सकाळपासून ऑफिसमध्ये लगबग सुरु होती...निमित्त होतं महिला दिनाचं...'एबीपी माझा'ची महिला टीम जाणार होती सातारा जिल्ह्यातील जाखणगावला. 'पानी फाऊंडेशन'चं काम जाणून घ्यायला.

दुपारी दोन वाजता निघाल्यावर इच्छितस्थळी पोहोचायला आम्हाला रात्रीचे १० वाजले...वाटलं खेडेगावात जातोय...बसमधून उतरेपर्यंत सगळं गाव झोपी गेलं असणार...पण नजारा वेगळाच होता...आणि डोळ्यांना सुखावणारा...सगळा गाव आमच्यासाठी जागा होता..लेझीम, ढोल-ताशे, तुताऱ्या घेऊन आमच्या स्वागताला तयार होता...



'पानी फाऊंडेशन'च्या गाण्यावर बसवलेला डान्स घेऊन लहान-लहान शाळेची मुलं पाण्याचं महत्त्व समजावत होती...खूप अप्रतिम परफॉर्मेन्स होता...वाखाणण्याजोगा...त्यांचा उत्साह बघून झोप कुठल्याकुठे उडून गेली...पाहुणचारानंतर सुरुवात झाली, ती ज्यासाठी आलेलो त्या कामाची...'पानी फाऊंडेशन'चे लोक आणि गावकऱ्यांसोबत आमची मिटींग झाली...दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी आम्हाला ग्रुप्समध्ये विभागलं जाणार होतं...

'पानी फाऊंडेशन' आमचा सोबती होता...मग या अंतर्गत बनवलेल्या ग्रुपची नावं काय असावीत??? साहजिकच नद्या...आमच्या 'एबीपी माझा'च्या एका अखंड प्रवाहाला चार नद्यांमध्ये विभागण्यात आलं. वर्धा, नर्मदा, गोदावरी, कृष्णा आणि त्याप्रमाणे आमच्या चार ग्रुप्सची अर्थात नद्यांची समुद्र गाठण्याच्या दिशेने विजयासाठी घोडदौड सुरु झाली. मुख्य काम सुरु करायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी. पण सकाळ व्हायला अजून पूर्ण रात्र बाकी होती...तेच निमित्त ठरलं एका मस्त अनुभवाचं...



कधी स्टार वॉचिंग केलंय??? एक्स्पर्ट शिवाय??? मी केलं...मला सगळे तारे, त्यांच्याबद्दल माहिती नसेल ती मिळाली.. पण अनुभव खरंच खूप छान होता...मोकळी हवा...थंड बोचरी हवा...निरभ्र आकाश...इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र म्हणजे नक्की मुंबई किंवा इतर शहरात कधीही पाहिलं नव्हतं.

मस्त निवांत रात्र...सगळे थकून झोपी गेलेले...पण नम्रताताई सोबत मी आकाशातील ताऱ्यांचा आस्वाद घेत होते...अगदी रस्त्यावर झोपून आकाशाकडे अविरत पाहत बसण्यात जी मजा आहे ना...खरंच हौस फिटली...ते लुकलुकणारे तारे...उन्हाळा असल्याने ताऱ्यांनी गच्च भरलेलं निरभ्र आकाश...काही तारे घोळक्याने जमलेत तर कोणी एकटेच प्रखरतेने तेवत आहेत...मधूनच एखादं लुकलुकत जाणारं, खालून अगदी छोटसच दिसणारं विमान...सप्तर्षी आणि त्यावरून ओळखता येणारा ध्रुव तारा मला ओळखता येत असल्यामुळे लगेच लक्ष वेधून घेत होता...समुद्र किनाऱ्यावर अनुभवायला मिळणार वारा इथे त्यापेक्षाही जास्त आल्हाददायक वाटत होता...अंधाऱ्या रात्रीची ती भयाण शांतता...आणि वाऱ्यानंतर ऐकू येत होते ते स्वतः च्या हृदयाचे ठोके...मधेच कुत्र्यांच्या भुंकण्याने नक्कीच भीती वाटायची, पण त्यांनाही ते कळल्यामुळे कदाचित ते शांत झाले असावेत...रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज रात्रीची जाणीव करून देत होता.



सूर्योदयाची वेळ...डोंगरमाथा...पक्षांच्या किलबिलाटासह मोकळ्या हवेत एकसुरात मिसळून कानावर पडणारे शब्द...मग ती प्रेरणादायी प्रार्थना असेल तर दिवसाची सुरुवात उत्तमच...!!!

अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात झाली...शिवार फेरीने आमची सुरुवात होणार होती. शिवार फेरी ही संकल्पना ऐकूनच मस्त वाटते...शिवार...झाडं...शेती...पिकं आजूबाजूला असणार, असं ठरवून आम्ही निघालो होतो. पण डोंगरावर जाऊन आम्हाला तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितला...तिथं ना पिकं होती, ना शेती...होता तो ओसाड डोंगर आणि पाणी अडवण्यासाठी घातलेले बांध... पण हिरमोड नाही झाला...वेगळ्या गोष्टी आणि परिस्थिती पाहायला मिळाली...



तिथून पुढे आमची स्वारी निघाली आमच्या कामाच्या ठिकाणी... जिथून आम्ही आमच्या मोहिमेची सुरुवात करणार होतो...काहीतरी नवीन शिकण्याची...

ती जमीन ओसाड होती...पडिक होती...पण पाण्यासाठी आता तिचा उपयोग होणार होता...तिथे सुखदेव भोसले म्हणजेच तात्यांनी आम्हाला 'हायड्रोमार्कर'च्या सहाय्याने जमिनीची पातळी मोजण्याचं तंत्र शिकवलं...ज्याचा उपयोग आम्हाला सलग समतल चर खणण्यासाठी होणार होता...ज्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया सुलभ होणार होती. आम्ही चर खोदण्याच्या कामाला सुरुवात केली. चारही ग्रुप्समध्ये कोण जास्त आणि व्यवस्थित काम करेल, याची चढाओढ लागली होती...आम्ही 'एबीपी माझा'च्या महिला बिग्रेडने एक फूट खोल आणि जवळपास सात ते आठ मीटर लांब सलग समतल चर खोदला जो पाणलोट क्षेत्रातला एक महत्त्वाचा उपचार म्हणून ओळखला जातो. या कामामुळे तिथे एका पावसात १२५० लीटर पाणी साठलं जाईल...तर दहा वेळा पाऊस पडल्यानंतर तिथेच आपल्याला १२ हजार ५०० लिटर पाणी म्हणजेच अडीच टँकर पाणी मिळेल. तेही फक्त अर्धा तास केलेल्या कामामुळे. अनुभव भन्नाट होता...आज आम्ही पाणी कमावलं होतं.



श्रमदान करताना एकमेकींना, आपआपल्या ग्रुपला मोटिव्हेट करणं सुरू होत. तसं पाहता चर खोदणं हे काम थोडं मेहनतीचं आणि कष्टाचं तर होतंच...यातच मजेची गोष्ट म्हणजे आम्ही शहरातल्या, नाजुक मुली असणार हा त्यांचा गोड-गैरसमज. त्यामुळे गावकऱ्यांनी कुदळ-फावड्याआधी आमच्यासाठी मेडीकल बॉक्स आणून ठेवला होता. पण त्याची आम्हाला गरजचं पडली नाही, ही गोष्ट वेगळी. श्रमदान करतानाच तिथल्या ताई आणि काकी मदतीला होत्याच पण लहान मुलीही आम्हाला मदत आणि मार्गदर्शन करण्यात मागे पडत नव्हत्या.

कामानंतर आम्ही शाळेत परतलो...पाणी वाचवण्यासाठी किती झगडावं लागतं हे शिकलो...पाण्यासाठी किती झुराव लागतं ते शिकलो...

काम करुन आम्ही थकलो, असं म्हणून आमच्याकडून एक खेळ खेळून घेण्यात आला...ज्यात प्रत्येक ग्रुपमधून एक आजोबा, वडील आणि मुलगा यांना अनुक्रमे पाण्याच्या टबमधून स्ट्रॉनं पाणी घेऊन बाटलीमध्ये भरायचं होतं...इथेही कोण आधी पाणी घेऊन आपल्याकडील बाटली भरतंय याची अक्षरशः स्पर्धा लागली होती. टबमधलं पाणी संपत होतं...आजोबांनंतर वडील यांनी पाणी घेतल्यामुळे मुलासाठी पाणी कमी झालं होतं...तरी ते पाणी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी चढाओढ सुरूच होती...वेळ संपत आलेली...पाणी ही काही थेंबांतच शिल्लक होतं. पण तरी आपल्याकडील साठा तेवढाच वाढेल म्हणून तो टबच मी उचलून माझ्या बाटलीत रिकामा केला...

सगळीकडे शांतता पसरली...

सगळे एकमेकांकडे फक्त बघत होते...

नक्की झालेलं काय???

या शांततेने खेळाचा निष्कर्ष काय ते कळालं...आपल्याच पुढच्या पिढीचा, आजुबाजुच्या लोकांचा विचारच आपण करत नाही...आपली गरज बघून इतरांकडे दुर्लक्ष करतो...आपल्या फायद्यासाठी आपण आपलीच पिढी धोक्यात घालतोय.आपण इतरांचा विचार करू तेव्हाच प्रगती होईल.

या नंतर आम्हाला गावातलीच परिवर्तनाची कथा ऐकवण्यात आली...

उनकी कहाणी,उन्हीं के ज़ुबानी...

एकाच गावचे राजकारणी...दोघेही कट्टर विरोधक अगदी एकमेकांच्या जीवावर उठलेले...पण दोघांचा ध्यास गावचा विकास...'पानी फाऊंडेशन' आणि अविनाश पोळ यांच्या मध्यस्थीने अजूनही मनात ईर्षा असूनही फक्त गावच्या विकासासाठी ते एकत्र आले...कारण एकाच... आपलं गाव...अशी परिवर्तनाची कथा ऐकून कोणाला नवल नाही वाटणार??? अगदी गावासाठी गावकऱ्यांची एकी कोणाला नाही भावणार???



या दोन दिवसात खूप काही अनुभवलं होतं...अगदी एकाच ऑफिसमध्ये असून जास्त बोलणं न होणाऱ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या...गावाकडच्या लोकांची माया भेटली...एक आपुलकी होती...ते प्रेम होतं...तो जिव्हाळा होता...हे सर्व साध्य झालं पाण्यामुळे...

आपल्या रुटीन जीवनात आपण नक्कीच या गोष्टी कुठेतरी हरवत चाललोय...वेळ मिळत नाही हे तर फक्त कारण झालं...आपणच आपलं भविष्यासाठी तरतूद करायला हवी...पैसा तर आहे...पण निसर्ग हवाच...

असा हा भन्नाट दिन...महिला दिन...अविस्मरणीय अनुभव.