6 जून ते 9 जून. तब्बल 10 वर्षांनी कोकणच्या (Konkan News) भूमीतला गंध अनुभवला. मुख्य म्हणजे कोकणातल्या लग्नाची लगबग, अंगणातला मंडप सजवण्यापासून ते श्रीसत्यनारायण पूजेपर्यंत सारं काही अनुभवलं. सावंतवाडीजवळच्या न्हावेलीतल्या रेवटेवाडीत मावसभावाच्या अक्षयच्या लग्नानिमित्ताने कोकणातल्या खास वातावरणाचा आस्वाद घेतला. होय, कोकणातल्या खास पदार्थांचा आस्वाद घेतो, तसा इथल्या वातावरणाचा, इथल्या नात्यातल्या ओलाव्याचाही आस्वाद घ्यावा लागतो. तो अनुभवला.


या लग्नानिमित्तानं आईची मावशी, मामाची मुलं म्हणजे आमचे मामा, मामी, मावशा, भावंड, मावशी आजी हे सारे एकत्र आले. खरं तर अक्षयच्या मोठ्या भावाच्या अश्विनच्या लग्नावेळी सुमारे 10 वर्षांपूर्वी तिथे गेलो होतो. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी तिथे जाण्याचा योग आला. विमानाने कोकण गाठण्याचीही ही पहिलीच वेळ.


आम्ही कोकणात गेलो, तेव्हा कोकणात पावसानं वर्दी दिली नव्हती. फोर व्हीलरनं लग्नघर गाठताना विस्तीर्ण पसरलेलं निरभ्र आकाश डोळ्यात भरभरून साठवत होतो, त्याच वेळी रेवटेवाडीकडे जात असताना ऊन मी म्हणत होतं, तरीही कोकणच्या भूमीत असल्यानं दाट झाडी डोलत होती. यामध्ये आंबा, काजू, वड यासारखी झाडं होती. वळणाच्या रस्त्यानं जात असताना मध्येच उतरण आल्यावर चहूबाजूचे वृक्ष, किंवा मध्येच एखादा छोटी डोंगरसदृश चढण सूर्य  झाकत होती, पारा खाली जात होता आणि सावलीचा सुखद गारवा काही क्षण का होईना पण, सुखावत होता. झाडांचं एक बरं असतं, झाडं तापत असली तरी आपल्याला गारवाच देतात. गावच्या रस्त्यांवर झाडांची गर्दी तर इथे आपल्या शहरात माणसांची, वाहनांची गर्दी हाही फरक लगेच लक्षात आला.




तिथे पोहोचतानाचा मधला थोडा रस्ता असमान होता, म्हणजे टिपिकल गावच्या रस्त्यासारखा, थोडा खडकाळ, थोडासा गाडीची आणि ड्रायव्हरची परीक्षा घेणारा. तसंच गाडीत बसलेल्यांच्या हाडांची थोडी टेस्ट ड्राईव्ह घेणारा. लग्नाच्या दोन दिवस आधीच लग्नघरी पोहोचलो, तेव्हा लग्नाची वातावरण निर्मिती झालेली होती, म्हणजे मंडपाचे  वासे बांधले होते, ज्याला सुशोभित करण्यासाठी काही पानं गुंफण्यात आली. साहजिकच माझं कुतूहल चाळवलं. मी अधिक विचारलं असता, ही भेदला माडाची पानं, असं मला सांगण्यात आलं. आपण जे पुष्पगुच्छ देतो ना, त्यामध्ये फुलांच्या मागे जे गुच्छाची सजावट खुलवत असतात त्यामध्ये या पानांचा वापर होतो. मुंबईत भाव खाऊन जाणारी ही पानं. तिथे कोकणात मात्र मुबलक उपलब्ध असतात. मंडप या सजावटीने खुलून दिसत होता. रांगोळीनंही मंगल वातावरणाचे रंग खुलवले.




मग देवक, पुण्यवचनाचा दिवस आला. लग्नाआधीचे विधी पार पडत होते, दुसरीकडे एकेक नातेवाईक येत होते. गावचे मामा, मामी, मावशी. बरेचसे साठी ओलांडलेले. पण, एकत्र जमल्यानं जणू तरुण झालेले. सारेच एकमेकांना कडकडून भेटत होते. लग्न हे निमित्त होतं, सारेच शब्दांच्या पानांनी आठवणींचा अल्बम उलगडत होते. अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही कालपरवा भेटल्यासारख्याच सहजतेने भेटत होते, कोकणच्या मातीत जसा ओलावा तसाच इथल्या नात्यांमध्येही.


काही जण डोळ्यांनी बोलत होते. अनेक दिवसांनी भेटत असल्याने, एकमेकांशी बोलत असल्याने डोळ्याचा किनारा मध्येच समाधानाच्या, आनंदाच्या अश्रूंनी हलकासा ओलावत होता. कौलारु घर, बाजूला मोठ्ठं खळं. समोर आटोपशीर अंगण. बाजूला फणस, आंब्याची झाडं सोबतीला. अशा मोहावणाऱ्या वातावरणात आपली माणसं, कोकणच्या भूमीत दिलखुलास भेटत होती, मध्येच कोकम सरबत, गावचा खास चिवडा यांची खाद्यजत्रा लग्नोत्सवाचा उत्साह द्विगुणित करत होती. हे सगळे क्षण जमेल तसे मी फोटोमध्ये आणि मनामध्येही साठवत होतो. एक चांगलं झालं होतं, की, आम्ही ज्या भागात होतो, तिथे मोबाईलला अजिबात नेटवर्क नव्हतं. त्यामुळे कॉल्सचं इनकमिंग, आऊटगोईंग बंद होतं. पण, एकमेकांसोबतच्या क्षणांच्या आठवणींचं, गप्पांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग फाईव्ह जीच्या वेगाने सुरु होतं.


कोकणात तेव्हा पावसाचा मागमूस नव्हता. सूर्यही तेजानं तळपत होता, तरी घराच्या आजूबाजूनं असलेल्या झाडांच्यामधून मध्येच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेमुळे पानांची सळसळ व्हायची, जी सनईइतकीच मधुर वाटत होती. एरवी कर्कश्श हॉर्नचा आवाज ऐकून त्रासणारे आम्ही मुंबईकर, निसर्गाचं हे संगीत ऐकून सुखावत होतो.


तिथे उपस्थित असलेल्या सर्व मामांना आणि मामींना एकत्र करुन फोटो काढला. माझ्या आईची मावशी, आजीची सख्खी बहीण म्हणजे ती माझीही आजीच, ती खास कुडाळहून आली होती. ती येणार कळलं तेव्हा आनंद झाला. बऱ्याच दिवसांनी कुणाला तरी आजी म्हणायला मिळणार म्हणून. कुडाळहून ती तिथे दाखल झाली, तेव्हा तिला आणायला गाडीतून उतरुन घ्यायला गेलो. तेव्हा तिला पाहून छान वाटलं. तिला हाताला धरुन घरी नेत असताना या आजी मंडळींनी आमच्या लहानपणी आम्हाला हाताला धरुन कसं मोठं केलं असेल ते क्षण मनात फेरी मारुन गेले. त्या आजीकडे मी आप्पे खाल्ल्याची आठवण तो क्षण अधिक गोड करुन गेली. आजी वयपरत्वे लग्नाला येऊ शकणार नव्हती. पण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. आशीर्वाद द्यायला आणि आम्हाला भेटायलाही.


ही म्हातारी माणसं अनुभवाचं, ज्ञानाचं भांडार असतात. ती बोलत असताना आपण उत्तम श्रोता व्हावं, एखाद्या पुस्तकात किंवा सर्च इंजिनमध्येही मिळणार नाही, असं काहीतरी आपल्याला देऊन जातात. त्यांच्यासोबतचे थोडेसे क्षणही मोठी ऊर्जा देऊन जातात. या दिवसासह पुढचा लग्नाचा आणि त्यानंतरचा श्रीसत्यनारायण पूजेचाही दिवस, त्यातला प्रत्येक तास, मिनिट भरभरुन जगलो. आईबाबा, बायको-मुलगी यांच्या साथीने.


कोकणातलं वातावरण, इथली माणसं गोड आहेतच. तसेच इथे जिभेचे चोचलेही तितक्याच आपलेपणाने पुरवले जातात. लग्नोत्सवाच्या चार  दिवसात मनगणं, खतखतं, केळीचे काप आणि हळसांदा काजू भाजी असे रुचकर पदार्थ चाखले. प्रत्येकाची खासियत निराळी. मनगण्याची गोडी जिभेवर रेंगाळणारी. खीरच ती. वेलची, जायफळाचा गंध, तुपाचा रवाळपणा खाण्याची लज्जत वाढवणारा.


हळसांदा काजू भाजी हा एक नवा पदार्थ चाखला. ज्याला आपल्याकडे फजावची भाजी म्हणत असल्याचं मामेभाऊ घन:श्यामने सांगितलं. तिसरा इंटरेस्टिंग पदार्थ होता केळीचे काप. रव्याची झालर लागल्याने अत्यंत सुंदर दिसत होते आणि स्वादिष्ट लागत होते.


तर, आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेली भाजी म्हणजे खतखतं. शेंगदाळा, भोपळा, फरसबी अशा भाज्यांची संगतीला मक्याची कणसं, असा कमाल जुळून आलेला मेळ.  आता लिहितानाही तोंडाला पाणी सुटतंय आणि अर्थातच जेवणाच्या या  मैफलीची सांगता करताना ताक, मठ्ठा आणि सोलकढीची तृप्त करणारी भैरवी. मुख्य मैफलीइतकीच चवदार. म्हणजे ताक किंवा मठ्ठा गावच्या घरच्या ताज्या दुधाच्या दह्याचा. तर, सोलकढीही गावच्या कोकमांची. त्यावर भुरभुरलेला ओला नारळ, त्याची चव आणखी खुलवणारा.




हे चार दिवस यायची खूप वाट पाहिली, पण ते कापरासारखे भुर्रकन उडून गेले. श्रीसत्यनारायण पूजेचं प्रसाद भोजन करुन आम्ही सर्व  निघालो. त्या वातावरणाचा आणि गावच्या नातलगांचाही निरोप घेऊन. पानांची सळसळ एव्हाना बोलू लागली होती. तशाच मंडपातल्या गप्पा, ते सारे क्षणही रिवाईंड होत होते. ते फोटो, ते एकमेकांना कडकडून भेटणं. सगळं पुन्हा जगायचं होतं. पण, आता परतीची वेळ आली होती.  भरलेल्या डोळ्यांनी आणि भारलेल्या मनाने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. गाडी पुढे जात होती आणि मन मागे...