कोरोनाने आपल्या आयुष्यात पाऊल ठेवलं त्याला आता एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेला. गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढा सुरू झाला. तो अजूनही सुरूच आहे. कधीही कल्पना न केलेल्या या संकटानं अनेकांची आयुष्य उघड्यावर आली. शेकडो जणांचा बळी घेतला. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणारे कोरोना योद्धेही सुटले नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर अनेक डॉक्टर्स परिस्थितीला हतबल झाले आहेत. रुग्णांसोबतच स्वत:च्या जीवाची काळजी घेणे हे देखील महत्त्वाचे असते. मात्र, रुग्ण संकटात असताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. रुग्णसेवा करताना राज्यातील अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांना आपल्या जीवाला मुकावे देखील लागले आहे. अशातच एका संध्याकाळी मी फिल्डवर असताना माझ्या कानावर बातमी पडली. डॉ. देवेंद्र कुचर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मी स्तब्ध झालो. बातमी कन्फर्म केली, खरी निघाली, तेव्हा मन सुन्न झाले.


सध्याच्या काळात एक ना अनेक बातम्या कानावर येतायत. नातेवाईकांमध्ये देखील अनेकांना कोरोना झाल्याने मुकावे लागले आहे. महाराष्ट्रात असं एक देखील घर नसेल ज्याच्या जवळच्या व्यक्तीला कोरोना झाला नसेल. सध्या रिपोर्टिंग करत असल्याने रुग्णांना वाचवण्याची डॉक्टरांची तळमळ त्यांच्यावरील ताण हे जवळून अनुभवत आहे. त्यात कुणाच्या जाण्याच्या बातम्या कानावर पडल्यावर तर मी अधिकच अस्वस्थ होतो. एमबीबीएसचं शिक्षण घेऊन होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणारे हे माझ्या ऐकीवात एकमेव असावेत. त्यांना जनरल प्रॅक्टीसचा दांडगा अनुभव होता. रोगनिदानात त्यांचा हातखंडा होता. डॉक्टरकी करताना त्यांनी सामाजिक बांधीलकीही जपली. जन सामान्यांचे आपले डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. 


डॉक्टरांची बातमी कानावर पडल्यानंतर लगेचच सर्व आठवणी समोर येऊ लागल्या. डॉ. कुचर आणि माझा संबंध तसा लहानपणापासूनचा होता. अगदी माझा पहिला कोवळा दात पडण्यापासूनचा! माझी आई होमिओपॅथी औषध घ्यायची. माझे वडील हे सुईधारी, एक सुई, आराम देई अशा याच्यात कोणती पॅथी चांगली हे न कळण्याच्या वयात मी साखरेसारखं गोड औषध निवडले. त्यात लहानपणी जशी सर्वांना सुईची भीती वाटायची तशी ती मलाही होती, म्हणून नाईलाजास्तव का होईना पण माझ्या देखील वाट्याला होमिओपॅथी औषध आलं. कोणती पॅथी चांगली हा वाद जरी घरी चालत असला तरी आमच्या घरी होमिओपॅथीचाचं विजय होत असे. सामान्य माणसासारखे माझे देखील आजार सामान्यच असायचे. ताप, सर्दी, खोकला आला की त्याच्या ईलाजासाठी डॉक्टर कुचर हे हमखास पर्याय असायचे. अशात मी देखील त्यांच्याकडे आनंदाने जात असे. कारण गोड औषध आणि ते स्वत: वर्षातून दोन-तीनदा माझी आणि त्यांची भेट होतच असे. डॉक्टर काकांचे सूर ज्याच्यासोबत जुळलेत त्यांच्याबरोबर ते अनेकदा ते गप्पा मारायचे, विचारपूस करायचे. मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यानं पुढचा विचार काय? हा प्रश्न देखील येत असे आणि अनेकदा यावर आमच्या चर्चा देखील होत असे. 


वय वाढत गेलं तसे आजारांचे स्वरुपही बदलत गेले. एकेकाळी चिकनगुनियासारख्या आजारानं मला ग्रासलं होतं,  होमिओपॅथीमुळे अनेक दिवस ताप कमी होईना. अशावेळी ॲलोपॅथी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. आयुष्यात पहिल्यांदाच रुग्णालयात भर्ती झालो होतो, अंगाला सुया लागल्या होत्या. आपला रुग्ण बरा होत नसताना त्याला बरे करणे हे डॉक्टरांचे पहिले कर्तव्य असते. अशात त्यांनी हे काम प्राधान्याने केलं. त्यानंतर मात्र, त्यांनी मला कधी ॲलोपॅथी औषधं घे असा सल्ला दिला नाही आणि सुदैवाने मला रुग्णालयात उपचारासाठी जावं देखील लागलं नाही.


औरंगाबादेत असताना फोनवरुन अनेकदा त्यांच्याशी बोलणं होत असे. इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय? हा प्रश्न पुन्हा समोर आल्यानंतर माझा पुढचा विचार मी पहिल्यांदा कदाचित त्यांच्याकडेच बोलून दाखवला असेल. 


डॉक्टरी पेशाला महत्त्व देताना त्याला व्यवसायी व बाजारीपणा कधीही आणला नव्हता. "रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा" या नितीने ते समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर मिळून मिसळून वागत होते. विदर्भातील दूर ठिकाणाहून डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी अनेक लोक मी स्वत: येताना पाहिले आहेत. अनेक दुर्धर आजारावर इलाज त्यांनी केलेत. अनेकांना गुण आल्याने त्यांच्या रुग्णालयात देखील मोठी गर्दी पाहायला मिळायची. गोरगरीब असो अथवा श्रीमंतीचा थाट असणारा रुग्ण त्याच्यावर उपचार सेवा करताना डॉक्टरांनी कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी कधीही उपचारासाठी भरमसाठ फी घेतली नाही. एमबीबीएसचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणं म्हणजे प्रवाहाविरोधात पोहोण्यासारखं होतं. अनेक होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांकडून ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करु देण्याची मागणी होत असताना होमिओपॅथी निवडणं खरंच धाडसाचं असतं. 


होमिओपॅथी ही स्वस्त आणि सर्वसामन्यांना परवडेल अशी पॅथी आहे, त्यात रुग्ण जर लवकर बरा होत नसेल तर इतर पॅथी आहेतच की तिच्या मदतीला अशी त्यांची धारणा असायची. पण, औषधांपेक्षा रुग्ण हा डॉक्टरने दिलेल्या धीरामुळे ठिक होत असतो आणि तसंच काहीसं डॉ. कुचरांमध्ये होतं. मागील एका वर्षात कोरोना काळात देखील अनेकांवर उपचारासाठी ते धडपड करत होते. अनेकांना बरे देखील केले. मात्र, अशातच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी कानावर पडली. शेवटी नियतीपुढे कोणाचेही काहीही चालत नाही हेच कटूसत्य आहे. ज्याने अनेकांना नवसंजीवनी दिली, ज्याने अनेकांना जगण्याची उमेद जागवली त्यालाच मृत्यूने अखेर गाठलेच. कुचर कुटुंबीयाने होमिओपॅथीला घराघरात पोहोचवले आहे. कदाचित होमिओपॅथीला राजाश्रय नसेलही पण डॉ. देवेंद्र कुचरांनी त्याला लोकाश्रय नक्की मिळवून दिला आहे. असा हा सच्च्या मनाचा अवलिया आपणा सर्वांचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघाला परत कधीही न येण्यासाठीच.