शिल्लक राहिलेल्या पातळ पोह्यांच्या चिवड्यात तळाशी उरलेलं मीठ चिवड्याची ‘गोडी’ वाढवत असतं.त्यात मुलांनी ‘भूक’म्हणताक्षणी जेमतेम चिरलेला कांदा,हाताला लागलेलं खोबरं-कोथिंबीर त्यावरून शेव पसरल्यावरची त्या चिवड्याची चव काय वर्णावी ? तीच गोष्ट चकलीच्या अर्धवट तुकड्यांची अधमुर्या दह्याबरोबरची.मोतीचूर लाडवांची (दिवाळीतून शिल्लक राहिलेच तर)वरतून जास्तीचं तूप सोडून जी काही चव लागते,त्याला त्रिखंडात तोड नाही.पण ही सगळी कॉंबीनेशन्स झाल्यावर अस्सल खवैय्यांना वेध तिखटाचेच लागलेले असतात.
एकतर दिवाळीचे दिवस म्हणजे डोळ्यापुढे येतो तो आसमंतात दूरवर पसरलेला गुलाजारांच्या शब्दातला “जाडोंकी नर्म धूप” वाला गारवा.खिशात दिवाळीच्या दिवसात आलेली गरमी असते,माहौलला चारचांद लावायला परिवार सोबत हजर असतो.
अश्यावेळी काही घरात दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाऊबिजेला, बहिणीच्या घरी भावांसाठी मटण,चिकनची ‘तिखट दिवाळी’ साजरी करायची पद्धत आहे.शाकाहारी घरात मात्र दिवाळीनंतरच्या तिखट खाण्याची हौस मसालेदार पदार्थ करूनच भागवली जाते.
उत्तर महाराष्ट्रात शेवभाजी,पातोड्या,गंडोरी केली जाते,सोबतीला तळलेला पापड असतोच.मराठवाड्यात तेलातल्या वांग्यासारख्या मसालेदार भाज्या केल्या जातात.
विदर्भात चंद्रपूरकडे मिळणाऱ्या भिवापुरी मिरच्या वापरून केलेल्या झणझणीत मसाल्यात भाज्या सोडल्या जातात.ह्या दिवसात नागपूरच्या सावजी हॉटेल्समधून शाकाहारी लोकांकडून तिखट,तेलकट तरीही चविष्ट ‘खसखस’लाही “बम्म डिमांड रहाते ना बाप्पा’ !
कोकणात निजामपूर,माणगाव पासून ते हरीहरेह्वर पट्ट्यात काळा वाटाणा,हरभऱ्याच्या उसळीतला रस्सा-वडा बनवला जातो होतो.तळकोकण,गोव्यात कांदाबटाट्याच्या आणि मिक्स भाज्यांच्या तिखट पातळ रस्यात बेकरीचा पाव बुडवून त्यावर आडवा हात मारला जातो.तिकडे कारवार,सदाशिवगडच्या बाजूला बटाट्याच्या भाजीचं सारस्वती पद्धतीचे मसाले वापरून ‘स्वॉन्ग’ करतात.नावातल्या साधर्म्याप्रमाणेच एखाद्या सुरेल गाण्यायेवढीच सुंदर भाजी असते.
“कोल्हापूरकर हे केवळ मांसाहारीच असतात आणि ते दिवसरात्र तांबडापांढरा रस्सा ओरपतात.जर शाकाहारी (कोणी)असलेच तर ते तिन्हीत्रिकाळ फक्त ‘मिसळ’ आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचाच खात असतात”,असा निव्वळ गैरसमज बाळगून उडपी हॉटेलात कोल्हापुरी जेवणार्यांनी,कधीतरी कोल्हापुरकडच्या अस्सल शाकाहारी घरात जेवणानिमित्त आवर्जून हजेरी लावावी.कोल्हापुरात शाकाहारी पदार्थाचीही तेवढीच रेलचेल असते,किंबहुना मांसाहारी पेक्षा जास्ती सरस शाकाहारी पदार्थ कोल्हापुरात बनवले जातात.
कृष्णाकाठावरून आलेल्या वांग्यांची भाजी कोल्हापुरच्या घाण्याच्या शेंगदाणा तेलात पडल्यावर ‘बोलक्या वांग्यांची’ बनून समोर येते.चंदगडकडून कोल्हापूर मार्केटमध्ये येणाऱ्या पालेभाज्यांमध्ये पोकळ्याची,हरभर्याच्या पानांची किंवा लसणाची फोडणी दिलेली अंबाडीसारख्या पालेभाज्या एकदा खाल्ल्या तरी कायम लक्षात रहाण्यासारख्या असतात.आजकाल ढाबा कल्चरनी बराच फेमस केलेला “आख्खा मसूर” त्याच्याबरोबरच्या भल्याथोरल्या रोटीबरोबर तोंडाची चव वाढवतो.
घरांत उन्हाळी सुट्टीत वाळवलेल्या मिक्स डाळीच्या ‘सांडग्यांची भाजी’ ह्या दिवाळीनंतरच्या दिवसात सांगली,कराड,कोल्हापूर पट्ट्यात हमखास केली जाते.कोल्हापुरात ‘डाळसांडगा’ ही म्हणतात त्याला.
पाटवडी,डाळकांदा असे तर्हेतर्हेचे प्रकार शाकाहारी मंडळींची क्षुधाशांती करतात.मलातरी फक्त कोल्हापूरकडेच आढळलेली दाण्याच्या कुटाची झटपट होणारी ‘खुदूकन’ ची रेसिपी आपली एकदम फेव्हरेट आहे.ह्याचं नाव जेवढं इंटरेस्टींग आहे तेवढ्याच सुंदर चवीची ही भाजी(?) असते.खाऊन बघितली नसेल,तर नक्की खाऊन बघा कधीतरी ! असल्या चटकदार भाज्या मांसाहारी लोकांनाही तात्पुरते का होईना पण मटण,चिकन विसरायला लावतात.
हे सगळे पदार्थ कितीही भारी असले तरी नाश्त्याला;रात्रभर भिजवून मोड आलेल्या कडधान्यात बटाट्याची भाजी घालून,त्यावर कांदालसूण मसाला घातलेल्या रश्याची मिसळ म्हणजे दिवाळीनंतरच्या तिखट पदार्थांचा सरताज असतो.
आज दिवाळीनंतरचा खाण्यावरचा पहिला ब्लॉग लिहिताना ह्याक्षणी मला कराडच्या ‘गजानन रेस्टॉरंट’ची खाल्लेली वेगळी मिसळ आठवली.आमचे मित्र सचिन कुलकर्णी ह्यांनी ह्याची कीर्ती अनेक महिने आधी सांगितली होती.पण भेट द्यायचा योग आला तो सुहास निकम ह्या आमच्या कराडच्याच मित्राबरोबर.
१९४८ साली कराडच्या बाजारपेठेत (हायवेपासून जेमतेम पाच मिनिट आत) मोक्याच्या जागी सुरु झालेलं लक्ष्मीनारायणजी आणि सरैय्या परिवाराच्या ‘गजानन’ची मिसळ एकदम हटके आहे.ह्यात भावनगरी शेव,फराळी चिवड्याबरोबरच भाजणीच्या चकलीचे तुकडेही(मार्केटच्या भाषेत चकली स्टिक्स) घातलेले असतात.वरतून ओतलेल्या पातळ रस्याखाली लपलेले चकलीचे तुकडे आपला क्रिस्पीनेस न सोडता ज्यावेळी दाताखाली येतात त्यावेळी खाण्याचा आनंद द्विगुणित करून मगच पोटात जातात.नेहमीची मिसळ खाऊन चेंज पाहिजे असेल तर ही मिसळ नक्की खाऊन बघा.त्यांच्याबरोबर इथले सँडवीचही नक्की टेस्ट करण्यासारखे.स्वीटडिश म्हणून सगळ्यात शेवटी खव्याचे लुसलुशीत गुलाबजाम असतात. ते दोनचार तोंडात पडेपर्यंत ह्या ‘गजानना’ चे दर्शन व्यर्थ आहे.शेवटी कितीही तिखट खाल्लं तरी जाताना तोंड गोड करायची पद्धत आहेच आपल्याकडे.
खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग :
खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?
खादाडखाऊ : जखमा उरातल्या
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे
खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड
खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं
खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ
खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’
खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची
खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी
खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा