68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) घोषणा झाली. तमिळ सिनेमा 'सूराराई पोट्ट्रू'नं (Soorarai Pottru) सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा बहुमान मिळवत सुवर्ण कमळावर आपलं नाव कोरलं. याच सिनेमाला तब्बल 5 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेता सूर्या, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अपर्णा बालामुरली, सर्वोत्कृष्ट पटकथा सुधा कोंगारा यांना तर जी. व्ही. प्रकाश यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा राष्ट्रीय पुरस्कारही सूराराई पोट्ट्रू चित्रपटाला जाहीर झाला. पुरस्कार मिळाले की, आपल्याकडे चित्रपट पुन्हा चर्चेत येतात. थोडावेळ हे बहुमान आणि पुरस्कार बाजूला ठेवा. एक चित्रपट म्हणून 'सूराराई पोट्ट्रू' हा सिनेमा अत्यंत महत्वाचा आहे, कारण ही एका अतिसामान्य माणसानं खिजगणतीतही नसलेल्या लोकांसाठी पाहिलेल्या असामान्य स्वप्नांची कहाणी आहे. आयुष्य जगताना समान संधी आणि समान अधिकार फक्त संविधानाच्या पुस्तकातच असतात. प्रत्यक्षात संधी आणि अधिकार मिळवण्यासाठीचा संघर्ष किती जीवघेणा असू शकतो हे सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. धन आणि संपत्तीच्या जोरावर कायद्यांना लाल फितीत घट्ट बांधून अडगडीत टाकणाऱ्या मुठभर लोकांविरोधात उभ्या राहणाऱ्या एका योद्ध्याची ही कहाणी आहे. ही कहाणी आहे फक्त एका रुपयात भारतीयांचं विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण करणारे एअर डेक्कन एअरलाईन्सचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांची.
आजही भारतातल्या गावाखेड्यात शेतात काम करणारे मजूर आणि शेतकरी आकाशात विमान दिसलं की, दोन घटका थांबतात. विमानात बसण्याची इच्छा त्यांच्याही मनात येत असणार. समाजातल्या याच शेवटच्या घटकाचं हे स्वप्नं कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी पूर्ण केलं. कॅप्टन गोपीनाथ यांचा संघर्ष दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांच्या वाचनात आला. त्यानंतर त्यांनी या सिनेमाची कथा लिहिली. 'सिंपली फ्लाय- अ डेक्कन ओडेसी' या पुस्तकात कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी स्वतः आपला संघर्ष शब्दबद्ध केला आहे. सूराराई पोट्ट्रू हा सिनेमा या जीवनसंघर्षाचं चलचित्रस्वरूप आहे.
गोरूर रामास्वामी अय्यंगार गोपीनाथ (जी. आर. गोपिनाथ) यांचा जन्म कर्नाटकातल्या हासन जिल्ह्यातल्या गोरूर गावात झाला. सैनिकी शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या एनडीएमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर ते सैन्यदलात सामिल झाले. 8 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना कॅप्टनपदही मिळालं. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्यांना सेवानिवृत्ति घेतली. त्यानंतर त्यांनी शाश्वत शेतीची कास धरत पर्यावरणीय शेतीची संकल्पना राबवली. शेतात बैलगाडी हाकणाऱ्या याच हातांनी शेतात राबणाऱ्या शेतकरी आणि मजूरांसाठी विमानांची निर्मिती केली. कॅप्टन गोपीनाथ यांच्या कास्टलेस आणि कॉस्टलेस विमानप्रवासाच्या संकल्पनेनं एअरलाईन्स क्षेत्रात क्रांती घडवली.
एअरलाईन्स कंपन्यांची मक्तेदारी, डीजीसीएसारख्या सरकारी संस्थामधले भ्रष्ट अधिकारी, कॉर्पोरेट जगाशी संधान बांधून अव्वाच्या सव्वा तिकिट दर आकारणाऱ्या विमान कंपन्या आणि या चक्रव्यूहात व्यवस्थेविरोधात नायकाचा लढा. याचं वेगवान चित्रण सूराराई पोट्ट्रू सिनेमात आहे. एक लक्षात घ्या, की हा सिनेमा जी. आर. गोपीनाथ यांच्या जीवनसंघर्षापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलाय. यामध्ये दिग्दर्शकानं सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरेपूर वापर केलाय. कॅप्टन गोपीनाथ यांनी स्वतःची विमान कंपनी स्थापन करण्यासाठी जो असामान्य लढा दिला तो सुपरस्टार सूर्यानं मोठ्या मेहनतीनं साकारलाय. सिनेमात जी. आर. गोपीनाथ यांच्या पात्राचं नाव मारन आहे.
जैझ एअरलाईन्सचा मालक परेश गोस्वामी (परेश रावल) जेव्हा मारनला (सूर्या) म्हणतो, "रतन टाटांना ओळखतोस का? देशाचे सर्वात मोठे उद्योगपती, त्यांनीही स्वत:च्या एअरलाईन्स कंपनीचं स्वप्नं पाहिलं होतं. पण ते अजून पूर्ण करू शकले नाही". त्यावर मारन म्हणतो, "मी रतन टाटा नाही. एक दिवस मी माझं स्वप्नं पूर्ण करेनच". दुसरी कडे मारनच्या ( जी. आर. गोपिनाथ) एअर डेक्कन विमान कंपनीवर लोभी विजय माल्ल्याची नजर असतेच. एक रुपयात विमान प्रवास झाला असता तर मजूर हा सुटाबुटावाल्या साहेबाच्या शेजारी विमानात बसला असता. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वत:च्या कंपन्यांचं अस्तित्व वाचवण्यासाठी अख्खी कॉर्पोरेट लॉबी मारनला संपवण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा शेवटच्या सीनमध्ये कष्टकरी, मजूर पहिल्यांदा विमानप्रवास करून बाहेर पडतात तेव्हा आपल्या डोळ्यातही पाणी येतं.
महागड्या एसी रेस्टॉरंटमध्ये मिळणारा 200 रुपयांचा डोसा आणि साध्या उडुपी रेस्टॉरंटमध्ये मिळणारा 20 रुपयांचा डोसा यामध्ये तसा काहीच फरक नसतो. उलट कधी कधी 20 रुपयांचा डोसा अधिक चवदार असतो. तसंच 2 तासाच्या विमानप्रवासात लोकांना कुठल्याही सुविधांची गरज नसते. तो खर्च कमी केला तर विमानाची तिकिटे निम्म्यापेक्षाही कमी किंमतीत येऊ शकतात, असं साधं सोपं गणित मारन मांडतो. चिमणी मुठभर दाणे खाऊन उंच आकाशात झेप घेते, कारण ती वजनानं हलकी असते. अगदी तसंच कमी वजनाची विमानं असतील तर इंधनावरही कमी खर्च होईल. त्यामुळे लोकांचं तिकिट आणखी स्वस्त होईल. कार्गो विमानांचं रुपांतर पॅसेंजर विमानांमध्ये करण्याचं मॉडेल मारन विकसित करतो. त्याचा हा प्रयोग सर्वच पातळीवर यशस्वी होऊ लागल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपन्या खोडा घालायला सुरुवात करतात. पण व्यवस्थेविरोधातला लढा मारन यशस्वीपणे लढतो.
मारनच्या या प्रवासात पत्नी सुंदरीची (अपर्णा बालामुरली) साथ खूप महत्वाची असते. खरं तर सुराराई पोट्टुरू हा सिनेमा मारन आणि सुंदरीच्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी आहे. सुंदरी ही एक मनस्वी, स्वाभिमानी स्त्री आहे. मारनच्या विमान प्रवास खाद्यपदार्थ विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन ती यशस्वी उद्योजिका बनते. जी. आर. गोपिनाथ यांच्या पत्नी भार्गवी यांनी 'द बन वर्ल्ड बेकरी'च्या माध्यमातून एका वर्षात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमात जी. आर. गोपिनाथ यांच्या पत्नी भार्गवीच्या (सुंदरी) भूमिकेत अपर्णा बालामुरली यांनी उत्तम काम केलंय. सूर्या आणि अपर्णा या दोघांच्या सहजसुंदर अभिनयासाठी सुराराई पोट्टुरू सिनेमा बघायला हवा.
स्वस्तात विमानप्रवासाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी 2000 साली युरोपात प्रवास केला. युरोपीय कंपन्या ईझी जेट आणि रायन एअर यांनी कमी खर्चात एअरलाईन्स कंपनी यशस्वीपणे चालवता येऊ शकते हे दाखवून दिलं होतं. कॅप्टन गोपीनाथ यांनी या कंपन्यांचा अभ्यास करून भारतातही ही संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ऑगस्ट 2003 मध्ये कॅप्टन गोपीनाथ यांनी दोन इंजिनच्या 48 सीटर विमानाची निर्मिती करून 'एअर डेक्कन' एअरलाईन्सची स्थापना केली. 2003 ते 2007 या तीन वर्षात कॅप्टन जी. आर गोपिनाथ यांनी एअर डेक्कन या लो कॉस्ट एविएशन कंपनीचं स्वप्न साकार केलं. पहिलं उड्डाण हुबळी ते बंगळुरू दरम्यान यशस्वीपणे पार पडलं. पुढच्या तीन वर्षात त्यांनी तब्बल 30 लाख भारतीयांना अवघ्या एका रुपयात विमानप्रवास घडवला. सुरुवातीला 2 एअरक्राफ्टच्या माध्यमातून सुरू झालेला एअर डेक्कन एअरलाईन्सचा व्यवसाय बहरला. या तीन वर्षांत 45 एअरक्राफ्टच्या माध्यमातून 67 एअरपोर्टवर एका दिवसांत 380 वेळा एअर डेक्कनचं विमान भरारी घेत असे. दररोज 25 हजार लोक या विमानांनी प्रवास करत. 70 टक्के मध्यमवर्गीय लोक एअर डेक्कननं प्रवास करत. त्यांनी विमानातली क्लास सिस्टम बंद केली. खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या आणि गरीब श्रीमंतीच्या भींती तोडल्या. लाखो छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी याचा लाभ घेतला.
जी. आर. गोपिनाथ यांचा हा फॉर्म्युला चार वर्षांपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकला नाही. कारण इंधनाच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. मेन्टेनेंस आणि इतर खर्चही पेलवत नसल्यानं जमाखर्चाचं गणीत बिघडलं. त्यामुळे एअर डेक्कन कंपनी डबघाईला आहे. नाईलाजानं कॅप्टन जी. आर. गोपिनाथ यांनी एअर डेक्कन एअरलाईन्सला विजय मल्ल्याच्या किंगफिशर कंपनीत विलीन केलं. माल्यानं एअर डेक्कन हे नाव बदलून किंगफिशर रेड केलं. पुढे ती कंपनीही दिवाळखोरीत निघाली. पण कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या हवाई क्रांतीमुळे देशातल्या गरीबांचा विमान प्रवासाचा मार्ग मोकळा केला होता. अनेक एअरलाईन्स कंपन्या भारतीय बाजारात स्वस्त तिकिटदरात सेवा पुरवू लागल्या. आज भारतात अनेक एअरलाईन्स कंपन्यांचे तिकिट दर सर्वसामान्य लोकांना परवडणारे आहे. हे कैप्टन गोपीनाथ यांनी घडवलेल्या क्रांतीचं फलीत आहे. एअरलाईन्स क्षेत्रातल्या नवोदित कल्पना आणि तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2014 साली भारत सरकारनं स्थापन केलेल्या उडान प्रोजेक्टसाठी सल्लागार म्हणून गोपीनाथ यांनी काम केलंय. कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांचं कार्य आकाशात भरारी घेऊ पाहणाऱ्यां सर्वांसाठी उर्जादायी आहे.
अमेझॉन प्राईमवर SOORARAI POTTRU या नावानं हा सिनेमा तमिळ भाषेत, तर हिंदीत UDAAN या नावानं उपलब्ध आहे.