टी-ट्वेन्टी विश्वचषकाचा (T20 World Cup) थरार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. माहीच्या अर्थात धोनीच्या (MS Dhoni) टीम इंडियाने (Team India) 2007 मध्ये केलेल्या विश्वविजयाच्या पराक्रमाची पुनरावृती करायची असेल तर सध्याच्या संघाला दोन अडथळे पार करायचेत. यातली पहिली सेमी फायनलची लढाई गुरुवारी रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही काळात विशेषत: वनडेचा वर्ल्डकप जिंकल्यानंतर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या इंग्लिश आर्मीशी आपल्याला भिडायचंय.
बटलर, मलान, स्टोक्स, हेल्स सारखी ताकदवान बॅटिंग लाईनअप त्यात करन, मोईन अली, वोक्ससारखे ऑलराऊंडर्स तर वूड, मिल्स, रशीदसारखे गोलंदाज यामुळे इंग्लंडची टीम सर्वसमावेशक ताकद राखून आहे. आयर्लंडविरुद्धची डकवर्थ लुईस नियमावर गमावलेली मॅच वगळता इंग्लंडचा परफॉर्मन्स सफाईदार राहिलाय. त्यात त्यांच्या वेगवान गोलंदाजीची ताकद पाहिल्यास ऑसी खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजीची ते तिखट परीक्षा घेऊ शकतात. या गोलंदाजांना असलेली उंची पाहता या वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजीसमोर ते काही आव्हानं नक्की निर्माण करु शकतात. भारताची आघाडीची फळी विरुद्ध इंग्लंडचं धारदार वेगवान आक्रमण असा हा सामना असेल.
भारताचा या स्पर्धेतील परफॉर्मन्स लक्षात घेतला तर दक्षिण आफ्रिकेसमोरची मॅच आपण गमावली, त्याआधी पाकिस्तानची मॅच पराभवाच्या जबड्यात हात घालून कोहलीने खेचून काढली. म्हणजे दोन तगड्या टीम्ससोबत आपला घामटा निघालाय. याउलट बांगलादेश, झिम्बाब्वे आणि आयर्लंड या तुलनेने कमी ताकद आणि अनुभव असलेल्या संघांना आपण धूळ चारली. त्यात बांगलादेशच्या मॅचलाही आपल्याला टेन्शन आलं होतं. या साऱ्या बाबींचा विचार केल्यास इंग्लंडचा पेपर सोपा नाही. आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल, ही नॉकआऊट स्टेज आहे. एकदाही चुकलात तरी तुम्ही हुकलात अशी स्थिती आहे. आपल्या फलंदाजीतील तोफा चालल्या तर इंग्लंडच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवू शकतात. कोहलीचं सातत्य, सूर्यकुमारचा भन्नाट फॉर्म याने आपली ताकद दुणावली असली तरी सलामीच्या जोडीवर बरंच काही अवलंबून असतं. सूर्यकुमारची तुलना एबीडीशी अर्थात 'मिस्टर 360' शी होऊ लागलीय. अर्थात एबीडीनेही त्याला ही तुलना होण्यास हरकत नाही, असं म्हटलंय. त्याच वेळी सूर्याने कामगिरीत सातत्य आणायला हवं, असा सल्लाही दिलाय. तेव्हा गुरुवारच्या मॅचमध्ये हा सूर्य तळपला तर इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये अस्त होण्यासाठी मदतच होईल. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू लीलया भिरकावण्याची एबीडीसारखीच क्षमता सूर्यकुमारमध्ये आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीचे चटके दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना बसले तर आपलं काम सोपं होईल.
हे होत असतानाच खेळाच्या तिन्ही अंगांमध्ये 200 टक्के कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीतही ग्रिप सुटू देऊन चालणार नाही. पाकविरुद्धच्या सामन्यात 120 ला 7 वरुन बाबरच्या टीमने 159 चं टार्गेट गाठलेलं. तर दक्षिण आफ्रिकेविरोधात आपण पाच बाद 49 असे कोसळलो होतो, तिथून रिकव्हर होऊच शकलो नाही. या दोन्ही परफॉर्मन्सच्या कटू आठवणी मागे सारत आपल्याला खेळायचंय. गोलंदाजीत सामन्यागणिक सुधारणा करणारा अर्शदीप, अनुभवी शमी, आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर सुधारत असलेला पंड्या आणि फिरकी गोलंदाजीची गाठ बटलर अँड कंपनीशी आहे. बटलर हा आपल्या वाटेतला मुख्य काटा आहे. त्याला न फुलू देणं याची जबाबदारी गोलंदाजांना घ्यावी लागेल. त्यासाठी पॉवर प्लेमधील गोलंदाजांची निवड, त्यांच्या ओव्हर्समध्ये लुटल्या जाणाऱ्या धावा या सामन्याचा निकाल ठरवणाऱ्या असू शकतात. यामुळे काही वेगळे डावपेच आखले जातात की, नियमित वेगवान गोलंदाजांनीच आपण सुरुवातीच्या सहा षटकात गोलंदाजी करणार हे पाहावं लागेल. एकूणातच पूर्ण 40 ओव्हर्स सामन्यावरची पकड ढिली न होऊ देणं यावर फोकस ठेवूनच खेळावं लागणार आहे. दबावाच्या क्षणी जो बर्फासारखं टेम्परामेंट दाखवेल तो रविवारी मेलबर्नला खेळेल. तो संघ आपलाच असेल, अशी अपेक्षा करुया.