विक्रमसारखा आजच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक असणारा दिग्दर्शक इतकं मोठं विधान करतो तेंव्हा ते गांभीर्याने घेतलं जाण्याची गरज आहे. सुधीर मिश्रावर बनलेल्या 'बावरा मन ' या डॉक्युमेंट्रीमध्ये अनेक आघाडीच्या दिग्दर्शकांनी सुधीरवर कौतुकाची सुमन उधळली आहेत. पण त्यात एखाद्या व्यक्तीच्या कौतुक समारंभात होणाऱ्या स्तुती सुमनांमध्ये बऱ्याचदा जी एक बळच दिसणारी औपचारिकता दिसते त्याचा गंध पण नाही. सगळे अगदी मनापासून बोलत आहेत हे स्पष्ट कळत. कारण प्रेक्षकांना सुधीर मिश्राच महत्व काय आहे हे कळलं नसलं तरी, या समकालीन आणि नव्या चाकोरीबाहेरचा विचार करणाऱ्या दिग्दर्शकांना सुधीर मिश्रा काय आहे हे खूप आधीपासूनच कळलं आहे.
आज अनुराग कश्यप, दिबांकर बॅनर्जी, विक्रमादित्य मोटवाने, नितेश तिवारी सारखे दिग्दर्शक ज्या वेगळ्या प्रकारचे सिनेमे बनवत आहेत त्याचं बरचस श्रेय सुधीर मिश्राचं आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात वेगळ्या प्रकारचा सिनेमा बनवण्यासाठी सुधीरने ज्या एकहाती लढाया लढल्या त्याची फळ आजच्या पिढीतल्या दिग्दर्शकांना चाखायला मिळत आहेत. सुधीर मिश्राचे काही सिनेमे जबरदस्त आहेत तर काही सरासरी. पण सुधीर मिश्राच भारतीय चित्रपटांच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. 'बावरा मन' या डॉक्युमेंट्रीमध्ये स्वानंद किरकिरे म्हणतो तस, "आपण सुधीर मिश्राचं कधी तो डिजर्व करत असणार कौतुक केलंच नाही."
सुधीर मिश्राशी माझे वैयक्तिक ऋणानुबंध आहेत. अर्थातच एकतर्फी. सुधीर मिश्राला याची कल्पना असण्याचं सुतराम कारण नाही. आयुष्यातल्या एका क्षणी मी मिश्राचा 'इस रात की सुबह नही' पाहिला आणि मी सिनेमाच्या खऱ्या अर्थाने प्रेमात पडलो. मिश्राचा 'हजारो ख्वाहिशें ऐसी' हा माझ्या सगळ्यात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. त्या सिनेमातलंच स्वानंद किरकिरेने गायलेलं 'बावरा मन देखने चला एक सपना' हे गाणं माझ्या सगळ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. आयुष्याच्या एका हळव्या फेजमध्ये हे गाणं म्हणजे माझ्यासाठी जगापासून तोडून घेण्याचा दरवाजा होत.
मिश्रा हा लेखक अगोदर आहे आणि नंतर दिग्दर्शक. कल्ट बनलेल्या 'जाने भी दो यारो' मध्ये तो सहाय्यक दिग्दर्शक होताच (चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या विनोद चोप्रा आणि सुधीर मिश्रा यांची नाव दोन पात्रांना दिली आहेत ) पण चित्रपटाचं लिखाण पण त्यानं केलं आहे. मिश्राच्या बहुतेक सर्व चित्रपटांचं लिखाण पण तोच करतो.
सुधीर मिश्राच्या सिनेमांचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याचे सिनेमे आपल्या महानगरी शहरांमध्ये घडतात. 'धारावी' मुंबापुरीमध्ये घडतो. 'कलकत्ता मेल' नाव सुचवत असल्याप्रमाणेच कलकत्त्यात घडतो. 'हजारो ख्वाहिशें ऐसी' आणीबाणीच्या काळात सत्तेच्या केंद्रात म्हणजेच दिल्लीमध्ये घडतो. 'इस रात की सुबह नही' मुंबईच्या वेगवेगळ्या भागात घडतो. 'ये साली जिंदगी' आणि 'इन्कार ' पण शहरांमध्येच घडतात. भारतातल्या शहरांमध्ये जागतिकीकरणांपासून जे काही सामाजिक -राजकीय -आर्थिक बदल घडतात त्याचं डॉक्युमेंटेशन मिश्राच्या सिनेमात झालेलं दिसत. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मुंबईवरचा अगोदरच असलेला अंडरवर्ल्डचा ठसा अजूनच गडद होत गेला. मिश्राच्या 'इस रात की सुबह नही' ने याची सर्वप्रथम नोंद वास्तवदृष्ट्या घेतली. काळात भारतात 'सत्या' पासून गँगस्टर पटांची जी एक लाट आली आहे त्याची बीज कुठेतरी मिश्राच्या 'इस रात की सुबह नही' मध्ये आढळतात.
मिश्राने सुरु केलेला ट्रेंड नंतर रामगोपाल वर्माने आणि अनुराग कश्यपने नंतर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. 'खोया खोया चांद' हा मिश्राचा अजून एक दुर्लक्षित मास्टरस्ट्रोक. मिश्राच्या शब्दातच सांगायचं तर हि त्याची सगळ्यात वैयक्तिक कलाकृती. साठच्या दशकात बॉलिवूडमध्ये संघर्ष करणाऱ्या एका लेखकाची आणि एका अभिनेत्रीच्या प्रेमप्रकरणाची गोष्ट म्हणजे 'खोया खोया चांद'. मिश्राच्या मनात त्या काळातल्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल आणि तेंव्हा कार्यरत असणाऱ्या कलावंताबद्दल एक सुप्त आकर्षण आहे. या सिनेमात उर्दूचा संवादात नितांतसुंदर वापर केला आहे.
सिनेमाचा शेवट सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेऊ शकतो. याच माझं सगळ्यात आवडत उदाहरण म्हणजे सुधीर मिश्राचा 'हजारो ख्वाहिशें ऐसी'. आपल्याकडे बनलेला बहुतेक सर्वोत्कृष्ट राजकीय चित्रपट. सिनेमातल्या तीन मुख्य पात्रांचा देशाच्या एका अस्थिर कालखंडातला वैयक्तिक आणि राजकीय भूमिकांचा प्रवास या सिनेमात दाखवला आहे. या सिनेमातली सिद्धार्थ (केके ) आणि गीता (चित्रांगदा ) ही पात्र आदर्शवादी आणि ध्येयवादी तर विक्रम (शायनी आहुजा ) च पात्र सर्व मूल्य -आदर्श फाट्यावर मारून यशस्वी होण्याच्या ध्येयाने पछाडलेलं. या तिघांमध्ये एक प्रेमाचा त्रिकोण आहे. गीता सिद्धार्थच्या प्रेमात तर, विक्रम गीताच्या प्रेमात. नियती या तीन पात्रांना अनेकदा वेगळं करत. पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिघंही एकमेकांच्या समोर येत जातात. सिद्धार्थचं पात्र ध्येयवादी नायकाचं तर विक्रमच पात्र खलनायकी ढंगाचं. ग्रे शेड्स असणार. पण सुधीर मिश्राने सिनेमाचा शेवट अशा खुबीने केला आहे की चांगलं कोण, वाईट कोण, खरं प्रेम म्हणजे काय याबद्दलच्या तीन तासांच्या प्रेक्षकांच्या मनात तयार झालेल्या प्रतिमा ढासळून जातात.
चित्रपटाच्या शेवटी येणार स्वानंदचं 'बावरा मन देखने चला एक सपना' गाणं हा चित्रपटाच्या शेवटाने केलेला घाव अजूनच गहिरा करून जात. तुम्हाला राजकारण आणि सिनेमा या कॉकटेलच आकर्षण असेल तर सिनेमा नक्की बघा. हा सिनेमा लांबीने मोठा आहे आणि बहुतांश इंग्रजीमध्ये आहे. तरी पण आवर्जून बघा. प्रतिशोधाची कहाणी सांगणाऱ्या 'कलकत्ता मेल' मध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि मनीषा कोईरालासारखे स्टार्स होते. या सिनेमाचा फर्स्ट हाफ हा अतिशय उत्कृष्ट आणि बांधून ठेवणारा होता. पण सेकंड हाफ प्रचंड गंडलेला होता. स्त्री पुरुष नात्यावर भाष्य करणारा 'ये साली जिंदगी' ह्या इरफान खान अभिनित सिनेमाची गेल्या काही वर्षांमध्ये कल्ट फॉलोईंग तयार झाली आहे. एक कार्पोरेट क्षेत्रातला माणूस आणि शहरातल्या अधोविश्वाचं प्रतिनिधित्व करणारी एक वेश्या या दोन टोकाच्या विश्वांना काही वेळापुरतं एकत्र आणणाऱ्या एका पावसाळी रात्रीची गोष्ट सांगणाऱ्या 'चमेली 'सारखा चित्रपट सुधीर मिश्राचं बनवू जाणे.
मिश्राच्या सिनेमातली पात्र अनेकदा प्रचंड महत्वाकांक्षी असतात आणि त्याचवेळी ती प्रचंड vulnerable असतात. 'हजारो ख्वाहिशें ऐसी' मधला विक्रम हे याचं उत्तम उदाहरण. विक्रम हा नंतर भारतीय राजकारणात उदयाला आलेल्या 'फिक्सर' संस्कृतीचा प्रणेता. सिनेमात त्याच्या तोंडी एक डॉयलॉग आहे, "I am fixer sir. I fix things". हा विक्रम एका गांधीवाद्याचा मुलगा आहे. मुलगा कितीही अधपतीत असला तरी वडिलांबद्दल त्याला प्रचंड आदर आहे . 'खोया खोया चांद' मधला संघर्षरत चित्रपटलेखक हे पण असच एक उदाहरण. सुधीर मिश्राची पुरुष पात्र अनेकदा अप्राप्य प्रेमाचा मागे प्रयत्नांची निरर्थकता माहित असून पण धावताना दिसतात. पुन्हा 'हजारो ख्वाहिशें ऐसी' आणि 'खोया खोया चांद' मधले नायक हीच उदाहरणादाखल घेता येतील. 'ये साली जिंदगी' मधला इरफान पण या निरर्थक पाठलागाचा बळी आहे. 'धारावी' मधला एका रूममध्ये राहणाऱ्या ओम पुरीच्या मनातल्या वासनांच, अतृप्त इच्छांचं प्रतीक म्हणजे लाल साडी ल्यालेली माधुरी दीक्षित असते. त्या अर्थाने ओमच पात्र पण एका मृगजळाचा पाठलाग करत आहे. 'चमेली' मधल्या वेश्येला पण आपल्या मर्यादांची जाणीव आहे पण तिला अप्राप्य प्रेमाचं आकर्षण आहेच.
मिश्राच्या चित्रपटांमध्ये कलाकारांची पुनरावृत्ती होताना दिसते. सौरभ शुक्ला आज इंडस्ट्रीमध्ये प्रस्थापित झाला असला तरी मिश्राच्या चित्रपटांमध्ये तो नेहमी असतो. सुधीर मिश्रा सोबत त्याने तब्बल सहा चित्रपट केले आहेत. चित्रांगदा सिंगने मिश्राच्या तीन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दीप्ती नवल, केके, शायनी आहुजा यांनी प्रत्येकी दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शंतनू मोईत्रा आणि स्वानंद किरकिरे पण मिश्राच्या सिनेमात नेहमी असतात. मिश्राची जवळची मैत्रीण एडिटर रेणू सलुजा हिने तर मिश्रासोबत तब्बल पाच चित्रपट केले आहेत. सलूजाचा एकूणच मिश्राच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर फार प्रभाव होता. तिच्या अकस्मात झालेल्या निधनामुळे मिश्रा आपल्या कोषात अनेक महिने जाऊन बसला होता.
सुधीर मिश्राचा 'दास देव' हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'देवदास' या अजरामर झालेल्या पात्रावरचा हा सुधीर मिश्रा टेक आहे. पण हा देवदास खूप वेगळा आहे. इथला देवदासच प्रारूप असणारा देव प्रताप सिंह (राहुल भट ) ह्याला कुठल्याही दारूचं किंवा ड्रगचं व्यसन नाहीये. राजकीय परिवारात जन्माला आलेल्या देवला व्यसन आहे सत्तेचं आणि सत्तेतून आलेल्या अपरिमित ताकदीचं. या सिनेमातली पारो (रिचा चढ्ढा ) ही पालखीत फिरणारी बाई नाही. ती राजकीय सभा आयोजित करते. भाषण करते. तिला राजकीय महत्वाकांक्षा आहेत. याच महत्वाकांक्षेपोटी ती देवला सोडून दुसरं लग्न करते. या सिनेमातली चंद्रमुखी (अदिती राव हैदरी ) ही पोलिटिकल फिक्सर आहे. सध्याच्या भारतीय राजकारणाचा वरून सुंदर पण आतून तितकाच भेसूर असणारा चेहरा, जो कोणालाच बघायचा नाहीये. पूर्ण 'दास देव' चंद्रमुखीच्या नजरेतून दिसतो हे विशेष. सिनेमात चुनीलालच्या भूमिकेमध्ये विपीन शर्मा आहे. अनुराग कश्यप हा पण एका महत्वाच्या भूमिकेत असेल. सुधीर मिश्राला राजकारणाचं आणि राजकारण्यांच्या मनोव्यापाराचं प्रचंड आकर्षण जे आहे, ते त्याच्या सिनेमात दिसून येतच. तो स्वतः एका राजकीय परिवारातून असल्याचा हा परिणाम असावा. त्याचे आजोबा द्वारका प्रसाद मिश्रा मध्यप्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री होते.
प्रेक्षकांनी सुधीर मिश्राच्या सिनेमावर पसंतीची मोहोर कधीही उमटवली नसली तरी सध्याच्या वेगवेगळ्या प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकांना सुधीर मिश्रच महत्व माहित आहे. त्यातूनच त्यांना सुधीर बद्दल आपुलकी आणि आदर आहे. 'दास देव' च्या ट्रेलर लाँच ला तब्बल बावीस दिग्दर्शक हजर होते. अजून कोणत्या दिग्दर्शकाला आपल्यापेक्षा तरुण सहकाऱ्यांचे इतके प्रेम मिळते. तरुण लोकांसोबत काम करायला त्यांच्यासोबत बोलायला सुधीर मिश्राला आवडत. त्याच्यासोबतच्या इतर दिग्दर्शकांप्रमाणे तो काळाच्या एका तुकड्यात थिजून बसलेला नाही. त्यामुळेच कदाचित प्रस्थापित खोकडानी मिश्राला कायम दूर ठेवलं असावं. 'बावरा मन ' डॉक्युमेंट्रीमध्ये स्वानंद किरकिरे मिश्रा बद्दल बोलतो तस -Thats why he is not celebrated enough. Because he still stays with younger lot.