महाभारतात द्रौपदीच्या स्वयंवरात कर्णाला नाकारलं गेलं. श्रेष्ठत्वाच्या सगळ्या परीक्षा देऊनही कर्णानं लौकिक मिळवला पण आदर सन्मान आणि हक्क त्याला मिळाला नाही. हजारो वर्ष उलटली पण कर्णाचा संघर्ष संपला नाही. पोथ्या पुराणात पांडवांना नायक म्हणून रंगवलं जात असताना कर्ण, दुर्योधन आपसूकच खलनायक बनले. महाभारतातल्या याच संदर्भाला छेद देत दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी कर्णन उभा केलाय. काळानं असंख्य वेळा उघडझाप केली, गृहगोलांनी हजारो वेळा आपली स्थानं बदलली, पण कर्ण आजही तिथेच उच्चनिचतेच्या आणि जातीभेदाच्या उंबरठ्यावर न्यायाच्या प्रतिक्षेत उभा आहे. मारी सेल्वराजचा कर्णन लढून हा हक्क मिळवतो.
कथा १९९७ सालची आहे. तमिळनाडूमधल्या पोडियंकुलम गावात आदिवासी, मागासवर्गीय लोक राहतात. गावात शाळा, दवाखाना, प्राथमिक सुविधा काहीच नाहीत. गावाशेजारी पक्की सडक आहे पण कोणतीच बस थांबत नाही. पोडियंकुलमच्या शेजारी मेलूर नावाचं गाव आहे. या गावात सधन आणि सत्तेच्या जोरावर यंत्रणेला वाकवणाऱ्या सवर्णांची वस्ती आहे. पोडियंकुलमच्या मागासवर्गीयांना कायम आपले आश्रित ठेवण्यासाठी मेलूर गावचे लोक पोडियंकुलम गावात कुठलीही बस थांबू देत नाही. शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलींना मेलूर गावाच्या बस स्टॉपवरून गाडी पकडावी लागते. तिथेही छेडछाड होते. कोणी आजारी असेल तरीही त्या सवर्णांच्या भीतीनं गावात कोणतीही बस थांबत नाही. गुळगुळीत डांबरी सडकेवर एक मुलगी पाय घासून घासून तोंडातला फेस सांडत आपला जीव सोडते. पण रस्त्यावरून जाणारी एकही गाडी थांबत नाही. पुढे याच मुलीचा मुखवटा युद्धाचा चेहरा बनतो, ज्याचा सेनापती बनतो 'कर्णन'.
कर्णनचा धनुष हा कथेचा मध्यवर्ती नायक असला तरी या सिनेमात प्रत्येक जण नायक आहे. गावातला एक म्हातारा यमन हा कर्णाचा मार्गदर्शक आहे. गावातल्या पात्रांची नावं कर्ण, दुर्योधन, अभिमन्यू, द्रौपदी, पद्मिनी आहेत. दिग्दर्शकाला आपल्यासमोर आजच्या काळातलं महाभारत उभं करायचंय. पेडियंकुलमच्या माळावर या आदिवासींची फक्त धड असलेली एक देवता आहे. सुरुवातीला एका सीनमध्ये माशाचे दोन तुकडे करण्याची प्रथा बघताना कर्णानं द्रौपदीच्या स्वयंवरातली आपली इच्छा पूर्ण केल्यासारखं वाटतं. मानाच्या हत्तीवरून मानाची तलवार मिरवणारा कर्णा कोणापेक्षाही कमी नाहीय.
कर्णाला सैन्यात भरती व्हायचंय! देशाची सेवा करायची आहे. आपल्या गावातली परिस्थिती बदलायची आहे. त्याच्या मनात व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाविषयी प्रचंड राग आहे. या रागाचा विस्फोट कोणत्याही क्षणी होईल असं आपल्याला अर्धा सिनेमा होईपर्यंत सातत्यानं वाटत राहतं. पण अतिशय संयत पद्धतीनं दिग्दर्शकानं कुठलाही अतिरेक न करता कर्णन अतिरंजीत होऊ दिलेला नाही. कर्णाची मनस्थिती दर्शवण्यासाठी दिग्दर्शकानं पुढचे दोन पाय बांधलेलं गाढव दाखवलंय. त्या गाढवाला धावायचंय, मुक्त व्हायचंय पण त्याला होता येत नाही. संथगतीनं चालणारं ते गाढव कर्णाची मनस्थिती अचूकपणे दर्शवते. कर्णालाही धावायचंय, पण इथली सामाजिक व्यवस्था त्याला ते करू देत नाही.
कर्णा यमन ला विचारतो "या गाढवचे पाय का बांधलेत?"
त्यावर यमन म्हणतो "ते पळून जाऊ नये म्हणून"
त्यावर कर्णा म्हणतो "मी त्या गाढवाचे पाय मुक्त करू का?"
त्यावर यमन म्हणतो नाही, "तो अधिकार फक्त मालकाचा आहे"
असे साधे साधे संवाद मूळ विषयाला हात घालत राहतात.
मेलूर गावच्या सवर्णांच्या मनमानीविरोधात कर्णा अनेकवेळा बंड करतो. पण ते गावकऱ्यांना पटत नाही. गावकऱ्यांना कर्णाचा संतापी स्वभाव आवडत नाही. इथेही समाजाची दबून राहण्याची प्रवृत्ती दिसून येते. पण कर्णा त्यातला नाही. आपल्या गावात बस थांबावी यासाठी तो एकटाच लढतो. एक प्रेग्नंट महिला स्टॉपवर तासंतास ताटकळत राहूनही बस थांबत नाही, तेव्हा मात्र त्याच्या सहनशक्तीचा बांध फुटतो. कर्णा गाढवाच्या पायातले दोर कापतो आणि त्यानंतर बसची तोडफोड करतो. इथून पुढे सिनेमात जे घडत ते आपल्या व्यवस्थेचं नागडं वास्तव आहे.
सिनेमात आता खऱ्या विलनची एन्ट्री होते. गाडीच्या तोडफोड प्रकरणी चौकशीसाठी पोलीस अधिकारी कन्नपीरन ताफ्यासकट गावात येतो. जाती धर्माच्या राजकारणात बरबटलेल्या या अधिकाऱ्याला सुपिररीयर कॉम्प्लेक्स आहे. गावातली लोकं त्याच्यासमोर डोक्यावरची पगडी उतरवत नाही म्हणून त्याला राग येतो.
जेव्हा तो सरपंचाला त्याचं नाव विचारतो. तेव्हा,
सरपंच उत्तर देतो 'दुर्योधन'
आणखी एकाला नाव विचारतो.
तो उत्तर देतो 'अभिमन्यू'
या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवून हा पोलीस अधिकारी लाठ्यांनी इतकं बदडतो की ते दृश्य अंगावर काटे आणतं. 'तुमच्या जातीतल्या लोकांची नावं दुर्योधन किंवा अभिमन्यू का आहेत?' 'माझ्यासमोर पगडी घालून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली?' या क्षुल्लक कारणावरून हा अधिकारी या चारही वयोवृद्धांना अक्षरशः मरेस्तोवर काठीनं बदडतो. जाती जमातींविषयी मनात तुच्छतेची भावना ठेवणाऱ्या समाजाचा हा पोलीस अधिकारी एक भाग आहे. कर्णाला जेव्हा हे कळतं तेव्हा तो पोलीस स्टेशनची तोडफोड करतो. तोडफोड करताना भिंतीवरच्या प्रतिमेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळं बघताहेत. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला एक अर्थ आहे. प्रत्येक फ्रेम आणि पात्रांच्या कृतीतून दिग्दर्शकानं नेमका परिणाम साधलाय.
पोलिस स्टेशनचं नुकसान करून आपल्या चार लोकांना घेऊन कर्णा गावी परततो ते संकटाचं आमंत्रण सोबत घेऊनच. पुढे जे काही घडत जातं ते पापणी न लवता बघत राहावं लागतं. कर्णाला आर्मीमध्ये जॉईन होण्याचं पत्र येतं. पण दुसरीकडे गावावर संकट असताना गाव सोडून जाणं त्याला पसंत नाही. द्विधामनस्थितीतला कर्णा गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आर्मीमध्ये जॉईन व्हायला तयार होतो. पण तोपर्यंत गावात पोलिसांचा ताफा शिरतो आणि बायका, म्हातारे, लहान मुलं सगळ्यांना लाठ्यांनी फोडून काढतात. हा नरसंहार थांबावा म्हणून कर्णाचा मित्र यमन स्वतःला पेटवून घेतो. गावाच्या वेशीवर गेलेला कर्णा परत येतो आणि आपल्या गावाचं रक्षण करतो. शेवटच्या एका सीनमध्ये कर्णा त्या पोलीस अधिकाऱ्याला त्याचं नाव विचारतो.
पोलीस अधिकारी उत्तर देतो 'कन्नपीरन'
कर्णा पुन्हा प्रश्न विचारतो बापाचं नाव काय?
पोलीस उत्तर देतो 'कंदेया'
त्यावर कर्णा म्हणतो की "जर कंदेयाच्या मुलाचं नाव कन्नपीरन असू शकतं, तर माडासामीच्या मुलाचं नाव कर्णा का असू शकत नाही."
मागासवर्गियांनी राहण्या बोलण्यासोबत नावंही उच्चवर्णीयांसारखी ठेवू नये. आमची बरोबरी करू नये, या प्रवृत्तीवर कर्णा आघात करतो.
शेवटच्या काही मिनटात कर्णा जेव्हा शिक्षा भोगून बाहेर पडतो तेव्हा पोडियंकुलमची बस पकडतो. आता गावात बस थांबते. मुलं शाळा कॉलेजात जातात. गावाच्या एका भिंतीवर धड नसलेल्या प्रतिमेला आत्मदहन करणाऱ्या यमनचा चेहरा रंगवलेला असतो. गावातल्या अनिष्ट प्रथा दूर होऊन गावाला आपलं खरं दैवत कळतं. अनेक वर्ष जातीबंधनाच्या जोखडातून मुक्त झालेला कर्णा बेभान होऊन नाचतो.
कर्णन सिनेमाची कथा ही फक्त पोडियंकुलम गावची कथा नाहीय. आजही भारतातल्या शेकडो गावांमधल्या अनेक पिढ्यांची व्यथा आहे. कुठे रस्ते नाही, दवाखाना, शाळा नाही त्या सर्व गावांची कहाणी आहे कर्णन. वयोवृद्धाच्या निधनानंतर त्याचा आनंदसोहळा साजरा करण्याची पद्धतही एका गाण्यातून दिसते. द्रौपदीच्या विरहात दारू पिऊन नाचणाऱ्या कर्णाच्या मुस्काटात मारणारी त्याची बहिण पद्मिनी सिनेमाची कधीकधी नायक वाटते.
सिनेमातली छोटी छोटी दृश्यं सातत्यानं सामाजिक संदर्भावर बोलतात. कोंबडीचं पिल्लू उचलून नेणारी घार असेल, गावातली भटकी कुत्री, मांजरं, जमिनीवर रेंगाळणारे किडे, गांडूळं किंवा कन्नपीरनच्या जाळ्यात अडकणारा मासा. ही सर्व दृश्यं संदर्भासह येत जातात आणि कहाणी पुढे घेऊन जातात. सिनेमाभर अधून मधून दिसणारं गाढव शेवटी त्याच्या आईजवळ जातं. गरज असेल तिथेच ड्रोनचा योग्यवेळी वापर अशा सर्व गोष्टी सिनेमा देखणा बनवतात.
पोलीस स्टेशनमध्ये चौघांना काठीनं बदडण्याचा प्रसंग असेल किंवा शेवटी गावात घुसून पोलिसांनी केलेला लाठीमार ही दृश्यं थरकाप उडवतात. यमनचं स्वतःला जाळून घेणं, बाहेर लाठीमार सुरू असताना गरोदर महिलेची डिलिव्हरी होणं हे सगळे प्रसंग अंगावर येतात. लिबर्टीच्या नावाखाली काही प्रसंग किंवा पात्र अतिरंजीत करण्यााची संधी असूनही तो मोह दिग्दर्शकानं टाळला. यावरून सिनेमाकर्त्याचा हेतू किती स्वच्छ आहे ते कळतं. जातीचा उल्लेख न करताही जातव्यवस्थेतली विदारकता दाखवण्याचं कसब मानावं लागेल.
थोडंसं दिग्दर्शकाविषयी.. पेरियुरम पेरूमल ज्यांनी बघितलाय ते मारी सेल्वराज यांचे फॅन आहेत. मारी सेल्वराज यांनी दिग्दर्शकीय पदार्पणातच स्पष्ट भूमिका, थेट भाष्य करून तमिळनाडूमधल्या शोषितांचं जगणं आणि समाजात समानतेसाठीचा संघर्ष दाखवला होता. कर्णन हा त्याचाच दुसरा भाग आहे असं समजा. मारी सेल्वराजच्या सिनेमाचा नायक हा हार मानणारा नसतो, शेवटच्या क्षणापर्यंत तो लढत राहतो. कथाही मारी सेल्वराज यांनी लिहिली असल्यानं आधी कागदावर मग पडद्यावर सगळं हवं तसं साकारणं मारी सेल्वराज यांनी करून दाखवलंय. थेनी ईस्वर यांंचं कॅमेरावर्कही अप्रतिम आहे. संतोष नारायण यांचं पारंपरिक तमिळ संगीत सिनेमाला अधिक वास्तवतेकडे घेऊन जातं.
सिनेमात एकही गोरा गुळगुळीत चेहरा नाही. तरीही सगळेच लोक सुंदर दिसतात कारण त्यांचं खरखुरं जगणं आणि भूमिकेशी एकरूप होणं. सिनेमाची नायिका दौपदी बनलेली राजिशा विजयन, कर्णाचा मार्गदर्शक यमन बनलेेे लाल, किंवा सिनेमा संपल्यावरही पोलीस अधिकारी आपल्या लक्षात राहतो. नटराजन यांनी हा पोलीस अधिकारी उत्तम साकारलाय. योगी बाबूंची ग्रे शेड भूमिकाही महत्वाची. बाकी कर्णाच्या भूमिकेतल्या धनुषबद्दल त्याच्या अभिनयाविषयी आपण काय लिहिणार. बनियन, लुंगीवर वावरणाऱ्या धनुषचा स्वॅग सुटाबुटातल्या जेम्स बॉण्डपेक्षा कमी नाही. असुरनमधला बाप जितका प्रभावी साकारला तितकाच कर्णनमधला अँग्री यंग मॅन धनुषनं साकारलाय. त्याचं साधं दिसणं, साधं असणं हीच जमेची बाजू आहे. पा रंजीत, वेट्रीमारन यांच्या विद्रोही सिनेमाची परंपरा मारी सेल्वराज पुढे घेऊन जाताहेत.
( 'कर्णन' अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे )