Ashadhi Wari 2023 : सोमवारी रात्रभर पुण्यात वारकऱ्यांची रेलचेल होती. पूर्ण शहर वारकऱ्यांच्या दिंड्यांनी व्यापले होते. कालच्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे एखाद्या सणांचं स्वरूप या  शहराला आलं होतं. या हजारो वारकऱ्यांमध्ये  व्यक्ती तितक्या प्रवृत्ती होत्या. काही हौशी पर्यटक होते ज्यांनी रात्रभर पुण्यातील काही पर्यटन स्थळं हिंडून घेत काही आजसाठी राखीव ठेवली. काही आज्यांना, आजोबांना विठ्ठल दिसेल तेव्हा दिसेल काल मात्र, खेळणी बघून आपली नातवंडं दिसत होती म्हणून दिसतील ती खेळणी आपल्या थैलीत भरत परमार्थातही प्रपंच जिवंत ठेवला. काही पहिल्यांदाच वारीत येणाऱ्यांना या शहराने इतकी भुरळ घातली की काही काळ ते आपण वारकरी आहोत हे विसरूनच गेले होते. परमार्थात नवीन असणाऱ्या त्यांना काय माहित असणार, 'येर ती मायिकें दु:खाची जनिती'
 
आता  म्हटलंच आहे तर काही आणखी किस्से सांगतो म्हणजे तुम्हाला वारीतील आणखी गंमती कळू शकतील. मागच्या वर्षी एक आजी होत्या ज्या बीड जिल्ह्यातून केवळ वारीसाठी आल्या होत्या. रस्त्यावर एक सेवाभावी संघटना वारकऱ्यांसाठी रस्त्यावर राजगिऱ्याचे लाडू वाटत होती, जे आपल्यापुरते घेऊन सर्व वारकरी पुढे सरकत होते. या आज्जींनी आधी तर आपल्यापुरता घेतले त्यानंतर आणखी घेत घेत अशी 10  पाकिटं घेतली. लाडू वाटणाऱ्याला आज्जीबाईचा राग आला त्याने अर्धे मलालाडू काढून घेतले. आज्जीबाईंनी उर्वरित अर्धे घेत पुढे मोर्चा वळवला. मला त्या आज्जींची जरा गंमत वाटली. बरोबर कोणी नसताना, ठिकठिकाणी एवढे सगळं खायला मिळत असताना एवढं घेऊन कशाला बरं चालतानाच स्वत:जवळ ओझं करून घ्यावं. मी पुढे जाऊन थोडा आज्जीबाईंना भेटलो. सुरूवातीला तर त्या काही बोलत नव्हत्या पण नंतर बोलता बोलता त्यांना थोडं बोलकं केलं आणि लाडूंबाबत विचारूनच टाकलं. त्यानंतर आज्जीबाईंनी दिलेला रिप्लाय ऐकून मला त्यांचं अप्रूपच वाटलं. कोणी बरोबर नसताना एकट्यासाठीच एवढे लाडू कशाला घ्यायचे म्हटल्यावर आज्जीबाई म्हटल्या, बाळा आता आषाढीपर्यंत माझा उपवास आहे. मी आता पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करणार नाही. सकाळी चहा आणि दुपारी हे लाडू खाऊन सायंकाळी पुन्हा चहा घेणार आणि रात्री कीर्तन ऐकून झोपणार. वाटेत काही मिळेल न मिळेल म्हणून पिशवीत भरून घेतले म्हणजे मला पंढरपूरपर्यंत पुरतील. आज्जीबाईंचं बोलणं ऐकलं आणि पुढच्या दिवसांची तजबीच रोज करून ठेवणारी माझी आई मला आठवली. सुरूवातीला चेष्टेचा विषय ठरलेली आज्जी बोलता बोलता बायकांची नियोजनाची सवय अधोरेखित करून गेली. 


रात्रीही उशिरा पुण्यात फेरफटका मारताना मला अजून एक गंमत दिसली ती म्हणजे सिनेमा थिएटरमधून रात्री शेटवचा शो संपल्यावर बाहेर सर्व धोतर टोप्या घातलेल्यांची मांदियाळी.. सर्वांना जय हरी म्हटल्यावर आम्ही त्यांना विचारणा केली की इकडे कुठे, तेव्हा त्यांना सिनेमा बघायचा होता म्हणून आल्याचे सांगितले. आपल्याला घरी वाटत असेल की काय हे वारकरी दिवसभर टाळ कुटतात, मृंदग बडवतात आणि पायपीट करत एवढ्या दूर जातात. बघा असं असतं. मध्येच असे आनंद सोहळे साजरे करत वारकरी निवांत आयुष्याची मजा घेत घेत किमान महिनाभर का होईना पूर्णत: स्वत:साठी जगतात. एक वृद्ध वारकरी कपल बाजीराव रस्त्यावर रात्री गोला खाऊन जीभ लाल झाल्यावर एकमेकांकडे बघत तीस-पस्तीस वर्षांच्या संसारानंतरही रोमॅंटिक होतात. मी तर त्यांचं निरीक्षण करताना स्वत:ही दोन गोळे खाऊन टाकले आणि ते कपल निघून गेल्यावर स्वत:बाबतच रोमॅंटिक बनलो. मायेच्या बाजारात असे अनेक वारकरी थोडे फार वाहवत जातातच. मात्र, वाहवत जाणं, प्रवाही राहणं बरंही असतं, कचरा साचत नाही. असो. आपण दोन-तीन उदाहरण दाखल किस्से सांगितल्यावर आता पुन्हा ज्या नैमित्तिक कारणासाठी आपलं रोज लिहिण्याचं प्रयोजन आहे त्याबाबत थोडं बोलून नंतर उद्या घाटातील अवघड प्रवासाआधी थोडं विसावू.


आज पहाटेची काकड आरती झाल्यावर दोनही पालख्या नव्या नवरीसारख्या सजवल्या होत्या. पहाटेच्या पादुका पूजनानंतर पुणेकरांनी माऊली, तुकारामांचे चरणस्पर्श करण्यासाठी लांबच लांब रिघ लावली. यात अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपींनी दर्शनासाठी गर्दी केली. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी दोनही संतांपुढे नतमस्तक होत करतलध्वनी करत भजनात सहभाग घेतला. पहाटेपासून पुण्यात सर्वत्र भजनाचे स्वर ऐकू येत होते. कुठे कीर्तनातून पांडुरंगाच्या लीला सांगून वारकऱ्यांना वैकुंठीच्या रायाची महिमा सांगितली जात होते. सगळं वातावरण कसं एकदम भक्तिमय झालं होतं. हे सुरू असताना काही सेवाभावी संस्था, सेवाभावी वृत्तीची लोक मात्र या वारकऱ्यांची भजनाबरोबरच सेवा करण्यात दंग होते. काही निवासी महिला डॉक्टर महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना पुढच्या प्रवासासाठी ठणठणीत करण्यात तल्लीन होत्या. एक मालिशवाले काका मागील 25 वर्षांपासून चाललेली अखंड सेवा याही वर्षी तितक्याच उत्साहाने पार पाडत होते. आज जवळपास 500 वारकऱ्यांची मालिश केल्यानंतरच या काकांनी विश्रांती घेतली. मुस्लिम बांधवांनी सध्याच्या अस्थिर वातारणातही आपली श्रद्धा कायम ठेवत अनेक वारकऱ्यांना शिर खुर्म्याचा पाहुणचार केला. वारकऱ्यांबरोबरच आणखी एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले जे आताच्या काळात आत्यंतिक गरजेचे आहे. वारीत सर्वधर्म  समभाव रॅली निघाली. ज्यात बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख बांधव संतांची वचनं लोकांना सांगत शांतीचा संदेश देऊ पाहत होते. असा आजचा दिवस संमिश्र दृश्य दाखवत आल्हाद देऊन गेला. 


उद्या पहाटे दोनही संतांच्या वाऱ्या पुणे शहर सोडतील. माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचेल तर तुकारामांच्या पालखीचा उद्या लोणी काळभोर येथे मुक्काम असेल. माऊलींच्या पालखीबरोबर निघालेल्या वारकऱ्यांसाठी उद्याचा दिवस आव्हानात्मक असेल. कारण उद्या अवघड दिवेघाट चढायचा असेल. मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर वारकऱ्यांमध्ये चालण्यासाठी उर्जाही अधिक असेल. तेव्हा उद्यापासून मी सुद्धा  तुम्हाला आता थेट वारीतूनच माझ्या पदरी जे येईल ते सांगणारे. तूर्तास रामकृष्ण हरि.


हा संबंधित ब्लॉग वाचा: