सिनेमात एन्ट्रीच्या सीनला नुसता बुटांचा आवाज आला की अख्खं थिएटर टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणून जायचं. सुटाबुटात मोठ्या रुबाबात हातातला पाईप सावरत आपल्या वजनदार आवाजानं ज्यांनी प्रत्येक डायलॉग अजरामर केला. हा रुबाब फक्त सिनेमातच नव्हता तर खऱ्या आयुष्यातही ते फक्त स्वत:च्या नियमांवर जगले. ज्यांच्या अभिनय क्षमतेवर चर्चा होऊ शकेल. पण हिंदी सिनेमात स्टाईल आणि डायलॉगची जेव्हा चर्चा होईल तेव्हा मात्र आपल्या खरखरीत आवाजात "जानी....." म्हणणाऱ्या राजकुमार यांचं नाव सगळ्यात आधी घेतलं जाईल. बुलंदी सिनेमातला त्यांचाच डायलॉग आहे.
"खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खूद पुछें, बता तेरी रजा क्या है"
या डायलॉगसारखं त्यांचा आयुष्यात घडलंही. सिनेजगाशी दूरदूरपर्यंत संबंध नसतांना त्यांनी आपलं स्थान 60, 70, 80, आणि 90च्या दशकापर्यंत कायम ठेवलं



सिनेमात काम मिळेपर्यंत राजकुमार यांनी सिनेमा पाहिलाच नव्हता. 8 ऑक्टोबर 1926 रोजी आताच्या पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतातल्या लारालोईमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव कुलभूषण पंडित. वयाच्या 14व्या वर्षी आपल्या कुटुंबासोबत ते मुंबईला आले आणि इथेच शिक्षण घेतलं. माहिम पोलीस स्टेशनमध्ये ते इन्स्पेक्टर पदावर काम करत होते. आता माहिमच्या पोलीस स्टेशनमधला एक सर्वसामान्य पोलीस अधिकारी ते बॉलिवुडचा सुपरस्टार हा पुढचा प्रवास थक्क करणारा तर आहेत. पण एक मनमौजी कलाकराची गाथाच आहे.

माहिम पोलीस स्टेशनमध्ये पोलीस इन्सपेक्टर असलेल्या राजकुमार (कुलभूषण पंडित) यांना सिनेमात काम करण्याची कधीच इच्छा नव्हती. पण पोलीस स्टेशनच्या समोर शेख नावाचे मेजिस्ट्रेट पदावर काम करणारे व्यक्ती राहायचे. त्यांच्या भावाची फिल्म इंडस्ट्रीतल्या काही लोकांशी ओळख होती. तो अधून मधून राजकुमार यांच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये गप्पा मारायला यायचा. राजकुमार यांना तो कायम म्हणायचा, "इन्स्पेक्टर साहब, आपकी आवाज और स्टाईल बहोत युनिक है। आप फिल्मो मे काम क्युं नहीं करते."
त्यावर राजकुमार कधी रिअॅक्ट व्हायचेच नाही. त्या व्यक्तीनं राजकुमार यांचे फोेटो ओळखीतल्या काही निर्माता दिग्दर्शकांकडे दिले. काही दिवसांनी दिग्दर्शक नज्म नक्वी यांनी ते फोटो पाहून माहिम पोलीस स्टेशन गाठलं. नज्म नक्वी यांनी आपल्या रंगिली सिनेमात राजकुमार यांना घेतलं. ते वर्ष होतं 1952.

राजकुमार हे प्रचंड फटकळ, हजरजबाबी आणि समोरचा व्यक्ती कितीही मोठा असला तरी एका वाक्यात त्याचा पानउतारा करणारे होते. त्यामुळे राजकुमार यांची इंडस्ट्रीत तशी फार कुणाशीच मैत्री किंवा सख्य नव्हतं. पण तरीही दिग्दर्शकांना आपल्या सिनेमात राजकुमार हवे असायचे.
सौदागर सिनेमात एक डायलॉग आहे,
"दुनिया जानती है की जब राजेश्वर दोस्ती निभाता है  तो अफसाने लिखें जाते है, और जब दुश्मनी करता है, तो तारिख बन जाती है."
याच तत्त्वानुसार त्यांचा इंडस्ट्रीत वागणं असायचं.
कामात त्यांचा फोकस होता आणि तितकीच शिस्तही. त्यामुळेच कदाचित अनेक दिग्गज दिग्दर्शकांनी त्यांना वारंवार आपल्या सिनेमात घेतलं.

आयुष्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात पोलीसाची खाकी वर्दी मिरवलेले कुलभूषण पंडित सिनेमातही खाकी वर्दीत शोभून दिसायचे. सहा फूट उंच आणि   आपल्या आवाजानं सहकलारांचा अभिनय झाकोळला जायचा. इन्सानियत के देवता सिनेमात खाकी वर्दीतला जेलर राणा प्रताप सिंह समोर उभ्या असलेल्या दोन ठगांना (रजनीकांत, विनोद खन्ना) म्हणतो,
"हवाओंके टकरानेंसे पहाडोंमे सुराग नही हुआं करते. फिर भी हमे तुम्हारा यह अंदाज पसंद आया. यह हमारा वादा रहा के हम तुम्हे भागने के लिए ऐसा मैदान देंगे, के तुम भागते भागते थक जाओंगे, लेकिन मैदान खत्म नही होंगा,
और..... नजर उठा के तुम जब देखोंगे तो राणा प्रताप सिंग तुम्हारे सामने कानून की मजबूत दिवार के तरह खडा होंगा.. बंद करदो इन्हें!"
पोलीस दलातली शिस्त, अनुशासन सिने इंडस्ट्रीत नव्हतं. म्हणून त्यांना वाटायचं मी चुकीच्या क्षेेत्रात आलोय. पण म्हणून ते बदलले नाही. ते त्यांच्याच वेळापत्रकावर सगळ्यांना चालवायचे.
राजकुमार साहेब यांच्या कामच्या वेळा ठरलेल्या असायच्या. सिनेमाच्या अख्ख्या युनिटला त्यावेळेतच काम करावं लागत होतं. सकाळी 10 वाजता ते सेटवर हजर व्हायचे, मोजून तीन तास काम करायचे. 1 वाजता त्यांचा लंच ब्रेक असायचा, त्यानंतर दोन तास ते सेटवरच झोप काढायचे. पुन्हा 4 वाजता तयार होऊन शुटिंग सुरू  करायचे. या मधल्या वेळेत त्यांना डिस्टर्ब केलेलं अजिबात चालायचं नाही. तोपर्यंत दिग्दर्शक इतर कलाकारांचे सीन्स करून घ्यायचे. राजकुमार नाईट शिफ्टला थेट नकार द्यायचे. रात्रीचे सीन्स असतील तर 7 ते 12 यावेळेतच शुटिंग व्हायचे. 12 नंतर ते सेटवरून निघून जायचे.

एखादा सिनेमा फ्लॉफ गेला म्हणून ते कधीच विचलित झाले नाही. एकदा एक निर्माता राजकुमार यांच्याकडे सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन गेला. स्क्रिप्ट ऐकवली, राजकुमार साहेबांनी होकारही दिला. यावेळी राजकुमार यांनी आपली फी 1 लाख रुपयांनी वाढवून सांगितली. निर्माता म्हणाला, "तुमचा शेवटचा पिक्चर तर फ्लॉफ गेलाय तरीही फी 1 लाखांनं का वाढवताय?" त्यावर राजकुमार म्हणजे, "फिल्म फ्लॉफ हुई है। लेकिन राजकुमार कभी फ्लॉफ नहीं हो सकता।"

1956 सालच्या सोहराब मोदी यांनी दिग्दर्शित केलेल्या नौशेरवां-ए-आदिल या सिनेमातला प्रिन्स नौशाजाद राजकुमार यांनी साकारला. त्याकाळी या सिनेमाची आणि राजकुमार यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. त्यानंतर आलेल्या मदर इंडियानं थेट ऑस्करपर्यंत झेप घेतली. दिग्दर्शक मेहबुब खान यांनी या रोलसाठी दिलीप कुमार यांना विचारलं पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे राजकुमार आणि सुनिल दत्त यांना हा सिनेमा मिळाला होता. बॉलिवुडच्या इतिहासात मदर इंडिया हा सिनेमा माईलस्टोन मानला जातो. मदर इंडियानंतर मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबरीवर आधारीत गोदान सिनेमातही राजकुमार यांची भूमिका महत्वाची होती. मदर इंडियाप्रमाणेच गोदान सिनेमाही ऑस्करला गेला होता. त्यानंतर पैगाम, दिल अपना प्रित पराई, हमराज, वक्त,  नीलकमल, हिर रांझा, पाकिजा, बुलंदी, सौदागर, तिरंगा असे किती तरी सुपरहिट सिनेमे राज कुमार यांनी दिले. बदलते कलाकार, दिग्दर्शक, नवनवीन तंत्रज्ञान येत गेलं पण राजकुमार यांचा तोरा तसाच होता. किंबहुना सातत्यानं त्यांचा दबदबा वाढतच राहिला.
राजकुमार यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन या सर्व सुपरस्टार्सच्या काळात आपल्या सिनेमांकडे लोकांना खेचलं. राजकुमार हे कायम सुपरस्टार राहिले. सिनेमा फ्लॉप गेला तरी राजकुमार यांचे डायलॉग मात्र कायम सुपरहिट होते. त्यांचा स्वॅग सुपरस्टार मंडळींपेक्षा 10 पटीनं अधिक होता.
"हमको मिटा सकें यह जमानें मे दम नहीं,
हमसे जमाना खुद है, जमानें से हम नहीं."
हा सिनेमातला डायलॉग त्यांच्या कारकीर्दीला तंतोतंत लागू पडतो.

राजकुमार यांचे डायलॉग्ज आजही लहान थोरांच्या ओठी असतात. आपल्याला दैनंदिन जगण्यातल्या प्रसंगातही हे डायलॉग्ज आजही वापरले जातात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर 1965 साली आलेल्या यश चोपडा यांच्या 'वक्त' सिनेमातला राजकुमार यांचा डायलॉग "चिनॉय सेठ, जिनके घर शीशे के बने होते हैं, वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते.."
किंवा याच सिनेमतला-
"यह बच्चों के खेलने की चिज नही. हाथ कट जाएं तो खुन निकल आता है."
हे असे डायलॉग्ज आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांचा पडद्यावरचा क्लासी अंदाज आणि भारदस्त संवादफेक कोणीही विसरू शकत नाही.

ऑनस्क्रीन वाघासारखं जगणारे राजकुमार यांचे ऑफस्क्रीन किस्से तर भन्नाट आहेत. हे किस्से ऐकताना तुम्हाला कळेल की राजकुमार हे काय रसायन आहे. सिनेमातल्या व्हिलनला आपल्या डायलॉग्जनी गपगार करणारे राजकुमार पार्ट्यांमध्ये, सेटवर अनेक सुपरस्टार्सचीही लाज काढायचे. अमिताभ बच्चन, राज कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, गोविंदा यांतल्या कोणलाही त्यांनी सोडलं नाही. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना याची जाणिव होती त्यामुळे सगळेच कायम लांब राहणं पसंत करायचे.

आपल्याला महिती असेल की जंजीर सिनेमानं अमिताभला सुपरस्टार बनवलं. पण जंजीरचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना अमिताभचा रोल राजकुमार यांना द्यायचा होता. स्क्रीप्ट घेऊन ते राजकुमार यांच्या घरी गेले. स्क्रीप्ट ऐकवली आणि या रोलची ऑफर दिली. त्यावर राजकुमार यांनी अशक्य उत्तर दिलं. ते म्हणाले,
"तुम्हारे पास से बिजनौरी तेल की बदबू आ रही है, हम फिल्म तो दूर तुम्हारे साथ एक मिनट और खड़ा होना बर्दाश्त नहीं कर सकते."
असं उत्तर दिल्यावर अर्थातच जंजीरचा रोल अमिताभ बच्चन यांच्याकडे गेला.

राजकुमार सेटवरच्या सहकलाकारांना वेगवेगळी नावं घेऊन बोलवत असतं. ते मुद्दाम जितेंद्रला धर्मेंद्र, धर्मेंद्रला जितेंद्र म्हणायचे. एकदा कोणीतरी सेटवर त्यांना विचारलं की तुम्ही असं का करता? तर त्यावर त्यांचं उत्तर होतं.
"धर्मेंद्र या जीतेंद्र या बंदर, क्या फर्क पड़ता है! राजकुमार के लिए सब बराबर हैं." हा किस्सा वाचून तुम्हाला आतापर्यंत राजकुमार यांच्या स्वभावाचा अंदाज आला असेलच.
आता हा किस्सा जंगबाज सिनेमाच्या सेटवरचा आहे. सेटवर राजकुमार हे गोविंदाची बऱ्याचदा मस्करी करायचे. “अरे भाई चिची (गोविंदा) तुम इतना नाचते हो, थोडा हिरोईनको भी नाचने दे दो” तेव्हा सेटवर सगळेच खळखळून हसले. गोविंदाने जो शर्ट घातला होता, त्याचंही राजकुमार साहेबांनी खूप कौतुक केलं. गोविंदाला राजकुमार यांचा स्वभाव माहिती होता. पण आज ते एवढं कौतुक करताय म्हटल्यावर गोविंदा एमदम खूश झाला. गोविंदा राजकुमार यांना म्हणाला, ‘सर अगर आपको ये शर्ट इतनी पसंद आ रही है, तो आप इसे रख लीजिए’. गोविंदानं तो शर्ट राजकुमार यांना दिला. दोन दिवसांनंतर राजकुमार यांनी त्या शर्टचा रुमाल करून आपल्या खिशात ठेवला होता. आपल्या शर्टचा रुमाल झालेला पाहून गोविंदाची काय हालत झाली असेल. तुम्हीच कल्पना करा.

याहून भयानक प्रकार घडला दिग्दर्शक रामानंद सागर यांच्यासोबत. 1968 साली आलेल्या आँखे या चित्रपटासाठी राजकुमार यांना स्क्रीप्ट ऐकवण्यासाठी रामानंद सागर त्यांच्या बंगल्यावर गेले. स्क्रीप्ट ऐकून झाल्यावर राजकुमार यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला जवळ बोलावत विचारलं, “ क्या तू इस फिल्म मे काम करेगा?” आता बिचारा तो कुत्रा काय बोलणार! रामानंद सागर यांच्याकडे पाहत राजकुमार म्हणाले, “देखा! ये रोल तो मेरा कुत्ता भी नहीं करना चाहेगा.”
हा असा पानउतारा झाल्यावर रामानंद सागर निघून गेले. त्यानंतर राजकुमार यांच्यासोबत त्यांनी कधीच काम केलं नाही.

पानउताऱ्याच्या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन यांचंही नाव आहे. अमिताभ बच्चन एका पार्टीत राजकुमार यांना भेटले. अमिताभ बच्चन यांनी घातलेल्या ब्लेझरचं राजकुमार यांनी खूप कौतुक केलं. अमिताभ बच्चन यांनी राजकुमार यांना दुकानाचा पत्ताही दिला. शेवटी राजकुमार म्हणाले, “इस पते के लिएं शुक्रिया, मुझे अपने घर के लिए पर्दे सिलवाने है, उसका कपडा मैं इसी ब्लेझर का लेना चाहुंगा”. अमिताभ बच्चन यांना तेव्हा मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल.

अंगावर किलोभर सोनं मिरवणाऱ्या बप्पी लहरी यांना अशाच एका पार्टीत राजकुमार यांनी म्हटलं होतं. “वाह, शानदार. एक से एक गहने, बस मंगलसूत्र की कमी रह गई है.

राजकुमार यांचा ह्युमर सिने इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनाच माहिती होता. सुपरस्टार असो की कोणी मोठा आघाडीचा दिग्दर्शक असो. राजकुमार शब्दांनीच त्याची शिकार करायचे. फक्त अभिनेते आणि दिग्दर्शकच नाही तर त्याकाळची आघाडीची अभिनेत्री झिनत अमानला हा अनुभव आला. झिनत अमान तेव्हा हरे क्रिष्णा हरे राम चित्रपटातल्या दम मारो दम या गाण्यामुळे चर्चेत होती.  बॉलिवुडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव होतं. एका सिनेमाच्या प्रीमियरला राजकुमार यांची झिनत अमान यांच्याशी भेट झाली. तेव्हा राजकुमार यांच्या तोंडातून पहिलं वाक्य बाहेर पडलं,  “जानी, शक्ल-सूरत से तो माशाअल्लाह लगती हो, फिल्मों में ट्राई क्यों नहीं करती?”
हे ऐकल्यानंतर झिनत अमान यांची प्रतिक्रिया काय होती हे तिथे उपस्थित असलेल्यांनाच ठाऊक.

प्रेम चोपडाच्या लग्नाच्या पार्टीत राज कपूर आणि राज कुमार यांच्यात जोरदार भांडणं झाली. राज कपूर यांनी त्या दिवशी जरा जास्तच घेतली. राजकुमार यांना बघून त्यांना राग अनावर झाला. "तुम एक हत्यारे हो" असं जोरात ओरडत त्यांनी राजकुमार यांच्याकडे इशारा केला.
त्यावर राजकुमार म्हणाले "मै बेशक एक हत्यारा हूं, लेकिन मै कभी तुम्हारे पास काम मांगने नहीं आया, बल्कि वो तुम ही हो जो मेरे पास आये थे."
या वादाची पार्श्वभूमी अशी आहे की राज कुमार जेव्हा माहिम पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते, तेव्हा त्यांच्यावर एका हत्या प्रकरणात आरोप करण्यात आले होते. त्यासंदर्भानं राज कपूर यांनी राजकुमार यांना हत्यारा म्हटलं. राज कपूर यांचा राजकुमार यांच्यावर इतका राग असण्याचं कारणही तसंच आहे.
राज कपूर यांनी 'मेरा नाम जोकर' सिनेमातला एक रोल राजकुमार यांना ऑफर केला होता. मात्र राजकुमार यांनी ती ऑफर नाकारली होती, त्यांनी म्हटलं होतं की, "मै सिर्फ सोलो फिल्मे करता हूं, धर्मेंद्र और मनोज कुमार के साथ मेरी कोई बराबरी नही है."
तो नकार राज कपूर यांच्या जिव्हारी लागला होता, प्रेम चोप्राच्या लग्नाच्या पार्टीत तो उफाळून आला इतकंच.

समाजात वावरताना कठोर वागणारे राजकुमार नीलकमल सिनेमातल्या चित्रसेनसारखेच प्रेमळ आणि सहृदयी होते. पाकिजा सिनेमातला सलिम आपल्या प्रेयसीला म्हणतो,  ''आपके पांव देखे.. बहुत हसीन हैं, इन्हें जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे...'' असंच प्रेम त्यांचं आपल्या पत्नीवर होतं. एका विमानप्रवासाच्या दरम्यान एअर होस्टेस असलेल्या जेनिफरनं राजकुमार यांच्या कठोर हृदयाला पाझर फोडला. लग्नानंतर त्यांच्या पत्नीनं गायत्री राजकुमार असं आपलं नामकरण केलं. राजकुमार यांच्या सुखी संसारात तीन मुलं झालं. मुलगा पुरू राजकुमार, वास्तविकता आणि पाणिनी या दोन कन्या होत्या. त्यांच्या मुलांनी सिनेमात नशिब आजमावलं पण यश मिळालं नाही.

"ना गोलियों की बौछार से ना तलवार की धार सें,
बंदा डरता है, तो सिर्फ परबरदीगार से."
हा तिरंगा सिनेमातला डायलॉग आपल्या सगळ्यांना आठवत असेलच. त्यानंतर तोंडातला पाईप फेकून धूर करणारे आणि प्रलयनाथच्या मिसाईलचे फ्युज कंडेक्टर काढणारे ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग जेव्हा गेंडास्वामीला म्हणतात,
"हम तुम्हे ओ मौत देंगे जो ना किसी कानून के किताब मे लिखी होगी और ना किसी मुजरिम ने सोची होगी".
हे असे डायलॉग खास राजकुमार स्टाईलमध्ये पडू लागल्यावर थीएटरमध्ये कल्लोळ व्हायचा. आजही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला टीव्हीवर बघतोच. राजकुमार यांच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या टप्प्यात  तिरंगा हा चित्रपट प्रचंड हिट होता, आहे आणि राहणार. पण या सिनेमात दोन विरुद्ध दिशेचे कलाकार म्हणजेच राजकुमार आणि नाना पाटेकर एकत्र कसे आले असतील. असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.  राजकुमार यांना शिस्तीत, वेळेत आणि तितकंच शांततेनं काम केलेलं आवडायचं. पण नाना पाटेकर हे मात्र सेटवर आरडाओरड करतात अशी चर्चा होती. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी या दोन्ही पूर्व आणि पश्चिम प्रकृतीच्या व्यक्तींना एकत्र आणलं. आधी नाना पाटेकर यांनी राजकुमार यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. राजकुमार स्क्रीप्टमध्ये बदल करतात, मला ते चालणार नाही असं नाना पाटेकरांनी दिग्दर्शकाना सांगितलं. राजकुमार यांनाही नानासोबत काम करण्याची इच्छा नव्हती. मात्र दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी दोघांनाही सांभाळत तिरंगा चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 6 महिन्यांत पूर्ण केलं. विशेष म्हणजे तिरंगा चित्रपटाच्या सेटवर सीन्सच्या व्यतिरिक्त नाना पाटेकर आणि राजकुमार हे एकमेकांशी एकदाही बोलले नाही. सीन संपला की दोघे एकमेकांचं तोंडही पाहात नसत. पण तरीही तिरंगा सिनेमातली नाना आणि राजकुमार यांची जोडी हिट ठरली.

जसा किस्सा तिरंगाचा तसाच 1991 साली आलेल्या सौदागर सिनेमाचा. राजकुमार आणि दिलीप कुमार ही दोन पहाडांसारखी व्यक्तिमत्व अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आली. राजकुमार यांनी साकारलेला राजेश्वर आणि समोर बीर सिंग बनलेले दिलीप कुमार यांची जुगलबंदी सुपरहिट ठरली. आजही लोक सौदागर सिनेमा बघतात ते राजकुमार आणि दिलीप कुमार यांच्या संवांदासाठी..
"जानी.. हम तुम्हें मारेंगे और जरुर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी, और वह वक्त भी हमारा होगा..."
सिनेमातल्या राजेश्वरची ही ठस्सन खऱ्या आयुष्यातही होती. राजकुमार आणि दिलीप कुमार यांचं फार काही सख्य नव्हतं. पण दिग्दर्शक सुभाष घई यांना मात्र या दोघांना घेऊनच सौदागर सिनेमा बनवायचा होता. पण या दोघांना एकत्र कसं आणायचं? असा प्रश्न सुभाष घईंसमोर होता. त्यासाठी ते पहिल्यांदा दिलीप कुमार यांच्याकडे गेले. दिलीप कुमार यांना कथा आवडली त्यांनी होकारही दिला. पण निघताना त्यांनी सुभाष घईंना विचारलं "यह राजेश्वरका रोल कौन कर रहा है?" तेव्हा सुभाष घईंनी उत्तर देणं टाळलं. सुभाष घई घाईघाईनं गाडीत बसले. तेव्हा पुन्हा दिलीप कुमारांनी प्रश्न विचारला, "अरे सुभाष वो राजेश्वर का रोल कौन करेगा?" सुभाष घई यांनी फक्त 'राजकुमार' असं बोलून गाडीचा दरवाजा लावला आणि अक्षरशः पळ काढला.
दिलीप कुमार यांचा होकार मिळवल्यावर आता राजकुमार यांच्याकडे सुभाष घई गेले. राजकुमार काही मोजक्याच लोकांसोबत ड्रिंक्स घेत. आपल्या जुहुवरच्या बंगल्यावर ड्रिंक्स घेत घेत त्यांनी सौदागरची कथा ऐकली, त्यांना आवडली सुद्धा.. सहाजिकच, ज्या प्रश्नाची भीती होती तो प्रश्न राजकुमार यांनी विचारला. “यह बीर सिंग का कॅरेक्टर कौन करेगा?’’
सुभाष घई यांची आता पंचाईत झाली, ते अत्यंत तुच्छतेनं म्हणाले, “ राज साहाब कोई बडा एक्टर तो नही कर सकता.. वो दिलीप कुमार है ना, ओ कर रहे है. राज साहब आप चिंता मत किजीए, आपके सामने कोई टिक नही पाएंगा”
यावर हलकंच हसत राजकुमार म्हणाले “जानी, इस हिंदुस्तान मे हमारे बाद अगर हम किसी को एक्टर मानते है, तो वो दिलीप कुमार है. यह रोल उसके लिए फिट है, मेरे सामने दिलीप कुमार होगा तो जलवा तो आयेगा.”

दिलीप कुमार आणि राजकुमार यांच्या दमदार अभिनयानं सजलेला सौदागर सिनेमा हा प्रचंड हिट होता.
इस जंगल में हम दो शेर,
चल घर जल्दी हो गई देर
या गाण्यात गळ्यात हात टाकून नाचण्याचा अभिनय करणारी ही जोडी आयुष्याची संध्याकाळी मनभेद विसरून एकत्र आली.

पण काळाची चक्र पाहा, ज्या आवाजानं चार दशकं गाजवली, ज्या आवाजाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं तो आवाज गळ्याच्या कॅन्सरनं क्षीण झाला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात राजकुमार यांना बोलताच येत नव्हतं. अन्नपाणीही नीटसं जात नव्हतं. ऐटीमध्ये जगणाऱ्या या रुबाबदार माणसाला मृत्यूनं चारी बाजूने घेरलं. आपल्या मुलाला त्यांनी सांगितलं होतं. "माझ्या मृत्यूची बातमी अंतिम संस्कार झाल्यावरच सगळ्यांना सांगा." राजकुमार साहेबांना मृत्यूपश्चात दाखवल्या जाणाऱ्या खोट्या सहानुभूतीची चीड होती. बॉलिवुडच्या दिखाऊपणावर ते कायम टिका  करत. त्यांनी आयुष्यात कधीच मीडियाला जवळ केलं नाही, कधीच इंटरव्यू दिला नाही. त्यामुळे आपल्या मृत्यूचा तमाशा होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या गळ्याच्या कँसरची बातमी गुप्त ठेवण्यात आली. मात्र दिलीप कुमार साहेबांना ही बातमी कळली. तेव्हा सगळे मनभेद विसरून दिलीप कुमार त्यांच्या घरी पोहचले. तेव्हाही राजकुमार आपल्या नेहमीच्या थाटात पण क्षीण आवाजात म्हणाले "जानी! हम राजकुमार हैं…हमें सर्दी-जुकाम जैसी मामूली बीमारी थोड़े ही होगी. हमें कैंसर हुआ है, कैंसर।"

मृत्यू समोर उभा असतानाही राजकुमार यांचा शाही अंदाज मात्र कायम होता. 3 जुलै 1996 रोजी त्यांचं निधन झालं. नावासारखं राजासारखं आयुष्य ते जगले. इन्सानियत के देवता या सिनेमातला डायलॉग त्यांच्याच आयुष्याचं वर्णन करणारा आहे.
"आप यह शायद भुल रहे है मंत्रिजी, के हर आखरी शब्द के बाद एक फुलस्टॉप होता है। और वो फुल्ल स्टॉप हम है, हम।"
कायम खोटे मुखवटे घेऊन वावरणाऱ्या बॉलिवुडच्या दुनियेत असाही एखादा अभिनेता होऊन गेला. हे पुढच्या पिढीला सांगितलं तर कदाचित खरं वाटणार नाही. असं फुल्लस्टॉपसारखं जगणारा कलाकार आता यापुढे होणार नाही.

स्व. राजकुमार यांच्या स्मृतींना वंदन.