अँड्रयू सायमंड्स गेल्याची बातमी सकाळी सकाळी फेसबुक उघडल्यावर दिसली. माणसं अकाली जाण्याचं दुःख जरा कणभर जास्त असतं. एकेकाळी म्हणजे जेव्हा मी क्रिकेट अगदी आवडीनं पाहात होतो त्या काळी सायमंड हा कायम शिव्या देण्याचाच विषय होता. बॅटिंग करताना राक्षसासारखा दिसणारा हा प्राणी आपल्या किती पिढ्यांचा बदला घेतोय असं वाटायचं. आडदांड शरीर, झिंक लावून रंगवलेले पांढरे ओठ, भीती वाटावी असे घारे डोळे, आणि कुरळ्या केसांच्या बांधलेल्या त्या अगणित बटा. त्याला बघूनच अनेकांना घाम फुटायचा. सायमंड्स होताही तसाच आक्रमक. स्लेझिंग करुन प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या परंपरेत सायमंड सगळ्यात पुढे होता.
अफ्रिकन-कॅरेबियन परिवारात जन्मलेल्या अँड्रयूला 15 महिवन्यांचा असताना युरोपातल्या एका दाम्पत्यानं दत्तक म्हणून घेतलं. नंतर ते ऑस्ट्रेेलियात स्थायिक झाले. आफ्रिका आणि युरोप खंडाशी जन्मानं नातं असल्यानं सायमंड्सला इंग्लंंडच्या ज्युनियर टीमकडून खेळण्याची ऑफर आली. पण अँड्र्यूनं ती नाकारली. ऑस्ट्रेलियाशी त्याचं हे देशप्रेमाचं नातं जोडलं ते कायमचंच. वयाच्या विशीत म्हणजे 1995 साली काउंटी क्रिकेटमध्ये 16 सिक्सर मारत 206 चेंडूत 254 धावा करणाऱ्या अँड्र्यूनं आपली कारकीर्द वादळी असणार आहे याची झलक दाखवली होती.
अँड्र्यू सायमंड्स त्याची बॅट घेऊन जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा हे मैदान आपल्याच बापाच्या मालकिचं असल्याचा त्याचा अविर्भाव असायचा. जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे, जहीर खान, आशिष नेहरा, इरफान पठाण या सर्वांनीच अनेकदा सायमंड्ससमोर गुडघे टेकवले होते. अँड्र्यू सायमंड्स हा गोलंदाजांना धो धो धुवायचा. तेव्हा सायमंड आऊट होण्याचा क्षण मॅच जिंकल्याच्या आनंदाएवढाच होता.
2003 मधल्या विश्वचषकात शेन वॉर्न नसल्यानं सायमंड्सला संधी मिळाली. पाकिस्तानविरोधात 86 धावा आणि 4 विकेट अशी दयनिय परिस्थिती ऑस्ट्रेलियाची झाली होती. त्यावेळी 125 चेंडूत 143 धावा ठोकणारा सायमंड्स कायम लक्षात राहतो. या सामन्यातल्या विजयानंतर त्या विश्वचषकावरही ऑस्ट्रेलियानं आपलं नाव कोरलं होतं.
2008च्या सिडनी कसोटीत भारताविरोधात नाबाद 162 धावांचा डोंगर सायमंड्सनं रचला होता. सायमंड्स कोणत्याही देशांच्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवायचा.पण या सगळ्यात हरभजन आणि श्रीशांत यांच्यासोबत सायमंड्सशी झालेली ऑन फिल्ड भांडणं बघायला जाम मजा यायची. श्रीशांत तर माकडासारखे दात खाऊन सायमंड्सला किती वेळा डिवचायचा. हरभजननं मंकी असा उल्लेख केल्याचं प्रकरण तर कोर्टापर्यंत गेलं. मंकीगेट प्रकरणानंच आपलं करीयर संपलं असं अँड्र्यू सायमंड्सनं एका मुलाखतीत कबूल केलं होतं.
एकीकडे जोरदार बँटिंग करणारा अँड्र्यू तुरूतुरू धावत येत कधी मध्यम गतीनं तर कधी मूड असेल तसं ऑफ स्पिनही टाकायचा. 2000 साली सिडनीत झालेला तो सामना भारतीय संघासाठी दुःस्वप्न होता. अवघा 21 चेंडूत भारताच्या 4 विकेट्स घेत सायमंड्सनं भारतीय संघाचे हाल हाल केले. क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात एखाद्या भिंतीसारखा उभा राहायचा. त्याच्याकडे आलेला चेंडू क्षणात परतावून लावत स्टम्प उखडून टाकायचा. सायमंड्सकडे चेंडू गेल्यावर रनसाठी धावण्याआधी फलंदाजही दहा वेळा विचार करायचा. अँड्र्यू सायमंड्स हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम ऑल राऊंडरपैकी एक होता. म्हणूनच रिकी पॉन्टिंग त्याला 'खतरनाक टायगर शार्क' म्हणायचा.
जगबुडी झाली तरी आपल्याच मस्तीत कसं जगायचं हे सायमंड्सकडून शिकावं. बोलणारे या प्रकाराला बेशिस्तपणा म्हणतील, पण मला तर तो मनमौजी वाटतो. 2008 साली बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी इकडे टीम मीटिंग चालू असताना, अँड्रयू मात्र डार्विन नदीच्या किनाऱ्यावर बसून मासे पकडत होता. त्यानंतर कर्णधार मायकेल क्लार्कनं त्याला सीरिजमधून वगळलं, त्यानंतर झालेल्या भारताविरोधातल्या सीरिजमध्ये तो नव्हता. पण सायमंड्सला त्याचा काही फार फरक पडला नाही. अँड्र्यू सायमंड्स तसा फाटक्या तोंडाचाही होता. "हेडनच्या घरी डिनरला जायला मला आवडतं कारण त्याच्या बायकोला मला बघायला आवडते". असं एका जाहीर मुलाखतीत तो बोलून गेला होता.
पब, दारू आणि नाईट आऊटिंगनं सायमंड्सचा अनेकवेळा घात केला. पण त्यातून तो कधीच सुधारला नाही. उद्या बांगलादेशशी मॅच आहे आणि सायमंड्स रात्रभर पबमध्ये दारुचे पेले रिचवत होते. सकाळी संघ वॉर्म-अप करत असताना हा मात्र कुंभकर्णासारखा पलंगावर पडून होता. शेवटी तोंडावर पातेलंभर पाणी ओतून त्याला उठवावं लागलं होतं. आपल्या शौकसमोर त्याला करीअर वगैरे गोष्टी गौण वाटायच्या. त्याची इच्छा काय तर, ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू कीथ मिलरसोबत दोन पेग लावता यावे. पण ती इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. पबमध्ये मद्यधुंद होत महिलेसोबत गैरवर्तन आणि काही वेळा मारहाण केल्याचे आरोपही झाले. नग्न चाहत्याला मैदानातून धक्के मारून बाहेर काढल्याचं प्रकरणही त्यापैकीच एक. सायमंड्सला या सर्व विवादांमधून बाहेर पडण्याची संधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं अनेकवेळा दिली,पण त्यातं दारूच्या आहारी जाणं हे क्रिकेट कारकीर्द संपवूनच थांबलं.
आयुष्य आपल्याला धक्के देत देत घडवत असतं. अँड्र्यू सायमंड्स मैदानावर कितीही कठोर, प्रसंगी उद्धट आणि डॉमिनेटिंग वागला तरी तो मनाचा वाईट नव्हता. आयपीएलचं पर्व सुरू झाल्यावर तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. तेव्हा हरभजनसोबत कुठलाही आकस न बाळगता त्यानं काम केलं. अक्षय कुमारच्या पटियाला हाऊस सिनेमातही तो दिसला. बिग बॉसच्या घरातही राहून आला. आयुष्य भरभरून जगायचं आणि आनंदात जगायचं हे सायमंड्सनं ठरवलं होतं. नंतर कॉमन्टेटर म्हणूनहूी त्यानं आपली वेगळी शैली निर्माण केली. जो विचित्र केशसांभार त्याची ओळख होता. त्या केसांना कापत लाईव्ह टेलिव्हिजनवर टक्कल करून ल्युकेमिया आजारग्रस्तांसाठी 10 हजार डॉलर्स उभारणारा सायमंड्सही जगानं पाहिलाय. स्वतःच्या नियम व अटींवर जगणाऱ्या अँड्र्यूचं निसर्गासमोर आणि काळासमोर मात्र चाललं नाही. आज त्याच्यासोबत अँड्र्यू सायमंड्स या वादळी युगाचाही अंत झालाय.
भावपूर्ण श्रद्धांजली.