ब्लॉग : श्रीलंकेत सत्तांतर झालंय. मार्क्सवादी नेता अनुरा कुमारा दिसनायके किंवा एकेडी यांनी अध्यक्षीय निवडणुकीत 42 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या अभूतपूर्व अशा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्येनंतर या निवडणुकांना अतिशय महत्त्व आलं होतं. विद्यमान विरोधी पक्षनेता सजीत प्रेमदासा यांच्या पक्षाला जवळपास 32 टक्के मतं आणि विद्यमान अध्यक्ष रनिल विक्रमसिंगे यांच्या पक्षाला अवघी 17 टक्के मतं मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेला 2.9 बिलियन डॉलर्सचं बेलआउट पॅकेज दिलं होतं. या पॅकेजच्या बदल्यात विद्यमान अध्यक्ष रनिल विक्रमसिंगे यांना मोठ्या प्रमाणावर जाचक अटी श्रीलंकेत लादाव्या लागल्या होत्या. सर्वसामान्य श्रीलंकन नागरिकांवर मोठ्या करांचा भार तसंच अनेक क्षेत्रात निधी कपात करावी लागली होती. यामुळे सर्वसामान्य श्रीलंकन जनतेचा रोष मतपेटीतून व्यक्त झालेला दिसतोय. 


कोण आहेत एकेडी अर्थात अनुरा कुमारा दिसनायके? 


मार्क्सवादी विचारांचा नेता एकेडी यांची ओळख हुशार नेता अशी आहे. वय वर्ष अवघे 55. विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात सक्रिय असलेल्या दिसनायके यांनी चंद्रिका कुमारतुंगा यांच्या मंत्रिमंडळातही कृषिमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. विद्यमान श्रीलंकन संसदेमध्ये स्वतः दिसनायके, विजीता हेरात आणि हरिणी अमारासूर्या यांची सरकारवर नेहमीच वचक ठेवणारे खासदार अशी ख्याती होती. 


आता गंमत अशी आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पॅकेजमुळे विक्रमसिंगे सरकारला लागू कराव्या लागलेल्या जाचक अटींमुळे जनतेत असलेला रोष दिसनायकेंच्या पथ्यावर पडला खरा. पण या बेलाऊट पॅकेजला दिसनायके यांच्या पक्षाचाही विरोध नाही. प्रचारात केवळ ते एवढंच म्हणत राहिले की या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी आम्ही पुन्हा चर्चा करू. त्यामुळे सत्तांतर तर झालं आता जनतेला दिलासा कसा द्यायचा याचं मोठं चॅलेंज दिसनायकांसमोर असणार आहे. 


भारतावर काय परिणाम होईल? 


श्रीलंकेत सध्या चीन मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरत आहे. भारतविरोधी रणनीतीमध्ये श्रीलंका हा चीनसाठी उपयुक्त देश आहे. तर श्रीलंकेत डाव्या विचारांचे सरकार येणं याचा अर्थ काय असेल ते समजून घ्या. 1970 आणि 1988 या दोन वर्षांमध्ये दिसनायके यांच्या पक्षातल्या पूर्वसूरींनी तत्कालीन श्रीलंकन सरकार विरोधात बंड केलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला होता. त्यातील दुसरे म्हणजे 1988 सालच्या बंडामध्ये उत्तर श्रीलंकेतील तामिळविरोधी आणि भारतविरोधी अजेंडा जेव्हीपी राबवत होती. त्यामुळे नवे दिसनायके सरकार भारताबाबत काय भूमिका घेतं, भारताशी संबंध कसे असतील याची उत्सुकता आहे. अर्थात रनिल विक्रमसिंगे हे सरकारही फारसं भारतप्रेमी नव्हतंच. तरीही दोन वर्षांपूर्वीच्या संकटकाळामध्ये भारताने केलेली अन्नधान्य रूपातली मदत आणि पेट्रोल रूपातली मदत यामुळे रनिल सरकार भारताशी थेट पंगा घेत नव्हतं. आता दिसनायकेंचं नवं सरकार पुन्हा भारतविरोधी अजेंड्याला पुनरुज्जीवन देतो का याकडे भारताचं बारकाईने लक्ष असेल. नुकतंच बांगलादेशात राजकीय उठावानंतर झालेलं सत्तांतर आणि आता श्रीलंकेतलं डाव्या विचारांचा सरकार यामुळे भारताच्या शेजाऱ्यांनी आव्हानं वाढवलेली आहेत या शंकाच नाही.