रजत कपूरच्या 'आंखो देखी', 'मिथ्या' 'रघु रोमियो' अशा चित्रपटांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. पण चित्रपट कितीही चांगले असले तरी पुढच्या चित्रपटासाठी निर्माता मिळवणं हे रजतच्याच भाषेत सांगायचं तर माउंट एव्हरेस्ट चढून जाण्यापेक्षा कठीण आहे. 'आंखो देखी' सारखा अप्रतिम चित्रपट बनवल्यावर पण रजतला पुढच्या सिनेमासाठी निर्माता मिळेना. शेवटी वैतागलेल्या रजतने निर्मात्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचं थांबवलं. आपल्या सिनेमासाठी पैसा उभारण्यासाठी त्याने 'क्राउड फंडिंग' चा पर्याय चोखाळला. अनेक सोशल  मीडियावरच्या वेबसाईट्सवर रजतने लोकांना आपल्या प्रोजेक्टसाठी यथाशक्ती आर्थिक मदत करण्याचं आव्हान केलं. रजतच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला. पैसा उभा राहिला. आता रजत त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.


सध्या अनेक प्रोडक्शन हाऊस चांगल्या कथानकांच्या शोधात असतात. पण फार कमी लेखक त्यांना अप्रोच होत असतात. इंडस्ट्री मुंबईमध्ये स्थित असल्यामुळे पण अनेक मर्यादा पडतात. त्यामुळे देशाच्या इतर भागातले लेखक ज्यांच्याकडे अनेक चांगल्या कथा असतात त्यांच्यापर्यंत पोहोंचण्यासाठी विविध प्रोडक्शन हाऊस सोशल मीडियावर कथालेखकांसाठी भरघोस बक्षीस असणाऱ्या स्पर्धा आयोजित करत असतात. यातून इंडस्ट्रीला देशातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक लेखक मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुकेश छाब्रा या देशातल्या सगळ्यात व्यस्त कास्टिंग डायरेक्टरने सोशल मीडियावर सुरु केलेल्या 'कास्टिंग कॉल' या मोहिमेतून अनेक नवोदितांना सिनेमात संधी मिळाली.

ह्या वरकरणी वेगवेगळ्या दिसणाऱ्या तीन एकाच इंडस्ट्रीमधल्या पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घटना. पण या तिघांना जोडणारा एक समान दुआ आहे. तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाचा उपयोग फक्त सिनेमाच्या पब्लिसिटीशी संबंधित गोष्टींसाठी होतो, असा एक प्रचलित गैरसमज आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की सोशल मीडियाने बॉलिवूडमध्ये आणि देशातल्या इतर प्रादेशिक फिल्मइंडस्ट्रीचे डायमेन्शन्स अनेक बाबतीत एकशे ऐंशी अंशामध्ये बदलले आहेत. सोशल मीडिया एकाचवेळेस चित्रपटांच्या प्रेक्षकांची मानसिकता मोठ्या प्रमाणात बदलत आहे, त्याचवेळेस स्टोरीटेलर्स, फिल्ममेकर्स यांची मानसिकता पण मोठ्या प्रमाणात बदलत आहेत.

काही वर्षांपूर्वी सिनेमा आणि सिनेमा क्षेत्रात काम करणारे लोक म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या ग्रहावर राहणारे लोक आहेत असा समज देशभरातल्या चित्रपट प्रेक्षकांचा असायचा. सिनेमा क्षेत्रातल्या लोकांभोवती एक गूढतेचं वलय असायचं. प्रेक्षक आणि सिनेमाक्षेत्रात काम करणारे लोक यांच्यातला संवाद दुर्मिळ आणि एकतर्फी असायचा. सिनेमा क्षेत्रातले लोक चकचकीत ग्लॉसी मॅगझिन्सला ज्या मुलाखती द्यायचे त्यातून हा एकतर्फी संवाद व्हायचा. सोशल मीडियाने हे चित्र पूर्णतः बदललं. अनेक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक सोशल मीडियावर उपस्थित आहेत. यातल्या बहुतेकांचा सोशल मीडियावर उपस्थित असण्याचा उद्देश स्वतःच्या कामाची प्रसिद्धी असा आहे. पण या कलाकारांच्या सोशल मीडियावरील उपस्थितीचा फायदा असा झाला की प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात प्रत्यक्ष संवाद सुरु झाला.

कलाकारांना प्रश्न विचारण्यासाठी सुरुवातीला जी पत्रकाररूपी मध्यस्थांची गरज होती, ती आता नाहीशी झाली. हा जागरूक प्रेक्षक आता आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्षच प्रश्न विचारू लागला, दाद देऊ लागला आणि क्वचित एखाद्या वेळेस जाब विचारु लागला. यामुळे प्रेक्षक आणि कलाकार या परस्परसंबंधांमध्ये मोठी क्रांतीच घडून आली. अर्थात याची एक काळी बाजू पण आहे. अनेक बेजबाबदार लोक सोशल मीडियावर, कलाकारांना विशेषतः महिला कलाकारांना अतिशय खालच्या भाषेत ट्रोल करताना दिसतात. त्यांच्या राहणीमानावरुन, त्यांच्या पेहरावावरुन, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय भूमिकांवरून त्यांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात येऊ लागली. हे भाषेवरच अनियंत्रण हा एकूणच सोशल मीडियाचा मोठा तोटा असावा.

हल्ली सिनेमाच पोस्टर किंवा टीजर सर्वप्रथम फेसबुक, ट्विटर आणि युट्युबवर रिलीज केलं जात आणि मग नंतर टीव्ही चॅनलवर ते झळकायला लागत. चित्रपट निर्मिती गृह आणि चित्रपट वितरण संस्था सोशल मीडियाला अतिशय गांभीर्याने घेऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा जो तात्काळ प्रतिसाद असतो , तो त्यांच्यासाठी फार महत्वाचा असतो. सिनेमाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावरून चित्रपट चालेल किंवा नाही याचे आडाखे बांधले जातात आणि बहुतेकवेळा ते बरोबर ठरतात .

समांतर धारेतले किंवा वेगळ्या विषयावरच्या फिल्म्स बनवणाऱ्या लोकांना आपल्या चित्रपटांसाठी पैसा उभा करणं हे एक खूप मोठं आव्हान असत . मुख्य धारेतले सेफ गेम खेळणारे निर्माते अशा चित्रपटांमध्ये पैसा लावण्यास फारसे उत्सुक नसतात . मग वर दिलेल्या उदाहरणानुसार रजत कपूरसारखे कलाकार प्रेक्षकांनाच आर्थिक मदतीची हाक देतात . सोशल मीडिया या अशा आवाहनासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे . कारण आपलं आवाहन लगेच प्रेक्षकांपर्यंत पोंचत आणि तात्काळ प्रतिसाद मिळण्याची शक्यता पण जास्त असते .अगदी शंभर रुपयापासून ते एक लाख रुपये इतक्या रकमेपर्यंत प्रेक्षक चित्रपटनिर्मितीमध्ये योगदान देतात . भारतात हळूहळू का होईना ही क्राऊडफंडिंग संस्कृती विकसित होऊ लागली आहे . अनेक शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स क्राऊडफंडिंग वर बनायला लागल्या आहेत .

चित्रपट समीक्षक हा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणारा महत्वाचा घटक आहे . सोशल मीडियाने अशा अनेक समीक्षकांना जन्म दिला आहे . पूर्वी चित्रपटसमीक्षक असण्यासाठी तुम्ही एखाद्या वर्तमानपत्रात काम करत असणं आवश्यक असायचं . आता तस बंधन उरलं नाही . अनेक चित्रपटविषयक चांगलं लिखाण करणारे लोक फेसबुकवर चित्रपटांचे review लिहितात किंवा आपापल्या ब्लॉग वर अतिशय उत्तम चित्रपटविषयक लिखाण करतात . त्यांना मोठा वाचकवर्ग आहे . वाचकांच्या चित्रपटविषयक मतावर परिणाम करण्याची त्यांची क्षमता मोठी आहे . सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मतांवरून चित्रपटाचं भवितव्य सील होत असं म्हणणं खूप धाडसाचं होईल पण एक मताचा ट्रेंड मात्र जाणवू लागतो हे मात्र नक्की . नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शुजीत सिरकारच्या 'ऑक्टोबर ' सिनेमाचं उदाहरण बघण्यासारखं आहे .

'ऑक्टोबर ' बद्दल सोशल मीडियामध्ये खूप चांगलं लिहिलं गेलं . शहरी भागामध्ये आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला . पण छोट्या शहरांमध्ये -ग्रामीण भागात चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही . हे उदाहरण एकाचवेळेस सोशल मीडियाची ताकद आणि मर्यादा दाखवून देत . हल्ली तर चित्रपटगृहातूनच लाईव्ह ट्विट review केले जातात . चित्रपट चालू असतानाच समीक्षक किंवा सोशल मीडियावर लिखाण करणारे लोक चित्रपट कसा आहे हे ट्विटरवर सांगत असतात . हे ट्विट review चं फॅड मात्र समजण्याच्या पलीकडे आहे . एक तर तुम्ही चित्रपट पाहू शकता किंवा ट्विट करू शकता . एकाचवेळेस तुम्ही दोन्ही गोष्टी करत आहात म्हणजे एक तर तुम्ही चित्रपट व्यवस्थित पाहत नाही आहात किंवा चित्रपट बघण्यापेक्षा तुम्हाला इतर गोष्टी करण्यातच जास्त रस आहे असा त्याचा अर्थ . असो .नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अव्हेंजर्स -इन्फिनिटी वॉर ' या चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांमध्ये जी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली त्यामध्ये या चित्रपटावर सोशल मीडियावर जे प्रचंड लिखाण झालं त्याचा फार मोठा वाटा आहे .

सध्याचं युग स्मार्टफोनचं युग आहे . या युगात सोशल मीडियापासून अलुफ राहणं हे बऱ्यापैकी अशक्य आहे . या काळात प्रेक्षकांची मानसिकता ठरवण्यामध्ये सोशल मीडिया महत्वाची भूमिका बजावणार आहे , ही काळ्या दगडावरची रेघ आहे . पण सोशल मीडिया हे बदल फक्त प्रेक्षकांच्या मानसिकतेमध्येच घडवतोय असं नाही . सोशल मीडिया फिल्मइंडस्ट्रीच्या अनेक महत्वाच्या घटकांमध्ये पण बदल घडवून आहेत . या बदलांशी जुळवून घेण्यास असमर्थ असणारे लोक हळूहळू कालबाह्य झाले किंवा होत जाईल . जो या सोशल मीडिया नामक राक्षसाशी जुळवून घेईल त्याच्या टिकून राहण्याच्या शक्यता वाढतील .

अमोल उदगीरकर