भारताचा स्टार क्रिकेटर राहुल द्रविडला 'द वॉल' म्हणून संबोधलं जातं. परंतु, तुम्ही भारतीय पुरुष हॉकी संघातील 'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया'ला ओळखता का? आज भारतानं जर्मनीवर मात करत 5-4 अशा फरकानं दणदणीत विजय मिळवला. पण एखाद्या अभेद्य भिंतीप्रमाणे उभ्या असलेल्या पीआर श्रीजेशशिवाय हा विजय शक्यच नव्हता. भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या सामन्यातील श्रीजेशच्या अभेद्य कामगिरीमुळेच सर्वांनी त्यांला 'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया' म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे. 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्यपदकासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात सामना रंगला होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. सामन्याचे शेवटचे सहा सेकंद काळाजाचा ठोका चुकवणारे होते. जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताच्या गोलपोस्टची अभेद्य भिंत असलेल्या पीआर श्रीजेशनं शिताफिनं जर्मनीचा गोल रोखला अन् भारतानं इतिहास रचला. 


आजच्या सामन्यात काही क्षण क्रिडारसिकांनी श्वास रोखला होता. पण गोलपोस्टवर भिंतीप्रमाणं उभ्या ठाकलेल्या श्रीजेशच्या कामगिरीनं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिला. श्रीजेशनं परवलेल्या गोलसोबतच भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तब्बल 41 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवण्यात संघ यशस्वी ठरला. पीआर श्रीजेशनं (PR Sreejesh) आपल्या अभेद्य खेळीनं आज क्रिडारसिंकाच्या मनात स्थान निर्माण केलंय. श्रीजेश संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहेच, पण त्यानं कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्त्वही केलंय. जवळपास 13 वर्षांच्या कारकिर्दीत श्रीजेशनं केवळ भारतीय हॉकी संघाला यशचं मिळवून दिलेलं नाही, तर त्यांनं गोलकिपर म्हणून स्वतःला सिद्धही केलंय. श्रीजेश 2014 साली एशियन गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या आणि 2014 साली कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या संघाचा हिस्सा होता. पण श्रीजेशचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी श्रीजेशला कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला. कधी कुटुंबाला सोडावं लागलं, तर कधी आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. पण श्रीजेशनं हार न मानता आपला संघर्ष सुरुच ठेवला. 


श्रीजेश भारतीय हॉकी संघात त्या भूमिकेत दिसतो, जी भूमिका कधी काळी राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघासाठी निभावत होता. द्रविडनं आपल्या संयमी आणि धमाकेदार खेळीमुळं भारतीय संघाला अनेक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आताही द्रविड भारताच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देतोय. पण अजूनही द्रविड लाईमलाइटपासून दूरच असतो. असाच काहीसा स्वभाव पीआर श्रीजेशचा. 


श्रीजेशही लाईमलाइटपासून दूरच... शांत आणि संयमी स्वभाव म्हणजे त्याची ओळख. अनेकदा महत्त्वाच्या वेळी संयमी भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं. काहीजण असतात जे दबावामध्ये गोंधळतात, अन् काही असतात दे दबाव असतानाही विचारपूर्वक निर्णय घेतात. भारतीय हॉकी संघासाठी श्रीजेशही तिच भूमिका निभावतो. अन् विरोधी संघाचा धुव्वा उडवतो. 


पीआर श्रीजेशला भारतीय हॉकी संघाचे माजी कोच हरेंद्र सिंह यांनी शोधून आणलं, असं सांगितलं जातं. हरेंद्र सिंह अंडर-14 च्या एका स्पर्धेतील श्रीजेशच्या खेळीमुळं प्रभावित झाले होते. 2004 मध्ये त्यांनं हरेंद्र सिंह कोच असताना ज्युनियर टीममध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अवघ्या चार वर्षातच श्रीजेशला सिनियर टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. संघात सामावेश झाला मात्र 2011 पर्यंत श्रीजेशला तशी फारशी संधी मिळाली नव्हती. परंतु, 2011 नंतरपासून श्रीजेशनं संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आपली जागा निर्माण केली. सध्याच्या भारतीय पुरुष हॉकी संघातील श्रीजेश हा सिनियर खेळाडू असून संघातील युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्थान आहे. 


श्रीजेशचा जन्म एका शेतकरी कुटुंबातला. पण सुरुवातीला हॉकी खेळण्याचं काही श्रीजेशचं स्वप्न नव्हतं. त्याला अॅथलेटिक्समध्ये काहीतरी करायचं होतं. त्यानंतर त्यानं वॉलीबॉल खेळण्यासही सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा स्तरावर धमाकेदार खेळी केल्यामुळं श्रीजेशला तिरुअनंतपुरमच्या स्पोर्ट्स सेंट्रिक स्कूलमध्ये शिकण्याची संधी मिळाली. पण इथे एक अडचणी श्रीजेशसमोर उभी राहिली. कारण शाळा त्याच्या घरापासून तब्बल 200 किलोमीटर दूर होती. पण श्रीजेशचा निश्चय पक्का होता. अवघ्या बारा वर्षाच्या श्रीजेशनं कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत अॅडमिशन घेतलं. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेणं श्रीजेशसाठी सोप नव्हतं. तेसुद्धा एका नव्या शहरात, जिथे कोणीही ओळखीचं नव्हतं. पण त्यानं मनाशी पक्क केलं आणि शाळेत अॅडमिशन घेतलं. तिथे खऱ्या अर्थानं श्रीजेशनं हॉकी खेळण्यास सुरुवात केली. श्रीजेशमधील  डिफेंडिंग पॉवर त्यावेळीच कोचला आवडली होती. त्यानंतर त्यांनी श्रीजेशला गोलकिपर म्हणून सराव करण्यास सांगितलं. अन् तिथूनच सुरु झाला श्रीजेशचा भारताच्या अभेद्य भिंतीपर्यंतचा प्रवास.