खरंतर महिला दिन म्हणून कधीच मी काही विशेष केलं नाही,  ना कधी कोणतं सेलिब्रेशन....या वर्षी मात्र थोडावेगळा दिवस होता... पानी फाउंडेशनच्या उपक्रमाच्या निमित्तानं महिला दिनी एबीपी माझाची वुमन ब्रिगेड साताऱ्यातील जाखणगावात गेलेलो.. तसं आम्ही गावात उशिरा पोहोचलो,  पण गावानं जे आमचं जंगी स्वागत केलं ना, त्यातच आमचा सगळा शीण उतरला...

रात्रीचा १ वाजलेला, मात्र झोपेपेक्षाही मला आणि नम्रताला मुंबईत कधीच अनुभवता न आलेलं सुंदर चांदणं बघण्यासाठी बाहेर पडायचं होतं... आम्ही बाहेर आलो आणि चक्क रस्त्यावर झोपलेलो.... त्या निसर्गाच्या पलंगावर झोपून चांदण्यांचं पांघरूण घेऊन तिथेच झोपावसं वाटत होतं....पण आम्ही आमचा मोह आवरला आणि २ वाजता रूममध्ये येऊन झोपलो.

पहाटे ५ वाजता आम्ही श्रमदानासाठी सगळ्याजणी तयार होतो...काही खेळ झाले, श्रमदानही झालं, पॉलिटीकल कट्टाही रंगला....पण या सगळ्या गोष्टीतून मला एकच मोठा अनुभव किंवा लाईफटाईम एक्सपिरियन्सही देऊन गेला तो म्हणजे ग्रामीण भागातील खरं वास्तव जवळून पाहण्याचा....

जन्मापासूनच मुंबईत राहिल्यामुळे ग्रामीण भागातील खरी परिस्थिती मी एवढ्या जवळून कधीच पाहिली नव्हती.... मुंबईत एखाद् दिवशी पाणी नाही आलं की लोक सैरभैर होतात...पण गावात मात्र लोक १५-१५ दिवस पाण्याशिवाय कसे राहत असतील हाच मोठा प्रश्न होता.... शिवाय दुष्काळामुळे केवळ तहानच नाही तर पिकाअभावी पोटापाण्याचेही हाल...अखेर वर्षानुवर्षे दुष्काळ फक्त सहन करत आलेल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन महाडिक, बाळासाहेब शिंदे आणि डॉ. अविनाश  पोळ यांच्या साहाय्यानं आपली तहान भागवली... बरं केवळ पाण्याचीच नाही तर व्यवसायाचीही... नंतर त्यांच्या प्रयत्नांना साथ मिळाली ती पानी फाउंडेशनची.

जेव्हा गाडीतून आम्ही श्रमदानाच्या ठिकाणी जात होतो...तेव्हा मी आजूबाजूची शेती आणि गाव पाहण्यात रमले होते.... तेवढ्यात गाडीत बसलेल्या गावातील बायकांचं बोलणं माझ्या कानावर पडलं...

आधी आम्ही फक्त घरीच असायचो, पण आता पानी फाउंडेशनमुळे आम्ही बाहेर पडलो, कामं करायला लागलो, आम्हालाही इतर गोष्टी कळू लागल्या, आता आम्हीही पुरुषांच्या बरोबरीनं काम करू लागलो...या उपक्रमामुळे आमचा आत्मविश्वास वाढलाय, हे त्यांनी बोलून दाखवलं...

श्रमदान झाल्यानंतर डॉ. अविनाश पोळ एक्सप्रेशन्सच सगळ काही बोलून गेले.... हे चर तुम्ही खणलेत? त्यांनी विचारलेल्या या प्रश्नातच आम्हाला आमच्या कामाचं सर्टिफिकेट मिळालं... खरंतर गावातल्यांनाही वाटलं नव्हतं की मुंबईच्या पोरी ही अशी कामही करू शकतील, आम्ही त्यांच्यात मिळूनमिसळून तरी राहू का याचा त्यांना संशय होता...पण जेव्हा आम्ही परतत होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानचं आम्हाला सगळ काही सांगून गेलं...

श्रमदान झाल्यानंतर पानी फाउंडेशननं आम्हाला एक खेळ खेळायला सांगितला....आम्ही सीरियस मोडमधून पुन्हा एकदा खेळकर मोडमध्ये आलो... आणि नेहमीप्रमाणेच कोण पहिले येणार यातच स्पर्धा रंगू लागली. पण तो गेमही आम्हाला खूप काही शिकवून गेला....पिढ्यनपिढ्या पाण्याचा कसा अवाजवी वापर करण्यात आला, का आपल्यावर दुष्काळ आणि पाणीटंचाईची भीषण परिस्थिती ओढवली गेली यांची खरी कारणं आम्हाला या खेळामुळे उमगली...

गमंतीचा भाग असा होता की ताड हत्तीचा खेळ खेळताना मी मध्येच खेळ कसा खेळायचा हेच विसरुन गेले… सगळे खरंतर हसले पण मी वेगळ्याच विश्वात होते… खरंतर मुंबईतून वुमन्स डे निमित्तानं तिथे जाणार म्हटल्यावर थोड्या वेगळ्या मूडमध्ये होते मी, पण गावात गेल्यावर तो पूर्णपणे बदलला....तिथली माणसं, ती शाळा, गाव, त्यांच्यातलं साधेपण हे मला पुन्हा एकदा एका वेगळ्या विश्वात घेऊन जात होतं...आमच्यासाठी संध्याकाळी ६ वाजताच ते तयार होते, मात्र आम्हाला पोचायलाच रात्रीचे ११ वाजले, पण आमच्या स्वागतासाठीचा जो उत्साह आणि जी आपुलकी त्यांच्या डोळ्यात दिसली ना ती इथल्या आपल्या लोकांच्याही डोळ्यात कधी दिसून येत नाही.

श्रमदान झालं, खेळ झाले त्यानंतरही तिथून आमचा पाय निघत नव्हता... आमच्या पॉलिटीकल कट्ट्यावरच्या गप्पा संपल्यावर आम्हाला सगळ्यांना आपआपले अनुभव शेअर करायला सांगितले, तेव्हा गावातील कविता ताई समोर आल्या आणि अवघ्या दीड दीवसात मुंबईच्या मुंलींविषयी असलेला त्यांचा गैरसमज दूर झाला... आमच्याविषयी बोलताना अक्षरश: त्यांच्या डोळ्यात दाटून आलेलं...शिवाय आम्ही तिथे आलो म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांना दोन दिवस का होईना पण आमच्यासारखाच त्यांनाही थोडा चेंज मिळाला असं त्यांनी सांगितलं



हे सारे खेळ, श्रमदान, शिवार फेरी, या गोष्टी काही फक्त महिला दिन सेलिब्रेशनसाठी नव्हत्या, तर स्वत:लाच नव्याने भेटण्याचा हा एक अविस्मरणीय अनुभव होता... काम आम्ही त्यांच्यासाठी जरी केलं असलं तरी श्रमदान हे आम्हालाच खूप काही शिकवून गेलं... लहानपणी चार भिंतींच्या आत घेतलेलं शिक्षण त्या दिवशी पहिल्यांदाच निसर्गाच्या सानिध्यात घेता आलं....त्या दिवशी पुन्हा एकदा शाळेत जाऊन आल्यासारखचं वाटलं... फक्त इथे पुस्तकी नाही तर खऱ्या वास्तवाचा अभ्यास करून आलो....

ही शाळा कशी सुरू झाली, मधल्या सुट्टीत खेळलेला ताड हत्तीचा खेळ कसा होता आणि शाळा संपताना घरी परतताना आमच्या भावना कशा होत्या...हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ जरुर पाहा