आपल्याकडे एखाद्याला काही आजार झाला तर बऱ्यापैकी सर्वसाधारण रुग्णांचा कल हा अॅलोपॅथी औषधांकडे असतो, काही जण इतर पॅथीचाही विचार करतात. अॅलोपॅथीची उपचार देणारे रुग्णलाय, दवाखाने राज्यात सर्वत्र आहेत. मात्र या कोरोना काळात अॅलोपॅथी सोबत नागरिक इतर पॅथीचा उपचार घेताना दिसत आहेत. काही नागरिकांना याचा चांगला परिणाम दिसत असल्याचं सुद्धा दिसत आहे. ज्यावेळी कुठेही कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कुठलेही ठोस औषध उपलब्ध नसताना सर्व पॅथीचे तज्ज्ञ आपापल्या त्या विषयातील ज्ञानानुसार उपचारपद्धती रुग्णांना देत आहेत. सध्या होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी रुग्णांना गुण यावेत म्हणून विविध काढे आणि औषधं रुग्णांना देत असून यावर केंद्र सरकारच्या आयुष विभाग व राज्य सरकारतर्फे सुरुवातीच्या काळात या पॅथीतील औषधांबाबत काही सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कोरोनसाठी लढा देण्यासाठी सगळ्याच पॅथी महत्वाच्या असल्याचे अधोरेखित झाले आहे.


काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच, राज्य शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य शासनाने समिती नेमली आहे. उपचारामध्ये सर्व पॅथी महत्वाच्या असून त्यातील औषधांसाठी सर्वांनी मिळून राज्य शासनाला दोन पानी मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


कोरोनाची ज्यावेळी सुरुवात झाली होती तेव्हा प्रत्येक जण नवनवीन औषधाची उपचारपद्धती सुचवत होते. यामध्ये आयुर्वेदिक काढा अनेक जण सुचवत होते मात्र त्यावेळी त्यांना कुणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मात्र जसजशी रुग्ण संख्या वाढत गेली त्यानंतर हळूहळू का होईना लोकांनी प्रतिबंधात्मक उपचार म्हणून विविध पॅथीतील औषधं घ्यायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात संपूर्ण राज्यात आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथिक औषध वाटपाचे पेव फुटले होते. राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, सेवा भावी संस्थांनी हे औषध लोकांना घरोघरी जाऊन वाटले. तर काही नागरिक आयुर्वेदिक काढे आणि युनानी काढे नित्यनियमाने घेत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी मालेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता परंतु मागील काही दिवसापासून पण तेथील रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या परिसरात सध्या मालेगाव काढा प्रसिद्ध झाला आहे. त्या काढ्याला या परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा युनानी काढा इतका प्रसिद्ध झाला आहे की हा काढा ज्यांना आजार झाला असून ते सुद्धा घेत आहेत आणि ज्यांना आजार झाला नाही ते सुद्धा हा काढा नित्यनियमाने घेत असतानाचे येथे आढळून आले आहे. मे महिन्यात 559 रुग्ण आढळून आले होते आणि 42 जणांचा या आजराने मृत्यू झाला होता. मात्र जुलै महिन्यात आतापर्यंत 161 रुग्ण असून पाच रुग्णाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


"कोरोना व्याधीचा संसर्ग हा राज्यभर मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना व्याधीच्या उपचाराकरिता अद्याप कोणत्याही चिकित्सा पद्धतीमध्ये परिपूर्ण चिकित्सा पद्धती विकसित झालेली नाही, तथापि आयुर्वेद व युनानी चिकित्सा पद्धतीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी तज्ज्ञांद्वारे या व्याधींवर यशस्वी उपचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे व या बाबतीत शासनाद्वारे विहित निती-नियमांचे पालन करुन विविध संशोधन प्रकल्पदेखील सुरु आहेत. कोरोना व्याधीने ग्रस्त होऊ नये याकरिता संसर्गाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनमानसामध्ये जागरुकता वाढली असून आयुष मंत्रालयाद्वारे सुचवण्यात आलेला आयुष काढा व अन्य औषधांच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्या माध्यमातून रोगप्रतिकारक क्षमता वाढवून संसर्ग रोखण्याकरिता जनसामान्यांकडून आयुर्वेद व युनानी चिकित्सा पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे." असे, डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष, मुंबई महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, यांनी सांगितले.


ते पुढे असंही म्हणाले की, "आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अधिकृत उपाययोजनांव्यतिरिक्त काही गैरनोंदणीकृत व्यक्तींकडून मौखिक स्वरुपात व सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे दावे व आयुर्वेद, युनानी औषधांचा वापर कोरोना व्याधीच्या प्रतिबंध व उपचाराकरिता करण्यासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. या माहितीच्या आधारे काही नागरिक परस्पर आयुर्वेद व युनानी औषधे यांचा वापर रोगप्रतिकारक्षमता वाढविण्याकरता व उपचाराकरिता तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे केवळ नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी डॉक्टरांकडूनच उपचार घेणे आवश्यक आहेत."


गेले काही दिवस अनेक कंपन्या लस शेवटच्या टप्प्यात असलयाचे दावे करीत आहे. तर कोरोनासाठी उपयुक्त ठरणारी काही औषधंं बाजारात उपलब्ध असून त्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर असल्याच्या घटना मागील काही दिवसात घडल्या होत्या. त्या प्रकरणी संबंधितांना पोलिसांनी अटकही केली होती.


बहुतांश नागरिक अॅलोपॅथीच्या औषधांसोबत अनेक आयुर्वेदिक औषधे प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी घेत आहेत. मात्र काही जण सोशल मीडियाचा आधार घेत चुकीची माहिती पसरवत असल्याचे दिसले आहे. त्यामुळे कुठल्याही पॅथीची औषध घेत असताना त्यांनी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही औषधं घेतली पाहिजे. या कोरोनाच्या महामारीच्या काळात सध्या एकत्र येऊन लढा देणे हा एकमेव पर्याय आहे. जे काही रुग्ण हिताकरिता चांगले आहे त्याचा वापर झालाच पाहिजे आणि तो करण्याचा शासनाचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. सगळ्या पॅथीचे स्वतःचे एक शास्त्र आहे त्या नुसार त्या रुग्णांना प्रतिसाद देत असतात. कोरोनाळात या सगळ्याच पॅथीचं महत्तव प्रकर्षाने जाणवायला लागले हे मात्र तितकंच खरे आहे.