खळबळजनक विधान करून वाद निर्माण करण्याची रामगोपाल वर्माची सवय तशी जुनीच. जेव्हा रामू त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर होता, तेव्हा त्याने एक विधान केले होते ,"जर धर्मा प्रोडक्शन आणि यशराज प्रोडक्शन ट्वीन टोवर असतील तर मी ओसामा बिन लादेन आहे ."अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा रूपकात्मक संदर्भ त्या विधानाला होता. म्हणजे करण जोहर, आदित्य चोप्रा ह्या प्रस्थापित मंडळीची बॉलिवूडमधली सद्दी मोडून काढणारा मी आहे असा दर्प त्या विधानातून येत होता. पण नंतर काय झाल हे सर्वविदितच आहे. धर्मा आणि यशराजच्या साम्राज्याची सद्दी अजून कायमच आहे आणि अनेक फ्लॉप चित्रपट देऊन डोक्यावर डोंगराएवढं कर्ज होऊन रामू हैदराबादमध्ये भूमीगत झाला आहे. सांगायचा मुद्दा असा की बॉलिवूडमधल्या प्रस्थापितांना आव्हान देण्याचे प्रयत्न पूर्वापार चालू आहेत. गुरुदत्तने पण ‘कागज के फल’सारखा काळाच्या पुढचा  सिनेमा देऊन तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला एकप्रकारे आव्हान दिलं होतं. रामूने 'पण 'सत्या ' आणि 'कौन' सारखे वेगवेगळे सिनेमे देऊन करण जोहर छाप गुडी गुडी सिनेमाला जोरदार टक्कर दिली होती. पण ही प्रस्थापितांची 'व्यवस्था' इतकी मजबूत आहे की तिने गुरुदत्त आणि रामूसारखे अनेक आव्हानवीर गिळले आणि पचवले. आता या प्रस्थापितांना आव्हान देणार कोण असा प्रश्न पडला असतानाच बॉलिवूडमध्ये 'फँटम फिल्म्स'चा उदय होत होता . 2011 मध्ये अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहेल आणि मधु मंतेना या चौघांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या निर्मितीगृहाने इनमीन चार वर्षात आपली पाळमूळे चांगलीच घट्ट जमवली आहेत.


लौकिकार्थाने 'फँटम फिल्म्स' ही भारतामधली पहिली 'डायरेक्टर्स कंपनी'. बॉलिवूडमधला किंवा एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीतला पहिला वहिला प्रयोग. म्हणजे या कंपनीचे जे चार आधारस्तंभ आहेत त्यातले तीन प्रथितयश दिग्दर्शक आहेत. बाकी प्रोडक्शन हाऊस किंवा 'स्टुडीओज'मध्ये मार्केटिंगमध्ये एमबीए केलेली माणसं भरली असताना इथे मात्र खरीखुरी सृजनशील माणसं सगळी कामं बघतात. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोट्वाने, विकास बहेल हे तिघेही कुठल्याही फिल्मी घराण्यातून आलेले नाहीत. म्हणजे बॉलिवूडी परिभाषेत सांगायचे तर हे तिघेही 'आऊटसायडर्स'. या तिघांमधलं हे एकमेव साम्य. इथेच हे साम्य संपतं. दिग्दर्शकीय शैली, कथा निवडण्याची आणि सांगण्याची पध्दत, वैयक्तिक स्वभाव अशा अनेक गोष्टींमध्ये या 'पार्टनर'मध्ये दोन ध्रुवाएवढं अंतर आहे.

भारतातली सर्वात पहिली 'डायरेक्टर्स कंपनी' स्थापन करण्याच्या कल्पनेचं जनकत्व जातं ते विकास बहेलकडे . आज 'क्वीन' चित्रपटानंतर विकास बहेल या नावाभोवती जे वलय आलं आहे ते कंपनीच्या स्थापनेच्या वेळेस नव्हतं. यापूर्वी 'यू टिवी स्पॉटबॉय' या कमी बजेटच्या पण 'अर्थपूर्ण 'सिनेमा बनवणाऱ्या निर्मितीगृहाचा तो मुख्य कर्ता-धर्ता होता . त्याच्याच कारकिर्दीत  'यू टिवी स्पॉटबॉय'ने  'देव डी', उडान, आमीर, वेलकम अब्बा अशा चित्रपटसृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली.  कालांतराने विकास बहेलला स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करावा असेही प्रकर्षाने वाटू लागले. मग त्याने निलेश तिवारी या दिग्दर्शकासोबत 'चिल्लर पार्टी' हा चित्रपटसह दिग्दर्शित पण केला. मुंबईतल्या एका बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या बच्चे कंपनीची एक अनाथ मुलगा आणि त्याचा कुत्रा यांच्याशी जुळलेली नाळ आणि त्यांच्यासाठी बच्चे कंपनीने बिल्डिंग मधल्या 'मोठ्या' लोकांशी दिलेला लढा या चित्रपटात सुंदरपणे दाखवला होता. चित्रपटाने चांगला धंदा केलाच शिवाय चित्रपटाला मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. सुखासीन कार्पोरेट आयुष्यातून बेभरवशाच्या 'सर्जनशील' क्षेत्रात उडी मारण्याचा विकासचा जुगार फळाला आला. याच काळात विकासचा संबंध अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानेशी आला. आपल्या सिनेमाविषयक 'सेन्सिबिलिटिज' जुळतात याचा विकासला अंदाज आला होता. मग आपण एकत्र येउन काही करूया असा प्रस्ताव त्याने अनुराग आणि विक्रमादित्य समोर ठेवला. आणि 'फँटम फिल्म्स'ची बीजं रोवली गेली. अनेक वर्ष कार्पोरेटमध्ये काढल्याने विकासच्या व्यक्तीमत्वात 'व्यवहारीपणा ' आणि 'सर्जनशीलता' यांचं दुर्मीळ पण अनोख समीकरण जुळून आले आहे. त्याचं 'प्रतिबिंब  त्याच्या 'क्वीन ; मध्ये उमटलं आहे . चित्रपटात कंगना रणावतचा अपवाद वगळता एकही स्टार नव्हता, पण आपली स्वतःच्या हनीमूनला एकटी जाणाऱ्या मुलीची आगळीवेगळी कथा हीच आपली खरी 'स्टार' आहे हे विकासला पुरेपूर कळलं होतं. क्वीन हिट झाला. सर्व मानाचे पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. क्वीन प्रदर्शित होण्यापूर्वी 'फँटम फिल्म्स'चे दोन चित्रपट फारसे चालले नव्हते. पण क्वीनने यशाचा रस्ता दाखवला आणि फँटमची गाडी सुसाट सुटली. आता विकास बहेल हृतिक रोशनसारख्या बड्या स्टारला घेऊन 'सुपर 30' सारखा मोठा सिनेमा बनवत आहे.

या तिघांमध्ये सर्वात गुणवान दिग्दर्शक म्हणजे विक्रमादित्य मोट्वाने. विक्रमादित्यला हे 'प्रमाणपत्र ' दस्तुरखुद अनुराग कश्यपकडून मिळालं आहे. एका मुलाखतीत विक्रमादित्य आणि दिबांकर हे देशातील सर्वात गुणवान दिग्दर्शक आहेत अशी कबुली अनुरागने दिली होती. विक्रमादित्यच्या 'उडान'ने छोट्या फिल्म्ससाठी संधींची अनेक कवाडे उघडून दिली. स्वतःच्या कठोर आणि क्रूर बापाशी स्वतःची स्वप्न जपण्यासाठी एका संवेदनशील पण बंडखोर मुलाने दिलेला लढा असा चित्रपटाचा विषय होता.  सात वर्ष 'उडान'ची संहिता हाती घेऊन निर्मात्यांचे उंबरठे झिजवत फिरणाऱ्या या लेखक दिग्दर्शकाची गुणवत्ता हेरली ती अनुराग कश्यपने. त्याने उडानची निर्मिती केली आणि इतिहास घडला. सगळयात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये निवड होणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला. 'उडान'चे व्यापारी मॉडेल समोर ठेवून अनेक छोट्या  बजेटच्या चित्रपटांची निर्मिती व्हायला लागली. 'द लंच बॉक्स' असेल किंवा 'कोर्ट' या चित्रपटांच्या निर्मितीच श्रेय कुठे तरी 'उडान ' आणि पर्यायाने विक्रमादित्यला पण जातं. उडानने जी पायवाट तयार केली त्यावरूनच  या चित्रपटाने वाटचाल केल्याचं दिसून येतं.  'लुटेरा' या विक्रमादित्यच्या 'पिरीयड ड्रामा' असणाऱ्या  दुसऱ्या चित्रपटाला तिकिट खिडकीवर अपेक्षित यश मिळाले नाही, पण समीक्षकांची ‘वाह ! वाह!’ मात्र मिळाली. कुठल्या तरी समीक्षकाने विक्रमादित्यचे सिनेमे म्हणजे पडद्यावर उलगडणाऱ्या हळुवार कविता असतात असे विधान केले होते. विक्रमादित्यच्या सिनेमाचं हे सर्वात यथार्थ वर्णन. 'ट्रॅपड' आणि 'भावेश जोशी सुपरहिरो' या वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या फिल्म्सने ब्रँड विक्रमादित्य प्रस्थापित केला आहे.

तिसरा आणि महत्वाचा म्हणजे अनुराग कश्यप. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या बंडखोरीचा चेहरा. त्याच्या अफाट लोकप्रियतेमुळे 'फँटम फिल्म्स' चा चेहरा पण तोच राहणार आहे याची जाणीव विक्रमादित्य आणि विकास बहेलला पण असणारच. अनुराग आणि त्याच्या फिल्मस बद्दल भरपूर लिखाण आणि चर्चा झाल्या आहेत. पण अनुरागने जितक्या नवीन लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना पहिली संधी दिली आहे तितकी फार कमी लोकांनी दिली आहे. प्रस्थापितांना  विरोध करणाराच स्वतः कधी प्रस्थापित बनतो हे त्याला पण कळत नाही . हा फक्त राजकारणाला लागू पडणारा नियम नाही. जौहर-चोप्राच्या चित्रपटांवर  टीकेची  झोड उठवणारा अनुराग कश्यप आता स्वतःच प्रस्थापित झाला आहे अशी ओरड  चालू झाली होती. करण जौहरसोबत चित्रपटाची सहनिर्मिती करण, रणबीर कपूरसारख्या 'स्टार'सोबत चित्रपट करण वगैर कारणांमुळे ही ओरड सुरु झाली  होती. या आरडा-ओरडीला अनुरागने त्याच्या खास निडर शैलीत दिलेलं उत्तर मोठ मार्मिक आहे, "इथपर्यंत येण्यासाठी मी प्रचंड संघर्ष केला आहे . एवढा संघर्ष करून आता कुठे मी माझ स्वप्न जगत आहे. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांनी स्वतः स्वप्न बघावीत. त्यांच्या अपेक्षांची ओझी वाहण्यात मला काडीमात्र रस नाही." लोकांना साच्यात बंदीस्त करण्यात रस असणाऱ्या इंडस्ट्रीत अनुरागच केवळ असणंच आश्वस्त करणारं आहे. आजही अनुराग कुठेही गेला तरी त्याच्याभोवती नवोदित दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा गराडा पडतो. अनुराग पण प्रत्येकाला वेळ देतो. त्यांचं बोलण ऐकून घेतो. मेन स्ट्रीम मीडिया अनुरागबद्दल काही म्हणो सर्वसामान्य प्रेक्षक आणि  'बॉलिवूड स्ट्रग्लर्स' यांच्याशी त्याची नाळ अजून पण जुळलेली आहे हेच सत्य आहे.

नवोदितांना कुठल्याही प्रस्थापित किंवा 'आहे रे ' वर्गातल्या प्रोडक्शन हाऊसपेक्षा 'फँटम'मध्ये आपल्याला संधी मिळेल अशी खात्री वाटत असते. 'फँटम फिल्म्स' च्या आरामनगर ऑफिसमध्ये एकाचवेळेस अनेक स्ट्रग्लर्स उभे असतात. आरामनगरच्या रहिवाशांना हे वडापाव खाणारे, सिगारेट फुंकणारे चित्रविचित्र वेशभूषा केलेले बेकार स्ट्रग्लर्स आपल्या भागात आलेले आवडत नाहीत. यांच्यामुळे आपल्या पॉश एरियाची रया जाते असे त्यांना वाटते. मग ते या स्ट्रग्लर्स लोकांना हिडीसफिडीस करतात. हाकलून देतात. तरी हे स्ट्रग्लर्स तिथे घुटमळत राहतात.  यामागे पुण्याई आहे ती अनुराग कश्यप, विक्रमादित्य आणि विकास बहेल या आऊटसायडर्स'ची.