शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली....या ओळी आहेत कवी नारायण सुर्वे यांच्या. सारी हयात पोटाची खळी भागवण्यासाठी केली जाणारी धडपड कवीने अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.


नारायण सुर्वे यांच्या याच कवितेची आठवण काल दिवसभर येत होती. त्याचं कारण असं होतं, शुक्रवारी औरंगाबाद करमाडजवळ झालेल्या रेल्वेचा अपघात. हा अपघात कव्हर करताना छिन्नविछिन्न मृतदेहाचे तुकडे जितके वेदनादायी होते, तेवढ्याच वेदना देत होत्या अपघाताने रेल्वे पटरीवर विखुरलेल्या भाकऱ्या.. याच भाकरीसाठी हे मजूर साडे आठशे किलोमीटर कामासाठी आले होते. उद्या आपल्या घरच्यांसोबत जाऊन पोटभर जेवण करावं आपल्या लहानग्याला घास भरवावा, या इच्छेने ते चालत होते. इकडे कोरोनाचं संकट आहे. हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्याने गेलो तर पोलीस मारतील, इथेच थांबलो तर असेच मरु म्हणून ते 21 कामगार रेल्वे पटरीने चालत होते. 40 किलोमीटर चालल्यानंतर ते दमले, बसले आणि बसल्याजागी कधी झोप आली त्यांना कळले देखील नसेल. मनात एक विचार जी रेल्वे बंद आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या गावी जाता आलं नाही, ती रेल्वे तर बंद आहे. त्यांना एवढं समजतही नव्हतं की रेल्वे बंद आहे म्हणजे मालगाडी बंद नाही. सव्वा पाच- साडे पाचच्या दरम्यान धडधड करत मालगाडी आली आणि पापणी उघडेस्तोवर सोळा लोकांच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन गेली. हे प्रचंड वेदनादायी होतं. लॉकडाऊनच्या काळातील सर्वात वेदनादायी दृश्य होतं.



पण.. पण... एक विचार काही जात नव्हता तिथे विखरुन पडलेल्या भाकऱ्या. आपलं सगळं आयुष्य डोळ्यासमोर उभं करत होते. प्रत्येकाचं जगणं वेगळं, मात्र जगण्याचे ध्येय एकच ते म्हणजे भाकरी... त्या कामगारांचं त्या दिवसाचं दुर्दैव बघा, त्यांना गावी जायचं होतं, गाडी नव्हती.. रेल्वे नव्हती. काम हवं होतं ते पण नव्हतं. काम नाहीतर पैसे नाही अन् पैसे नाहीतर भाकर नाही. भाकर नाही तर जगणं नाही. पण या लॉकडाऊनमध्ये आपल्या नशिबी मरणच लिहून ठेवलंय हे त्यांना कसं माहित असणार? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युन्स, त्यांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्पेशल विमानाने अधिकारी आले. त्यांच्या मृतदेहासाठी रेल्वे गाडीत एक डबाही मिळाला. त्यामुळे प्रश्न पडला
जिवंतपणी या मजुरांना विचारणारे कोणीही नव्हतं पण मृत्यू झाल्यानंतर सरकारचे पन्नास-शंभर कर्मचारी शरीराचे विखुरलेले तुकडे एकत्र करण्यासाठी मात्र होते.



मजुरांच्या मृत्युनंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने पाच -पाच लाख रुपये देण्याची घोषणाही केली. पण हेच आधी मिळालं असतं तर?
बघा किती दुर्दैव आहे हे ते सगळे मजूर भाकरीसाठी गेले आता त्यांच्या पाठी राहिलेल्या कुटुंबातील इतरांसमोरही भाकरीचाच चंद्र मोठा झालेला असेल....