आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रेडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या ही अनाऊन्समेंट जगण्याचा भाग झालीय. दै.’नवशक्ति’त काम करताना आकाशवाणी मुंबई केंद्राच्या कॅज्युअल अनाऊन्सर पॅनलवर माझं सिलेक्शन झालं आणि माझी ओळख एका नव्या विश्वाशी झाली. फक्त आवाजातून व्यक्त होण्याचं, परिणाम साधण्याचं हे माध्यम. गिरगावसारख्या भागात भल्या पहाटे पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे पाण्याचा नळ आणि रेडिओचं बटण एकाच वेळी सुरु व्हायचं. त्यामुळे शालेय वयापासून रेडिओशी नातं तयार झालं. रेडिओ लहरींशी मनाचं नेटवर्क कनेक्ट झालं जणू.
पुढे त्याच रेडिओ म्हणजे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर काम करण्याचा अनुभवही घेतला. किशोर सोमण, राजेंद्र पाटणकर, लता भालेराव, छाया भोंजाळ, सुलभा सौमित्र, श्रीराम केळकर, दिनेश अडावदकर या नावांनी सुरुवात होणारे कार्यक्रम आतापर्यंत फक्त ऐकत होतो. पुढे आकाशवाणीवर कॅज्युअल अनाऊन्सर टीममध्ये सिलेक्शन झाल्यावरचं ट्रेनिंगही याच दिग्गज मंडळींच्या हाताखाली खरं तर आवाजाखाली पार पडलं. या मंडळींचं ट्रान्समिशन ऐकण्याचा अनुभव घेतला होता, पण तो पाहण्यासह ऐकण्याचा दुहेरी संगम आमच्या ट्रेनिंगदरम्यान झाला. माईकपासून तुमच्या चेहऱ्याचं अंतर किती असावं इथपासून ते आवाजाची फेक, उच्चारण, उत्स्फूर्तता, कार्यक्रमाचं अप टू डेट पेपर वर्क. मुख्य म्हणजे कार्यक्रमाचा क्रम ठरलेला असल्याने घड्याळाचं, वेळेचं गणित सांभाळणं. या साऱ्या गोष्टी इथे शिकता आल्या.
सोमण सर तर नेहमी म्हणायचे, आपलं पेपर वर्क नीटनेटकं असलं की, प्रोग्रॅम उत्तम होणारच. कोणत्याही कार्यक्रमासाठीची सखोल तयारी करण्याचं त्यांचं कसब, पाटणकर सरांची उत्स्फूर्तता पाहून थक्क व्हायचो. केळकर सरांचा जरब बसवणारा आवाजातला बेस, दिनेश सरांच्या आवाजातील गोडवा, लता मॅडम, छाया मॅडमच्या आवाजातील ठहराव, सुलभा मॅडमच्या आवाजातील वेगाचं थ्रिल. प्रत्येकाचा आपल्या ट्रान्समिशनवर ठसा असायचा. इंग्रजी वेदर फोरकास्ट पेपरवरुन ते मराठीत भाषांतर करुन सांगणे किंवा कधी कधी वेळेअभावी इंग्रजीतील हे वेदर बुलेटिन समोर मराठी स्क्रिप्ट असल्यासारखं घडाघडा वाचून दाखवणे. या दोन्ही गोष्टी या मंडळींकडून शिकलो. तसंच रेल्वे वृत्त, बाजारभाव याचंही. शास्त्रीय संगीत कार्यक्रमात द्यायची उद्घोषणा, फोनच्या लाईव्ह कार्यक्रमात घ्यायची खबरदारी, तेव्हाचं प्रिपरेशन. या सगळ्याची तयारी या आमच्या रेडिओ गुरुंनी आमच्याकडून घटवून घेतली. खास करुन लाईव्ह फोन-इन कार्यक्रमामध्ये त्या विषयाची तयारी महत्त्वाचीच. त्याच वेळी श्रोत्यांशी संवाद साधण्याचा स्वरसंवाद कार्यक्रमही खास देऊन जाणारा. आपल्याला न दिसणारी, न माहित असलेली व्यक्ती आपल्याशी बोलत असते.
मला याची तुलना क्रिकेटशी करावीशी वाटते. म्हणजे उसळत्या किंवा फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर चेंडू काय रंग दाखवेल ते जसं ओळखणं कठीण, तसंच कुठला श्रोता काय बोलून तुमची कशी फिरकी घेईल हेही सांगणं काही वेळा तितकंच अनप्रेडिक्टेबल, त्या क्रिकेट पिचइतकंच. तेव्हा त्या श्रोत्यांशी संवाद साधताना घ्यायची खबरदारी, एखादे वेळी जर विषय भरकटत असेल आकाशवाणीच्या आणि श्रोत्यांच्याही सन्मानाला धक्का न लावता मूळ विषयाकडे परत आणणं ही तारेवरची कसरत किंवा रेडिओ लहरींवरची म्हणा ना.. तीही या सर्वांकडून शिकलो. तेव्हा स्पूल (रेडिओच्या भाषेतील हा टेक्निकल शब्द) च्या टेपमधून 50 सेकंद किंवा दीड मिनिटांचे कार्यक्रम एकामागोमाग एक क्यू करणं (म्हणजे क्रमाने लावून ठेवणं). खास करुन तीन मशीन्सवर तेही सकाळच्या हेवी लिसनरशिप अर्थात श्रोत्यांची संख्या जास्त असलेल्या वेळेत. हे सारं या सगळ्या मंडळींनी आपल्या विद्यार्थ्यांसारखं नव्हे तर आपल्या मुलांना शिकवावं इतक्या आपुलकीने आम्हाला शिकवलं. ज्यातल्या अनेक बाबी उदाहरणार्थ माईकचं डिस्टन्स, आवाजाची फेक करताना पाळायचं भान, म्हणजे प,फ,ब,भ,म यासारखे ओष्ठ्य शब्द उच्चारताना घ्यायची अतिरिक्त खबरदारी, ते व्यवधान. हे बारकावे आज न्यूजचॅनलमध्ये काम करताना फार उपयोगी पडतात.
अभिवाचन किंवा नाट्यवाचनावेळचं रेकॉर्डिंग करणं आणि ते ऐकणं हाही निव्वळ आनंददायी अनुभव. या अनाऊन्सर्स मंडळींशिवायशिवाय झिनझिनाट फेम एनर्जिटिक महेश केळुस्कर सर, उमा दीक्षित मॅडम, नेहा खरे मॅडम, क्रीडा विभागातील कपिलकुमार धोरे सर, राजेश दळवीजी या साऱ्यांनीही निरनिराळ्या गोष्टी शिकवल्या. केळकर मॅडम, नाबर सर, झुबेर सर, जावेद शेख सर आदी मंडळीदेखील ड्युटी ऑफिसर, कार्यक्रमाचे प्रोड्युसर अशा वेगवेगळ्या भूमिकेतून आपापल्या परीने आम्हाला मार्गदर्शन करायची.
आकाशवाणी म्हणजे दृश्य नव्हे तर श्राव्य माध्यम. ज्याचं सादरीकरण दिसत नसलं तरी परिणाम दिसतो. तसेच हे आकाशवाणीतील कार्यकाळातील हे सारे गुरु माझ्या करिअरमध्ये अदृश्य म्हणजे पडद्यामागे किंवा रेडिओ सेटच्या आतच राहिले, त्यांनी भरभरून दिलं, माझ्या ओंजळीने, क्षमतेने ते घेण्याचा प्रयत्न केला. चांगलं काही गवसलं त्याचं श्रेय त्यांचं. जे उणं राहिलं तेव्हा माझी ‘रेंज’ कमी पडली हे नक्की, खराब वातावरणामुळे रेडिओ ट्रान्समिशन पोहोचण्यात काही वेळा कमी पडते तशी.
न्यूज चॅनलमध्ये 14 वर्षे काम केल्यानंतर आजच्या गुरुपौर्णिमेला आकाशवाणीतले ते दिवस, त्या गुरुंविषयी मांडावंसं वाटलं. योगायोगाने २३ जुलै हा आकाशवाणीचा स्थापना दिन आहे. त्यावेळी याचं नाव भारतीय प्रसारण सेवा होतं, असंही वाचनात आलं. या दुहेरी योगाच्या दिवशी आकाशवाणीतील या शिकवून जाणाऱ्या वर्षांबद्दल शिकता आलं. याच आकाशवाणीने दिलेल्या मित्र परिवाराविषयी असंच कधीतरी लिहिता होईन. जाता जाता आकाशवाणीच्याच भाषेत सांगायचं तर पुन्हा आपली भेट पुढच्या लेखात, तोपर्यंत नमस्कार!