गावा-गावात पूर्वी होत असलेला पैलवानाचा खेळ अनेकांनी पहिला असेल. त्यामध्ये गर्दीत जाऊन कोणालाही धक्का न लावता जागच्या जागेवर उडी मारणारा पैलवान आठवत असेल? त्याच्या त्या उडीला ते जामुवंत उडी म्हणतात. ही आठवण काढण्याचं कारण म्हणजे. महाराष्ट्राच्या राजकारणाची हवेचा रोख ज्यांना दिल्लीत बसून कळतो, त्या शरद पवार यांचं वक्तव्य आणि त्यामागचं कारण. बीड-लातूर-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघातील भाजपमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक आखाड्यात उतरलेले उमेदवार रमेश कराड यांनी गावच्या वेशीतील त्या पैलवानाच्या खेळाप्रमाणे अशी काही जागच्या जागी जामुवंत उडी मारली. की ती पाहून महाराष्ट्र्र थक्क झाला. कराडांच्या 'जामुवंत उडीचे' सोशल महाराष्ट्रात अनेक अर्थ निघाले. मात्र शाहूनगरीत अगदी सुसंस्कृत शब्दात पवारांनी त्या मागचा अन्वयार्थ सांगितला. 'निवडणूक लढायला कराडांकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी माघार घेतली'. निवडणूक नावाच्या व्यवहारात देशात सातत्यानं सुरु असलेलं अर्थकारण पवारांनी थेटपणे मांडलं. मग निवडणूक लढायला किती पैसे लागतात हे विचारलं जाऊ लागलं. राजकीय बाजारात काळ आणि वेळे नुसार भाव ठरतो. तसा निवडणुकीतील 'गांधी' सर्वांना ठाऊक आहे. मात्र आम्ही त्या गावचे नव्हेच असा पवित्रा बहुतेकांचा असतो. या अगोदरही अनेकांनी लक्ष्मीदर्शना बद्दल थेट बोललं. अशा वेळी थेट बोलणाऱ्यांच्या नावानं ओरड होते. पवारांच्या वक्तव्याची रेषा मुख्यमंत्र्यांनी पालघरच्या कार्यकर्ता मेळाव्यात थोडी लांब ओढली. मग आमच्याकडे कशी नैतिकता आहे, हे दाखवत साम, दाम, दंड, भेद या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप शिवसेनेनं जाहीर सभेत व्हायरल केली. आता अशा क्लिपने घायाळ होईल ती भाजप कसली. परंतु सध्याची राजकीय  स्थिती पाहिली तर यात मुख्यमंत्री वादाचं काय बोलले ? नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेनंही हा फॉर्म्युला वापरलाच की, म्हणून तर परभणीत बाजोरिया विजयी झाले. तर मराठवाडा कर्मभूमी आणि पश्चिम महाराष्ट्र जन्मभूमी असलेले शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी थेट विदर्भात विजयाचा गुलाल उधळला. सोईचं ते आपलं हाच नियम इथही लागू होतो.

पॉलिटिकल डिक्शनरीतून मूल्य, तत्व, नैतिकता हे शब्द केव्हांचे शिफ्ट डिलीट  झालेत. घराच्या भिंतीवर महापुरुषाचे फोटो टांगावेत, तशी त्यांची जागा आता इतिहासाच्या पानावर आहे. मात्र एकाच वेळी दोन तोंडानं राजकारणी बोलतात तेंव्हा इतिहासाच्या पानांमधून बाहेर डोकावून नैतिकताही हसायला लागते. 'हम करे सो कायदा' याप्रमाणे 'हम बोले ओ... नैतिकता'. अशी परिस्थिती सध्या सगळीकडे निर्माण झाली आहे. देशाच्या सोडा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील अलिकडची काही राजकीय वक्तव्ये रीवाईंड केली, की नेत्यांचा दुतोंडेपणा समोर येतो. याचं दर्शन सत्ताधाऱ्यापासून विरोधकापर्यंत सर्वत्र होतं. मोदी-शाह कार्यकाळात काँगेसला देशभरात सक्षम पर्याय निर्माण झाला. त्यामुळे पक्षांतराचे वारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाहत आहे. वाऱ्याच्या दिशेनं कोणी पाऊल टाकलं की, कालपर्यंत त्याच्या खांद्याला खांदा लावणाऱ्यांना देखील तो अस्पृश्य होतो. तर गुन्हेगारीचे आरोप करणाऱ्यांना पावन. लोकशाहीत कोणी कोणत्या पक्षात रहावं, हे ठरवण्याचा अधिकार घटनेनं प्रत्येकाला दिला आहे. पक्षांतराच्या राजकीय बेडूक उड्या मारल्या म्हणून कोणावर टीका करता येत नाही. जनता मतपेटीतून त्यांचा निकाल देते. अर्थात तुम्ही घटना मानत असाल तर. मात्र इथं स्वतःच्या सोईचे अर्थ लावले जातात आणि तसे शिक्के मारले जातात. ते सगळं राजकीय सोईचं. कोणी स्वतःचं पुरोगामी असल्याचा शिक्का मारतं, तर कोणावर देशद्रोही असल्याचा. अनेकांवर देशद्रोहाचा शिक्का मारला जात असताना  'भारत माझा देश आहे, आम्ही सर्व भारतीय आहोत'. ही प्रार्थना मात्र दररोज शाळेत सामूहिकपणे वाचली जात असते.

तिकडे औरंगाबादेत दंगलीच राजकारण आणि 'टुरिझम' सुरु आहे. मुस्लिमांनी दंगल केली. आम्ही हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असू, असं नरड्याच्या शिरा ताणून खासदार खैरेंनी सांगितलं. त्याच औरंगाबादमध्ये कचऱ्यामुळे दंगल झाली होती. त्यावेळी हिंदू वस्तीत देखील कचऱ्याचे डोंगर लागल्याची आठवण बहुदा खैरेंना नसावी. ते विसरले तर शार्प मेमरीचे आमदार इम्तियाज जलील त्यांना आठवण करुन द्यायला आहेत म्हणा, अनेक कार्यक्रमात खैरेंच्या मांडीला मांडी लाऊन बसणाऱ्या इम्तीयाज जलील यांनी दंगलीनंतर शहरवाशीयांच्या काळजीपोटी सध्याच्या डिजिटल इंडियात खैरेंना खुलं पत्र पाठवलं. त्याला खैरेंनीही जशास तसं उत्तर दिलं. शांतीदूत व्हायचं असेल, तर थोडी हिंमत दाखवत असंच एखादं पत्र दहा मिनिटं पोलीस हटवा म्हणणाऱ्या छोट्या साहेबांनाही पाठवावं. पत्र शक्य नसेल तर औरंगाबाद भेटीवर आल्यानंतर कानात सांगितलं तरी चालेल. तरुणांची माथी भडकू नये, ही तळमळ खैरेंनी व्यक्त केली. दोघांनी आपल्या राजकीय परीक्षेसाठी लिहिलेल्या या पत्रांना किती मार्क पडणार त्याचं उत्तर काळचं सांगेल.

राजकीय कोलांट उड्या सतत सुरु असतात. मात्र अलिकडे पालघर आणि ठाण्यात झालेल्या दोन पक्षांतरा नंतरच्या प्रतिक्रियाही सोईची नैतिकता सांगतात. शिवसेनेचं रक्त हे अशुद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी वनगांच्या बाबतीतला नियम निरंजन डावखरेंच्या बाबतीत सोईस्कर विसरले. शिवाय पालघरच्या प्रतिउत्तराच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी पुढचं पाऊल टाकलं. निवडणूक प्रचारासाठी शिवसेनेनं वृत्तपत्राला दिलेल्या जाहिरातीत वनगांचा फोटो वापरला नाही. निवडणुकीनंतर मातोश्रीची दारं श्रीनिवास वनगांना बंद होणार हे मुख्यमंत्र्यांनी पेपर उंचावत सांगितलं. याच वेळी 'शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ'  या भाजपच्या प्रचार वाक्यासोबत दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलेली आभाराची जाहिरात व्हायरल होत होती. ज्यात शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. राजकीय जुमलेबाजी, महाराजांचं नाव, विरोधकांची आवेशपूर्ण भाषण आणि सो कॉल्ड नैतिकता हे सगळं आता जनतेला सवयीचं झालं आहे. त्यामुळे जनतेला साले म्हणा किंवा एकमेंकांना नाग, माकड, मुंगूस, मांजर असं काहीही बोललं तरी चालतय. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे जो तो रेटून बोलतोय. आता निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वपक्षीय नेत्यांकडून असेच 'हम बोले ओ... नैतिकता'  याचे अनेक प्रयोग रेटून चालवलेले पहायला मिळणार आहेत...