इस देश मे दो भारत बसते है ! एक इंडिया आणि दुसरा भारत .. असा एक ‘पैसा वसूल डायलॉग’आहे पिक्चरमधे, बहुतेक अमिताभच्या तोंडी, खोटं काहीच नाही त्यात. पण पुणेकरांना त्याचं फारसं अप्रूप वाटत नाही, त्याला सबळ कारण आहे. जिथे एका पुण्यातच ‘अनेक पुणे’आहेत तिथे उर्वरित भारत म्हणजे अथांग पसरलेला सागर आहे, हे मान्य करण्यात काही कमीपणा नाही (अगदी पुणेकरांना देखील) त्या न्यायाने देशात दोन देश रहातात हे अगदीच मान्य !

भारतात दोन देश तयार होत गेले पण पुणे तर स्वातंत्र्यपूर्व कालापासूनच दोन पुण्यात विभागले गेले.कालांतराने त्याचे “इस दिल के टुकडे हजार हुवे, कोई यहां गिरा,कोई वहां गिरां “! स्टाईल अनेक तुकडे झाले तो भाग सोडून द्या. तर पहिले पुणे शहर,ज्यात त्यावेळी फक्त पेठांचाच भाग होता आणि दुसरा ब्रिटिशांनी निर्मिलेले पुण्यातले 3 सैनिकी कँप. पहिला पुणे कँप, खडकी, देहूरोड कँप. एकाच शहरात तीन-तीन सैनिकी कँप सुरु करण्यातच पुण्याचं सामाजिक, भौगोलिक महत्व स्पष्ट आहे.

पैकी दुसरे दोन कँप पहिल्यापासून भौगोलिकदृष्ट्या आणि मनानी पुण्याच्या बाहेरच राहिले. पण पुणे कँप मात्र एकाच राजवाड्यात राजाच्या दोन पट्टराणी राहिल्यासारखा तरीही मनानी पुण्याच्या बाहेरच राहिला. सुरुवातीला ब्रिटीश अधिकारी, सैनिकांपाठोपाठ त्यांच्याबरोबर व्यावसायिक गरज, सख्य म्हणून आलेले पारसी-इराणी, बोहरी, अँग्लो इंडियन इथे राहायला आले. हळूहळू ‘नेटिव्ह’ लोकही येत गेले. नंतर ह्यातले बहुतांशी लोकंही स्वतःला कॉस्मोपॉलिटिन म्हणवून घेण्यात धन्यता मानायला लागले. ब्रिटिशांनी वसवला म्हणून पुणे कँप पहिल्यापासून इंडिपेंडंट राहिला तो आजतागायत. इथल्या लोकांना ‘टाऊन’ भागात यायची गरज फारशी भासली नाही. पण पुण्यातल्या तरुण मंडळींमध्ये मात्र पहिल्यापासून इथल्या कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीबद्दलचं सुप्त आकर्षण कायम राहिलंय.



व्हिक्टरी, लिबर्टीसारखी इंग्लिश क्लासिक्स दाखवणारी थियेटर्स, अनेक वर्ष बंद राहून ९० च्या सुमारास नव्या रुपात सुरु झालेलं अरोरा टॉवर्समधलं ‘वेस्टएंड’, ७० च्या दशकात झालेला रजनीश आश्रम, भगव्या झोळ्या घालून मुक्तपणे वावरणारे तिथले परदेशी लोकं आणि कॉरोनेशन दरबार, जॉर्ज, ब्ल्यू नाईलपासून ते डायमंड, डायमंड क्वीनपर्यंतची अनेक पारशी-इराणी रेस्टॉरंट हे सगळे कायमच गर्दी खेचत आलेत. आधीपासून आधुनिक म्हणवणारा कँप ९० च्या दशकानंतर जास्तीच आधुनिक होत गेला. नवीन मॉल्स झाले तशीच अनेक जुनी हॉटेल्स काळाच्या पडद्याआड गेली. काहींनी आपल्या जागा विकून नव्या जमान्यातल्या ‘बरिस्ता’,’सीसीडी’ सारख्या नावांचा आधार घेतला.’ब्ल्यू नाईल’सारख्यांनी नव्याने कात टाकली. पण ह्या सगळ्यांच्या आधी म्हणजे एकोणीसाव्या शतकात १८७८ मध्ये सुरु झालेलं ‘दोराबजी’ ह्या सगळ्या हॉटेल्सपेक्षा अजूनही ‘हटके’ आहे.ते अजूनही आपल्या जुन्या वेशात सुरु आहे.

कॅफे नाझचे खिमा सामोसे, मार्जोरीनचे चिकन सँडवीच आणि ‘दोराबजी’ची बिर्याणी खाऊन पुण्यातल्या हजारोंच्या आयुष्यातल्या सामिष खाण्याची सुरुवात झाली. ह्यापैकी कॅफे नाझ,पलीकडच्या कॉर्नरचं महानाझ बंद होऊनही आता १०-१५ वर्ष होऊन गेली.



दोराबजी म्हणजे समस्त पुण्यातल्या हॉटेल विश्वाचा साक्षीदार. नॉनव्हेज स्पेशालिटी असलेल्या दोराबजीत रविवारी बिर्याणी पार्सल घ्यायला लोक पुणे शहरातून येऊन रांगा लावायचे म्हणे. आता दोराबजीच्या बिर्याणीची पूर्वीची ती ‘शान’ राहिली नसली तरी, दोराबजीमध्ये जेवायला येणाऱ्यांची संख्या अजूनही घटलेली नाही. आजही शनिवार-रविवारी रात्री ९ नंतर दोराबजीमध्ये पोचलात, तर त्यांची स्पेशालिटी असलेली दम बिर्याणी, मटण धनसाक, दाल गोश्त, ग्रेव्हीमधली मटण कटलेट, चिकन फर्चा हे प्रकार संपले असण्याचीच शक्यता जास्ती.



जसं “पूर्वीचं पुणं आता उरलं नाही”, त्याच धर्तीवर माझ्यामते “दोराबजीची बिर्याणीही आता पहिल्यासारखी उरली नाही”. दोराबजीमध्ये खायला जावे ते, इतर हॉटेल्सच्या रेग्युलर मेन्यूकार्डवर सहसा बघायला मिळत नाहीत असे पदार्थ. भोपळ्यासारख्या भाज्या, चणा आणि मिक्स डाळीत भरपूर धने, काळी मिरी, मस्टर्ड, मेथ्या, तमालपत्र घातलेले पारसी पद्धतीचे गरम मसाले आणि भरपूर लाल मिर्ची घालून टोमॅटोच्या ग्रेव्हीत बनवलेले मटण म्हणजेच पारसी पद्धतीचे धनसाक. इतर हॉटेल्समध्ये पारसी फेस्टिव्हल जर कोणी केलाच तर त्यात धनसाक दिसेल. इथे ते दर रविवारी असतंच. त्याच्या बरोबर खायला रोटी वगैरे घेतलीत तर तुम्ही स्वतःला अगदीच नवशिके वगैरे सिद्ध कराल. त्याच्यापेक्षा जोडीला जरा गोडसर वाटतो असा ‘ब्राऊन राईस’ घ्यावा. तोंडी लावायला ‘शामी कबाब’ची प्लेट आणि/नाहीतर पारसी भाषेतली ‘पत्रा-नी-मच्छी’ उर्फ आजकाल क्रेझ असलेलं पात्रा फिश.

आजकाल अनेक हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या बंगाली स्टाईलच्या “पात्रा बासा”पेक्षा पारसी पद्धतीचा ‘पात्रा’ वेगळा. ह्यात मासा म्हणून फक्त पापलेट वापरतात. त्याला भरपूर खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीची चव दाखवली जाते आणि त्यात आलं-लसूण पेस्ट भरून त्याला पुडीच्या दोऱ्यांनी (आम्हाला ह्याचा एकच उपयोग माहिती) गुंडाळून केळीच्या पानात त्याचं चांगलं मॅरीनेशन केलं जातं. काही वेळाने स्टीमरमध्ये वाफ लावून झाल्यावर (इतक्या खटाटोपानंतर )त्याला तुमच्यासमोर डिशमध्ये आणला जातो. फक्त रविवारी मिळणारे हे स्पेशालिटी आयटम्स म्हणजे खरं दोराबजी. त्यामुळे इतर दिवशी दोराबजीत जाण्यापेक्षा आवर्जून रविवारी (जरा लवकर) जावं.



पारसी जेवण जेवताना त्यातल्या मसाल्यामुळे, तिखटपणामुळे बऱ्याच जणांना कोरडं वाटतं. तशीही आजकाल जेवणाबरोबर ‘सॉफ्ट ड्रिंक्स’ घेण्याची फॅशन आहेच. पण इथे जेवताना घ्यायचंच असेल तर, दोराबजीच्याच आसपास सुरु झालेल्या ‘अर्देशीर’ची रासबेरी किंवा लेमन घ्यावं. थोडी वेगळी चव असलेली ही थंडगार सरबतं म्हणजे पारसी जेवणाबरोबरची परफेक्ट जोडी. इथे जेवणानंतर ‘कस्टर्ड’ नावाखाली मिळणारं ओव्हनमध्ये केलेलं ‘ब्रेड पुडिंग’ पण छान.

काही हॉटेल्समध्ये मी जातो ते खूप चांगलं जेवण, सर्व्हिस मिळते म्हणून. काही हॉटेलात जातो ते मालकलोक दोस्त आहेत म्हणून. काही ठिकाणी नवीन हॉटेल्स ट्राय करून बघायला पण मोजक्या हॉटेल्समध्ये जातो ते केवळ त्यांनी जिवंत राहून एक परंपरा टिकवून धरली आहे म्हणून. दस्तूर मेहेर रोडवरच्या सरबतवाला चौकातले दोराबजी हे त्यातलंच एक.

कोणी काही म्हणो पण, अशी हॉटेल्स म्हणजे शहराचा, गावांचा चालताबोलता इतिहास असतात. डोळे उघडे ठेवले तर बरच काही दिसत असतं इथे आणि त्याच्या आजूबाजूला ‘दोराबजी’ तर आख्खा १४० वर्षांचा इतिहास आहे. जेवढा स्वातंत्र्याच्या नंतरचा तेवढाच आधीचाही. त्याचं नाव बदलून दोराबजी अँड सन्सच्या ऐवजी आता ग्रेट ग्रँड सन्स ठेवायला हवं.

अंबर कर्वे

संबंधित ब्लॉग

खादाडखाऊ : 'धुंधुरमास' स्पेशल


खादाडखाऊ : परफेक्ट दर्शन
हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख 
खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव
खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने
खादाडखाऊ : वहुमनचा बाबाजी
खादाडखाऊ : पुण्यातले इराणी
मित्रो !!! आज खिचडी पुराण
खादाडखाऊ : दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ
खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी! 
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?
खादाडखाऊ : जखमा उरातल्या
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे
खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड
खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं
खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ
खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’
खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची
खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी
खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा