नाटकाच्या प्रयोगादरम्यान सतत प्रेक्षकांचा फोन वाजल्याने सुबोध भावेने उद्विगतेने 'त्यापेक्षा नाटकात काम करणं बंद करेन' असं विधान केलं. त्याआधी सुमीत राघवनने अशा प्रकारच्या घटनांबद्दल आवाज उठवला होता. पण त्यानंतर किंवा त्याच्यापुढे काय? काही दिवस या घटनांची चर्चा होते... प्रतिक्रिया उमटतात... समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या जातात आणि मग ही सगळी हवा विरली की पालथ्या घड्यावर पाणी पडतं आणि पहिल्या पंचावन्न पाढ्यांची पुन्हा पुन्हा उजळणी केली जाते.
मी अनुभवलेली एक घटना सांगते. मागच्या वर्षी रवी जाधव यांचा न्युड सिनेमा पहायला मी आणि माझी आई ठाण्यातल्या एका रेप्युटेड मल्टिप्लेक्स मध्ये गेलो होतो. आमच्या बाजूच्या सीट्स वर नवरा बायको आणि त्यांची मुलगी असे तिघेजण येउन बसले. आता म्हणाल यात काय आक्षेपार्ह आहे? यात आक्षेपार्ह होतं ते त्या मुलीचं वय. अवघी 4-5 वर्ष वयाची ती मुलगी. मुळात 'न्युड'सारखा सिनेमा बघायला इतक्या लहान मुलीला घेउन येणाऱ्या त्या आई वडिलांच्या अकलेला मी मनोमन धन्यवाद दिले. त्यानंतर या सिनेमासाठी त्या मुलीला आत सोडणाऱ्या सुरक्षारक्षकांविषयी माझ्या मनात वेगळाच आदर निर्माण झाला.
सिनेमा सुरु झाल्यापासून त्या मुलीची अखंड बडबड सुरू झाली. आई मला कॉर्न्स दे.. आई मला भूक लागलीये. एक ना असंख्य फर्माईशी.. एक डायलॉग ती मुलगी पूर्ण ऐकू देत नव्हती. त्यात तिच्या वडिलांनी स्वतःच्या अकलेचं जाहीर प्रदर्शन म्हणून तिला गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला आणि मग ठणाणा करत तिने मोबाईल वर गेम सुरु केला. शेवटी असह्य होउन माझ्या आईने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या सिनेमासाठी इतक्या लहान मुलीला का घेउन आलात असा प्रश्न विचारल्यावर त्या मुलीच्या आईने प्रतिप्रश्न केला. 'समोर काय चाललंय यातलं तिला काही कळतंय का?' तिचा हा प्रश्न संपण्याआधी त्या मुलीने विचारलं 'ए आई ती बाई सगळ्यांसमोर अशी नंगु का बसलीए' ओशाळणे या शब्दासाठी त्या बाईचा चेहरा त्या क्षणी अगदी परफेक्ट होता.
'कोड मंत्र'सारखं नाटक पाहायला गेले होते, तेव्हा ज्या क्षणी त्या सैनिकाचा मृत्यू होतो त्याच क्षणी कोणाचं तरी बाळ रडायला लागलं होतं. म्हणजे ज्या ठिकाणी नाटकात आम्हाला 'वॉर क्राय' (War Cry) अपेक्षित होता, तिथे आम्हाला हा 'बेबी क्राय' (Baby Cry) ऐकावा लागला होता.
काही प्रेक्षकांची जीभ नाटकादरम्यान फार चुरुचुरु चालते. म्हणजे इथे कलाकारांचे संवाद आणि दुसरीकडे यांच्या वेफर्स चा चुरचुर आवाज... जुगलबंदीच...
मुद्दा हा आहे की सिनेमागृहात कलाकार आपल्यासमोर नसतात पण असल्या काही उपद्रवी प्रेक्षकांमुळे इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो. पण नाट्यगृहासारख्या ठिकाणी जिथे एक जिता जागता कलाकार परकाया प्रवेश करून जेव्हा एखादी व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर उभी करत असतो तेव्हा तो त्या भूमिकेशी.. त्याच्या कलेशी तादात्म्य पावलेला असतो. समोर बसलेले प्रेक्षकांची एकतानता लागलेली असताना मध्येच जर कोणाचा फोन वाजला आणि त्या कलाकारासोबत इतर प्रेक्षकांचाही रसभंग झाला तर तो अक्षम्य गुन्हा आहे. तुम्ही रसिक म्हणवून घ्यायला त्या क्षणी अपात्र ठरता. अशा प्रेक्षकांना हटकायचा प्रयत्न केला तर त्यांचं उत्तर असतं ..'पैसे देउन तिकीट खरेदी केलय आम्ही, तुम्ही कोण सांगणार आम्हाला?' मान्य आहे. तुम्ही पैसे देउन तिकिट घेतलय.. पण बाकीच्यांनी काही चिंचोके दिलेले नसतात न...
रसिकांनीच रसभंग केल्याचे असे एकाहून अनेक सरस किस्से आम्ही वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कलाकारांकडून ऐकले आहेत. कलाकार बदलले, नाट्यगृह बदलली पण आम्हा प्रेक्षकांची मानसिकता काही बदलायला तयार नाही.
साधी गोष्ट जर प्रयोगदरम्यान तो नट संवाद, प्रवेश विसरला तर प्रेक्षक म्हणून तुम्ही त्याला माफ कराल... मी सांगते, नाही करणार उलट तिकीट खिडकीवर जाउन तिकिटांचे पैसेही वसूल कराल. मग तुमची ही अरेरावी, बेजबाबदारपणा त्या कलाकाराने का सहन करायचा? आणि अशा क्षणी त्य़ाने नाटक थांबवलं तर त्याचं काय चुकलं. त्याक्षणी नाटक थांबवणं हा त्याचा नैतिक अधिकार असतो.. त्याशिवाय त्या व्यक्तिला चुकीची जाणीवही होणार नाही.
यावर उपाय म्हणून सुबोध भावेने काल प्रबोधनकार ठाकरे सभागृहात प्रयोग सुरू होण्याआधी नाट्यगृहात येउन प्रेक्षकांना मोबाईल सायलेंट वर ठेवण्याची विनंती केली. ज्यांना ते करता येत नव्हतं त्यांना मदत केली. इतक्याशा क्षुल्लक बाबींसाठी जर कलाकाराला रंगमंचावरून खाली यावं लागत असेल तर प्रेक्षक म्हणून ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
प्रत्येक बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. जर प्रत्येकाने ठरवलं तर हे काही फार मोठं दिव्य नाही. संकल्प एवढाच करायचा की सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात आपलं तोंड, आपली मुलं आणि आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचा. सजग नागरिक बनत असताना सुजाण प्रेक्षकही बनूया.
एक सोपी गोष्ट जेव्हा नाटक सुरू होतं तेव्हा प्रेक्षकांवरचा लाईट डिम होऊन रंगमंच प्रकाशात उजळून निघतो आणि जेव्हा मध्यांतर होतं तेव्हा पुन्हा प्रेक्षागारातले लाईट्स लावले जातात. हे लाईट्स त्या त्या क्षणी जे महत्त्वाचं आहे ते अधोरेखित करत असतात. त्यामुळे त्या त्या वेळेला योग्य गोष्टींना महत्त्व देता आलं पाहिजे.
आपण या भ्रमात असतो की एखाद्या कलाकाराला प्रेक्षक मोठं करतात. त्यामुळे कलाकारांनी प्रेक्षकांसमोर माज नाही दाखवायचा. बेशक पण प्रेक्षकांचा तो वाटा खारीचा असतो. कलाकार खरा मोठा होतो तो त्याच्या कलेमुळे, कलेच्या सादरीकरणामुळे...
आणि शेवटी काय आपल्या प्रेक्षक या नावापुढे या कलाकारांनी 'मायबाप' आणि 'रसिक' अशी दोन लाखमोलाची विशेषणं लावली आहेत. त्यांचा आदर करुया आणि खरी रसिकता काय असते हे जरा त्यांनाही दाखवूया...
आम्ही खरंच रसिक आहोत?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2019 05:06 PM (IST)
आपण प्रेक्षक या भ्रमात असतो की एखाद्या कलाकाराला प्रेक्षक मोठं करतात. त्यामुळे कलाकारांनी प्रेक्षकांसमोर माज नाही दाखवायचा. बेशक, पण प्रेक्षकांचा तो वाटा खारीचा असतो. कलाकार खरा मोठा होतो तो त्याच्या कलेमुळे, कलेच्या सादरीकरणामुळे...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -