मराठी भाषा जतन-संवर्धनासाठीचा "कृतीशून्य-वृथा अभिमान" उपयुक्त नसून त्यासाठी अभ्यासपूर्ण व्यावहारिक “कृतियुक्त उपायांची” अधिक निकड आहे.
सर्वप्रथम “एबीपी माझा”च्या सर्व पेक्षकांना आणि तमाम मराठी बंधू-भगिनी, मराठी प्रेमींना आगामी “मराठी भाषा दिनाच्या“ मनःपूर्वक शुभेच्छा!
दांभिकता हा आपल्या समाजाचा स्थायीभाव झालेला आहे. दांभिकता म्हणजे "उक्तीच्या विसंगत कृती". याची असंख्य उदाहरणे आहेत. सर्वज्ञात उदाहरण म्हणजे पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचार निर्मूलन. गल्लीपासून दिल्लीपर्यंत याबाबत उक्तीच्या विसंगत कृती दिसते. सर्व सरकारी यंत्रणांचा कारभार नागरिकांपासून गुप्त ठेवून देखील पारदर्शक कारभाराची दवंडी कशाच्या आधारे करते हा 130 करोड जनतेसाठी निरुत्तरित प्रश्न आहे.
दांभिकतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे "मराठी भाषा जतन-संवर्धना बाबतचे आपले मराठी प्रेम." नेमेची येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणे 27 फेब्रुवारीजवळ येत असल्यामुळे आता सोशल मीडिया, सरकार, लोकप्रतिनिधी, मराठी भाषेचे संरक्षक, लेखक-साहित्यिक-प्रसारमाध्यमे आणि मराठीचे तारणहार असणाऱ्या सर्वांचे मराठी प्रेम उफाळून येईल. भाषणे होतील, समारंभ होतील, पोटतिडकीने लेख लिहले जातील, चर्चासत्रे होतील, 'मराठीच्या सक्तीबाबत' सरकारी घोषणा होतील. पण पुढे काय? हा खरा प्रश्न आहे.
मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाबाबतचा आजवरचा अनुभव पाहता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर आहे. वर्षभर शांती आणि पुन्हा 27 फेब्रुवारीजवळ आला की मराठी भाषेच्या प्रेमाचे उमाळे! असा हा प्रवास वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा आरंभ बिंदूवर येणारा 'वर्तुळा'वरील प्रवास चालू आहे आणि म्हणूनच कोणी कितीही नाकारत असले तरी मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे हे कटू वास्तव आहे.
साहित्यातील सर्वोच्च असा 'ज्ञानपीठ पुरस्कार' आणि भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवीत मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार, अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, काव्य लेखक आणि समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच दरवर्षी महाराष्ट्रात 1 मे ला 'राजभाषा मराठी दिन' देखील साजरा करण्यात येतो. असे दिन साजरे करून खरंच मराठीला "अच्छे दिन" येऊ शकतील काय याचे उत्तर नकारात्मक आहे. उक्तीला कृतीची प्रामाणिक जोड, दूरदृष्टीने मराठीच्या जतन-संवर्धनासाठी व्यावहारिक उपाय योजल्याशिवाय अशा दांभिक उत्सवांना अर्थ असत नाही. कुठलीही भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. प्रत्येक भाषा ही एक संस्कृती असते. इतिहास असतो. आजवरच्या जगाच्या पाठीवरील भाषांचा इतिहास लक्षात घेतला तर एक गोष्ट अगदी स्प्ष्टपणे दिसते ते म्हणजे जी भाषा पोटाची भाषा होते म्हणजेच अर्थार्जनाची भाषा होते तीच टिकते. त्याच भाषेचे जतन होते, विकास होतो, विस्तार होतो.
याचाच थेट अर्थ असा होतो की मराठीची मावशी संबोधल्या जाणाऱ्या इंग्रजी सारखी मराठी भाषा देखील केवळ संवादापुरती न ठेवता तिला संगणकाची भाषा, शिक्षणाची भाषा, व्यवहाराची भाषा, प्रशासकीय भाषा, व्यवहाराची भाषा बनवणे अत्यंत गरजेचे आहे. नव्हे हा आणि हाच एकमेव मार्ग मराठीच्या जतन संवर्धनासाठी उपयुक्त ठरतो हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. त्या दृष्टीने युद्धपातळीवर विचारपूर्वक-व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रामाणिकपणे उपाय योजना राबवावी लागेल.
इस्त्राईलच्या धर्तीवर उपाय योजायला हवा :
इस्त्राईल या देशाची भाषा आहे "हिब्रू ". याच भाषेतून त्यांचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण अनिवार्य आहे. इंग्रजी ही संगणकाची भाषा आहे, या जागतिक गैरसमजाला खोटे ठरवत इस्त्राईलमध्ये अगदी उच्च दर्जाचे संगणक शिक्षण दिले जाते. याच्यातून हेच सिद्ध होते की भाषेच्या जतन-संवर्धनासाठी सर्वात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे 'पराकोटीची प्रामाणिक ईच्छा-महत्वकांक्षा'. अतिशय वेदनादायक गोष्ट म्हणजे आपल्याकडे त्याचाच दुष्काळ आहे.
एवढेच नव्हे तर इस्त्राईलमध्ये वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षण देखील हिब्रू भाषेतूनच दिले जाते. पीएचडी देखील त्याच भाषेतून करता येते. अगदी आधुनिक संगणक शास्त्र देखील’ हिब्रू’ तूनच दिले जाते. जे अन्य देशाला संभव आहे ते भारताला देखील अशक्य असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
केवळ शिक्षणासाठीच भाषेची अनिवार्यता नसून व्यावहारिक दृष्टिकोन ठेवत त्यांनी आपल्या देशात विविध कारणाने येणाऱ्या, स्थायिक होणाऱ्या नागरीकांसाठी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने 3 महिन्यांचा प्रशिक्षण कोर्स निर्माण केला आहे आणि त्याची उपलब्धी 100 टक्के असते हे विशेष.
महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी यायला हवी अशी केवळ वांझोटी अट ठेवण्यात काय हशील आहे. त्यासाठी इस्त्राईलच्या धर्तीवर अभ्यासपूर्ण व्यावहारिक दृष्टिकोनातून उपाय योजायला हवेत. (विविध व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त माहितीवर आधारित मत)
केवळ वृथा अभिमान नको, मराठीला शिक्षणाची भाषा बनवण्यासाठी प्रामाणिक कृती हवी :
भारतात "इंग्रजी भाषेचे शिक्षणाचे माध्यम म्हणून केले जाणारे अंधानुकरण" हे त्या त्या राज्यातील भाषेच्या अधःपतनाचे प्रमुख कारण आहे आणि मराठीच्या शैक्षणिक अधःपतनास ते लागू पडते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कुठलीही भाषा टिकवायची असेल तर ती प्रत्येकाला बोलणे-लिहण्याच्या पातळीवर अवगत असली पाहिजे. म्हणजेच ती शिक्षणाची भाषा असली पाहिजे. अर्थातच तीच भाषा शिक्षणाची भाषा म्हणून स्वीकारली जाते जी भाषा अर्थार्जनाची म्हणजेच नोकरीची भाषा असते. "भाकरीची भाषा" हीच शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकरण्याकडे कल असतो हे आपल्याला विविध देशाच्या भाषा विकासातून दिसते.
याचाच अर्थ हा की जर मराठी भाषेचे "जतन-संवर्धन" ही ज्यांची ज्यांची प्रामाणिक इच्छा आहे, तसा अभिमान आहे, तशी महत्वकांक्षा आहे, त्यांनी त्यांनी मराठी ही शिक्षण माध्यम म्हणून स्वीकारली जाईल यासाठी मराठीच्या उच्चीकरणासाठी आपले योगदान देणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, भाषेचा वृथा अभिमान हा भाषेला तारक नव्हे तर मारकच ठरतो आणि मराठी भाषेच्या बाबतीत तसा तो ठरतो देखील आहे.
इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजी ही अर्थार्जनाची एकमेव भाषा आहे व भविष्यात आपल्या पाल्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, हा गैरसमज आणि त्यास सामाजिक-व्यावहारिक-शैक्षणिक पातळीवरील मराठीची दुरावस्था.. हा गैरसमज दृढ होण्यास सरकारी पातळीवरील निष्क्रियतेचा मोठा हातभार आहे. या 'गांधारी प्रेमापायी'च अनेक पालकांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक कुवत नसतानाही इंग्रजी माध्यमातूनच शिकविण्याचा अट्टाहास दिसतो.
माहिती तंत्रज्ञान, संगणकाच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, याविषयी किंचितही दुमत नाही, परंतु त्यासाठी सर्वच शिक्षण इंग्रजीतूनच असायला हवे का? इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक की इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे आवश्यक यामध्ये प्राधान्य कुणाला द्यावयाचे यामध्येच मुळात आपल्याकडे गफलत झालेली दिसते.
मातृभाषेतून शिकणे ही नैसर्गिक गोष्ट आहे."TO LEARN ENGLISH IS A DIFFERENT THING AND TO LEARN IN ENGLISH IS A DIFFERENT THING हे वेळोवेळी अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी सांगितले आहे. पण ध्यानात कोण घेतो. अर्थातच यासाठी ती भाषा शिक्षण भाषा म्हणून समृद्ध असायला हवी हे वेगळे सांगण्याची गरज नसावी .
होय! मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य हवे ही सक्ती असून उपयोगी ठरणार नाही त्यासाठी मराठी भाषेतून कुठल्याही प्रकारचे शिक्षण उत्तम रीतीने घेता येऊ शकते हा दृढ विश्वास निर्माण करण्याकरिता सरकारने, मराठीचे तारहणार समजणाऱ्या प्रत्येकाने कृतियुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन मराठीतून केले तर आणि तरच "शिक्षणाचे माध्यम" म्हणून स्वीकार केला जाऊ शकतो. अन्यथा सक्तीची भाषा केवळ मगरीचे आश्रू ठरतील हे नक्की .
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
या वेदनेला हद्दपार करण्यासाठी आणिमराठीचा ‘झेंडा’ उंचावण्यासाठी भूतकाळात घडलेल्या चुकांपासून योग्य बोध घेऊन वर्तमानातील परिस्थितीस अनुरूप आणि भविष्याचा अचूक वेध घेणारे नियोजनपूर्वक शैक्षणिक धोरण आखावे व त्याची प्रामाणिक, कठोरपणे अंमलबजावणी करावी. तर आणि तरच भाषा म्हणून मराठीला भविष्य संभवते हे निश्चित .
दृष्टिक्षेपातील काही उपाय :
मराठी भाषेबाबत वृथा अभिमान हा मराठीला तारक नसून मारक आहे हे ध्यानात घेत संबंधितांनी मराठी भाषेचे भविष्य उज्वल बनवण्यासाठीचे उपाय योजायला हवेत. काही दृष्टीक्षेपातील उपाय असे :
- केजी ते पीजीचा अभ्यासक्रम, वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून निर्माण करण्यासाठी आवश्यक योजना.
- इंग्रजी शिकणे अणि इंग्रजी माध्यमातून शिकणे याविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जनजागृती व्हायला हवी.
- संगणकाशी जोडणारे तंत्रज्ञान (सॉफ्टवेअर्स) मराठी भाषेत उपलब्ध व्हायला हवीत. राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम केंद्रीय मंडळाशी समकक्ष असावा.
- मराठी माध्यमातून शिकूनही चांगले इंग्रजी येऊ शकते हा विश्वास येण्यासाठी पहिलीपासून शिकवणारा शिक्षक हा इंग्रजीचाच पदवीधर असावा.
- व्यावहारिक उपयोजिता” हा कुठल्याही भाषेवरील प्रेमाचा प्रमुख निकष असतो. यामुळे मराठीची उपयोजिता वाढवण्यासाठी तातडीचे उपाय योजावेत.
- बहुतांश पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग इंग्रजी माध्यमाचे आहेत. त्याचा परिणाम टाळण्यासाठी मराठीत दर्जेदार बालवाड्या उपलब्ध व्हाव्यात.
- इंग्रजी भाषेचा न्यूनगंड व भय दूर करण्यासाठी इंग्रजीस पूरक कार्यक्रम मराठी माध्यमाच्या शाळेत राबवावेत.
- समान संधीच्या अधिकाराचे जतन करण्यासाठी मराठी माध्यमाला सम बाजारमूल्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
- रोग जितका जटिल तितकाच त्याच्या निराकारणावरील उपाय देखील कठोर असणे अभिप्रेत असते या तत्वाने अगदी जालीम उपाय म्हणजे मराठी माध्यमाच्या सर्व संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकणे बंधनकारक करावे. स्वत:ला झळ बसल्यास आपसूकच दर्जा सुधारेल.