पुण्यातल्या समस्त पेठांचं सहसा पाहायला न मिळणारं एकमत म्हणजे पुण्याची मंडई! इथे अनुभवायला मिळतो खऱ्या पुण्याचा अर्क. ग्राहक शेर तर भाजीवाले, दुकानदार सव्वाशेर ! तेवढीच विविधता इथल्या मिळणाऱ्या खाण्यातही. मंडईच्या आसपासच्या खादाडीबद्दलही बोलायचं तर ३-४ ब्लॉग कमी पडतील. त्यापेक्षा आज हॉटेलपेक्षा ह्या पेठांच्या बाहेर फारसं कोणाला माहिती नसलेलं एक अस्सल पुणेकराचं दुकान.


मंडईशेजारच्या(तुळशीबागेच्या समोरच्या)भाऊमहाराज बोळात कधी गेलात; म्हणजे मारा एखादी चक्कर.. हाय काय अन नाय काय? तर रतन सायकल मार्टच्या चौकाच्या कोपऱ्यात औदुंबराच्या आड लपलेलं एक छोटेसे दुकान दिसेल. पेठांतल्या पुणेकरांना हे दुकान माहित्ये बाराही महिने दिवाळीच्या फराळाचे पदार्थ मिळण्याचे खात्रीशीर दुकान. ‘टू बी स्पेसिफिक’, पुण्यातले ‘सर्वोत्कृष्ट चिरोटे’मिळण्याचे ठिकाण म्हणून.

तुम्ही म्हणाल चिरोट्यात काय येवढं ‘स्पेशल’? ह्याचं उत्तर फक्त खरी सुगरणच देऊ शकेल. चिरोट्याच्या नाजूक पोळ्या करुन (साटा) त्याचे एकेक पापुद्रे असलेले थर एकमेकांना चिकटवणे आणि नंतर ओले चिरोटे न मोडता अलगद बाजूला काढणे म्हणजे कर्मकठीण काम. बाजारात चिरोटे विकणारे लोक ह्यावर स्वस्तातला उपाय म्हणून मग वनस्पती तूप वापरून तरी चिरोटे बनवतात(खरतर चिकटवतातच) नाहीतर डोक्याची मंडई करून न घेता सरळ पाकातले अतिगोड चिरोटे तरी करतात. पण हिंगणगावे काकांनी सर्वात आधी अनेक प्रयोग करून फक्त रिफाइंड शेंगदाणा तेल वापरून चिरोटे बनवायला सुरुवात केली.

एकदा चव घेऊन तर बघा! पिशवीत पॅक करताना एकही साटा न तुटलेला चिरोटा, तोंडात टाकल्यावर मात्र अलगद विरघळतो. घासागणिक एकेक पापुद्रा वेगळा होऊन, मैदा आणि साखरेचं गोड मिश्रण जिभेचा ठाव घेत पोटात कधी जातं हे समजतही नाही, सुरेख चव!

चिरोट्यायेवढीच दुकानाचे मालक, चालक श्री.सुभाष हिंगणगावे ह्यांची गोष्टही सुरस आहे. जन्माने अस्सल पुणेकर,पार्श्वभूमी पिढीजात किराणा मालाचा व्यवसाय असलेल्या घराची. पण भाऊबंदकीनी पिढीजात इस्टेटीशी फारकत घेऊन, व्यवसाय सोडायला भाग पाडलं. खिशात पैसे नसताना वयाच्या ४६ व्या वर्षी आपल्या दोन मुलींच्या शिक्षण, भविष्याकडे दुर्लक्ष न करता आयुष्याची संपूर्ण नवी सुरुवात करणे अवघड असतं महाराजा! ज्यांनी अशी सुरुवात केली त्यांना त्याचे महत्व समजेल.

ती जवाबदारी त्यांनी पत्नीच्या पाककौशल्याच्या आणि स्वतःच्या दुकानदारीच्या कौशल्यावर पेलली. भांडवल म्हणून होता, तुटपुंजा वाटणीत आलेला जुन्या वाड्यातला छोटा गाळा आणि पत्नीच्याही माहेरच्या व्यवसायाचा वारसा. दोघांनीही बाजारात चांगल्या दर्जाचे फराळाचे पदार्थ मिळत नसल्याची उणीव लक्षात आल्यावर घरातच फराळाचे पदार्थ बनवायचा कारखाना सुरु झाला.

पदार्थ बनवताना फक्त उत्तमच मटेरियल वापरायचं, रेटसाठी क्वालिटीत तडजोड कधीही करायची नाही हे ठरवून दोघं कामाला लागले. सुरुवातच केली ती फराळात सगळ्यात अवघड अश्या चिरोट्यानी.

काकूंनी घरातच चिरोटे बनवायला आणि काकांनी दुकानात ते विकायला सुरुवात केली. सुरुवातीचा काळ अती अवघड असणार. पण जशीजशी चिरोट्याची चव पुण्यातल्या खवैय्यांना समजली तसे लोकांची पावलं आपोआपच दुकानाकडे वळायला लागली. एकेक करत जिन्नस वाढत आता फरसाण, डाळमुठ, चकल्या, चिवडा, बेसन लाडू, करंज्या त्याबरोबरच केळ्याचे वेफर्स, थालिपीठ भाजणी, मेतकुटही बनवतात. जवळपास २२ वेगवेगळे पदार्थ ते वर्षभर दुकानात ठेवतात.



दिवाळीच्या फराळाची ऑर्डर तर हिंगणगावेकाका घटस्थापनेलाच सुरु करतात. नेहमीचे ग्राहक घरी घट बसवल्यावर एटीएमला थांबावं तसं तडक दुकानासमोरच्या रांगेत ऑर्डर द्यायला थांबतात. त्यातून दिवाळीच्या चिरोट्याची ऑर्डर तर सहसा पहिल्या १५ मिनिटातच फुल्ल होते.

पदार्थांच्यासोबतच हळूहळू कारखान्याचा विस्तार आता थोडा वाढवलाय. काकूंच्या हाताखाली कामाला जवळपासच्याच मोजक्या गरजू बायका आहेत. जवळ गोडाऊन आहे, पण मालाच्या क्वालिटीत तडजोड नाही, चवीत कधीच फरक नाही आणि व्यवहार सचोटीचा. त्यामुळे वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंगणगावे काकांना विक्रीची चिंता नाही. चितळेंच्या दुपारच्या सुट्टीचं काय घेऊन बसलात? चितळे जेवढा वेळ दुपारची सुट्टी घेतात(म्हणजे आत्तापर्यंत घेत होते) बरोब्बर तेवढ्याच वेळ हिंगणगावेकाका आपले दुकान सुरु ठेवतात. कारखाना जरी दिवसभर सुरु असला तरी दुकानाची वेळ मात्र दिवसभरात मोजून फक्त ३ तास. सकाळी(दुपारी?)१२ ते१ आणि संध्याकाळी ६.३० ते ८.३० फक्त.

पण दुकान येवढ्या कमी वेळ उघडे असून आणि काही दिवस चांगले टिकत असतील तरीही दुपारी बनवलेले चिरोटे दुसऱ्या दिवशी सकाळी  दुकानात शिल्लक दिसतील ह्याची खात्री नाही.

एकदा चव घेऊन तर बघा! तुम्हीही चिरोटे घेण्यासाठी, ह्याच वेळात हिंगणगावे काकांच्या दुकानात पुन्हापुन्हा पोचाल.

खादाडखाऊ या  ब्लॉग मालिकेतील या आधीचे ब्लॉग :

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी 'वैद्यांची मिसळ'!


खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा