आकाशात काळे मिट्ट ढग... जोरात बरसणारा पाऊस... हिरवा शालू पांघरूण खुलून उटणारा भवतालचा परिसर... खळखळ आवाज करणारे नुकतेच प्रवाहित झालेले ओहळ... शिवाय, गारेगार असणारे वातावरण... अशारितीनं प्रवास सुरू होता. पाऊस जोरात असल्यानं चिंब भिजायला झालेलं. त्यात झाडाच्या आडाशोला चहाची टपरी दिसली. गाडी जणू आपोआप थांबली. "काका! दोन चहा. भजी आहो का ओ?" चहा ओतत असताना काकांनी हलकाच कटाक्ष टाकला. उत्तर मिळालं. बरं, द्या एक प्लेट. साधारण दहा मिनिटात भजी आली. तोवर चहा संपला होता. काका, आणखी एक एक कप द्या. वाफाळलेला चहा हातात आला, जोडीला गरमागरम भजी. गप्पा रंगल्या. अशातच मला जिभेला दिलेलं एक विशेषण आठवलं. 'चुटकुळी जीभ!' त्यानंतर मन झरझर बालपणात गेलं.


पावसाळा लागल्यानंतर शाळेत जात असताना पॅरागॉनच्या चप्पलला रबर लावून त्याचं पाणी कपड्यांवर उडणार नाही, अशी काळजी घेतलेली असायची. आडवे-तिडवे पाय टाकत पचपच आवाज काढत पाणी उडवण्याची मजा काही औरच... पण, आज हे दिवस आठवले, डोळ्यासमोर चित्र उभं राहिल्यानंतर मन हळवं होतं. अशावेळी काजू बी भाजून ती खाण्याची लगबग देखील असायची. अनेक जण तर फणसाच्या बिया उकडून किंवा भाजून खाण्यात व्यस्त असायचे. पण, वयानं मोठे झालो म्हटल्यावर या गोष्टी करायला फुरसतच नाही. कामाच्या निमित्तानं गावात अंतर पडलं. असं असलं तरी आठवणी मात्र कायम आहेत. ज्यामुळे मन सैरभैर होत गावाकडे धावतंय. दरम्यान, यामध्ये चुटकुळी जीभेचा किस्सा देखील एकदम भारी आहे. 


कोकणात वाडीनुसार लोकवस्ती असते. याच वाड्यांमध्ये असणारी पाणंद. या पाणंदमध्ये लाल लाल चिखल एव्हाना झालेला असायचा. शाळेतून सुटल्यानंतर दुपारी दीडच्या सुट्टीत पावलं सुसाट घरी पोहोचायची. मुख्य रस्त्याला लागून गोपाळ तात्यांचं घरं होतं. टिपिकल कोकणातील घर. मातीच्या भिंती आणि शेणाणं सारवलेलं घर. आमचं घर काहीसं पडक असल्यामुळे एक दिवस वादळी वारं असल्यानं या घरात राहायालो गेलो. नव्हे या घरातील आजी जिला मी मायेआये (माईची आई म्हणजे मायेआये ) म्हणायचो, ती धावत आली. वादळ जोरात होतं. त्यादिवसापुरता म्हणून आम्ही त्या घरात गेलो. पण, त्यानंतर ते घर तसं म्हटल्यास कायमचं आमचं होऊन गेलं. अगदी नवीन घर बांधल्यानंतर देखील गोपाळ तात्यांच्या (घरातील मुख्य व्यक्ती) घरी जाणं कायम राहिलं. या घरात तीन वयस्कर माणसं होती. गोपाळ तात्या, मायेआये आणि आत्ये (शांता आत्ये). रोजचं जेवण एकत्र होत असल्यानं आमची मज्जा आसायची. आत्येच्या हाताला असणारी चव अप्रतिम होती. मुख्य घरात वेगळ्या खोलीत आत्ये जेवण करायची. साधारणपणे रोज एक नवीन पदार्थ. त्यात हाताला चव असल्यामुळे आत्येकडून मिळणारं 'शेजाळपाळं' खाण्यासाठी चढाओढ असायची. शिवाय, आज आत्येकडे जेवणात काय आहे? याची उत्सुकता मनात असायची. अगदी शेवटपर्यंत दुपारी आणि रात्री अशा दोन्ही वेळा आत्येकडचं शेजाळपाळं मी न चुकता घेऊन जात असे आणि देत देखील असे. साधारणपणे रोज दुपारी दीड वाजता आणि रात्री आठ वाजता आत्ये जेवण उरकत असे. पण, त्यापूर्वी वाटी भरून शेजारपाळं मात्र असायचं. दरम्यान, कधी चव आवडली नाही तर, आत्ये आज काय असं केलीस? म्हटल्यावर आत्ये सहज बोलायची 'तुझी जीभ चुटकुळी आहे ना! तिला आवडलं नसेल'. उद्या देतो. त्यामुळे उद्या आत्ये काय बनवणार? याची देखील उत्सुकता असायची. साधारणपणे कोणत्या घरात काय शिजतंय? याचा गंध देखील घराच्या बाजुनं जाताना यायचा. कुणाची फोडणी करपली असेल ते देखील कळायचं. गावात एक वेगळेपण होतं. आपुलकीनं देण्याची आणि हक्कानं जाऊन जेवणाची पद्धत होती. काका-काकी, ताई-भावोजी, आत्या, मावशी, दाद-वैनी, भाऊ, आजी-आजोबा ही सारी मंडळी तितक्यात आपुलकीनं खाऊ घालायची. त्यात आपुलकी होती. मनातला गोडवा होता. मुख्य म्हणजे, कोणत्याही बंधनांशिवाय कुणाच्याही घरी जाऊन खाण्याची मुभा होती. का खाल्लास? हे विचारणारं कुणी नव्हतं. शेजारच्या घरात काही स्पेशल बनलं तर आपुलकीनं जेवायला देखील बोलावलं जायचं. सध्या चिकन, मटण हा रोजच्या आहाराचा एक भाग असला तरी 'कोंबड्याचं मटाण' आणि वडे म्हणजे खास बेत असायचा. चुटकुळी जिभेला हे सारं काही हवंहवंसं वाटायचं. कुणी जेवायला बोलावल्यास लगबग असायची. "आज जेवायला ये" म्हटल्यानंतर पुढचा सारा वेळ उत्सवी असायचा. आपुलकीनं जेवायला बोलवणं, आग्रहाणं खाऊ घालणं यामुळे नात्यांमध्ये दृढता होती. हॉटेलमध्ये जेवण ही बाब त्यावेळी खुप भूषण वाटायची. 


पण, सध्या हे चित्र बदललं आहे. घरात आर्थिक सुबत्ता आली. कामा-धंद्यासाठी गावाबाहेर पडावं लागलं म्हणून गाव ओस पडू लागलेत. एकत्र येणं, जेवण करणं या गोष्टी खूप कमी झाल्यात. गावाचं गावपण हरवत चाललं. रात्री उशिरापर्यंत असणारा माणसांचा राबता कमी झाल्यानं कधी काळी हवाहवाहवासा वाटणारा गावचा अंधार खायला उठतो. लोकांच्या गाठीभेटी दुर्मिळ झाल्या. गजबजलेलं गाव शांत होऊ लागलं. नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्तानं स्थलांतर वाढलं. त्यामुळे गाव, वाडी निर्मनुष्य होऊ लागली. त्यामुळे प्रत्येक घरात एक ते दोन माणसं अशी स्थित निर्माण झाली. त्यात म्हाताऱ्या माणसांचा भरणा अधिक. एकमेकांना आधार घेत आपल्या माणसांच्या वाटेकडे डोळे लावत ही माणसं घरात बसलेली असतात. घरोघरी टीव्ही आल्या डेली सोप बघून वेळ ढकलतात. अचानकपणे गावी गेल्यानंतर यापैकी कुणाला "भेटायाला वेळ मिळाला" तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान खुप काही सांगून जातं. याच माणसांच्या डोळ्यात प्रेम दिसून येतं. पण, धावपळीत हे सारं मागं सरत आहे. त्यामुळे खुप काही हातातून जात असल्याची भावना मनात घर करते. पण, त्याला पर्याय नाही. त्यामुळे गावी गेल्यानंतर 'चुटकुळी जीभ'च्या आठवणीत मन आजही गावातल्या त्या रस्त्यांवर काळ्याकुट्ट अंधारात जुन्या आठवणीत रमतं आणि रुंजी घालू लागते.