साधारण दुपारची वेळ असेल, काकू आजीने रेडिओचा कान पिळून मराठी गाण्यांचं कुठलसं स्टेशन लावलं होतं. मी तेव्हा साधारण चौथी-पाचवीत असेन. आमच्याघरी तेव्हा टिव्ही नव्हता, रेडिओ हीच काय ती करमणूक होती. मला त्यात अजिबात रस नव्हता. रेडिओवरच्या कार्यक्रमात एकीकडे निवेदिकेची त्याच नेहमीच्या सूरात बडबड सुरु होती, आणि दुसरीकडे नवीन रंगपेटी शोधण्यासाठी माझी खुडबूड सुरु होती. आजीला विचारलं तर तिने, बाबा रंगपेटी आणायला विसरल्याचं सांगितलं. झालं... तेव्हा काय, बाबावर रुसायला आणि नाक फुगायला मला तेवढसं कारणही पुरेसं होतं. बाबाशी अजिबात बोलायचं नाही, असं ठरवून मी दुसरं काहीतरी करु लागले होते. आणि तेव्हाच रेडिओवर गाणं सुरु झालं होतं. निवेदिकेने गाण्याची पार्श्वभूमी सांगितली होती. त्यामुळे लग्नात पाठवणीच्या वेळचं ते गाणं आहे, हे कळलं होतं. पण गाणं जसजसं पुढे जात होतं, तसतसं मनात काहीतरी विचित्र होत होतं, नेमकं काय होतंय हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण गाण्यातली एक ओळ ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं. ती ओळ होती 'परक्यापरी आता आम्ही, येथे फिरून येणे' गाणं होतं पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं 'दाटून कंठ येतो'. मी काकूआजीकडे पाहिलं तिच्याही डोळ्यात पाणी होतं. मी तिला मिठी मारली आणि आपण आयुष्यात कधीच लग्न करायचं नाही, असा एक बालनिर्णय तेव्हा माझ्या मनाने घेऊन टाकला होता. अर्थात रंगपेटी आणली नाही म्हणून काही वेळापूर्वी बाबाचा आलेला राग डोळ्यातल्या पाण्यात केव्हाच विरघळून गेला. बाबापासून दूर जातानाच्या भावना मांडताना शांताबाईंनी परका हा शब्द निवडून योग्य परिणाम साधलाच, पण त्या परिणामाला चिरंजीव केलं, ते पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांनी. माझी आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांची झालेली ती पहिली भेट.


त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर वसंतराव भेटत राहिले, कळत्या वयात अभिजात संगीताचं वेड लागलं आणि नाट्यसंगीताचं गारूड मनावर जादू करु लागलं होतं. अर्थात कॉलेजमध्ये असताना हिंदी मराठी सिनेमांमधल्या गाण्यांचंही तेवढंच वेड होतं. पण घरात एकटं असताना डिव्हीडीवर नाट्यसंगीत ऐकणं हा माझा छंद होता. अर्थात हा छंद जोपासला तो आई बाबांनी, त्यांनीच या सगळ्या रथी महारथींची ओळख करुन दिली. पण का कोण जाणे, नाट्यसंगीत म्हटलं की, मला सगळ्यात जास्त वेड लावलं ते पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे यांनी. कदाचित त्यांची शब्दप्रधान गायकी याला कारणीभूत असेल. आणि अशातच हाती एक हिरा लागला. हिरा काय, खजिनाच म्हणा ना. त्या खजिन्याचं नाव होतं. 'संगीत कट्यार काळजात घुसली' तेव्हा नाटकाचा नवा संच रंगमंचावर आला नव्हता, पण हे नाटक काय वादळ होऊन रंगभूमीवर वावरलं असेल, याची जाणीव मला त्यातली गाणी ऐकताना सातत्याने होत होती. मग वेगवेगळी पुस्तकं वाचत असताना कट्यार आणि त्यातलं खाँसाहेब हे पात्र वसंतरावांच्या आयुष्याला कशी कलाटणी देऊन गेलं याबद्दल ही बरचं काही वाचलं. त्यांचा संघर्ष अनेकांकडून ऐकला. 


कोणत्या कलाकाराला संघर्ष चुकलाय? केवळ कलाकाराला नाही, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला संघर्ष करावा लागलाय. असं म्हणतात माणसाचा संघर्ष त्याच्या जन्माआधीपासून सुरु होतो आणि तो अविरत सुरु रहातो. कोणाला यश मिळवण्यासाठी, तर कोणाला मिळवलेलं यश टिकवण्यासाठी, संघर्ष हा अटळ असतोच. आणि कलाकाराच्या हस्तरेषांमध्ये तर वेगळी संघर्षरेखा आखूनच विधात्याने त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं असतं, आणि त्या संघर्षरेषेवरचं मार्गक्रमण म्हणजे कलाकाराचं आयुष्य. आणि म्हणूनच वसंतरावांसारखा सच्चा कलाकार संघर्षामुळे खचला ही नाही, संघर्षाला कंटाळला ही नाही. पण कोणत्याही कलाकाराला नकोशी असते ती अवहेलना, त्याच्या कलेचा अपमान कलाकार कदापी सहन करु शकत नाही, पण वसंतरावांच्या बाबतीत विधात्याने तळहातावरच्या संघर्षरेषेसोबतच, त्यांच्या माथ्यावर अवहेलनेचा, समाजाच्या नकाराचा एक ठसठसशीत शिक्का मारलेला असावा असा अनुभव 'मी वसंतराव' हा सिनेमा पहाताना येतो. पण हात आणि माथा या दोहोंच्यामध्ये देवाने एक अलौकीक वरदान त्यांना दिलं होतं, त्यांच्या कंठात सप्तसूर कोरलेले होते. आणि म्हणूनच त्यांना समाजाच्या चौकटींची तमा नव्हती.


या सगळ्या कारणांमुळे 'मी वसंतराव' हा सिनेमा पहाण्याची उत्सुकता होती. सिनेमा सुरु होतो, झाकीर हुसैन यांच्या तबलावादनाने, आणि तिथेच सिनेमासाठी अपेक्षित माहौल तयार होतो. आणि मग वसंतरावांच्या फ्लॅशबॅकमध्ये सिनेमा पुढे जाऊ लागतो. 1920 ते 1983 चा काळ दिग्दर्शकाने आणि कलादिग्दर्शकाने ताकदीने उभारलेला आहे. संपूर्ण सिनेमा पहाताना आत्ताच्या काळातल्या खुणा कुठेही स्वतःचं अस्तित्त्व दाखवत नाहीत. कलाकारांचा साधेपणा आणि अभिनयतली सहजता ही या सिनेमाची दोन बलंस्थानं आहेत. सिनेमात नागपूरची असून अनिता दातेने विनाकारण संवादात कुठेही नागपूरी हेल काढलेला नाही, (माझ्या नवऱ्याची बायको या सिरिअलमध्ये तो असह्य झालेला होता, म्हणून हे आवर्जून लिहावंसं वाटलं.) सिनेमाच्या पहिल्या भागात सारंग साठ्ये, अमेय वाघ, आलोक राजवाडे ही सातत्याने सोशल मिडियावर भेटणारी मंडळी आपल्याला दिसतात. पण नेहमीच्या थट्टामस्करी पलिकडे आपण त्यांना कलाकार म्हणून पाहिलं पाहिजे, तरच त्यांच्या भूमिका आपल्याला कळू शकतील, नाहीतर सिनेमाचा तो भाग भाडीपाचं एक्सटेंडेड व्हर्जन वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. मा. दिनानाथ मंगेशकरांच्या भूमिकेसाठी अमेय वाघची निवड मला निपूणची दिग्दर्शकीय दृष्टी किती पक्की आहे हे दाखवून गेली. ती निवड अगदी चपखल वाटली. पुष्कराज चिरपूटकरबद्दल काय बोलावं? त्याने साकारलेले भाई पाहून जेवढे प्रेक्षक सुखावले तेवढेच पु.लं. ही सुखावले असतील. जेवढा आनंद पु.लंनी दिलाय, त्याच्या जवळपास पोहोचण्याचा पुष्कराजचा प्रयत्न यशस्वी झालाय, असं म्हणायला हरकत नाही. पु.लं.ची भूमिका साकारण्यासाठी त्यांच्यासारखं दिसलं नाही तरी चालेलं, पण त्यांच्यासारखं निखळ, आणि मिष्किल असलं पाहिजे. मला असं वाटतं, पुष्कराजची हीच जमेची बाजू आहे. 


संगीत हा वसंतरावांचा जीव होता, त्यामुळे त्यांचा चरित्रपट मांडत असताना त्या चित्रपटाचा आत्मा संगीतच असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सिनेमाचं संगीत प्रवाही आहे, जसं वसंतरावांचं होतं...या सगळ्यात जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, जेव्हा जेव्हा वसंतरावांच्या आयुष्यात कठीण प्रसंग उभे ठाकले, तेव्हा तेव्हा मागे 'राम राम राम राम, जप करी सदा' या गाण्याची धून वाजली, आणि 'सदा संकटी देव धावूनी येई' या ओळीची प्रकर्षाने आठवण आली. कदाचित हाच परिणाम साधण्यासाठी तसं प्रयोजन करण्यात आलं असेल. त्याकाळातली गाणी, आणि त्या काळाला पुरक अशी नवी गाणी यांचा मेळ उत्तम जमून आलाय. आणि याचं श्रेय संगीतकाराइतकं गीतकारालाही द्यायला हवं. विठ्ठला दर्शन देऊन जा आणि कैवल्यगान ही गाणी, त्यातले भाव म्हणजे कळस आहेत. याचं श्रेय जातं ते वैभव जोशी यांना. पांघरुण सिनेमातही संतरचनांच्या जवळ जाणारी शब्दरचना या अवलियाने केलेली आहे. काही कवींच्या हातून निर्माण झालेल्या रचना ऐकताना त्या कवीचा हात डोक्यावर ठेऊन घ्यावा, आणि त्याच हातांवर अलगद आपले ओठ टेकवावे हे दोनही भाव एकाच वेळी निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे वैभव जोशी. तेरे दरसे कोई कहाँ जाए इथपासून ते, ले चली तकदीर हा सिनेमातला वसंतरावांचा प्रवास, प्रेक्षक म्हणून आपल्याला, आपल्याही नकळत सिनेमातल्या एका वेगळ्या प्रवासाला घेऊन जातो.


भाई आणि वसंतरावांचं मैत्रीतलं अद्वैत आनंद देतं, आणि मैफल संगीताची असो किंवा आयुष्याची योग्य संगत कशी महत्त्वाची असते हे दाखवून देतं. वसंतरावांच्या आयुष्याला भाईंचा स्पर्श झाला नसता तर, कचेरीत कारकूनी करता करता वसंतरावांमधला कलाकार निद्रिस्तच राहिला असता, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून गेला असता. संगत योग्य असेल तर आयुष्य कसं रंगत जातं हे भाई आणि वसंतरावांच्या मैत्रीतून या सिनेमाने दाखवलं आहे. पु.लं. देशपांडे आणि वसंतराव यांच्या पहिल्या भेटीचा क्षण. जिथे ललना न भेटली हवी तशी हे गाणं सिनेमात आहे. या प्रसंगात वसंतरावांच्या तोंडात पान आहे, मैफल सुरु होते, पु.लं. गात असतात, वसंतराव त्यांना दाद देत असतात. दाद देत असताना तोंडात पान असलेला माणूस ज्या पद्धतीने बोलेल, तसं वसंतराव बोलताना दाखवलेत. (म्हणजे प्रवाशाला लेफ्ट का राईट विचारताना युपीचा रिक्षावाला विचारेल तसं) पण याच गाण्यात जेव्हा वसंतराव गायला लागतात तेव्हा तोंडात पान असूनही अगदी स्पष्ट आणि स्वच्छ गातात, जिथे पु.लं.ना वसंतरावांमधल्या गायकाची पहिल्यांदा जाणीव होते. त्या प्रसंगात, वसंतराव पान न खाता आले असते तरी चाललं असतं असं वाटून गेलं. 


 मालकंस हा माझा आवडता राग आहे, मालकंसी माहौलच वेगळा असतो, पण या सिनेमात ज्या पद्धतीने मारवा मांडलाय, समोर आलाय, ते ऐकता एकदातरी मारवा तल्लीनतेने अनुभवावा असं वाटून गेलं. दिनानाथ मंगेशकर प्रयोग संपवून येताना त्यांच्याभोवती चाहत्यांची गर्दी असते, त्या गर्दीतून वसंतरावांचा मामा, त्यांना खेचत आणून दिनानाथांसमोर उभं करतो, वसंतरावांच्या आयुष्याला वळण देणारा हा एक क्षण, तर लाहौरमध्ये दंगल उसळल्यावर गर्दीतून वाट काढत वसंतरावांना मामाच ट्रेनमध्ये चढवतो, आणि पुन्हा महाराष्ट्रात पाठवतो, तेव्हाही वसंतराव एका वेगळ्या वळणावर उभे असतात, पण दोन्हीवेळा गर्दीतून वाट काढत, पुढची वाट दाखवत, त्यांना मार्गस्थ करणारा मामाच आहे, दोन्ही प्रसंगातला हा सामाईक धागा जर कळला, तर वेगळा आनंद देऊन जाणारा आहे. 


 कोणत्याही कलाकाराचं जगण्याचं स्वतःचं असं एक सूत्र असतं. 'माझं घराणं देशपांडे, माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं' हे वाक्य वसंतरावांच्या केवळ जगण्याचं सूत्र नव्हतं, तर तो त्यांच्या संगीतातून निर्माण झालेला, त्यांनी स्वतः सिद्ध केलेला मंत्र होता. या वाक्याला सिनेमात अधिक पोषक प्रसंग हवा होता, जरा जास्त न्याय मिळायला हवा होता, असं सिनेमा पहाताना सतत वाटतं राहिलं. सिनेमामध्ये वसंतचा वसंतराव झाला पण त्यांच्या नावापुढे किंवा त्यांचा नामोल्लेख करताना कधीच पंडित ही बिरुदावली का वापरली गेली नाही हा ही प्रश्न पडतो.


एका लग्नात गाण्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर वसंतराव तिथे गायला जातात, तो कार्यक्रम झाल्यावर वसंतरावांपेक्षा निम्म्या वयाचा मुलगा जो या कार्यक्रमाचा यजमान आहे, तो वसंतरावांना येऊन असेच गात रहा असं सांगतो. त्याचं वय आणि ज्या अधिकाराने तो वसंतरावांना सांगतोय याचा मेळ तितका जमत नाही, आणि ते डोळ्यांना आणि कानांनाही खटकतं. 


कोणताही कवी एका कवीतेसाठी जगत असतो, जी त्याला अजरामर करतो, कोणताही गायक एका मैफीलीसाठी जगत असतो, जी त्याला रसिकांच्या मनात अढळ स्थान देते, आणि कोणताही कलाकार एका भूमिकेसाठी जगत असतो, ज्याच्यामुळे ती भूमिका आणि त्या भूमिकेमुळे तो कलाकार अजरामर होतो. अशी एक भूमिका वसंतरावांच्या आयुष्यात चालत आली ती कट्यारमधल्या खाँसाहेबांची. या भूमिकेने वसंतरावांच्या आयुष्याच्या मैफिलीली चार चाँद लावले. या नाटकाच्या शेवटावरुन दारव्हेकर मास्तर आणि वसंतराव यांच्यात वाद झालेला दाखवला आहे, आणि हा वाद मिटत असताना दारव्हेकर मास्तर आपल्या हातातला चहाचा कप वसंतरावांच्या हातात देतात. जणू काही ते सांगू पहातात वसंतराव – 'It's your cup of tea' सिनेमातला हा डिरेक्टर्स शॉट फार आवडला. 


खाँसाहेब ही भूमिका वसंतरावांनी अजरामर केली कारण खाँसाहेबांनी जे भोगलं, जी उपेक्षा, जी अवहेलना त्यांनी सहन केली त्या सगळ्या यातना वसंतरावांनी उभ्या जन्मात याची देही याची डोळा अनुभवलेल्या आहेत, आणि म्हणून या भूमिकेत त्यांनी त्यांचे पंचप्राण ओतलेले आहेत. वसंत ते वसंतराव हा प्रवास करताना त्यांनी अगणिक घाव सोसलेत, नावात जरी वसंत असला तरी त्यांच्या आयुष्यातला शिषिर जरा जास्तच लांबला असं राहून राहून वाटतं. वाटेवर काटे वेचित चाललो, वाटले जसा फुलाफुलात चाललो. हे गाणं केवळ गायक म्हणून वसंतराव गायले नाहीयेत, तर एक माणूस म्हणून त्या गाण्यातले शब्दही वसंतराव जगलेले आहेत...वसंतरावांचं गाणं,  म्हटलं तर वादळ आहे, म्हटलं तर हवेची थंड झुळूक आहे, तुम्ही कसा अनुभव घेता यावर सगळं अवलंबून आहे.


राहुल देशपांडे हा सर्वोत्तम अभिनेता नसेलही कदाचित, पण जर आजोबा गायन आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात लीलया वावरू शकतात, तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाणारा त्यांचा हा नातू निश्चित ते करू शकतो. आणि म्हणूनच वसंतरावांची भूमिका साकारण्यासाठी राहुल पलीकडे दुसऱ्या कोणाचा चेहरा डोळ्यासमोर येत नाही. 


सध्याच्या काळात जराशा यशाने हुरळून जाणाऱ्या, आणि अपयशासमोर गुडघे टेकणाऱ्या, रिएलिटी शोज मधून खोट्या प्रसिद्धीच्या मृगजळात अडकलेल्या प्रत्येकाने हा सिनेमा पहावा, आणि आपण नेमकं कुठे आहोत, हे स्वतःपाशी एकदा तपासून पहावं.


शेवटी एकच सांगेन. सिनेमागृहात प्रवेश करताना 'कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर' अशी काहीशी मनोवस्था होती, आणि बाहेर येत असताना कैवल्यगान ऐकून एक वेगळी तृप्तता मनावर पसरलेली होती.