कोणी रेमडेसिवीरच्या इंजेक्शनसाठी तासंतास रांगेत,
कोणी बेडच्या प्रतिक्षेत हॉस्पिटलबाहेर,
कोणाला ऑक्सिजन बेडची गरज,
कोणाला आयसीयू बेड, तर कोणाला व्हेंटिलेटर गरजेचा,
सगळीकडे रांगा...


पण वॅक्सिनसाठी अजूनही तितका प्रतिसाद नाही.


वॅक्सिन द्यायला जेव्हा सुरवात झाली. तेव्हा किती जणांनी पुढाकार घेतला???
बरेच होते... कारण सुरवातीला लसीकरणादरम्यानचा सावळा गोंधळ आपण पहिला होता. मग ती केंद्रावर झालेली गर्दी असेल किंवा कोविन अॅपमुळे उडालेला गोंधळ असेल. टीव्हीवर आपल्याला दाखवलं जात होतं, दिसत होतं. पण त्या टीव्हीच्या चौकटीबाहेरही जग आहे. जे खूप विस्तारलंय. अगदी वाड्या-वस्त्या, खेड्यापाड्यांपासून मोठमोठ्या शहरांपर्यंत. सगळीकडे वॅक्सिनबाबत सुरुवातीपासून काही गैरसमजही होते. त्यामुळे बहुतांश लोक वॅक्सिन घेणं टाळत होते. 


गावकडेही बरेच लोक या भीतीमुळे वॅक्सिन घेणं टाळत होते. अजूनही टाळतायत. शिवाय आम्ही गावाकडे असल्यामुळे आमच्याकडे प्रतिकारशक्ती आहे. वॅक्सिन घेऊन कुठे पुन्हा आजारी पडा. ताप, अशक्तपणा... त्यापेक्षा नकोच. पण वॅक्सिननंतर ताप येण्याचा अर्थ तुमच्यात प्रतिकारशक्ती तयार होतेय. हे त्यांना समजवायला कोणी नाहीये. त्यामुळे भीतीने राहिलंच. शिवाय जाऊन रांग कोण लावणार? हा प्रश्नही आहेच. 


पण ती वॅक्सिनसाठीची रांग लावली असती तर आता रांगा लावायची वेळ कमी आली असती. मग रेमडेसिविर असो, RTPCR असो, सिटी स्कॅन असो किंवा इतर औषधांसाठीची रांग असो.


रेमडेसिवीरसाठीच्या रांगा आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय. मागणी वाढल्यामुळे काळाबाजारही सुरु झाला. 


आता रुग्णाला रेमडेसिवीर लागणार हे कशावरून ठरवतात?


तर ते प्रत्येक हॉस्पिटलचा असणारा प्रोटोकॉल आणि रुग्णाच्या अवस्थेवर आहे. आणि हे कळतं ते सिटी स्कॅन वरून. सिटी स्कॅन केल्यानंतर रुग्णाच्या फुफ्फुसात किती टक्के इन्फेक्शन आहे, त्यावर ठरवलं जातं की, रुग्णाला रेमडेसिवीर लागेल का? आणि लागलं तर किती लागेल?


रेमडेसिवीर इंजेक्शन अँटी व्हायरल इंजेक्शन आहे. SARS आणि MERS-CoV ची जेव्हा साथ आलेली तेव्हा यांवरच्या उपचारांवर रेमडेसिवीर प्रभावी ठरलेलं. त्यामुळे WHO नुसार, हे Covid-19 वरही प्रभावी ठरू शकतं असं सांगितलं गेलं. कारण हे सगळे विषाणू एकाच माळेतळे. रेमडेसिवीर कोविडसाठी 100 टक्के प्रभावी आहे असं अजून कुठेही सिद्ध झालेलं नाही. पण वॅक्सिनमुळे प्रतिकार शक्ती वाढते हे सिद्ध झालंय. त्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वॅक्सिन जास्त प्रभावशाली आहे.


जसं वॅक्सिनचे काही साईडइफेक्ट आहेत, तसेच रेमडेसिवीरचेही आहेतच. त्यामुळे ज्या साईड इफेक्ट्स ना घाबरून लस घ्यायला टाळाटाळ केली जाते, त्यापेक्षा जास्त साईड इफेक्ट्स रेमडेसिवीरचे आहेत. 


वॅक्सिन घेतल्यावर कोरोना होत नाही असं नाही. तो व्हायची शक्यताही आहेच. पण अति त्रास, रुग्ण सिरीयस व्हायची शक्यता कमी आहे. सध्या उपचारांनी तुम्ही घरी लवकर येऊ शकता. रेमडेसिवीरसारखी औषधं लागण्याची वेळ नाही येणार कारण वॅक्सिनमुळे तुमच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार व्हायला आधीच सुरुवात होते. त्यामुळे वॅक्सिनला प्राधान्य द्या. वॅक्सिनमुळे सिरीयस होऊन हॉस्पिटलला जायची वेळ येणार नाही. एखाद्याचा जीव जायची शक्यता यामुळे बरीच कमी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. 


आता दुसऱ्या लाटेत 45 वर्षांखालील लोक कोरोनाने जास्त बाधित होत आहेत आणि वॅक्सिन हे अजून तरी 45 वर्षे वयाच्या वरच्या व्यक्तींना दिलं जातंय. हे आहेच.


45 च्या खालचे लोक बाधित होणारच होते, पण ज्यांना या लसीचा लाभ घेता येत होता, त्यांनी योग्य वेळी लस घेतली असती तर किमान ती वाढीव रुग्णसंख्या कमी झाली असती. हॉस्पिटलमध्ये थोडीफार जागा शिल्लक राहिली असती. कारण वय हा फॅक्टर बघता हॉस्पिटलमध्ये बरेच रुग्ण हे अजूनही 45 वर्षे वयाच्या वरचेच आहेत. आणि तेच जास्त सिरीयस आहेत, आणि त्यांनाच रेमडेसिवीरची गरज लागत आहे. जर वॅक्सिन घेतली असती तर सिरीयस प्रदूर्भावाचा धोका टाळता आला असता. 


आता मुद्दा वॅक्सिन डोस वाया गेल्याचा आणि त्यावरून होत असलेल्या आरोपांचा. तर महाराष्ट्रात केंद्राकडून दिलेल्या वॅक्सिनमधले जवळपास पाच लाख डोस वाया गेल्याचं सांगितलं जातं.


...तर आता डोस वाया कसे जातात? वॅक्सिनच्या एका बाटलीला वॅक्सिन व्हायल म्हणतात. तर त्या एका बाटलीमध्ये 10 डोस असतात. त्या एका बाटलीमधून 10 जणांना लस टोचली जाते. आता लसीकरणासाठी काही ठराविक वेळ नाही. की इतक्या वाजताच आलं पाहिजे. तर समजा कोणी संध्याकाळच्या दरम्यान आलं. मग एक जण असेल किंवा दोन. तर आता दोघांसाठीच कुठे दुसरी बाटली फोडू. त्यापेक्षा तुम्ही उद्याच या. असं त्यांना नाही सांगितलं जातं. त्यांना वॅक्सिन दिली जाते. परिणामी उर्वरित डोस वाया जाण्याची शक्यता असते. कारण ती एक व्हायल/ बाटली उघडल्यानंतर फक्त चार तास वापरू शकतो. 
आता या सगळ्याचा हिशोब केला, महाराष्ट्राची व्याप्ती पाहिली, लसीकरणाचा वेग पाहीला तर 5 लाख डोस वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सुरुवातीपासून पुढे आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने नुकताच 1 कोटींचा टप्पा पार केला आहे. पण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातले जवळपास 28 टक्के लोकांचं वय हे 45 पेक्षा जास्त आहे. म्हणजे साडेतीन कोटीपेक्षा जास्त. आता जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यांमध्ये साडेतीन कोटींपैकी फक्त 1 कोटी लोकांचं लसीकरण झालं. मग अजून वेग आणि सामग्री किती वाढवायला हवी याचं गणित लक्षात येईल. कारण हे 28 टक्के तर सोडाच अजून 72 टक्के जनतेच्या लसीकरणाला सुरवातही नाही झाली.


सरकार त्यांचं काम त्यांच्या वेगाने करतंय, पण त्यांना सहकार्य करणं आपलंही कर्तव्य आहे. रेमडेसिवीरसाठी रांगांमध्ये काळजीने ताटकळत तासंतास उभं राहण्यापेक्षा वॅक्सिनची रांग कधीही चांगली. कोरोना इतका घातक आहे की कधी, कुठे, कसा तो तुम्हाला इफेक्ट करेल सांगता येत नाही. यावेळी उपयोगी ठरते ती आपली प्रतिकारशक्ती. आणि पौष्टीक खाण्यासोबत एकमेव पर्याय ही वॅक्सिन आहे.


त्यामुळे आता तुमची रांग तुम्हालाच ठरवायची आहे.
वॅक्सिन की रेमडेसिवीर???
बाकी आपण समजूतदार आहोतच.