सिल्व्हर  मेडल मिळवणाऱ्या पेक्षा ब्रॉंझ मेडल मिळवणारे सहसा जास्त खुश का असतात?


गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ या मेडलचा जर कोणालाही क्रम विचारला तर साहजिकच गोल्ड सर्वोच्च सिल्व्हर द्वितीय आणि ब्राँझ मेडल हे तृतीय स्थानी असतं हे कोणीही सांगेल, परंतु या मेडल विनरपैकी गोल्ड मेडलिस्ट सोडला तर सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेडलिस्ट यांच्यापैकी सहसा ब्रॉंझ मेडलिस्ट हे जास्त आनंदी असतात असं तुम्हाला सांगितलं तर सहजासहजी पटणार नाही.


परंतु हेच सत्य आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटी सारख्या अनेक ठिकाणी या मानसिक अवस्थेवर संशोधन करण्यात आलेल आहे, यामध्ये ऑलिम्पिक मेडल विनरचा अनेक वर्षांचे फेशियल एक्स्प्रेशन आणि प्रश्नोत्तरांचा डेटा घेऊन निघालेला निष्कर्ष देखील हाच आहे की ब्रॉंझ मेडलिस्ट हे सहसा सिल्व्हर मेडलिस्ट पेक्षा जास्त समाधानी असतात आणि याच सिंड्रोमला सिल्व्हर मेडल सिंड्रोम असे म्हणले जाते.


जरा खोलात जाऊन सांगायचं झालं तर सिल्व्हर मेडल कुणीही जिंकत नसतं तर गोल्ड हारने म्हणजेच सिल्व्हर मिळणं असं म्हणलं तर जास्त योग्य होईल,  याउलट ब्रॉंझ मात्र जिंकलं जातं.


केवळ खेळातच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात हा सिंड्रोम लागू होतो. म्हणजेच सिल्व्हर मेडल मिळवणारा किंवा नंबर एक क्रमांक गमावणारा व्यक्ती सहसा रिग्रेट मोडमध्ये असतो. मी असं केलं असतं तर नक्की गोल्ड मेडल असतं,  माझे मेडल एकदम थोडक्यात गेले आहे असे अनेक विचार त्याच्या डोक्यात नाचत असतात याउलट ब्रॉंझ मिळवणारी व्यक्ती आपण किमान मेडल जिंकणाऱ्यांच्या यादीत तरी आलो म्हणून खुश असते.


 मानसशास्त्रीय दृष्टीने सांगायचं झालं तर आपल्याला काय मिळालं आहे यापेक्षा आपण काय मिळवू शकलो असतो आणि  इतरांना काय मिळालं आहे, यांच्याशी तुलना केल्यानंतर आपण किती सुखी किंवा समाधानी आहोत याच मोजमाप मानवी मनात निर्माण होत.


स्वानुभवावरून सांगायचं झालं तर युपीएससीच्या तयारीच्या दिवसात देखील एकदम टॉपला आलेले व्यक्ती सोडले तर थोडक्यात टॉपर होण्यापासून हुकलेले विद्यार्थी जास्त असमाधानी दिसतात. याउलट यादीमध्ये खालच्या स्थानी असून देखील थोडक्यात का होईना आपल्याला काहीतरी पोस्ट मिळाली या भावनेमुळे असे लोक समाधानी असायचे. (अर्थात पोस्ट इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी परत अटेम्प्ट देणं वगैरे या गोष्टी नंतर सर्रास सर्व जण करतातच)


सिल्व्हर  मेडलवाला स्वतःची तुलना गोल्ड मिळणाऱ्या सोबत करतो. म्हणून त्याच्या मनात कायम एक प्रकारची रुखरुख राहते याउलट ब्राँझ मेडलवाला स्वतःच यश-अपयश हे यादीत स्थान न मिळवलेल्या सोबत तुलना करून पाहतो म्हणून तो एक प्रकारे समाधानी असतो.


ऑलम्पिक म्हणा किंवा इतर खेळात सुद्धा बघितलं तर आपल्या हॉकी संघाच जर उदाहरण घेतलं तर आज त्यांनी ब्रॉंझ जिंकल्यामुळे आपण सर्व आनंदी आहोत परंतु सिल्व्हर हे ब्रॉंझपेक्षा मोठं मेडल असलं तरी आज जर ते फायनलला जाऊन हरले असते तर मात्र आपल्या भावना कशा असल्या असत्या याचा तुम्हीच विचार करा.


या पोस्टचा अर्थ ब्राँझ मेडल हे सिल्व्हर मेडल पेक्षा चांगलं मेडल आहे असं कायच्या काय सांगण्याचा अजिबात नाही पण मागच्या काही वर्षात मेडल सेरेमनी बघताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती, म्हणून यावर लिहावं वाटलं.  तुम्हाला कधी सिल्व्हर मेडल सिंड्रोम जाणवला असला तर ते पण सांगा. 

- अनिरुद्ध ढगे 






(लेखक शासकीय सेवेत आहेत.)