एंटरटेन्मेंटची चौकट बदलतेय...


'नार्कोज' पाहिलीस का???

नाही मी 'हाऊस ऑफ कार्ड्स' बघतोय.

हॉरर आवडत असेल तर 'स्ट्रेंजर थिंग्स' किंवा 'डार्क' बघ.

अरे हिंदीतलं 'सिलेक्शन डेज' भारी आहे पण एंडच नाही नीट... दुसरा सीजन येतोय का नाही काय माहिती.

ते जाऊदे 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सिजनचं शूटिंग सुरु झालंय. लवकर येऊ दे रे...

अशी संभाषणं बऱ्याचदा कानावर पडतात. अगदी शाळकरी मुलांपासून ऑफिसला जाणाऱ्या मोठ्या आणि वयस्कर लोकांकडूनही. आणि मग लक्षात येते ती या वेब सीरिजची क्रेज.

स्टेशनवर, ट्रेनमध्ये, बस स्टॉपवर, बसमध्ये, ऑफिस ब्रेकमध्ये, घरी, कॉलेज कट्ट्यावर, लेक्चरमध्ये, निवांतक्षणी, कामातून कसाबसा वेळ काढून हमखास हे स्वतःच एडिक्शन पुरवलं जातंय.

सुरुवातीच्या काळात खुल्या ग्राऊंडवरती मनोरंजन सादर केलं जायचं... मग ते नाटक असो तमाशा, भारुड किंवा इतर कला असोत... कालांतराने त्याला एक चौकट आली...

सिनेमागृहात चित्रपट दाखवले जाऊ लागले... ते सुद्धा सुरुवातीला 70 mm मग 35 mm... ही सिनेमागृहे गर्दी खेचू लागली...

पण पैसा बोलता है बॉस... सगळ्यांनाच तिकीट परवडेल असं नव्हतं...

टीव्हीला प्राधान्य दिलं जाऊ लागलं... टिव्हीपुढे लोक घोळक्याने जमा होऊ लागले.

चित्रपट, मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होत्या. सासू-सुनेच्या मालिका घरच्या महिलांना, आजी-आजोबांना खिळवून ठेवत होत्या... आताही परिस्थिती बदललेली नाहीये.

पण एका कोपऱ्यात किंवा भिंतीवर असणाऱ्या टीव्हीने प्रेक्षकांच्या हातात स्थान पटकावलंय...

मोबाईलच्या रुपात.

आणि त्याला सोबत करतायत वेब सीरिज.

पण फक्त नेटफ्लिक्स नाही तर याव्यतिरिक्त अमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि आता तर काही चॅनलचेही ऍप आलेत. ज्यावर नवीन चित्रपट, संबंधित प्रॉडक्शन हाऊसच्या मालिका दाखवल्या जातात. व्हिडीओ पाहण्यासाठी आपण वापरात असलेलं 'एमएक्स प्लेअर'सुद्धा आता अपडेट झालंय, ज्यावर आपण अनेक टीव्ही सीरिअल्स, नवे-जुने बॉलिवूड-हॉलिवूडचे चित्रपट, वेब शोज, गाणी, कॉमेडी शोज इतकंच नाही तर बातम्यासुद्धा बघू शकतो. पण सध्या प्रामुख्याने आकर्षण आहे ते म्हणजे वेब सीरिज आणि त्यासाठी नेटफ्लिक्स.

वेब सीरिज म्हणजे सहसा इंग्लिश, स्पॅनिश, रशियन, फ्रेंच भाषेतील पाहिल्या जातात... पण हिंदीमध्ये याची आणि नेटफ्लिक्सची क्रेझ सुरु झाली ती सेक्रेड गेम्सने....

सेक्रेड गेम्स मोठ्या प्रमाणात पहिली गेली... लोकांना आवडली... खासकरुन त्याचसाठी नेटफ्लिक्सची मेंबरशिप घेतली गेली... आवडीने प्रेक्षकांनी इतर वेब सीरिज पाहायला सुरुवात केली...

नेटफ्लिक्समुळे झालं काय, की जगभरातल्या भाषेमध्ये तयार केलेल्या सीरिज एका क्लिकवर मिळवणं शक्य झालं... 'गेम ऑफ थ्रोन्स'साठी बहुतांश लोक वेडे झालेत. ती एचबीओची सीरिज पण नेटफ्लिक्सवर खूप सहजपणे उपलब्ध झालीय.

बॉलिवूडमधला रोमान्स, साऊथची एक्शन, भारतातली गरिबी यापेक्षाही वेगळं काही असतं हे लोकांना कळू लागले... किंबहुना इंग्लिश सिनेमे पाहणाऱ्यांना हे माहिती होतं, पण असे सिनेमे पाहणाऱ्यांची एक वेगळी कॅटेगरी आहे... वेब सीरिजने सर्वांपर्यंत अगदी सर्वसामान्यांपर्यंत हे पोहोचवलं, त्यात जीव टाकला...

इंग्लिश सबटायटल दिल्यामुळे ते समजणं जास्त सोपं झालं. मग ती सीरिज कोणत्याही देशाची असो. कोणत्याही भाषेची असो.

काय आहे हे नेटफ्लिक्स?

नेटफ्लिक्स ही एक अमेरिकन कंपनी आहे...

रिड हस्टिंग आणि मार्क रॅन्डोल्फ यांनी दोघांनी एकत्रितपणे नेटफ्लिक्सची सुरुवात करायची ठरवलं... आणि अशाप्रकारे 1997 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये नेटफ्लिक्सची सुरुवात झाली.

30 कर्मचाऱ्यांपासून सुरु झालेली कंपनी आज 190 देशांना सेवा पुरवते. या सर्व देशांत मिळून 139 मिलिअन पेड सबस्क्रिप्शन वापरणारे प्रेक्षक असून जवळपास 10 ते 12 मिलियन प्रेक्षक सध्या फ्री ट्रायलचा उपभोग घेतायत.

चीनसारख्या अनेक देशांमध्ये इंटरनेट वापरावर मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे चीन, रशिया, नॉर्थ कोरिया, इराण या देशांमध्ये अजूनही नेटफ्लिक्सच्या वापरावर बंदी आहे.

नेटफ्लिक्स का?

चित्रपट म्हटलं की काही बंधन येतात, मग ते काही सीन्सच्या बाबतीत असोत किंवा भाषेच्या बाबतीत. 18 वर्षाच्या आतील मुलांना बघण्यासारखं नसेल तर 'ए' सर्टिफिकेट लागतं. तरीही त्यात काटछाट केली जाते ती वेगळीच. त्यामुळे हल्ली निर्मातेही या वेब सीरिजकडे वळल्याच लक्षात येत.

कारण ना इथे भाषेचं बंधन ना कुठले सीन कशाप्रकारे दाखवले जावेत याचं लिमिट. सेन्सर बोर्ड नामक गोष्ट या सीरिजच्या आसपासही नसते. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्याला व्यक्त व्हायला पुरेपूर स्कोप मिळतो.

बऱ्याचदा होतं काय की काही चित्रपटांचं चित्रीकरण अपूर्ण राहतं... काही वेळेपेक्षा जास्त मोठे होतात... कारण चित्रपटांची एक वेळेची मर्यादा असते... 3 तासांपेक्षा जास्त वेळ प्रेक्षक नाही बघू शकत... मग जोधा अकबरसारख्या कमेंट मिळतात...

अच्छा था पर लंबा था...

तर अशा चित्रपटांचे छोटे छोटे भाग करुन त्यांची सीरिज बनवली जाते... त्यामुळे चित्रीकरण वायासुद्धा जात नाही शिवाय त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळतो.

1 स्क्रीन, 2 स्क्रीन, 4 स्क्रीन अशा पॅटर्नमध्ये नेटफ्लिक्स वापरणं शक्य आहे. त्यामुळे मित्र मैत्रिणींमध्ये कॉन्ट्रो काढून दोघांमध्ये, चौघांमध्ये नेटफ्लिक्सची मेंबरशीप घेतली जाऊ लागली. त्यामुळे खर्चामध्ये भागीदारी आली आणि खर्च कमी झाला. साध्या भाषेत सांगायचं तर हे परवडेबल पण आहे.

याआधी हातात मोबाईल असला आणि मनोरंजन हवं असलं की आपसूकच बोट युट्यूबकडे जायचं. पण आता माझं नेटफ्लिक्स हेच युट्यूब आहे का असा प्रश्न पडतो.

घरी टीव्ही बघताना आवडत्या चॅनेलसाठी होणारी भांडणंसुद्धा हल्ली कमी झाली आहेत. कारण आपले आवडते शो, सीरियल्स आपल्या हातात आले आहेत... रिमोटने नव्हे तर मोबाईल मध्ये. बाहेर असू, प्रवासात असू सीरिअल चुकायचं टेन्शन आता नसतं. एकतर लगेच ऑनलाईन तरी बघू शकतो किंवा टाटा स्कायसारख्या किंवा इतर अॅपवर आपल्या वेळेनुसारही बघू शकतो.

घरातली चिमुरडी पण आता कार्टून मोबाईलमध्ये बघण्यालाच पसंती देतात.

त्यामुळे आता नाटक असू दे, चित्रपट असू दे, मालिका, वेब सीरिज किंवा मनोरंजनाचा कोणताही प्रकार असू दे नाट्यगृह, सिनेमगृह, घरातली टीव्ही यापेक्षा मोबाईलवर पाहण्यालाच प्राधान्य दिलं जातंय. अगदी मोठ्या स्क्रीनपेक्षा मोबाईलच्या चौकटीला प्राधान्य दिलं जातंय.

त्यामुळे 'एन्टरटेन्मेंटची चौकट बदलतेय' असंच आपण म्हणू शकतो.