्रम ठरलेला.

मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतलेला संदीप वर्गात तसा कमीच यायचा. काही असाईनमेंट दिलेल्या कळाल्या की मग वर्गात यायचा. त्याला मदत करावी लागायची. प्रश्न पडायचा जर एमपीएससीच करायची आहे, तर मग मास कम्युनिकेशनला प्रवेश का घेतला? पण त्यावर त्याचं उत्तर असायचं की सगळं शिकून घ्यायचं.

बायकोचा विषय निघाला की डोळ्यात पाणी यायाचं. सगळ्या आठवणी सांगत बसायचा. तिचा वाढदिवस, ती त्याला भेटली तो दिवस, तीनं प्रपोज केलं ती तारीख सगळं त्याच्या लक्षात असायचं. बोलता बोलता २ वर्षे गेली, कम्युनिकेशनच्या परीक्षाही झाल्या. संदीपचे काही विषय अडकले, आम्ही सुटलो. त्यामुळं संपर्कही कमी होत गेला. काही दिवसांनी मुंबईत नोकरी मिळाली आणि मग संदीपशी संपर्क तुटला.

तरीही संदीप अधूनमधून फोन करायचा, वर्षभरापूर्वी त्याचा कॉल आलेला आठवतो, आशिष, लोकल न्यूज चॅनल सुरु करायला किती पैसे लागतात? मलाही याची काही कल्पना नसल्यानं मी त्याला थोडं टाळलं. पण तो त्यावरच अडून बसलेला, तू नगरला ये, आपण न्यूज चॅनल सुरु करु. स्थानिक बातम्यांना खूप महत्त्व आहे, ज्या आता कुठं दिसतंच नाही. पण मात्र मी त्याला दुसऱ्या अनुभवी पत्रकाराचं मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला.

काही दिवसांपूर्वी संदीपनं केडगावमध्ये वाचनालय सुरु केल्याचं कळालं. आनंद वाटला. जिथं लोक कोतकरच्या दहशतीखाली जगतात, तिथं ज्ञानाच्या गंगेतून पवित्रता येईल असं वाटलं. संदीपचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद होता. पण हाच संदीप, तिथल्या कोतकरांच्या प्रभावाशिवाय राहू शकला नाही, हेही तितकंच खरं आहे.

माजी महापौर संदीप कोतकरबद्दल संदीपला आदर होता. महापौर असताना संदीप कोतकरनं महापालिका नवीन जागेत नेली, तहसील कार्यालयापासून महापालिका, जिल्हापरिषदेत केडगावच्या पोरांना भरती केलं. केडगावचा पाणीप्रश्न काही अंशी सोडवला, असं तो सांगायचा. पण ज्यांच्यामुळं रक्ताचे पाट केडगावात वाहिले, त्या कोतकरांबद्दल सहनुभूती असावी याबद्दल मला कायम आक्षेप असायचा.

पण शनिवारी रात्री जेव्हा ही बातमी ऐकली, पायाखालची जमीनच सरकली. एक एमपीएससी, यूपीएससी देणारा, भित्र्या प्रवृत्तीचा, कुटुंब आणि बायकोसाठी रडणारा आणि गावातल्या पोरांसाठी वाचनालय सुरु करणारा संदीप असं कसं करु शकतो, यावर विश्वास बसत नव्हता.

अनेक प्रश्नांनी डोक्यात काहूर माजला. याआधीही कोतकरांनी अनेकांना आपण केलेल्या कृत्यांमध्ये अडकवल्याची चर्चा नगरमध्ये सुरु झाली. याचाच तर हा बळी नाही ना? अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली.

संदीपनं हे कृत्य केलं असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण तरुण पोरांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या या पवृत्तींनाही शासन व्हायला हवं. याची त्रयस्थ समितीतर्फे चौकशी व्हायला हवी, प्रकरण दुसऱ्या जिल्ह्यात चालायला हवं.

 केडगाव कोतकर समीकरण

केडगाव म्हणजे कोतकर हे समीकरण गेले कित्येक वर्षांपासून इथं सुरु आहे. कोतकरांनाच मतदान करायचं अशी सक्ती इथल्या मतदारांवर असते. एखाद्यानं दुसऱ्याला मतदान केलं, याची कुणकुणही कोतकरांना लागली, तर त्याला घरातून उचलायचा आणि आपल्या हॉटेलावर नेऊन बेदम मारहाण करायची. एवढंच काय केडगावातील जमिनीचे व्यवहारही कोतकरांना सांगूनच करावे लागतात, अशी नगरमध्ये यांची दहशत असल्याचं लोक सांगतात.

काही वर्षांपूर्वी अशोक लांडे या लॉटरी चालकाचाही कोतकर पिता-पुत्रांनी भर चौकात खून केला होता. भय इतकं की याची साक्ष देण्यासाठीही कोणी पुढं आलं नाही. शेवटी इथलेच शंकर राऊत यांनी मोठ्या हिंमतीनं कोतकर पिता-पुत्रांविरोधात तक्रार दिली. खमके पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी घरात जाऊन कोतकर पिता-पुत्रांना उचललं आणि त्यांना जेलमध्ये घातलं. याच प्रकरणी हे जेलची हवा खात आहेत, प्रकृतीस्वास्थ्याच्या कारणास्तव सध्या माजी आमदार भानूदास कोतकर बाहेर आहेत, त्यांच्यावर जिल्हाबंदी आहे, पण पुण्यातून ते आजही इथं वचक ठेवतात. आणि आत्ता घडलेली ही घटना याचीच साक्षीदार आहे.

अरुण जगताप, संग्राम जगतापांची गुन्हेगारी

शहरात आतापर्यंत शिवसेना निवडणून येण्याचं हेच मुख्य कारण. दगडापेक्षा वीट मऊ या उक्तीप्रमाणं आमदार अनिल राठोड इथं निवडून येत होते. गुंडांपेक्षा काहीही विकास न करणारा आमदार बरा, असं इथले मतदार म्हणतात. पण मागील वेळेला भाजप-शिवसेना युती फुटली, आमदार कर्डिलेंनीही आपला जावई म्हणजे राष्ट्रवादीतला संग्राम जगताप निवडून यावा यासाठी ताकद पणाला लावली. मतं फुटली आणि अवघ्या 2 हजार मतांनी शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला. त्यावेळी महापौर असणारे संग्राम जगताप आमदार झाले.

आमदार होताच शहरात गुंडाराज सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरातल्या सगळ्या महाविद्यालयात जगताप-कर्डिले आणि कोतकरांच्या पोरांची दहशत कायम झाली. कोणीही काहीही विरुद्ध वागलं, तर त्याला बिनधास्त मारहाण करायची. कॉलेजचं प्रशासनही यांच्या नादाला लागत नाही. यांच्याविरुद्ध कोणी बोलायची हिंमतही करु शकत नाही.

आमदार झाल्यानंतर अनेक गुंड यांचे मोठे पदाधिकारी बनले. शहरांच्या उपनगरातही यांचे वर्चस्व कायम झालं. आणि पाहिजे ते पाहिजे त्या ठिकाणी होण्यास सुरुवात झाली, असं चित्र नगरमध्ये रोज दिसत असल्याचं इथले लोक सांगतात.

याचा प्रत्यय या हत्याकांडासंबंधित चौकशीला संग्राम जगतापांना बोलावल्यानंतर पोलिसांना आला. कार्यकर्ते पोलीस अधिक्षक कार्यालयाची तोडफोड करत आत शिरले. जगतापांना खांद्यावर घेऊन पोलिसांसमोर घोषणा दिल्या. आणि त्यांना सोडवून घेऊन गेले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून धुडगूस घालण्याची या धेंडांची हिंम्मत होतेच कशी? या घटनेनंतर कृष्णप्रकाश या खमक्या अधिकाऱ्याची नगरकरांना आठवण झाली.

कर्डिले-कोतकर-जगताप हे व्याही, 3 पक्ष असले तरी नातं निभावण्यासाठी आपल्याच पक्षांच्या उमेदवारांना पाडतात, दुसऱ्याला तिकीट मिळू देत नाही, वेळप्रसंगी मारहाण आणि हत्याही करतात, असा प्रत्यय नगरकरांना येतो. हाच आतापर्यंतचा शहराचा इतिहास आहे.

कर्डिले-कोतकर आणि जगताप ही नगर शहरात दहशत निर्माण करणारी मंडळी आहेत, हे त्यांच्या आजवरच्या इतिहासावरुन दिसून येतं. ही दहशत अशीच राहिली  तर नगरचा बिहार काय, तालिबान व्हायला वेळ लागणार नाही.