"आय** हाब लवटिंग! अडव झो. आता याला मी काय सोडत न्हाय. चुकला रे चुकला, अडव झो!" उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणातील गावागावात कधीकाळी ऐकू येणारा हा गलका. भर दुपारी जरी कुणी रस्त्यानं चालत, गाडीनं गेला तरी त्याला असे शब्द सहज कानी पडायचे. उन्हाची तमा न बाळगता, कोकणातील किर्र अशा जंगलात झाडा-झुडपांमागे बिनधास्तपणे फिरताना अशी अनेक टोळकी. "अरं तो खय गेलाय बघ, सकाळी गेलेला पोर हा अजून काय मागं आला नाय. काय म्हणायचं काय याला? भूक नाय, तान न्हाय. फिरताय नुसता गावभर" असे शब्द या पोरांच्या काळजीपोटी प्रत्येक घरात सहजपणे ऐकू यायचे. उन्हाळ्याची सुट्टी, मुंबई, पुणे सारख्या शहरातून गावी येणारे नातेवाईक आणि होणार मजा, हा अनुभव जगण्याची वेगळीच अनुभूती देऊन जायचा. सुट्टी पडल्यानंतर नातेवाईकांच्या गावी जाणं, रानमेवा गोळा करणं, मित्रांच्या - भावंडांच्या संगतीनं हा सारा खेळ रंगायचा. शेणानं सावरलेल्या अंगणात बागडताना, भांडताना दिवस कसे भराभर निघून जायचे. करवंद, आंबे, जांभूळ, काजू, रातांबे गोळा करताना पकड्यांची पार वाट लागायची. यावेळी दुसऱ्यांच्या बागेत शिरून फळं चोरण्याची मजा काही औरच. कुणी आलं की सुरू होणारा लपंडाव. खाव्या लागणाऱ्या शिव्या या साऱ्यामध्ये दिवस कधी मावळायचा हे कळायचं देखील नाही. तसं म्हटलं तरी कोकणातील प्रत्येक गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत सारखीच मज्जा. गावी आल्यानंतर मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांचे रंग मात्र उन्हामुळे पार बदलून जायचे. पोरांच्या अंगावर असलेल्या कपड्यांची दशा तर काय विचारू नका? यावेळी शक्यतो तु संध्याकाळी 'गाव झोळून झाल्यावर अंघोळ कर' अशा शब्दात मायेनं दटावलं जायचं. तसं पण अंघोळ केली काय आणि नाय केली काय, कुणाला फरक पडत होता? रात्र संपतेय केव्हा आणि आम्ही घराबाहेर जातोय केव्हा हाच विचार डोक्यात घोळत असायचा. सकाळी एकत्र जमण्याचं ठिकाण हे ठरलेलं. कुणी आला नाही तर त्याच्या घरी जात विचारपूस करायची. त्याच्या घरच्यांना देखील सारं काही लक्षात यायचं. आये आलो गं, म्हणून बाहेर पडलेला पोरगा, पोरगी संध्याकाळीच येणार, ही खुणगाठ सर्वांनीच बांधलेली.दुपारचं जेवण घाईत संपवून निघायचं. केव्हा केव्हा तर घरी येणं देखील व्हायचं नाही. पण, हे घरच्यांसाठी काही नवीन नव्हतं. कोण शिट्टी मारतंय, कोण कुकारी अशा एक ना अनेक गोष्टींनी गाव नुसता गजबजून जायचा. अनेक ठिकाणी क्रिकेट खेळणारी मुलं. रस्त्यांवर फिरणारे चाकरमानी आणि गप्पांचे फड हे कोकणातील प्रत्येक गावात दिसणारं चित्र. फसण गरे, फणसाची भाजी, आंब्याचं लोणचं आणि करंवंदाची चटणी या जेवणाची मजा काय वर्णावी? फणसाच्या भाजीला कोकणात काही भागात शाक देखील म्हणतात. नदीवर अंघोळीला जाणं, मासे पकडणं, एकमेकांशी प्रमाने भांडणे, नावं ठेवणे, चिडवणे आणि त्यात कमी म्हणून की काय जोड्या लावण्यात देखील सर्वजण पटाईत. असा हा सारा माहोल कोकणात पाहायाला मिळायचा. आता काही प्रमाणात स्थिती बदलली आहे. (( कोरोनाचे वर्ष हे अपवादात्नक आहे )) अरे हो काहींना लवटिंग या शब्दाचा अर्थ सांगायचा राहूनच गेला की! तर, आंब्याच्या झाडावर पिकलेल्या आंब्याला लवटिंग म्हणतात. काही भागांमध्ये याला दुसरा शब्द देखील असेल. असो!


सध्या मात्र कोकणातील गावागावत दिसणारं हे चित्र कुठं तरी हरवत चाललं आहे. गावाकडे येणारा ओघ कमी झाला का? तर त्याचं उत्तर नाही असं म्हणता येईल. पण, गावी आल्यानंतर थांबण्याचा तिथं वास्तव्य करण्याचा कालावधी मात्र निश्चितच कमी झाला. धावपळीचं युग, वाढत्या गरजा. आई-बाबा दोघांची नोकरी, मुलांचे क्लासेस ही सारी कारणं त्यामागे असावीत असा अंदाज. पण, हे सारं असलं तरी भर उन्हात, मातीत खेळताना खुप कुणी जास्त दिसत नाही. या साऱ्यांची जागा आता मनोरंजनाच्या इतर साधनांनी घेतली आहे. गावागावात पोहोचलेलं इंटरनेट, विविध प्रकारची गॅजेट्स देखील जोडीला आहेत. पालक मुलांना हे कर, ते कर या करत असलेल्या सुचना आणि त्यांच्याकरता तयार केलेलं सुरक्षित वातावरण याचा देखील परिणाम निश्चितच होतो. आता हे सारं वाईट किंवा चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. पण, गावी आल्यानंतर देखील मुलं ठराविक वेळेतच बाहेर पडतात. "उन्ह वाढतंय, बारानंतर बाहेर नको जाऊस. जेवण कर आणि झोप. हवं तर मोबाईलवर खेळ किंवी टिव्ही बघ. संध्याकाळी दोन तास जा आणि वेळेवर ये. काकांच्या मुलांना हवं तर इथंच यायला सांग आणि या अंगणात खेळा" अशा सुचना सर्रास पालकांकडून दिल्या जातात. यात चुक काही नाही. पण, साधारण पाच - दहा वर्षापूर्वीचे क्षण आणि आताचे यामधील फरक सांगण्याचा हा उद्देश. यामुळे सध्या ठराविक वेळातच मुलं बाहेर खेळताना दिसतात. सर्रासपणे खेळले जाणारे खेळ आता हळहळू विस्मृतीत जात आहेत. मैदानी खेळांची जागा मोबाईलमधील गेम आणि टीव्हीनं घेतली आहे. काटे लागतात किंवा ओरखडे येतात म्हणून करवंद खाण्यासाठी कुणी सहसा जंगलात जात नाही. 


मला चांगलं आठवतंय. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानंतर आमची भावंडं गावी दाखल व्हायची. काही वेळा तर केवळ आजी - आजोबाच त्यांचा सांभाळ करायची. सुट्टी लागल्यानंतर कुणा ओळखीच्या माणसासोबत थेट गावची वाट धरायचा. एखाद्या भावाची, बहिणीची परिक्षा बाकी असेल तर मग ते मागावून येत. पण, यावेळी काय धम्माल करणार याचा प्लॅन हा आधीच ठरलेला असायचा. पार्टी व्हायच्या, गप्पांचे फड रंगायचे. गुरांच्या मागून किंवा त्यांच्या पाठीवर बसण्याची मजा शिव्या खायला भाग पाडायची. रात्रीच्या वेळी आंबे चोरण्यासाठी जणू स्पर्धा लागलेली असायची. झोपेत असताना सकाळी कानावर शिव्या पडायच्या आणि मग एकमेकांना खुणवणे सुरू व्हायचे. दिवसभर काय करायचं याचा प्लॅन हा सकाळीच ठरायचा. रात्री घरी झोपायला कुणी जायचाच नाही. गावातील मंदिर, शाळा इथंच महिनाभराचा मुक्काम ठरलेला असायचा. कोण काय करतंय? कुण कुठं गेलंय याची सारी माहिती याच ठिकाणी मिळायची. भांडणं व्हायची, चिडवाचिडवीनं एखादा रडकुंडीला देखील यायचा. लग्नाची वरात जाताना कापड आडवं धरत नारळ घेण्यासाठी होणारी धावपळ म्हणजे एक सोहळाच जणू. कोकणात उन्हाळ्यात अनेक नद्यांचं पाणी आटून जातं. पण, ठराविक ठिकाणी मात्र पाऊस पडेपर्यंत पाणी असतं. त्याला आम्ही कोंड असं म्हणतो. या ठिकाणी होणारी अंघोळ, कपडे धुताना होणारा गलका, पाणी पिण्यासाठी येणारी गुरं आणि त्याच ठिकाणी होणारी मासेमारी हे सारं आठवल्यानंतर आपण उगागच मोठे झालो असं वाटतं. ठिकठिकाणी होणाऱ्या क्रिकेटच्या मॅचेस गेलेले दिवस आठवल्या मन काही काळ थांबतं आणि क्षणभर दाटून येतं. त्यामुळे पुन्हा एकदा 'लवटिंग' पाडण्यासाठी होणारी धडपड आणि सुरू असणारा कल्ला नवी ऊर्जा देण्यासाठी हवाहवासा वाटतो.