शेतकऱ्याला अन्नाचं महत्व सांगणं म्हणजे कृष्णाला गीता शिकवण्यासारखं आहे. आणि मुख्य गोष्ट ही आहे की आपण शिकवणारे कोण? आपण धुतल्या तांदळाचे आहोत का हा विचार करणार का नाही? तुम्ही टोल भरताना कर्जबाजारी असल्यासारखा चेहरा करता. कर चुकवायला गाडीची पासिंग दुसऱ्या शहरात करता. घरचं लाईट बिल कमी यावं म्हणून ऑफिस मध्ये फोन चार्ज करणारे नग पण माहिती आहेत आम्हाला. तुम्ही कुठं नैतिकता शिकवायला लागले राव? वाकून बघितल्याशिवाय गाय का बैल हे न कळणाऱ्या चावट लोकांनो, शेतीतलं आपल्याला ढेकळं कळत नाही. कशाला उगीच तोंड चालवता?


संपावरचं लक्ष हटवायला तुम्ही अन्नाची नासाडी चाललीय म्हणून बोंब मारत आहात. तुमच्यापैकी अर्ध्या लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही की तुम्ही मुख्य समस्येवरून लक्ष विचलित करत आहात. आताच काही दिवसापूर्वी हे असेच टमाटे गावोगाव शेताच्या बाहेर पडलेले होते. भाव नाही म्हणून. व्यापारी काय भिकारी सुद्धा हात लावायला तयार नव्हते. आणि तुम्ही सांगतात गावात गरिबांना वाटा. पंधरा पंधरा दिवस तूर घेऊन शेतकरी उभे होते. तेव्हा त्याच्या तुरीची काळजी वाटली नाही तुम्हाला. ते नुकसान नव्हतं का? तुरीसोबत पंधरा पंधरा दिवस उन्हा तान्हात होरपळून निघालेला शेतकरी रस्त्यावर आला आहे. त्याला शहाणपणा शिकवू नका.

आम्ही कर भरतो म्हणे. आणि शेतकरी काय भरतो? बियाणं असेल, खत असेल ते विकत घेताना काय शेण भरतो का? आणि शेतकरी रागात माल रस्त्यात टाकून देतो ते त्याला अन्नाची किंमत कळत नाही म्हणून नाही. त्याने ते उगवलं पण त्याला त्याची किंमत मिळत नाही म्हणून. त्याची निराशा झाली आहे. तुम्ही दुधाच्या रिकाम्या पिशव्या विकून पण पैसे कमवता आणी त्याला दूध विकून पण पैसे मिळत नसतील तर त्याचा राग किती टोकाचा असेल याचा जरा विचार करा.

तुम्ही तुमचे जुने वापरलेले कपडे देऊन पण भांडे घेता. आणि शेतकऱ्याच्या कापसाला मात्र भाव नसतो. ही वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या अंतरंगात जाऊ द्या, स्वतःच्या डस्टबिन मध्ये डोकवून बघा. शेतकऱ्याने त्यामानाने कमीच नासाडी केली आहे. आई दूध तापवते. तिच्या लक्षात येतं दूध नासलं आहे. ती दूध फेकून देते. तुम्ही तिला नाव ठेवता का? मग शेतकऱ्याला का शहाणपणा शिकवता? त्याच दूध नासलंय राव.

हे आंदोलन शरद जोशी नावाच्या थोर माणसाने खूप आधीच सांगितलं होतं. आता उशिरा का होईना शेतकरी जागा झाला आहे. हे पण सत्य आहे की एक पाउस झाला की शेतकरी सगळं विसरून शेतात कामाला लागेल. पण आपण विसरून चालणार नाही. कर्जमाफी हा शब्द सुद्धा तुम्हाला नको असेल तर आधी हमीभाव दिला पाहिजे. हमीभाव हा हक्क आहे. तो देणार का? त्याच्यावर तोंड उघडायला सांगा नेत्यांना. आंदोलनाची गरजच उरणार नाही. स्वातंत्र्यानंतर एवढा दुबळा विरोधी पक्ष पहिल्यांदा दिसतो आहे. त्याला फुकट आंदोलनाचं श्रेय देऊ नका.

चार दिवस पांचट विनोद न करता शांत राहिलात तर शहर विरुद्ध गाव ही दरी वाढणार नाही. अन्नाला नाव ठेवू नये हे संस्कार आहेत ना? मग अन्नदात्याची का वाट लावता? राजकीय पक्षाच्या भक्तिभावात लिहिताना तुम्हाला गंमत वाटते पण याची फार मोठी किंमत मोजावी लागेल हे लक्षात ठेवा. देशात फूट पडू देऊ नका. अजून तरी या देशातल्या सैनिकाला आणि शेतकऱ्याला फेसबुकवरून देशभक्ती शिकायची वेळ आलेली नाही.

जय जवान! जय किसान!