आदिमकाळापासून काही ना काही रेखाटण्याचं वेड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, अश्मयुगात गुंफांमध्ये काढलेले चित्र असो, दगडांवर रेखाटलेलं लोकजीवन असो, दगडांवर कोरलेल्या मूर्ती असो, किंवा आजच्या जमान्यात घेतलेला एखादा सेल्फी असो. एखादी घटना, प्रसंग, लोकजीवन, संस्कृती, आभूषणं, निसर्ग हे सगळं एका चौकटीत कैद करण्याचं वेड जणू माणसाला जडलेलंच दिसतं. याच चौकटी पुढे जाऊन चित्रकला, मूर्तीकला, वास्तूकला, हस्तकलेच्या रुपात जगासमोर आल्या. अशातच 11 व्या शतकाच्या सुरुवातीला एका नव्या साधनाचा शोधाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते साधन होतं ‘कॅमेरा’. आणि याच कॅमेऱ्यानं पुढं जाऊन एका नव्या कलेला जन्म घातला, छायाचित्रण अर्थात फोटोग्राफी!
‘कॅमेरा’ हा मूळचा इटालियन शब्द ‘कॅमेरा आब्स्क्युरा’ या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ ‘अंधारी खोली’. पूर्वी फोटो घेण्यासाठी अंधाऱ्या खोलीचा वापर होत होता. आणि याच खोलीवरुन या नव्या साधनाला नाव मिळालं.
11 व्या शतकात अरबी संशोधक इब्न अल हजैन यांनी दृष्टी आणि प्रकाशाच्या परिवर्तनावर एक पुस्तक लिहलं. तब्बल 600 वर्षांनी म्हणजेच इस 1660 मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयल आणि रॉबर्ट हूक यांनी याच पुस्तकावर आधारित कॅमेऱ्याचं एक मॉडेल विकसित केलं आणि या जगातील पहिला कॅमेरा तयार झाला.
पण कॅमेऱ्याला खरे सोन्याचे दिवस आले, ते सन 1888 मध्ये. कारण फोटो फिल्म बनवणाऱ्या कंपनीनं आपला पहिला कॅमेरा बाजारात उतरवला... आणि त्याचं नाव होतं, ‘कोडॅक’.
‘कोडॅक’ हा छायाचित्रण विश्वातला मैलाचा दगड ठरला. जॉर्ज इस्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली. कोडॅकनं पहिला बॉक्स कॅमेरा बाजारात आणला, ज्याला फिक्स फोकस लेन्स होती, आणि तो सिंगल शटर स्पीडवर तो काम करायचा.
जॉर्ज इस्टमन
सन 1900 च्या दरम्यान कोडॅकनं ब्राऊनी नावाचा बॉक्स कॅमेरा बाजारात लॉन्च केला. आणि याच कॅमेऱ्यांना कोडॅकला कॅमेऱा विश्वातलं राजा बनवलं. या कॅमेऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 60 वर्ष म्हणजेच 1960 पर्यंत या कॅमेऱ्यानं बाजारावर राज्य केलं.
याच काळात कोडॅकसोबत अनेक कंपन्या 35 एमएमची कॅमेरा फिल्म बनवू लागल्या होत्या. त्यामुळं कोडॅकची मक्तेदारी मोडीत निघत होती. फिल्म कॅमेरा युरोपमध्ये घराघरात पोहचत होता.
1935 साली कोडॅकनं बाजारात रॅटीना आय नावाची कॅमेरा सिरिज उतरवली. जी लोकांमध्ये प्रचंड गाजली. या कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यात त्याकाळी तब्बल 135 कार्टरेज वापरले होते. पण हा तेवढाच महागही होता.
याच काळात टीएलआर आणि एसएलआर हे तंत्रज्ञान विकसित होत होतं. टीएलआर म्हणजे ट्विन लेन्स रिफ्लेक्ट, या प्रकारच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढण्यासाठी वेगळी लेन्स आणि व्हीव फाईंडरसाठी वेगळी लेन्स वापरली जात होती. त्यामुळं छायाचित्रकारानं पाहिलेलं छायाचित्र आणि कॅमेऱ्यातलं छायाचित्र यात थोडा फरक होत होता. तर दुसरं तंत्रज्ञान होतं एसएलआर, म्हणजेच सिंगल लेन्स रिफ्लेक्स. यामध्ये व्हिवफाईंडर आणि लेन्स ही एकमेकांना जोडलेली होती. त्यामुळं छायाचित्रकाराला हवा तोच फोटो घेता येत होता. आजही अत्याधुनिक डीएसएलआर म्हणजेच डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स तंत्रज्ञानाचाच वापर होतो.
1952 मध्ये जपानमध्ये ‘असाही’ ऑप्टीकल कंपनीनं आपली धमाकेदार कॅमेरा सिरिज बाजारात आणली, जी प्रचंड गाजली. हीच कंपनी पुढं चालून ‘पेन्टॅक्स’ नावानं ओळखली जाऊ लागली. तर जापानमध्येच एक दुसरी कंपनी उद्यास आली. जिच्या पहिल्या कॅमेऱ्याच्या मॉडेल्सनीच या कंपनीला प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं. आणि ही कंपनी होती ‘निकॉन’.
निकॉनची एफ सिरिज या काळात प्रचंड गाजली. आणि याच कॅमेऱ्याला तोड देण्यासाठी जपानमध्येच क्वॅनॉन या कंपनीनं आपले कॅमेरे बाजारात उतरवले. जी कंपनी आता कॅनॉन नावानं ओळखली जाते. कॅनोन शब्दाचा जापानी भाषेतला अर्थ होतो, बोधीसत्व.
आज प्रोफेशनल फोटोग्राफीच्या क्षेत्रात निकॉन आणि कॅनॉन याच दोन कंपन्यांची मक्तेदारी आहे. सोनीचं नावंही आता घेतलं जातं. दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसल्यानंतर, अणूबॉम्बच्या जखमा झेलल्यानंतरही जपानच्याच या तिन्ही कंपन्यांची जगाच्या छायाचित्रण क्षेत्रावर राज्य करत आहेत. तुमच्या आयुष्यातले अमुल्य क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी रोज नवनवीन कॅमेरे बाजारात उतरवत आहेत.
मोबाईलमुळे आज नक्कीच प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आला आहे. यामुळे महागड्या डीएसएलआर कॅमेऱ्यांचं क्रेझ कमी होईल असं भाकित वर्तवलं जात होतं. मात्र सध्यातरी असं होताना अजिबात दिसत नाही, हे कॅमेरे महागडे असतानाही बाजारात यांची प्रचंड विक्री होते. म्हणूनच फोटोग्राफी अर्थात छायाचित्रणात एवढी विविधता पाहायला मिळते.
कॅमेऱ्याच्या चौकटीतलं विश्व
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2017 08:19 AM (IST)
11 व्या शतकात अरबी संशोधक इब्न अल हजैन यांनी दृष्टी आणि प्रकाशाच्या परिवर्तनावर एक पुस्तक लिहलं. तब्बल 600 वर्षांनी म्हणजेच इस 1660 मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयल आणि रॉबर्ट हूक यांनी याच पुस्तकावर आधारित कॅमेऱ्याचं एक मॉडेल विकसित केलं आणि या जगातील पहिला कॅमेरा तयार झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -