आपण ज्या परिसरात राहातो, वाढतो, त्याच्याशी आपलं एक घट्ट नातं निर्माण होतं. आपल्या आईवडिलांप्रमाणे तुम्हाला तुमची राहाती जागा, तो परिसर बरंच काही देऊन जात असतो. संस्काराचं आदान प्रदान करत असते. माझ्या बाबतीत गिरगावशी माझं असलेलं नातं अगदी असंच आहे. माझा जन्म वरळीतला. आजीकडे सुरुवातीची दोन-तीन वर्षे वाढलो. त्यामुळे जांबोरी मैदान-वरळी परिसराशी खास जिव्हाळा आहेच. म्हणजे नवरात्रोत्सवात एक दिवस तरी तिकडे जत्रेला आणि दर्शनाला आवर्जून जाण्याचा माझा प्रयत्न असतो, पण त्यानंतरच्या काळात सीनियर केजीपासूनचं माझं सगळं शिक्षण आणि आतापर्यंतची वाटचाल गिरगावातली. त्यामुळे गिरगावशी असलेलं नातं शब्दापलिकडचं आहे. शाळा, कॉलेज, पहिल्यांदा दै. नवशक्ति आणि आता एबीपी माझा या प्रवासात गिरगावने मला खूप साथ दिली आहे. त्याच गिरगावसाठी आपण काहीतरी करावं, असं गेल्या काही वर्षांपासून मनात होतं. त्याला अखेर यावर्षी मूर्त रुप आलं आणि 'आपलं गिरगाव दिनदर्शिका 2020' चा जन्म झाला.
काळानुरुप बदलत जाणारं गिरगाव हे वास्तव असलं तरी या गिरगावच्या सांस्कृतिक, वैचारिक श्रीमंतीची जपणूक करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे कॅलेंडर. या कॅलेंडरच्या निर्मितीसाठी खरं तर अनेक मंडळींचं छोटंमोठं योगदान आहे. तरीही चार जणांची नावं इथे घ्यायलाच हवीत. अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर या दोन ज्येष्ठ पत्रकार, लेखकांसोबतच शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ आणि बाळा अहिरेकर. पुराणिक आणि दिलीप ठाकूर हे माजी गिरगावकर. म्हणजे फक्त शरीराने. मनाने इथेच असतात. याच धाग्याने आम्ही एकत्र आलो. दिलीप ठाकूर हे नवशक्तिमधले माझे ज्येष्ठ सहकारी. पण, पुराणिक सरांशी ओळख झाली ती एबीपी माझामुळे. माझाच्या 'फ्लॅशबॅक' या कार्यक्रमाने आम्हाला एकत्र आणलं, त्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांना खास धन्यवाद. त्यांच्यामुळे तीन गिरगावकर एकत्र आले आणि कॅलेंडरचा जन्म झाला असंच मी म्हणेन. पुराणिक सर मुंबईचे ज्येष्ठ अभ्यासक, पॅशनेट गिरगावकर. तर दिलीप ठाकूर म्हणजे सिने क्षेत्राचं गुगलच जणू. तेही कट्टर गिरगावकर.
एकदा असेच तिघेजण गप्पा करत होतो, तेव्हा गिरगावचा विषय निघाला. ही दोन्ही मंडळी म्हणजे अनुभवाची खाण असल्याने निरनिराळ्या विषयांचे संदर्भ चुटकीसरशी सांगत होते दोघेही. तेव्हाच मनात आलं, गिरगाव या संकल्पनेभोवती हे विषय गुंफण्याचा प्रयत्न करु. चाळ हा विषय साहजिकच ओघाने आला. चाळीत घराच्या दरवाजांसोबत मनाचे दरवाजेही सदैव उघडे असतात. याचा प्रत्यय आम्हा तिघांनाही वेळोवेळी आलाय. टॉवरच्या जमान्यातही चाळ संस्कृतीची मूळं किती घट्ट रुजलीत, हे दाखवणं गरजेचंच. त्याचसोबत मग कला, साहित्य, राजकीय, खाद्यसंस्कृती असे विविध 12 विषय निवडले. प्रत्येक विषयातली गिरगावची श्रीमंती, सुदृढता त्याबद्दलची माहिती गोळा करताना कळल्याने छाती अभिमानाने फुलून आली. त्याचसोबत सांस्कृतिकदृष्ट्या इतक्या समृद्ध भागात आपण राहतोय, हे आपलं भाग्यच असंही मनात आलं. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील गिरगावपासून ते मेट्रोच्या वेगाने धावू पाहणाऱ्या गिरगावचा प्रवास या 12 विषयांच्या माध्यमातून लेखांमध्ये आणण्याचा प्रयत्न या कॅलेंडरमध्ये केला.
त्यासोबत विविध क्षेत्रातील 14 नामवंत व्यक्तींशी संवाद साधला ज्या गिरगावच्या आजी-माजी रहिवासी होत्या, आहेत किंवा ज्यांच्या करिअरमध्ये गिरगावचा मोलाचा वाटा आहे. त्यांना एकच प्रश्न विचारला, गिरगावने तुम्हाला काय दिलं?
ज्येष्ठ नाट्य कलावंत जयंत सावरकर यांना मी जेव्हा या प्रतिक्रियेसाठी फोन केला, तेव्हा शब्दागणिक त्यांचा स्वर अश्रूंमध्ये भिजून गेला, गिरगावबद्दल बोलताना ते खूप भावूक झाले होते. अश्रूंमधून जणू आठवणीच वाहत होत्या झऱ्यासारख्या.
रमेश देव, सीमाताई, अशोक सराफ, निवेदिता सराफ, मिस्टर 'व्हाईट अँड व्हाईट' अर्थात आमचे गिरगावकर मुळ्येकाका सगळेच जण गिरगावबद्दल बोलताना त्यांच्या प्रवासात डोकावत होते, इमोशनल होत होते. भरभरुन बोलत होते, गिरगावबद्दल बोलताना जणू अंतरंगात पाहून ते गतकाळातील क्षण पुन्हा पुन्हा जगत होते. हे कॅलेंडर साकारणं, माझ्यासाठी खूप काही देऊन जाणारी प्रोसेस होती. अनेकांचं मोठेपण नव्याने कळलं, अनेकांचं पहिल्यांदाच.
आमची टीमही छान जमली कॅलेंडरसाठी. ठाकूर आणि पुराणिक हे वय, अनुभवासह या क्षेत्रातील योगदान, अशा सर्वच बाबतीत कैक पटीने ज्येष्ठ. मात्र दोघांचं मोठेपण हे की, त्यांच्या वयाची, ज्येष्ठत्वाची भिंत त्यांनी पाडून टाकली. मी या कॅलेंडरच्या निर्मितीच्या वेळी जे काही स्पष्ट विचार मांडले, सूचना केल्या. त्या त्यांनी ऐकून घेतल्या, स्वीकारल्याही. (गिरगावकर असल्याने अॅडजस्ट होणं, गोष्टी स्वीकारणं आमच्या रक्तात आहे. हे तिघेही जाणून आहोत)
अशी एनर्जेटिक आणि दुसऱ्याच्या मताचं मूल्य जपणारी मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करायला, तुमच्यासोबत काम करायला असतील तर हुरुप मिळतो, कितीही काम केलं तरी थकवा जाणवत नाही. साधारण दीड-दोन महिन्यात या कॅलेंडरसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. त्याच वेळी न्यूजचॅनलमध्ये काम करत असल्याने, त्यात सतत घडामोडी घडत असल्याने ऑफिसमधील कामाचीही गडबड होतीच. ते सांभाळून या कॅलेंडरच्या कामाकरता कोणतीही रजा न घेता हे कॅलेंडर पूर्ण केलं, याचं खास समाधान आहे. प्रिंटिंग, डिझायनिंगचं काम बाळा अहिरेकर यांनी जीव तोडून केलं. प्रसंगी आपल्याकडे असलेल्या व्यावसायिक कामांकडेही दुर्लक्ष करत कॅलेंडरसाठी झोकून देत वेळ दिला. सकपाळ यांनीही कॅलेंडरच्या निर्मितीसाठी पाठबळ दिलं ते महत्त्वाचंच.
कॅलेंडरच्या प्रकाशनाचा क्षण मात्र माझ्याकडून हुकला, याची रुखरुख कायम राहील. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यव्यस्ततेमुळे अगदी दोन-तीन तासच आधी कळलं, की त्यांची वेळ मिळाली आहे अन् आजच (म्हणजे त्या दिवशी शनिवारी 11 तारखेला) प्रकाशन होणार आहे. मी ड्युटीवर होतो. त्यामुळे पोहोचणं शक्य झालं नाही. त्याची चुटपुट लागून राहिली. 99 धावांवर पोहोचल्यावर इनिंग संपली किंवा पाऊस पडला तर एखाद्या बॅट्समनला त्या क्षणी जे वाटेल तसेच भाव माझ्या मनात आले. काही गोष्टी तुमच्या नशिबात नसतातच. काही वेळा परिस्थितीमुळे तर काही वेळा काही माणसांमुळे. त्यामुळे त्याची खंत बाळगत बसलो तर कॅलेंडर साकारल्याचा, ते प्रत्यक्षात आल्याचा आनंद, समाधान गमावून बसेन. त्यामुळे मनामध्ये रुखरुख असली तरी माझ्या गिरगावच्या, नव्हे आपल्या गिरगावच्या या कॅलेंडरचा हा क्षण साजरा करण्याचंच ठरवलंय तुम्हा मंडळींच्या प्रतिक्रियांची, सूचनांची वाट पाहत.