"याद है पंचम? जब भी कोई नई धुन बना कर भेजते थे, तो कह लिया करते थे...The ball is in your Court... ये कौनसा बॉल मेरे कोर्ट में छोड़ गए हो पंचम.... जिंदगी का ये खेल अकेले नहीं खेला जाता.... हमारी तो टीम है... आ जाओ, या फिर बुलालो!"


गुलजार रिमेम्बर्स आर डी बर्मन, या अल्बममधल्या 'तुझसे नाराज नही जिंदगी' साठी गुलजारने लिहिलेली ही प्रस्तावना...

कधी ऐकलीय? डोळ्यात काटे टोचावे असे पाणी येते... आज याच गुलजारचा वाढदिवस... किती वर्षांचा झाला आणि कधी जन्मला हे काय करायचे आहे? कोणाला हवंय ते?... पण हाच एक माणूस आयुष्य जगला यात शंका नाही...

त्याने दिलेल्या कवितेच्या धाग्याने आपण कित्येक वर्ष आपल्या सुख दुःखाची लक्तरे शिवत आहोत, तो नसता तर? इथे एक पंगत आहे, गुलजारच्या नज्म, शायरी, कविता आणि शब्दांचा रसपान करणाऱ्यांची.... आकाशवाणीवर गाणी ऐकताना मी ही त्या पंगतीत नकळत जाऊन बसलो.... त्याच्या "पंक्ति" कळत नसल्या तरी ती "पंगत" मात्र आवडू लागली....

गुलजारने एकाही संधीला सोडले नाही... एस डी बर्मनदाने जेव्हा "बंदिनी" साठी त्याला फक्त एक गाणे लिहायला सांगितले तेव्हा, "मोरा गोरा अंग लैले" कागदावर उतरले....आहहह.... काय कल्पना आहे, काय थॉट आहे गाण्याला.... बस्स.... इथून एक युग सुरु झाले... एका गीतकाराचे, दिग्दर्शकाचे, कवीचे... गुलजारचे....
याच गोष्टीला आता 54 वर्ष उलटली... पण काही बदलले आहे का या माणसात... मला तर दिसत नाही... हाँ केस आणि मिशी पांढरी झाली बाकी, त्यांच्याच शब्दात म्हणायचे झाले तर.... दिल तो अभी बच्चा है जी.... भारतीय सिनेसृष्टिची इतकी तपे पाहिल्या नंतर देखील तो बदलला नाहीय. आधी एस डी, मग आर डी, कधी हरिभाई (संजीव कुमार) कधी नसरुद्दीन, मग जस जसे हे मागे पडले तसे मग.... ए आर आणि विशाल भारद्वाज.... हे आणि असे किती कलाकार या माणसाने समृद्ध केलेत, त्यापैकी विशाल भारद्वाजवर याचे विशेष प्रेम, का कोण जाणे! आणि हो हे विसरलो आपण... गीतकार म्हणून पहिले ऑस्कर यानेच आणले ना... नंतर ग्रॅमी पण... राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर तर याने पोत्यात भरुन ठेवले असतील... इतके मिळाले...

काय नाही केलं या माणसाने... इतक्या कविता आणि नज्म लिहूनही विचार संपत नाहीत, तुलना संपत नाहीत, कल्पना संपत नाहीत, वाह रे विधात्या, वाह! आमच्या सारख्या बुद्धू लोकांना डोक्याने अपंग ठेऊन सगळे यालाच दिलेस? चलो, फेअर इनफ. काही लोकांनी केलेली चीटिंग पण मनाला भावते.... असे सगळे सहन करायला तयार आहे मी फक्त गुलजारसाठी...



इतके मोठे असून मी एकेरीमध्ये गुलजारला बोलतोय याचे आश्चर्य वाटून घेऊ नका.... कारण हे फक्त मी नाही तर तुम्ही पण बोलू शकता.... कारण तो वारा आहे, श्वासासोबत अंगात भिनणारा, आणि आपल्या श्वासावर फक्त आपलाच अधिकार असतो... दुरुन कुठून तरी कल्पनेच्या जगातून हा वारा शब्दांना एका लयीत बांधून सुवासाचे क्षण आपल्यापर्यंत आणतो... आपण ते श्वासातून शरीरात घेतो... म्हणून तो एकेरीच बरा वाटतो...

गुलजारच्या सोबत असलेले, किशोर, रफी, साहिर, मन्ना, सलील, एस डी, राज कपूर, बिमल रॉय, हरिभाई (संजीव कुमार) असे सगळे आपल्याला पोरके करुन निघून गेले, पण गुलजारने अजूनही आमची साथ सोडली नाही म्हणून तो जास्त जवळचा.... अगदी पंचम पण, सर्वात जास्त तेव्हाचा गुलजार रडला असेल का? त्याचे दुख तोच जाणो.... आपण तर स्थितप्रज्ञ देखील नाही....
तो मात्र गालिबप्रमाणे आहे, खूप जवळचा पण अनाकलनीय... शेवटी गुरुप्रमाणे शिष्य असणारच ना...

आजपर्यंत मला कधीच गुलजारला भेटण्याचा योग आला नाही... मात्र मला भेटल्याशिवाय मी त्याला जाऊ ही देणार नाही...

अखेर गुलजार हे नाव नाही, ती उपाधी आहे. त्यामुळे आज हीच इच्छा आहे की, अविरत, अखंड, सुरु असणाऱ्या तुझ्या या लेखणीला कधीही लगाम न लागो...