" बेगम, ये तुम्हारा ऑटोग्राफ सॉन्ग है, ओटोग्राफ देते वक्त, ये लफ्ज भी लिखते जाना", 


गुलजार म्हणाले हे, लता दिदींना!


कधी? तर जेव्हा


"नाम घुम जाएगा, 


चेहरा ये बदल जायेगा, 


मेरी आवाज ही मेरी पहचान है, गर याद रहे", 


या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी दीदी आल्या होत्या तेव्हा!


आता ज्यावेळी लता दीदी आपल्या स्वर्गीय सुरावटींना आपल्यासाठी सोडून अनंतात विलीन झाल्या त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये हेच गाणं लावलं गेलं होतं... किंबहुना लता दीदींसाठी हेच गाणं आपण ऐकत आलो आहोत... पण लता दीदींचं या सिग्नेचर सॉंगचे अल्फाज कोणी लिहिले तर ते गुलजार यांनी! चित्रपट होता 'किनारा' आणि संगीत दिग्दर्शन होतं अर्थात पंचमचं... गुलजार लता दीदींना नेहमी "बेगम" म्हणून हाक मारायचे... यातून गुलजार यांचा मी मोठं करत नाहीय, फक्त एक किस्सा सांगतोय... गुलजार स्वतःच म्हणतात कधी कोणत्या 'लेजेड्स' ची तुलना करू नये... ते 'लेजेड्स' आहेत यातच सगळं आलं... जसं की लता आणि आशा! चंद्रावर निल आर्मस्ट्राँग आणि बझ ओल्डरीन दोघे उतरले, नाव फक्त नीलचं घेऊ नये, तसंच लता आणि आशा या दोघीही गातात तेव्हा चंद्राला स्पर्श करून येतात, म्हणून त्यांची तुलना मुळीच करू नका... - इति गुलजार! 


गुलजारांचं नशीब कित्ती मोठं असेल नाही का? त्याचं आयुष्यातलं पहिलं फिल्मी गाणं, कुणी गावं? तर लता दीदींनी? वाह! एका मोटार रिपेअरिंगच्या गॅरेजमध्ये काम करणारा मुलगा विमल रॉय यांचा असिस्टंट डायरेक्टर होतो, ते बंदिनी सारखा चित्रपट करायचं ठरवतात, त्याला शैलेंद्र गाणी लिहिणार होते पण मोठे बर्मन म्हणजे एस डी बर्मन म्युजिक देणार ऐकून, शैलेंद्र गाणी लिहायला नकार देतात आणि विमल रॉय थेट गुलजारांसारख्या मेकॅनिकला गाणी लिहायला सांगतात! हा निव्वळ योगायोग असू शकतो का? इतकंच नाही तर नुकताच बिजातून अंकुर फुटतात तसा इंडस्ट्रीत आलेला गुलजार लिहितात,


"मोरा गोरा अंग लईले, 


मोहें शाम रंग दईदे" 


ते गाणं लताने गावं असं एस डी बर्मन यांना वाटतं, पण त्यांच्यात आणि लतादिदींमध्ये कुठे आलबेल असतं? त्यांचं तर 3 वर्षांपासून भांडण झालेलं असतं, मग एखादं फर्मान काढावं तसं बर्मनदा लता यांना कॉल काय करतात आणि "गाणं गायला ये" म्हणून आदेश काय देतात आणि लता दीदी चक्क आदेशाचं पालन काय करतात, मग ते गाणं अजरामर काय होतं. हे सगळं म्हणजे निव्वळ योगायोग वाटतो का? मला तर नाहीच, नियतीनं जाणून बुजून रचलेलं हे एक सुरमयी कारस्थान होतं! त्या कारस्थानाला गुलजार बळी पडले आणि त्यांच्या पहिल्याच गाण्याला लता दीदींचा स्वरसाज लाभला. आणि साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्यावर एक मेकॅनिक पण आपल्या लेखणीतून कागदावर काय उतरवू शकतो हे आपल्याला माहीत आहेच... ही ताकद होती लता दीदींची! 


अजून एक किस्सा स्वतः गुलजार सांगतात. त्याचं स्वतःचं आणि माझं पण जवळचं एक गाणं, जे त्याने लिहिलं होतं नायकासाठी, पण हेमंतजी यांच्या हट्टामुळे ते गायलं लता दीदींनी. गुलजार सांगतो मी एकही शब्द त्यात बदलला नाही.. गरजचं पडली नाही... कारण लतादीदी! त्यांनी ज्याप्रकारे ते गाणं गायलं, की कुणालाही कळलं नाही ते गाणं नायकासाठी होतं... गुलजारांचं ते गाणं होतं, 


"हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू


हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो",



असे अनेक प्रसंग आहेत... असणारच कारण गुलजारांनी फक्त लिहिलेल्याच नाही तर, दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या गाण्यांना पण लता दीदी गायिका म्हणून लाभल्या... ही मंडळी विलक्षण तेजाने, प्रगल्भतेने आणि नवनिर्मिच्या ऊर्जेने वलयांकित होती... इतकंच नाही तर त्यांनी आपल्या वलयात इतरांना पण सामावलं आणि पाणी, खत टाकून बीजाचं अंकुर केलं, अंकुराचं रोप आणि रोपाचं झाड केलं... लता दीदी आज गेल्या... स्वर्गीय प्रवासाला त्यांची सुरुवात झाली... पण त्या अमर आहेत, कारण त्यांचा आवाज अमर आहे... जोपर्यंत तो आवाज आहे तोपर्यंत त्यांची आठवण आहे... म्हणून गुलजार म्हणतात,


" बेगम ( लता दीदी ) के साथ बिताए हुए सारे लम्हे मेरे लिए souvenir है"